इंदिरा गांधींपेक्षा आपण अधिक पुरोगामी आहोत असे दाखवून आपण लोकप्रिय ठरू शकू, असा अटल बिहारीप्रभृतींचा आडाखा असावा. आणि असा प्रयत्न हास्यास्पद असून तो कधीही यशस्वी होणार नाही. उलट परंपराप्रिय जनतेला आपल्याकडे वळवण्यासाठी स्वतंत्र आणि संघटना-काँग्रेसपेक्षाही अधिक उजवे आपण आहोत हे दाखवणे श्रेयस्कर आहे, बसे बलराज मधोकांचा गट मानीत असावा.
श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी जनसंघाच्या अध्यक्षपदाची धुरा श्री. लाल कृष्ण अडवाणी यांच्या हाती दिली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघाचे कानपूर अधिवेशन पार पडले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जींनंतर वाजपेयींइतका दुसरा लोकप्रिय नेता जनसंघाला लाभला नाही. त्यामुळे लोकाग्रहास्तव तेच पुन्हा जनसंघाच्या अध्यक्षपदी विराजमान होतील अशी अनेकांची अटकळ होती ती खोटी ठरली. अटलबिहारी अध्यक्ष होत नाहीत हे निश्चित झाल्यावर जनसंघाच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते त्याबद्दल स्वाभाविकच कुतूहल निर्माण झाले होते.
ग्वाल्हेरच्या राजमातेचे नाव या संदर्भात पुढे आले तेव्हा त्यात अस्वाभाविक असे कोणालाच काही वाटले नाही. उलट ते नाव डावलले गेले तेव्हाच कित्येकांना धक्का बसला! जनसंघ हा राजे-महाराजे यांच्या कच्छपी लागलेला भांडवलदार-जमीनदार यांच्याबद्दल जवळीक बाळगणारा आणि चातुर्वण्यवादी गोळवलकर गुरुजींचा उदो उदो करणारा पक्ष आहे, ही सर्वसामान्य लोकांत प्रतिमा पुसून काढण्यासाठी ग्वाल्हेरच्या राजमातेला अध्यक्षपदापासून दूर राखण्याचा प्रयत्न करणे भागच होते.
त्यामुळे लाल कृष्ण अडवाणींच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. त्या मानाने लाल कृष्ण अडवाणी हे फारसे प्रसिद्ध नेते नाहीत. बलराज मधोक, मनोहर लाल सोंधी यांचीदेखील बरोबरी ते करू शकणार नाहीत. अटलबिहारींची बरोबरी करण्याची तर गोष्टच सोडा, पण मधोक-सौंधी-टंडन यांचे जनसंघाच्या प्रचलित नेतृत्वाशी बनत नसल्याने त्यांना डावलण्यासाठी अडवाणींना अध्यक्ष करण्यात आले असावे, आणि त्यांनी आपली अपेक्षित कामगिरी चोखपणे पार पाडली.
राजकीय पक्षांचे काही लोकप्रिय आडाखे असतात आणि त्यांच्याबद्दल त्या त्या पक्षश्रेष्ठींना दुर्निवार आकर्षण आणि श्रद्धा असते. ही नाणी झिजल्याचेही त्यांच्या क्वचितच ध्यानी येते. इंदिरा गांधी या रशियाच्या अंकित असून भारताला त्यांनी रशियाचे मांडलिक बनवले आहे. हा जनसंघवाद्यांचा सतत घोशा चालू असतो. जगाची राजनीती आज अशी प्रवाही बनली आहे की, व्यवहारवादाचा आश्रय घेऊनच प्रत्येक जण पावले टाकीत आहे. चीन-अमेरिकेचे जमलेले सूत हे त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण होय. अशा स्थितीत कोणतीही महत्वाकांक्षी व्यक्ती स्वत:ला किंवा आपल्या देशाला कोणाच्या कायमची अंकित करील ह्या बकवासावर कोण विश्वास ठेवील? अमेरिकेशी व चीनशी संबंध सुधारण्याची जाहीर घोषणा केल्यावर व तशी पावले पडताना दिसल्यावर आपले पंतप्रधान आणि आपला देश कोणाकडे गहाण पडला आहे हे म्हणणे म्हणजे आत्मग्लानीने आपण किती ग्रस्त आहोत तेच प्रकट करण्यासारखे आहे.
जनसंघाचे नेते हा उद्योग निरलसपणे करत आहेत. आर्थिक दुरवस्था आणि नियोजनाचे अपयश ह्या गोष्टी सर्वमान्य आहेत. पण त्यावर रचनात्मक तोडगा कोणता, आणि त्याबद्दल विश्वास बाळगावा असा कोणता विचार जनसंघाने दिला आहे असे पाहू गेले तर उत्तर नकारार्थीच येते. पुन्हा एकदा राज्यपुनर्रचना समितीची निर्मिती करावी अशी जनसंघाने मागणी करणे, हे त्यांच्या कोडगेपणाचे लक्षण समजावे की त्यांच्या गतिशीलतेचे- ते त्यांचे तेच जाणोत!
जनसंघ सध्या वैचारिक वावटळीत सापडला आहे आणि पर्यायी राष्ट्रीय पक्ष म्हणून जनसंघाची प्रतिमा समाजमानसात निर्माण व्हावी यासाठी परस्परविरोधी नुस्खे घेऊन अनेक वैद्यराज उभे आहेत, असे दृश्य दिसते! एकच प्याल्यातील तळीरामाची प्रकृती तपासण्यासाठी उपस्थित असणान्या भोंदू वैद्य व खोट्या डॉक्टरांच्या निदानासारखी जनसंघाची आज स्थिती झाली आहे. इंदिरा गांधींपेक्षा आपण अधिक पुरोगामी आहोत असे दाखवून आपण लोकप्रिय ठरू शकू, असा अटल बिहारीप्रभृतींचा आडाखा असावा. आणि असा प्रयत्न हास्यास्पद असून तो कधीही यशस्वी होणार नाही.
उलट परंपराप्रिय जनतेला आपल्याकडे वळवण्यासाठी स्वतंत्र आणि संघटना-काँग्रेसपेक्षाही अधिक उजवे आपण आहोत हे दाखवणे श्रेयस्कर आहे, बसे बलराज मधोकांचा गट मानीत असावा. या संघर्षात बलराज मधोकांची पिछेहाट झाल्यासारखे वरवर पाहता वाटले तरी ते खरे नाही. खरे म्हणजे मधोक यांची भूमिका जनसंघाच्या चरित्राशी अधिक सुसंगत असून उत्तर प्रदेशातील गेल्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने तोच कदाचित अधिक उपयोगी पडेल. त्यामुळे स्वतंत्र, संघटना काँग्रेस हे संघटनात्मक दृष्टया दुर्बळ पण साधनसामग्रीच्या दृष्टीने सबळ पक्ष जवळ येतील, आणि बहुधा त्यांना गिळंकृतही करता येईल, असा मधोकांचा आडाखा असावा.
जनसंघाचा फार मोठा आधार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आहे, ही गोष्ट कोणीही लपवू शकणार नाही. हा आधार ज्याला लाभेल त्याची सरशी होईल हे उघड आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आता तितकासा एकसंध राहिलेला नाही. पुरोगामी अर्थकारण व समाजकारण केल्याशिवाय हिंदू समाजालाही त्या अर्थाने व लोकशाही मार्गाने संघटित करता येणार नाही असे मानणारी मंडळी संघातही वाढती आहेत. गोळवलकर गुरुजींचा चातुर्वर्ण्य पुरस्कार आणि समान नागरी कायद्याबाबतचा आग्रह ह्या मंडळींना नापसंत आहे. याउलट सांस्कृतिक कार्य म्हणजे परंपरांचे जतन करणे, व जुन्या काळी हा देश बलवान व एकात्म होता असे मानून तो काळ पुन्हा आणला पाहिजे असे मानणे, असे समजणारीही बरीच मंडळी बाहेत. त्यामुळे जनसंघातील या किंवा त्या गोटाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सर्वस्वी विसंबून राहता येणार नाही.
Tags: अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघ बलराज मधोक मनोहरलाल सोंधी गोळवलकर गुरुजी M. S. Golwalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या