डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बाळासाहेब नम्र (?) - काँग्रेस गाफील?

मुस्लीमविरोधाचे आणि कट्टर हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यास शिवसेनेने पुन्हा सुरुवात केली आहे, हे अलीकडच्या काही घटनांवरून स्पष्ट दिसते. संघ परिवारातील बजरंग दलाने मशिदीवरचे नमाजाचे कर्णे काढून टाकण्याचे आंदोलन जाहीर करून आपणही मागे राहणार नाही हे स्पष्ट केले आहे. या मुस्लीम व ख्रिश्वन विरोधाचा राजकीय फायदा काँग्रेसला होईल हे उघड आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वेध आत्तापासून लागले आहेत काय? याचे स्पष्ट उत्तर अलीकडेच मिळाले. पवनारला सोनिया गांधींची भेट आणि विदर्भातील त्यांची जाहीर सभा यांमुळे आम्ही हे म्हणत नाही. शासनाने आपल्या कर्तृत्वाच्या पताका जाहिरातरूपाने सर्वत्र फडकवण्यास सुरुवात केली हे त्याचे कारण नाही. शिस्तबद्ध संघ स्वयंसेवकांनी युती शासनाच्या कार्याची 1 कोटी पत्रके घरोघरी पोचविण्याचे ठरविले आहे ही बातमीदेखील पुरेशी नाही. निर्णायक पुरावा असा की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकच्या त्यांच्या काही दिवसांपूर्वीच्या महाशिबिरात शिवसैनिकांना संदेश दिला - ‘नम्र बना!’ नुसते तेवढ्‌यावरच ते थांबले नाहीत, आपण अलीकडेच साहित्यिकांबद्दल काय मुक्ताफळे उधळली हे विसरून त्यांनी महाराष्ट्रातील साहित्यविश्वाचे स्वयंसिद्ध कुलपती कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्याकडे जाऊन त्यांचे पाय धरले होते, तो फोटो सर्वत्र छापून येईल याची व्यवस्थाही केली होती.

नम्रतेचा असा थेट धडा त्यांनी आपल्या अनुयायांना दिला. 'कानाखाली आवाज काढणारा शिवसैनिक मला हवा आहे' असे म्हणणाऱ्या ठाकरेंना ही नमतेची भलतीच उबळ अचानक कशी आली? अगदी अलीकडे झालेल्या प्रमुख शिवसैनिकांच्या व्यापक बैठकीत पुन्हा युतीच सत्तेवर येणार आहे, असा विश्वास बाळ ठाकरे यांनी प्रकट केला. 'प्रसंगी नम्रता धारण करा पण सत्तासंपादनाचा डाव पुन्हा एकदा यशस्वी करा' या खेळाची ही सुरुवात आहे. 

महाराष्ट्रात येत्या 6-8 महिन्यांत निवडणुका होणार. युती शासनावर महाराष्ट्रातील जनतेची वाढती नाराजी आणि खपा मर्जी होत असून फक्त निवडणुका होण्याचाच काय तो अवकाश की बस्स! काँग्रेस प्रचंड बहुमताने सत्तेवर आलीच, असा एक सूर महाराष्ट्रात काही वृत्तपत्रे लावीत आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेसवालेही ही खुशीची गाजरे खाताना आढळतात. युतीचे सरकार जावे अशीच आमची मनापासूनची इच्छा असली तरी आम्हांला हा आशावाद वस्तुस्थितीवर आधारित वाटत नाही.

शिवसेना-भाजप युतीचा पापाचा पाढा पुरेसा मोठा आहे. साफ फसलेली झुणका-भाकर ही योजना, 27 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याच्या आश्चासनाचे तीन-तेरा, मुंबईतील झोपडपट्टी निर्मूलनाचे शेख महंमदी स्वप्न, या साऱ्या बाबी सर्वज्ञात आहेत. टक्केवारी हा शब्द सर्व खात्यांत सर्व पातळीवर परवलीचा झाल्याने कालचा 'काँग्रेसवाला' बरा होता अशी स्थिती आहे. बिहार अथवा दिल्ली याच मार्गाने मुंबईतील कायदा सुव्यवस्थेची वाटचाल चालू आहे, संघटित गुन्हेगारीने सामान्य माणसालाही वेठीला धरल्याचे पूर्वी कधीही न अनुभवलेले चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. कृष्णेचे हक्काचे पाणी दोन हजार सालापर्यंत अडविण्याची राणा भीमदेवी घोषणा प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही.

क्रिकेटचे मैदान उखडणे, क्रिकेट कार्यालयावर हल्ला करणे, संमेलनाला आलेल्या साहित्यिकांची तुलना बाजारातल्या बैलांच्याबरोबर करणे, या सर्वांमुळे मौन पाळलेल्या मध्यमवर्गाच्या मनावर जखमा या झाल्याच आहेत. भाजपा सरकारचा दिल्लीचा कारभार, भाजपा सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांतील ताणतणाव अशा राज्याबाहेरच्या अन्य बाबीही सत्तारूढ पक्षांचा पाया खचवीत आहेत. 

मतदार युतीला डच्चू देणार आणि सत्तेची वरमाला आपल्या गळ्यात आपोआप पडणार हे काँग्रेसने जणू गृहीतच धरले आहे. मागील निवडणुकीच्या वेळी नाराजीची जी झळ काँग्रेसला सोसावी लागली त्या जागी आज युती शासन उभे आहे, असे काँग्रेसजनांना वाटते. महाराष्ट्रात सर्वत्र आजही काँग्रेसचा संघटनात्मक पाया बऱ्यापैकी मजबूत आहे. सहकार क्षेत्रावर तर त्यांचीच पकड़ आहे. शिवाय सोनिया गांधींचा करिष्मा, शरद पवार यांचे डावपेच, नेतृत्व, धनशक्ती या साऱ्यांची बेरीज कॉंग्रेसला सुखेनैव सत्तेच्या सोपानावर घेऊन जाईल अशी काँग्रेसची अटकळ आहे. हा भ्रम ठरण्याची शक्यता काँग्रेसजन नजरेआड करीत आहेत.

मागील निवडणुकीआधी काँग्रेसची स्थिती कागदावर अशीच मजबूत होती. विशिष्ट जबाबदारी घेऊन केन्द्रातून महाराष्ट्रात परतलेल्या शरद पवारांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, पुरोगामी महिला धोरण असे विविध समाजघटकांना खूश करणारे निर्णय घेतले होते. पक्ष संघटना व पारंपरिक मतदार तर दिमतीला होताच. तरीही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात घवघवीत यश मिळविले हे खरे आहे. पण त्याच निवडणुकीत तसेच यश भाजपाने दिल्ली व मध्य प्रदेशात मिळविले होते. त्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांत झालेल्या निवडणुकीत पारडे साफ उलटे पालटे झाले. महाराष्ट्रात आजची स्थिती काय आहे? महाराष्ट्रात विरोधी पक्ष वाढत नाही याचे कारण गमतीने असे सांगितले जात असे की काँग्रेसचा दुसरा गट हाच सत्तारूढ काँग्रेसचा प्रबळ विरोधी पक्ष आहे. या गमतीचे गांभीर्यात रूपांतर झाले त्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसने आपटी खाल्ली. आज विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात किमान तीनचार तरी प्रबळ इच्छुक आहेत.

तिकीट नाकारले गेले तर स्वतः पडलो तरी चालेल, पण दुसऱ्याला निवडून येऊ देणार नाही अशी त्यांची भीष्मप्रतिज्ञा असते. या प्रत्येकाकडे 5-10 हजार मते असतात. ती निवडून येण्यासाठी उपयोगी नसली तरी कोणाला तरी पाडण्यासाठी नक्की उपयोगी येतात. शिवाय बंडखोरीतून निवडून आल्यास सत्ता मिळते हा या पाच वर्षांतला धडा त्यांना उत्तेजित करणाराच आहे. युतीमधील दोन्ही पक्षांना हा फटका कमी बसेल. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील यशामध्ये रिपब्लिकन व समाजवादी पक्षांच्या बरोबरीने युतीचा वाटा होता. समाजवादी पक्ष हा आता काँग्रेसपासून दुरावला आहे, कारण त्यांची मतपेटी असलेल्या मुस्लीम मतदारांवर काँग्रेस डल्ला मारेल ही रास्त भीती त्यांना आहे. रिपब्लिकन पक्ष एकसंध नाही आणि त्यांची जागांची अपेक्षा पूर्ण करणेही काँग्रेसला अवघड आहे. त्यामुळे तो घटक नाराज राहण्याचा संभव अधिक. मागील वेळेस कॉंग्रेस पराभवाला बंडखोरीबरोबरच रिपब्लिकन बहुजन महासंघाने स्वतःकडे खेचलेली थोडी मतेही अनेक ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार हरविण्यास निर्णायक ठरली होती.

शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात एकाकी आहेत. त्यांचे कट्टर विरोधक प्रतापराव भोसले, गोविंदराव आदिक, सुशीलकुमार शिंदे संघटनेत महत्त्वाची पदे भूषवीत आहेत. त्यांच्या जोडीला शंकरराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ अशी मंडळी आहेतच. या सर्वांची एकत्रित ताकदही कमी आहे. पण उपद्रवमूल्य अधिक आहे. सोनिया गांधींचा विश्वास शरद पवारांवर किती आहे तो तिकीट वाटपातच कळणार, पण आपल्या उमेदवाराला तिकीट नाकारल्यास अधिकृत उमेदवाराला पवारांचे चेले सहजासहजी निवडून येऊ देत नाहीत हा इतिहास आहे. राणे हा कोकणी माणसाला आपला खराखुरा प्रतिनिधी वाटतो. कोकणातील दोन ते तीन जिल्ह्यांत शिवसेनेला याचा फायदा नक्की मिळेल.

स्वतंत्र विदर्भाविरोधात खंबीर भूमिका फक्त शिवसेनेने घेतली. आता विदर्भातील पूर्वीच्या व-हाड प्रांतातील पाच जिल्ह्यांनीही संयुक्त महाराष्ट्रात राहण्याचे आणि स्वतंत्र विदर्भाला विरोध करण्याचे ठरविले आहे, याचाही थोडाफार फायदा शिवसेनेला होईल. बाळ ठाकरे यांचा करिष्मा कमी झाला आहे, पण नष्ट झालेला नाही. शिवसेनेचे तर ते एकमेव नेते आहेत. शिवसैनिकांची त्यांच्यावर निष्ठा आहे. शिवसेनेची संघटना काहीशी सुस्त झाली असली तरी बऱ्यापैकी अस्तित्वात आहे आणि अजूनही त्यात प्रमुख भरणा तरुणांचाच आहे. भारतीय जनता पार्टीतही महाराष्ट्रात तुलनेने कमी गटबाजी आहे. पक्ष बराचसा एकसंध आहे. या सर्व बाबी निवडणुकीत अनुकूल ठरणाऱ्या आहेत.

'एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है' असा सुप्रसिद्ध डायलॉग नाना पाटेकरांच्या तोंडी यशवंत सिनेमात आहे. दोन वर्षांपूर्वी तो सिनेमा आला त्याच वेळी नाना नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष होता. त्या दरम्यान महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारताना पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या भाषणावर नेहमीप्रमाणे ‘ठाकरी तोफ’ डागली गेली होती. सौम्य, समंजस शब्दांत नानाने त्यावर थोडे भाष्य केले. त्यावरोवर 'मच्छरांनी शेरांच्या वाटेला जाऊ नये' अशी गर्जना झाली. मग आताच ही नम्रता कोठून आली? माणसाच्या रक्ताला चटावलेला वाघ नरभक्षक बनतो म्हणे, सत्तेच्या खुर्चीचे चटावलेपण तर त्यापेक्षा खूप प्रबळ व गंभीर असते. त्यासाठी मग काहीही करावे लागते. अगदी नम्र होणेदेखील. याचाच अर्थ एवढाच की मुकाबला कडवा करण्यासाठी सर्व डावपेच यापुढच्या काळात महाराष्ट्रात खेळले जाणार.

मुस्लीमविरोधाचे आणि कट्टर हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यास शिवसेनेने पुन्हा सुरुवात केली आहे, हे अलीकडच्या काही घटनांवरून स्पष्ट दिसते. संघ परिवारातील बजरंग दलाने मशिदीवरचे नमाजाचे कर्णे काढून टाकण्याचे आंदोलन जाहीर करून आपणही मागे राहणार नाही हे स्पष्ट केले आहे. या मुस्लीम व ख्रिश्वन विरोधाचा राजकीय फायदा काँग्रेसला होईल हे उघड आहे. पण धर्मद्वेषाचे राजकारण काही काळ माणसाची बुद्धी भ्रष्ट करू शकते हेही तेवढेच खरे. याचा समर्थ वैचारिक प्रतिवाद करण्याची काँग्रेसची कुवत नाही, इच्छाशक्तीही नाही. निवडणुका जिंकण्याचे यंत्र असे स्वतःचे रूपांतर काँग्रेसने करून बरीच वर्षे झाली. आता तेही बरेच खिळखिळे झाले आहे.

सामान्य माणसाचे दुर्दैव असे की तिसरा पर्याय महाराष्ट्रात जवळपास उपलब्ध नाही. सत्तेवर येण्याची गोष्टच दूर, काही मुद्यांची निवडणुकीच्या राजकारणात तड लावण्याची ताकदही महाराष्ट्रातील उर्वरित राजकीय पक्ष दाखवू शकत नाहीत. ‘आता सत्कार स्वीकारणारच नाही. युतीला निवडणुकीत विजयी करूनच सेनाप्रमुखांच्या हातून सत्कार स्वीकारेन,’ ही मुख्यमंत्री नारायण राणे यांची उमेद महाराष्ट्राच्या हितासाठी प्रत्यक्षात येऊ नये म्हणून अधिक सजग राजकारणाची गरज आम्हांला जाणवते.

Tags: राजकीय डावपेच बाळासाहेब ठाकरे समाजवादी कॉंग्रेस शिवसेना बिगुल निवडणुकांचा राजकारण political games bal thackrey socialists congress shivsena elections bugle politics weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके