डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आजच्या राजकीय अस्थिरतेची आद्य कारणे

इत्यर्थ एवढाच की, संधिसाधू राजकारणाची इतकी खेळी सतत खेळणाऱ्या भाजपाला लोकसभा बरखास्तीने विनाशकारी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टाहो फोडण्याचा अधिकारच नाही. गेल्या तीन वर्षांत होणारी ही लोकसभेची तिसरी निवडणूक आहे. आणि ही गोष्ट परवडणारी नाही, असा एक सूर देशात एका मोठ्या वर्गाकडून सतत लावला जातो आहे.

केन्द्रातील भाजपाचे सरकार पाडल्यानंतर व नवे सरकार स्थापन न झाल्याने लोकांच्या मनात वाजपेयी सरकारबद्दल सहानुभूती आहे आणि विरोधी पक्षांबद्दल रोष आहे व तो मतपेटीतून व्यक्त होईल, असा प्रचार भाजपाने जोरदारपणे चालवला आहे. लोकांची अशी नाराजी आहे का? असल्यास ती फक्त शहरातच आहे का सर्वत्र? या साऱ्या कल्पनाविलासाची उत्तरे आज मिळणार नाहीतच. त्यातही अशी नाराजी आहे असे मानले तरी ती निवडणुकीमार्फत मतपेटीतून सध्याच्या सरकारलाच संपूर्णपणे अनुकूल निर्णयात रूपांतरित होईल का, हा तर आणखीनच पुढचा प्रश्न आहे, पोखरण येथे अणुस्फोट केल्यानंतर त्या वातावरण निर्मितीद्वारे, नंतर येणाऱ्या निवडणुकांत प्रचंड यश संपादण्याची उमेद बोलून दाखविली गेली.

प्रत्यक्षात त्यानंतर आठ महिन्यांत निवडणुका झाल्या आणि राजस्थानात भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला. एवढेच नव्हे तर खुद्द पोखरण येथील जागाही त्यांना वाचवता आली नाही, हा भाग वेगळा. भाजपाची ही सर्व मांडणी अलीकडेच देशाला उद्देशून काळजीवाहू पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दूरदर्शनवरून केलेल्या भाषणामध्ये केली. त्यांच्या मते कोणताही ठोस मुद्दा नसताना बेजबाबदारपणे विरोधकांनी आपले सरकार पाडले.

आम्ही देश अधिक बलशाली करण्याचा निर्णय घेतला, म्हणून ते पाडण्यात आले. यामुळे निवडणुकीच्या खर्चाचा एक हजार कोटी रुपयांचा फटका तर देशाला बसणारच, परंतु अस्थिर परिस्थितीमुळे छोट्या गुंतवणुकदारांना त्यापेक्षा खूप मोठा फटका बसेल. सरकार पाडण्याची कारस्थाने विरोधकांवरच उलटली आहेत असे ते म्हणाले. यातील कांगावेखोरपणाचा भाग लोकांनी नीट ध्यानात घ्यावयास हवा, असे आम्हाला वाटते. अन्यथा प्रभावी प्रचारयंत्रणेच्या माध्यमातून जणू काही हे खरेच आहे असा विचार लोकांच्या माथी मारला जाईल. 

सरकार विरोधकांनी पाडले हे श्री. वाजपेयी यांचे म्हणणे अनाकलनीय आहे. विरोधकांनी अविश्वासाचा ठराव मांडला असता तर त्याला किमान अर्थ होता. तोदेखील फार नाही. कारण विरोधी पक्ष सत्ता मिळविण्यासाठीच राजकारण करत असतात आणि त्यातील पहिले पाऊल सत्तेवरच्याचा पराभव करणे हे असते. स्वतः सत्ता ग्रहण करण्याचे दुसरे पाऊल पहिल्या पावलानंतरच शक्य असते आणि त्या शक्याशक्यतेच्या खेळात काय होईल हे सत्तारूढांचा पराभव झाल्यावरच कळते. पण येथे हा सर्व मुद्दाच गैर लागू आहे. भाजपाचा पराभव झाला ते त्याला आपली आघाडी न टिकविता आल्याने.

सत्तारूढ भाजपाची आघाडी अनेक व्यक्ती व पक्ष यांच्या नाकदुऱ्या काढत कशीबशी वर्षभर चालविली गेली. त्यानंतर आघाडीतील एका सहकारी पक्षाने नौदल प्रमुख भागवत प्रकरणावर इशारा देऊन सरकारचा पाठिंबा मागे घेतला. असे अंतर्गत वाद ज्या कौशल्याने मिटवावे लागतात ते भाजपाकडे नसल्याने त्यांचे सरकार अल्पमतात गेले व मग त्यांना विश्वासाचा ठराव मांडण्याची गरज निर्माण झाली. हा ठराव आपण सहज जिंकणार असा छातीठोक आत्मविश्वास होता, तो पोकळ निघाला. तेव्हा स्वतःच्या अकार्यक्षमतेने राजकीय कौशल्याच्या अभावाने जे सरकार पडले, त्याला विरोधकाना जबाबदार धरणे, हा अगदी खास संघीय प्रचार झाला.

तत्त्वनिष्ठ राजकारणाचा आव आणणाऱ्या भाजपाचे मातीचे पाय गेल्या अवघ्या वर्षात अनेक वेळा दिसले आहेत. तामिळनाडूत जयललितांच्या बरोबर युती करून आणि करुणानिधी हे देशद्रोह्यांचे कसे हस्तक आहेत, याचा ढोल पिटून अवघे वर्ष झाले आणि आता वर्षभरानंतरच त्या जयललिता किती भ्रष्टाचारी आहेत, हे सांगावे लागते आहे. करुणानिधींचा पाठिंबा हवा यासाठी मनधरणी करावी लागत आहे. वर्षापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत ज्यांच्यावर सडकून टीका केली ते चंद्राबाबू नायडू आंध्रमधल्या राजकारणासाठी भाजपाला हवे आहेत. परंतु आपला मुस्लीम मतदार दुरावेल या रास्त भीतीने चंद्राबाबू त्यासाठी उत्सुक नाहीत.

सर्वांत कहर म्हणजे मुलायमसिंग यादव यांनी काँग्रेसला सत्तारूढ होण्यापासून रोखल्यामुळे ते आता भाजपाच्या मित्रपक्षात अप्रत्यक्षपणे तरी आले आहेत. भाजपा समता पक्षाचा एक हात धरेल आणि समता पक्षाचा दुसरा हात मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष पकडेल, असाही एक अंदाज वर्तवला जातो. इत्यर्थ एवढाच की, संधिसाधू राजकारणाची इतकी खेळी सतत खेळणाऱ्या भाजपाला लोकसभा बरखास्तीने विनाशकारी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टाहो फोडण्याचा अधिकारच नाही. गेल्या तीन वर्षांत होणारी ही लोकसभेची तिसरी निवडणूक आहे. आणि ही गोष्ट परवडणारी नाही, असा एक सूर देशात एका मोठ्या वर्गाकडून सतत लावला जातो आहे.

स्थिरता येण्यासाठी दोनच पक्ष असावेत, राष्ट्राध्यक्ष पद्धतीची लोकशाही असावी असे उपायही मोठ्या हिरीरीने सुचविले जातात. आम्हांला असे वाटते की या परिस्थितीचे कारण आणखी खोलवर आहे त्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. त्यापैकी एक म्हणजे मंडल आयोगानंतर सर्व जातींच्या आकांक्षा पूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या प्रबल झाल्या आहेत. त्या सत्तेत आपला वाटा अग्रहक्काने मागत आहेत. जातीच्या अस्मितेच्या राजकारणाचा हा राष्ट्रीय पट एवढा विशाल भारतव्यापी व गुंतागुंतीचा आहे की त्याचा योग्य वेध अजून कोणत्याच राजकीय पक्षाला घेता आलेला नाही.

दुसरा मुद्दा राम जन्मभूमीचा आहेच. बाबरी मशीद पाडताना हिंदू मानस उचंबळून यावे अशी आखणी केली गेली. अजूनही अयोध्येसह काशी, मथुरा हे मुद्दे शिल्लक आहेतच. स्वाभाविकच या मानसिकतेचा प्रतिवाद करण्यासाठी अन्य धर्मीय संघटित होऊ लागले आहेत. देशाच्या घटनेचा अंगभूत भाग असलेल्या आणि आजच्या राजकारणात परवलीचा शब्द असलेल्या धर्मनिरपेक्षतेलाच त्यामुळे आतून आव्हान निर्माण झाले आहे. याचे खंबीर उत्तर व त्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती कोणत्याच पक्षाकडे नाही. नवे आर्थिक धोरण आल्यानंतर ही अस्थिरता वाढली; हे तिसरे कारण लक्षात घेणे आवश्यक आहे.

काँग्रेस, संयुक्त आघाडी, भाजपा व त्याचे मित्रपक्ष या सर्वांची सरकारे या काळात येऊन गेली. पण व्यवहारात आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांच्या इच्छेनुसारच अर्थकारण सर्वांनाच करावे लागेल. या आर्थिक धोरणातून सामान्य माणूस, सुशिक्षित बेकार अधिकाधिक अस्थिर होत आहे आणि मग याचे प्रतिबिंब पडणारे राजकारण स्थिर होणे कसे शक्य आहे ? लोकांचे अधिक परिपाक राजकीय आकलन व नवे उपाय कार्यान्वित करणारे बळकट इच्छाशक्तीचे पुरोगामी राजकीय पक्ष संघटन या दोन्ही बाबी अस्तित्वात यावयास हव्यात. त्यांचे प्रतिबिंब राजकारणात पडल्याशिवाय राजकीय स्थिरता येणे शक्य नाही असे आम्हांला वाटते, आणि ती स्थिरता कृत्रिम उपायांनी आल्याचे भासले तरी सामान्याला न्याय व विकास देण्यासाठी त्याचा उपयोग नाही. खरा प्रश्न आहे मूळ प्रश्नाच्या गाभ्यालाच थेट भिडण्याचे राजकारण करण्याचा.

Tags: मित्रपक्ष भाजपा संयुक्त आघाडी काँग्रेस राजकीय इच्छाशक्ती कारणे राजकीय अस्थिरता allies bjp united front congress political willpower reasons political instability weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके