डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लोककल्याण आघाडी व मतदार-आमसभा स्थापन करा

सर्व राजकीय पक्षांनी, पिण्याचे स्वच्छ पाणी देशभर पुरविले जाईल, आरोग्यविषयक सुविधा खेड्यांपर्यंत नेण्यात येतील, स्त्रिया व मुले यांची काळजी घेतली जाईल आणि सर्व देश साक्षर करून शिक्षणावर अधिकाधिक खर्च केला जाईल अशी मोघम आश्वासने आपापल्या निवडणूक जाहीरनाम्यातून दिलेली आहेत. भाजपाचा मुख्य आधार हिंदुत्व हा आहे. तर काँग्रेस, जनता दल, समाजवादी पक्ष आणि दोन्ही कम्युनिस्ट पक्ष हे आपण 'सेक्युलर' आहोत असे ठामपणाने म्हणत आहेत.

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भारताच्या राजकीय जीवनाला वेग येणे अपरिहार्य होते. परंतु बहुतेक सर्व पक्षांतील प्रमुख नेत्यांवर कसली ना कसली तरी तोहमत आलेली असल्यामुळे निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून नेमके काय घडेल याचा अंदाज करणे कठीण होते. कोणते पक्ष एकत्र येणार, कोणते पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार, कोणती जुनी वैरे संपणार आणि कोणामध्ये कोणते नवे शत्रुत्व निर्माण होणार याबद्दल चर्चा सर्वत्र चालू होती. निश्चित काही सांगणे भल्याभल्या राजकीय पंडितांना शक्य झाले नाही. उमेदवारी अर्ज भरेपर्यंत वाटाघाटींचा घोळ चाललाच होता. आता चित्र थोडेबहुत स्पष्ट झालेले दिसते. तरी देखील एप्रिल महिन्यात आणखी काय घडेल हे सांगणे कठीणच आहे.

राजकीय पक्ष हे विचारांवर आधारलेले असले तर समविचारी पक्षांची एकजूट होऊ शकते. भारतातील प्रमुख राजकीय पक्षांच्या भूमिकांना कोणत्या विचारसरणीचा आधार आहे हे सांगणे कठीण नाही. काँग्रेस पक्षाने मुक्त अर्थव्यवस्थेचा पूर्णपणे स्वीकार केला आहे. भारतीय जनता पक्षालाही हेच धोरण मान्य आहे. मधून मधून संघातील जुने नेते स्वदेशीची डरकाळी फोडत असले तरी भाजपाने एन्रॉनशी नव्याने केलेल्या कराराला विरोध न केल्यामुळे स्वदेशीचा आव आणला तरी प्रत्यक्षात सर्व संघ परिवार मुक्त अर्थव्यवस्थेलाच पाठिंबा देणार हे उघड आहे. उजवे आणि डावे कम्युनिस्ट आणि जनता दलातील काही नेते बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात फारसा वाव देऊ नये असे म्हणत असले तरी ज्या राज्यांमध्ये या पक्षांच्या हातात सत्ता आहे तेथे बहुराष्ट्रीय कंपन्यांना भरपूर वाव देण्यात आला आहे. यावरून आर्थिक क्षेत्रात वैश्विकीकरणाच्या (ग्लोबलायझेशनच्या) प्रवाहापासून भारत दूर राहू शकणार नाही हे आता उघड झाले आहे.

सर्व राजकीय पक्षांनी, पिण्याचे स्वच्छ पाणी देशभर पुरविले जाईल, आरोग्यविषयक सुविधा खेड्यांपर्यंत नेण्यात येतील, स्त्रिया व मुले यांची काळजी घेतली जाईल आणि सर्व देश साक्षर करून शिक्षणावर अधिकाधिक खर्च केला जाईल अशी मोघम आश्वासने आपापल्या निवडणूक जाहीरनाम्यातून दिलेली आहेत. भाजपाचा मुख्य आधार हिंदुत्व हा आहे. तर काँग्रेस, जनता दल, समाजवादी पक्ष आणि दोन्ही कम्युनिस्ट पक्ष हे आपण 'सेक्युलर' आहोत असे ठामपणाने म्हणत आहेत. तेलगु देसम् मधील दोन गट ए.आय.डी.एम्.के. आणि डी.एम्.के., शिवसेना आदी प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामेही लोककल्याणाचा भोंगळ दावा करणारेच आहेत. एकूण विचारांपेक्षा पक्षांचे हितसंबंध अधिक प्रभावी ठरले असून या हितसंबंधांच्या संरक्षणासाठी तत्त्वशून्य आघाड्या निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसला तमीळनाडूमध्ये कोणाला पाठिंबा द्यावयाचा याचा दीर्घकाळ निर्णयच घेता आला नाही. कारण नरसिंहराव व दिल्लीतील अन्य काही काँग्रेसचे नेते जयललितांना अनुकूल तर मूपनार व तमीळनाडूतील काँग्रेस ही जयललितांच्या विरोधी अशी स्थिती होती. अखेर काँग्रेस जयललिता समझोता झाला. पण मूपनार गटाने बंड करून द्र.मु.क.शी युती केली आहे.

राष्ट्रीय आघाडी आणि डावी आघाडी बऱ्याच ठिकाणी एकत्र असली तरी डावे पक्ष आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडूंना अनुकूल आहेत. तर राष्ट्रीय आघाडी पार्वती अम्मांच्या गटाला पाठिंबा देत आहे. चंद्रशेखर आणि फर्नांडीस यांचे पक्ष एकमेकांत विलीन झाले असून लालूप्रसादांच्या विरोधात हे दोन सेक्युलर नेते भाजपाशी हातमिळवणी करीत आहेत. बंगालमध्ये जनता दलाला तुच्छतेने वागविणाऱ्या सी.पी.एम्. आणि सी.पी.आय्.ने बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या पुढे गुडघे टेकले असून उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव यांना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांच्या मोहब्बतीने काही जागा मिळविणे इतकाच त्यांचा मर्यादित उद्देश आहे. भारतीय जनता पक्षाला चंद्रशेखर व फर्नाडीस यांचा बिहारमध्ये पाठिंबा हवा आहे. परंतु उत्तरप्रदेश व हरियाणामध्ये मात्र भाजपा व चंद्रशेखर आणि भाजपा व देविलाल, चीताला यांचा एकमेकांना सक्त विरोध आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युती आहे. परंतु अखिल भारतीय पातळीवर त्यांचे सवते सुभे आहेत. आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल कुमार महंत यांना उजवे व डावे कम्युनिस्ट शिव्या देत. उलट गणपरिषद ही कम्युनिस्ट हे आमचे व देशाचे एक नंबरचे शत्रू आहेत असे तीनही पक्ष म्हणत असत. गेल्या निवडणुकीत हे एकमेकांचे हाडवैरी आता एकत्र आले असून या संधिसाधू आघाडीचे तात्विक समर्थन करीत आहेत. या संधिसाधू वृत्तीतून निर्माण झालेल्या आघाड्यांमुळे सर्व राजकीय पक्षांवरील लोकांचा विश्वास अधिकच ढासळला आहे आणि कोण कोठे उभे आहे हे कोणालाच कळेनासे झाले आहे.

मतदारांनी मत हे दिलेच पाहिजे हे सर्वांना पटते. परंतु कोणत्याच पक्षाला पाठिंबा द्यावासा वाटत नाही अशी मतदारांची मनःस्थिती आहे. अशा परिस्थितीत सामाजिक कार्य करणाऱ्या काही गटांनी मतदारांच्या मार्गदर्शनासाठी एक आघाडी करावी असे आम्हांला वाटते. सुंदरलाल बहुगुणा, वंदना शिवा आदी पर्यावरणवादी नेत्यांच्या संघटना, मेधा पाटकर आणि प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त यांच्या पुनर्वसनासाठी कार्य व चळवळी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे सर्व गट, सर्व स्त्री हक्कवादी संघटना, मानवी हक्कांसाठी काम करणारे गट, दलित व आदिवासींच्या सहकार्याने सामाजिक समतेसाठी झटणारे कार्यकर्ते, लहान मुलांवरील अन्याय दूर व्हावेत यासाठी क्रियाशील असलेले कार्यकर्ते, ग्राहकांच्या हितसंबंधांसाठी कार्य करणाऱ्या सर्व संघटना, साक्षरता आंदोलनात कार्य करणारे, शिक्षण क्षेत्रामधील गैरप्रकार नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते, व्यसनमुक्तीसाठी व विशेषतः दारुबंदीसाठी झटणाऱ्या संस्था आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कार्यतत्पर असलेले कार्यकर्ते यांनी एक आघाडी करून जनतेचा जाहिरनामा तयार करावा. विविध प्रश्नांवर सभा घेऊन मतदारांचे शिक्षण करावे आणि पक्षीय भूमिका न घेता जनहितदक्ष आणि चारित्र्यवान उमेदवारास मत द्यावे असे मतदारांना सांगावे. बऱ्याच वर्षांपूर्वी जयप्रकाश नारायण यांनी प्रत्येक मतदार संघात मतदारांनी आपली मतदार-आमसभा (व्होटर्स कौन्सिल) तयार करावी अशी कल्पना मांडली होती. 

आजच्या परिस्थितीत अशी मतदार-आमसभा जास्तीत जास्त मतदारसंघांत निर्माण करण्यासाठी बॅ. तारकुंडे यांच्या नेतृत्वाखालील पी.यु.सी.एल्.ने पुढाकार घ्यावा. या प्रयत्नांतून सर्वत्र योग्य उमेदवार जरी निवडून आले नाही, तरी मतदारांचे शिक्षण होईल आणि राजकीय पक्षांवर दबाव येऊ शकेल. राजकीय पक्षांच्या संधिसाधू आघाड्यांना उत्तर म्हणून वर उल्लेखिलेल्या क्रियाशील संस्था, संघटना व व्यक्तींची लोककल्याण-आघाडी आणि या आघाडीस पूरक अशा मतदार-आमसभा निर्माण करणे हे देशातील विचारवंतांचे आणि जनहितदक्ष कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.

Tags: आघाडी डावी हिंदुत्व भाजप निवडणुक लोकसभा Congress BJP Elections Loksabha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके