डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

महाराष्ट्रात क्रियाशील कार्यकर्त्यांच्या अशा वेगवेगळ्या चुली किती आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे. इतकेच कशाला, अण्णा हजारे यांच्या दौऱ्याची व्यवस्था कोणी ठेवायची यावरून दोन गट एकमेकांविरुद्ध निदर्शने करण्याचा पवित्रा घेतात. हे सर्व पाहिले की महात्मा गांधींचे मोठेपण पुन्हा एकदा तीव्रपणे लक्षात येते.

राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षात चाललेल्या अंतर्गत दुफळीमुळे आम्हांला खेद वाटतो. असाच खेद आम्हांला जनता दल, काँग्रेस आदी पक्षांतील अंतर्गत संघर्षामुळेही होतो. याचे कारण भारतीय लोकशाहीची वाटचाल यशस्वीपणे व्हायची असेल तर येथील राजकीय पक्षांना वैचारिक अधिष्ठान असले पाहिजे आणि जनसामान्यांच्या हितासाठी या पक्षांचे कार्यकर्ते क्रियाशील असले पाहिजेत. भारतातील राजकीय पक्षांचे वैचारिक अधिष्ठान कमालीचे क्षीण झाले आहे. ज्यावर विश्वास नाही असे अनेक कार्यक्रम हे पक्ष आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात देत असतात आणि स्वतःचीही फसवणूक चालली असताना आपण लोकांना सफाईने फसवीत आहोत असे या पक्षाच्या नेत्यांना वाटते. 

समाजवाद्यांमधील भांडणे जगजाहीर असल्यामुळे त्यांची अनेकदा टवाळी झाली. भारतीय जनता पक्षाने तर स्वतःच्या शिस्तीचा टेंभा मिरवीत समाजवादी पक्षाची आणि त्याचबरोबर समाजवादाचीही भरपूर टवाळी केली, परंतु गेल्या काही महिन्यांत त्यांच्या अब्रूची जी लक्तरे गुजरातच्या व राजस्थानच्या वेशीवर टांगली गेली त्यामुळे या पक्षाची शिस्त किती पोकळ आहे आणि त्यांच्या शिस्तीचा फुगा सत्तेचा स्पर्श होताच कसा फुटतो हे सर्व भारतीयांना समजून आले. कम्युनिस्ट पक्ष हा एका वेळी शिस्तबद्ध मानला जात होता परंतु डावे व उजवे कम्युनिस्ट यांच्यातील भांडणांमुळे कम्युनिस्ट चळवळीचीही वाताहत झाली. 

काँग्रेसमध्ये एकाच वेळी कमालीची लाचारी आणि वेगवेगळ्या गटांत कमालीचे शत्रुत्व आढळून येते. इंदिरा गांधींनी त्या पक्षातील सर्वांना गुलाम बनविले, त्यामुळे गेली अनेक वर्षे सर्व काँग्रेसजनांच्या मानगुटीवर लाचारीचे भूत ठाण मांडून बसले आहे. जनता दलातही शरद यादव विरुद्ध रामविलास पासवान मुलायमसिंग विरुद्ध लालूप्रसाद हे झगडे चालूच आहेत. सत्ता व संपत्ती यांसाठी भांडणे सगळीकडेच होतात. आम्हाला दुःख याचे वाटते की जे कार्यकर्ते निष्ठापूर्वक सामाजिक न्याय व समता यांच्यासाठी कार्यरत आहेत त्यांचेही आपापसात पटत नाही. ठाणे जिल्ह्यात गोदूताई परुळेकर यांनी केलेल्या चळवळीमुळे तेथे डाव्या कम्युनिस्ट पक्षाची वारली लोकांवर उत्तम पकड होती.

गेली काही वर्षे त्याच भागात कष्टकरी संघटना काम करते आदिवासींची स्थिती सुधारावी, त्यांना न्याय मिळावा हे डाव्या कम्युनिस्टांचे आणि कष्टकरी संघटनेचेही उद्दिष्ट. परंतु दोघांचे एकमेकांशी हाडवैर आहे, केवळ वादविवाद नव्हे. दोनही गटांतील कार्यकर्त्यांच्या मारामाऱ्याही होतात. यामुळे सावकाराचे फावते हे मात्र दोघांच्याही लक्षात येत नाही. महाराष्ट्रात क्रियाशील कार्यकर्त्यांच्या अशा वेगवेगळ्या चुली किती आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे. इतकेच कशाला, अण्णा हजारे यांच्या दौऱ्याची व्यवस्था कोणी ठेवायची यावरून दोन गट एकमेकांविरुद्ध निदर्शने करण्याचा पवित्रा घेतात. हे सर्व पाहिले की महात्मा गांधींचे मोठेपण पुन्हा एकदा तीव्रपणे लक्षात येते. 

भारताच्या सर्व भागातील अत्यंत बुद्धिमान आणि चारित्र्यवान नेते गांधीजींच्या भोवती गोळा झाले. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला कंगोरे होते, अनेकजण अहंकारी होते आणि तरीही गांधीजींनी सर्वांना एकत्र ठेवले. काही वेळा गांधीजी कमालीचे कठोर होत, काही वेळा मुदुपणे बोलून ते समजूत घालीत. असा लोकसंग्रह करणे, सर्वांना एकत्र ठेवणे हे फक्त महात्मा गांधीच करू शकले. ‘आपल्या या मनोवृत्तीचे मूळ कशात असेल ?' एका विचारवंताने लिहिले आहे की हिंदुधर्मात वैयक्तिक मोक्षसाधना केली जाते; परंतु समाजात सुसंवाद नांदला पाहिजे ही जाणीव हिंदूंमध्ये फारशी नाही. हाच युक्तिवाद आपल्या सार्वजनिक जीवनात दिसून येतो. 

आज आपल्यापुढे कोट्यवधी लोकांच्या दारिद्र्याचा आणि बेकारीचा भीषण प्रश्न आहे. यासाठी एकजुटीने प्रयत्न करून समाजाचा सर्वांगीण विकास केला पाहिजे व एकजूट टिकण्यासाठी, विकासाची फळे सर्वांना मिळतील यासाठी दक्ष राहिले पाहिजे. हे करण्याकरिता राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, क्रियाशील कार्यकर्ते यांनी स्वतःच्या अहंकाराला मुरड घालून परस्पर-सहकार्याने देशहित साधले पाहिजे. हे आपल्याला ज्या दिवशी कळेल आणि वळेल, तो सुदिन ! हे घडण्याची शक्यता दिसली नाही की शासनाचा शकट लष्कराच्या स्वाधीन करावा अथवा एकाधिकारशाहीलाच शरण जावे असे अविवेकी उद्गार समाजातील शहाणीसुरती माणसेही काढू लागतात. रोगापेक्षा इलाज घातक असावा तशातला हा प्रकार झाला. 

लष्करशाही आली की राष्ट्राचे जीवन कसे नासून जाते हे भारताच्या अवतीभवती असणाऱ्या राष्ट्रांतील घडामोडी पाहिल्या की समजून येईल. अगदी करोल हुकूमशहाच्या हातात सत्ता असली तर क्षुल्लक मतभेदांना थारा नसतो हे खरे; पण त्याच्या भोवती असलेल्या चांडाळचौकड्या परस्परांत संघर्ष करतात. इतकेच नव्हे तर आपल्या नेत्यालाच नेस्तनाबूत करतात, हा इतिहासाचा दाखला आहे आणि तो एकवार नव्हे तर अनेकवार मिळालेला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांतील अंतर्गत सामंजस्य आणि एकोपा नष्ट होता कामा नये, हीच भूमिका देशहिताची आणि लोकशाहीला पोषक ठरेल असा आम्हाला दृढ विश्वास वाटतो.

----------

कोर्टात महापुरुष

महाराष्ट्रातील न्यायमंदिरांत महात्मा गांधी आणि शिवाजी महाराज या दोनच राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावता येतील असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. यावरून समाजातील अनेक गट प्रक्षुब्ध झाले. न्यायमूर्ती शहांची प्रतिमा जाळणे आणि रस्त्यारस्त्यावर नाकेबंदी करणे. या मार्गानी उच्च न्यायालयाचा धिक्कार करण्यासाठी सर्वत्र निदर्शने होऊ लागली. पोलिसांनी ही निदर्शने दडपण्यासाठी कुठे लाठीमार, कुठे अटकसत्र असा दमननीतीचा प्रयोग केला पण निषेध करणाऱ्या गटांचा संताप अजून धुमसतोच आहे. वैध अथवा अवैध निषेधाद्वारा आपली तीव्र भावना व्यक्त करण्याचा मंडळींचा निर्धार अजूनही शमलेला नाही.

खरे म्हणजे आपण ऊठसूट प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टाकडे का धाव घेतो आणि न्यायमूर्तीही नसत्या उठाठेवीत लक्ष का घालतात, ते समजत नाही. पण ही प्रक्रिया अपरिहार्य आहे असे धरले तर मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सर्वांनी स्वीकार करायला हवा. त्याऐवजी होते मात्र काय, निर्णय मनासारखा मिळाला नाही तर त्याचा निषेध म्हणून दंगेधोपे घडवून आणण्याची प्रथा पडते आहे. ज्या प्रथा ज्या प्रश्नांना एकापेक्षा अधिक बाजू असतात त्यांची सोडवणूक अतिशय दुरापास्त असते. यक्षप्रश्नात सर्वसंमत उत्तर कधीच असू शकत नाही. 
समजूतदारपणा आणि वैचारिक देवाणघेवाण यांना फाटा दिला की प्रत्येक गुंता प्रतिपदी अधिकच गुंतत जातो. 

प्रस्तुतच्या प्रश्नी नेमके हेच झाले आहे, होणार आहे. अशा वेळी ही बाजू बरोबर आणि ती चूक या प्रकारचे निवाडे सहसा स्वीकारले जात नाहीत. घटनाकार आंबेडकरांची प्रतिमा न्यायमंदिरात असलीच पाहिजे हा आग्रह निरर्थक नव्हे, परंतु त्यांच्याबरोबर इतरही पाच-दहा राष्ट्रनेत्यांची नावे - या कलहापुरती का होईना आदराने सादर केली जातील. राष्ट्रीय नेत्यांची नावे - त्यांच्या मनात असो नसो परस्परांच्या तोंडावर फेकली जातील. त्यांना निष्कारण वादात ओढले जाईल. अंती समजूत काढण्यासाठी अधिक चार नावे मंजूर करण्यात येतील किंवा एखादुसरे कमीही केले जाईल. कालांतराने शांतता मंडळे काम करू लागतील. मग शांतता करू पाहणाच्यांची गावगन्ना टवाळी सुरू होईल. राष्ट्रीय महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावावर धाकदपटशा आणि मनमानी इत्यादी असंतोषाच्या प्रक्रियांचा धुडगूस घातला जाईल.

यात न समाजहिताचा कोठे विचार न परिवर्तनाची प्रेरणा. उनाड मुले ज्या प्रमाणे कुठले ना कुठले कारण शोधून दंगली माजवतात, कोणाचा तरी नालसाहेव करून त्याच्या नावे धुल्लाधुल्ला करीत गल्लीगल्लीत आणि चव्हाट्घावर अभद्र, भडक निदर्शनांचा निलाजरा नाच सुरू करतात. त्याप्रमाणे अशा समयीं होळीचे होळकर आपले पेंढार घेऊन दंगल माजवण्याचा राष्ट्रीय प्रकल्प तडीस नेण्यासाठी कमरा कसतात. समाजाला ज्या वेळी आपल्यासमोर आव्हान देत ठाकलेल्या ज्वलंत समस्या कोणत्या याचे भान राहत नाही त्या वेळी त्या समस्यांवर शक्ती एकवटावला कोणी पुढे सरसावत नाही. त्यापेक्षा प्रक्षोभक भाषा वापरून पोकळ पुरुषार्थांचे प्रदर्शन करण्यातच त्यांना फुशारकी वाटू लागते. 

बाबासाहेब आंबेडकरांचे किंवा त्यांच्याबरोबर राजेंद्रप्रसादांसारख्या राज्यघटनेच्या शिल्पकारांचे फोटो काय आणि पुतळे काय, समतेची सूत्रे विस्मरणात न जाण्यासाठी कोणाला नको असतात. त्यांच्या आठवणीपेक्षा त्यांच्या नावाने फडमारूपणा करून स्वार्थाचे देव्हारे माजवण्यातच सगळी धन्यता वाटत असते. अशा वेळी. वाटते की कोणाचीही मूर्ती किंवा प्रतिमा लावून भिंती सुशोभित करण्यापेक्षा सत्य न्याय सर्वभूतहित अशा अमूर्त मूल्यांचे प्रतीकात्मक रक्षण करणाऱ्या अमूर्त चित्रकलेवरच सर्व जिम्मेदारी सोपवावी किंवा सर्व भितींचे विशाल फलक करकरीत कोरे ठेवावेत, म्हणजे त्या कोऱ्या पाट्यांवर नव्या पुरुषार्थाचे लेख लिहिण्याची आकांक्षा जनमानसात पेटून उठेल.

Tags: राज्यघटना  राजेंद्रप्रसाद बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज न्यायमंदिर महाराष्ट्र लालूप्रसाद मुलायमसिंग रामविलास पासवान शरद यादव एकाधिकारशाही अण्णा हजारे महात्मा गांधी काँग्रेस भारतीय जनता पक्ष राजस्थान Laluprasad Mulayamshing Ramvilas Paswan Sharad Yadav Monopoly Anna Hajare Mahatma Gandhi Congres bjp Rajstan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके