डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ढाले प्रकरणातील फुले आणि काटे

त्यावेळी महिनाभर चाललेले ते जाहीर वादविवाद हे साधनाच्या इतिहासातील ‘तीक्ष्ण काटे आणि त्यावर असलेली फुले’ असे प्रकरण होते. एस.एम., यदुनाथ व अवचट या तिघांनीही त्या प्रकरणात दाखवलेले धैर्य आणि ध्येयाप्रति राखलेली निष्ठा अशी अधोरेखित होते की, ‘आपण या परंपरेचे पाईक आहोत’ याचा आम्हाला अभिमान वाटतो. या प्रकरणात यदुनाथांच्या वाट्याला स्वकीयांकडून आणि परक्यांकडून जी अवहेलना आली आणि ती त्यांनी कर्तव्यनिष्ठेचा भाग मानली, यासाठी साधनाचे वाचक त्यांचे कायम ऋणी राहतील. ‘हे यदुनाथ होते तरी कोण,’ याची झलक नव्या वाचकांना दिसावी म्हणून, सुरेश द्वादशीवार यांचा दहा वर्षांपूर्वीचा लेख या अंकात पुनर्मुद्रित करीत आहोत.

मागील अर्धशतकात सर्वाधिक गाजलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या मराठी लेखांची यादी करायची ठरवली तर पहिल्या दहा मध्ये समावेश करावा लागेल असा एक लेख साधना साप्ताहिकात 47 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हाच तो लेख. 15 ऑगस्ट 1972 च्या साधना अंकात तो प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाने साधनाच्या आत आणि बाहेर प्रचंड गदारोळ माजवला होता. इतका की, त्या एका लेखामुळेच केवळ राजा ढाले हे नाव अनेकांना माहीत झाले होते आणि साधना साप्ताहिकाचे नावही त्या एका लेखामुळेच केवळ अनेकांना माहीत झाले होते. त्याआधी आणि त्यानंतरही राजा ढाले यांचे लेखन साधनात प्रसिद्ध झाले नसावे. (क्वचित एखादा अपवाद असेल तर अर्काईवमध्ये शोधावे लागेल.) ‘तो लेख वाचायला मिळेल का, त्यात वादग्रस्त काय होते, त्यावेळी नेमके काय व कसे घडले, त्याचे परिणाम काय झाले’ हे व या प्रकारचे प्रश्न तेव्हापासून आतापर्यंत इतक्या वेळा व इतक्या विविध स्तरांतील लोकांकडून विचारले गेले आहेत, की त्यांची गणतीच करता येणार नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात राजा ढाले यांचे निधन झाले तेव्हा, त्यांच्यावर जे काही मृत्युलेख विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाले, त्यातील बहुतेकांमध्ये त्या लेखाचा उल्लेख होताच.

परिणामी, साधनाकडे पुन्हा एकदा चहुबाजूंनी मागणी/विचारणा सुरू झाली- ‘तो लेख वाचायला मिळेल का, तो लेख पुनर्मुद्रित कराल का?’ त्याचे आम्ही दिलेले उत्तर होते, दोनच पर्याय आहेत : तो लेख अंशतः संपादित करून (तीन-चार ठिकाणची मिळून आठ-दहा वाक्ये वगळून) प्रसिद्ध केला जाऊ शकतो किंवा अजिबात प्रकाशित केला जाऊ शकत नाही. म्हणजे त्यावेळी प्रसिद्ध झालेला लेख जसाच्या तसा आता पुनर्मुद्रित करणे हा पर्याय असूच शकत नाही! याचे कारण तो लेख भेदक असला आणि समाजाच्या मर्मावर घाव घालणारा असला तरी, त्यातील काही वाक्ये अशी आहेत की, त्यांच्यामुळेच केवळ साधनाचे त्यावेळचे संपादक यदुनाथ थत्ते, कार्यकारी संपादक अनिल अवचट आणि साधनाचे कार्यकारी विश्वस्त एस.एम. जोशी या तिघांनीही जाहीर माफी मागितली होती. एवढेच नव्हे तर, साधनातून ते माफीनामे प्रसिद्ध केले होते; संपादक व कार्यकारी संपादक यांनी तर राजीनामे दिले होते, ती सविस्तर लिहिलेली राजीनामा पत्रे नंतरच्या साधना अंकातून प्रसिद्धही झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना (आज तो मूळ लेख किती वादग्रस्त वाटेल हा भाग बाजूला ठेवला तरी), तो लेख जसाच्या तसा पुनर्मुद्रित करताच येणार नाही. इतके सांगूनही कदाचित काहींना हे पटणार नाही, म्हणून त्यांनी प्रस्तुत अंकात पुनर्मुद्रित केलेले एस.एम., यदुनाथजी व अनिल अवचट यांचे लेखन काळजीपूर्वक वाचावे.

मात्र त्याआधी, खूपच कमी लोकांना माहीत असलेली त्या प्रकरणातील वस्तुस्थिती नीट लक्षात घ्यायला हवी; ती थोडक्यात पण नेमकेपणाने सांगण्याचा प्रयत्न इथे करीत आहोत.

भारतीय स्वातंत्र्याला 25 वर्षे पूर्ण होणे आणि साधना साप्ताहिकाने 25 व्या वर्षात पदार्पण करणे, असे दुहेरी औचित्य साधून ‘स्वतंत्र भारतातील दलितांची 25 वर्षे’ या विषयावरील तो विशेषांक होता. त्यावेळी यदुनाथजी वयाच्या पन्नाशीत होते आणि साधनाचे संपादक म्हणून दोन दशकांहून अधिक वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. सतत भ्रमंती करणारा संपादक, नवे विषय व नवे लेखक शोधणारा संपादक आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांना निर्भयपणे वाचा फोडणारा संपादक, अशी त्यांची ओळख गांभीर्याने वाचन-लेखन करणाऱ्या मराठी भाषकांना होती. त्यांच्याभोवती जे काही तडफदार तरुण वावरत होते, त्यातील एक अनिल अवचट. 1967 ते 72 या पाच वर्षांत या तरुणाने साधनात सातत्याने लिहिले होते आणि तळागाळातल्या/ उपेक्षित-शोषित समूहांचे जगणे-मरणे मोठ्या ताकदीने मांडले होते. यदुनाथ तसेही तरुणांवर विश्वास टाकणारेच होते आणि अनिल अवचट यांच्यावर तर त्यांचा जास्तच विश्वास होता. त्यामुळे ‘शिक्षित दलित तरुणांशी बोलून, त्यांना लिहिते करून, पाव शतकातील स्वातंत्र्याने त्यांना काय दिले,’ या विषयावर विशेषांक करण्याची अवचटांची कल्पना यदुनाथांनी उचलून धरली. अवचटांनी यासाठी सिद्धार्थ कॉलेज (मुंबई) आणि मिलिंद कॉलेज (औरंगाबाद) इथे बऱ्याच फेऱ्या मारल्या; डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ या मंत्राने मोहित झालेले तरुण तिथे मोठ्या प्रमाणात होते. तेथील वसतिगृहात राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या तरुणांशी रात्र रात्र संवाद साधून, राज्यभरात दलित समाजाची काय स्थिती आहे हे अवचटांनी जाणून घेतले होते. त्यातून ‘पाव शतकानंतरही स्वातंत्र्य त्यांच्या दाराशी आलेले नाही, त्यांची गुलामी संपलेली नाही, पदोपदी होणारी अवहेलना थांबलेली नाही,’ हा निष्कर्ष निघाला होता. शिवाय, त्याआधीच्या काही महिन्यांत, महाराष्ट्राच्या विविध भागांत दलितांवर होणाऱ्या भयानक अत्याचाराच्या बातम्यांनी कहर माजवला होता. संपूर्ण गावाने दलितांवर बहिष्कार टाकणे, त्यांना अमानुष मारहाण करणे, ते वापरत असलेल्या विहिरीत विष्टा टाकणे, त्यांच्या आया-बहिणीची नग्न धिंड काढणे, असे एक ना अनेक लाजीरवाणे प्रकार घडत होते. अस्पृश्यतेचे चटके तर सर्वत्र नित्याचेच होते. आणि म्हणून त्यांची कैफियत, त्यांच्या वाट्याला आलेली अवहेलना त्यांच्याच शब्दांत आग ओकणाऱ्या अभिव्यक्तीसह प्रसिद्ध करावी, असे त्यावेळी 28 वर्षांच्या कार्यकारी संपादकाला वाटणे साहजिक होते. शिवाय, त्यातील काही अधिक बंडखोर तरुणांनी ‘आमच्या व्यथा वेदना आम्ही लिहू तशा छापण्याची तुमची हिम्मत आहे का’ अशी चेतावणीही अवचटांना दिली होती.

या सर्व प्रक्रियेतून 52 पानांचा विशेषांक आकाराला आला. त्या अंकाचा प्रारंभ पाच महाविद्यालयीन तरुणांच्या आयुष्यातील अस्पृश्यतेच्या एकेका प्रसंगाने व दोन छोट्या कविता यांनी केला होता. त्यानंतर ‘बलुतं’ या आत्मकथनामुळे प्रसिद्धीला आलेल्या दया पवार यांचा अस्पृश्यतेचेच अनुभव सांगणारा तीन हजार शब्दांचा ‘विटाळ’ हा लेख होता. मग जगदीश करंजगावकर यांचा ‘वास्तवाला सामोरे जायला हवे’ हा राजकीय लेख आणि त्र्यंबक सपकाळे यांच्या तीन कविता होत्या. मग राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख होता. त्यानंतर अनुक्रमे लहान बहिणीचे उपकार कसे फेडू (भीमराव चिकटे), रूढींच्या निर्मूलनाचे नवे जंग (ल.बा. रायमाने), स्वतंत्र भारतातील माझी फरफट (वसंत नारायण जाधव), खेड्यातील हुरडा (विद्यासागर कांबळे), दलितांमधीलही आम्ही दलित (विजया पगारे), अस्पृश्यता आणि स्वातंत्र्य (दत्ता भगत), हे घ्या पुरावे (प्रल्हाद चेंदवणकर), माझे अनुभव (धनंजय गुडदे) हे आठ लेख होते. मग बांडगुळे तोडणारे अंकुर (लैला महाजन) ही कथा होती. आणि समारोपाला पुरुषार्थी लोकमानस ही आजची गरज (एस.एम.जोशी) व बावडा आघाडीवरील सामसूम (बाबा आढाव) या दोन ज्येष्ठांचे लेख होते. अंकाच्या दीर्घ संपादकीय लेखामध्ये यदुनाथांनी साधनाच्या 24 वर्षांच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकून, साने गुरुजींचा वारसा व वसा अधोरेखित केला होता. आणि अवचटांनी अंक काढण्यामागील भूमिका सांगणारे छोटे टिपण लिहिले होते (प्रस्तुत अंकात हे टिपण घेतले आहे).

हा विशेषांक जोडअंक होता. त्यानंतर आलेल्या 26 ऑगस्टच्या अंकात द.तु. दिघे व यशवंत भोसले या दोन वाचकांची पत्रे आहेत. ‘ग्राम्य भाषा व हलकट टीका’ या शीर्षकाच्या त्या पत्रात, राजा ढाले यांच्या लेखातील काही विधानांबद्दल तीव्र नापसंती आहे. त्यानंतर आलेल्या 2 सप्टेंबरच्या अंकात दुर्गा भागवत यांचे एस.एम.जोशी यांना पत्र आणि त्याच्या शेजारी एस.एम. यांचे पत्र आहे. ‘एस.एम. यांनी त्या लेखाचा जाहीर निषेध करावा किंवा कार्यकारी विश्वस्तपदाचा राजीनामा द्यावा’ असे दुर्गाबाई म्हणतात. तर ‘‘त्या लेखातील ‘त्या’ विधानांचा निषेध, ती छापली गेली यासाठी माफी आणि तरीही आवश्यकता असेल तर राजीनाम्याची तयारी’’ असे एस.एम. यांचे पत्र आहे. याशिवाय ग.प्र.प्रधान, भार्गव, सरोजिनी वैद्य, र.ग.पंडित, मुमताज रहिमतपुरे, भालचंद्र कोतकर यांची पत्रे आहेत. ढालेंच्या लेखावरच ही पत्रे आहेत. संपादकांनी राजीनामा द्यावा असे पत्र प्रधानसरांचे तर झालेल्या चुकीवर कठोर टीका इतर पत्रांमध्ये आहे. याच अंकात यदुनाथ व अवचट यांची राजीनामा पत्रे आहेत (प्रस्तुत अंकात ती दोन्ही पूर्ण दिली आहेत.)

त्यानंतर आलेल्या 9 सप्टेंबरच्या अंकात 22 पत्रे आहेत, त्यामध्ये मृणालिनी देसाई, अ.के.भागवत, शांतीलाल शाह इत्यादी मान्यवरांची पत्रे आहेत. त्यातील एक पत्र सात जणांच्या नावाने आहे. पत्रलेखकांमधील बहुतेकांनी तो विशेषांक उत्तम झाला आहे याबद्दल संपादकांचे अभिनंदन केले आहे, त्या लेखातील ती विधाने कमालीची निषेधार्ह असून संपादकांनी ती छापायला नको होती असे म्हटले आहे, मात्र संपादकांचे राजीनामे स्वीकारले जाऊ नयेत असेही म्हटले आहे. याच अंकात ‘तेजोभंगाचे पाप आम्ही करणार नाही!’ हा एस.एम. यांचा लेख आहे. वैचारिक स्पष्टता, प्रामाणिकता, पारदर्शकता आणि तर्कनिष्ठ व विवेकी भूमिका यांचा (ऑल टाईम) अप्रतिम नमुना म्हणून या लेखाचा उल्लेख करावा लागेल. याच अंकात ‘साने गुरुजींची साधना’ हा अनिल अवचट यांचा लेख आहे, त्यात दरम्यानच्या दोन आठवड्यांत साधनाच्या आवारात आलेल्या दोन मोर्चांची हकीगत चित्रमय व नाट्यमय शैलीत आली आहे. उपहास, उपरोध, निर्भयता, तेजस्विता व कारुण्य इतके सारे या लेखातून अनुभवता येते (एस.एम. व अवचट या दोघांचेही लेख प्रस्तुत अंकात पुनर्मुद्रित केले आहेत. एस.एम. यांचा हा लेख निवडक साधनाच्या संपादकीय खंडात समाविष्ट केलेला आहे, परंतु अवचटांचा हा लेख मात्र त्यांच्या आतापर्यंत आलेल्या दोन डझनाहून अधिक पुस्तकांत कुठेही समाविष्ट झालेला नाही.)

त्यानंतर आलेल्या 16 सप्टेंबरच्या अंकात एकूण 24 पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यात वसंत पळशीकर व दि.के. बेडेकर यांच्या प्रतिक्रिया स्वतंत्र लेख म्हणाव्यात इतक्या सविस्तर आहेत, न्यायप्रेमी या टोपणनावाने एक लेख आहे. दत्तो वामन पोतदार, किशोर पवार, नरहर कुरुंदकर, पन्नालाल सुराणा, हुसेन जमादार, यांच्यासह अन्य पत्रलेखकही नामवंत म्हणावेत असे आहेत. एक पत्र 41 मान्यवरांच्या नावांसह आले आहे. लीलाधर हेगडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पाठवलेले पत्रही यात आहे. झाल्या प्रकाराबद्दल लेखक व संपादक यांच्यावर सरकार खटले दाखल करणार असल्याचे ऐकून, ‘तसे करणे का योग्य नाही’ हे सांगणारे ते पत्र आहे. आणि याच अंकात ‘ही चर्चा/वाद आता थांबवित आहोत,’ असे संपादकीय निवेदन आहे. या सर्व वाद-विवादात तीन-चार अपवाद वगळता कोणीही राजा ढाले यांच्या ‘त्या’ लेखातील त्या विधानांचे समर्थन केलेले नाही आणि दोन-तीन अपवाद वगळता कोणीही ‘संपादकांचे राजीनामे स्वीकारावेतच’ असे म्हटलेले नाही.

त्यावेळी महिनाभर चाललेले ते जाहीर वादविवाद हे साधनाच्या इतिहासातील ‘तीक्ष्ण काटे आणि त्यावर असलेली फुले’ असे प्रकरण होते. एस.एम., यदुनाथ व अवचट या तिघांनीही त्या प्रकरणात दाखवलेले धैर्य आणि ध्येयाप्रति राखलेली निष्ठा अशी अधोरेखित होते की, ‘आपण या परंपरेचे पाईक आहोत’ याचा आम्हाला अभिमान वाटतो. या प्रकरणात यदुनाथांच्या वाट्याला स्वकीयांकडून आणि परक्यांकडून जी अवहेलना आली आणि ती त्यांनी कर्तव्यनिष्ठेचा भाग मानली, यासाठी साधनाचे वाचक त्यांचे कायम ऋणी राहतील. ‘हे यदुनाथ होते तरी कोण,’ याची झलक नव्या वाचकांना दिसावी म्हणून, सुरेश द्वादशीवार यांचा दहा वर्षांपूर्वीचा लेख या अंकात पुनर्मुद्रित करीत आहोत. आणि वयाच्या 32 वर्षी तो लेख लिहिणारे राजा ढाले नावाचे रसायन कोणत्या संतापजनक परिस्थितीतून आकाराला आले होते, हे कळावे म्हणून ‘खेळ’ या नियतकालिकातील त्यांची मुलाखतही प्रस्तुत अंकात घेतली आहे.

एकंदरीत, हा सर्व अंक राजा ढाले प्रकरणाची पुनर्भेट असा झाला आहे, उत्खननातून तो आकाराला येत गेला. यातून धडा मिळतो तो हाच की, कोणत्याही शोषित समूहांची अभिव्यक्ती जहरी असणे स्वाभाविक, म्हणून त्याबद्दल आमजनतेने अधिक सहनशील व सहिष्णू होत जायला हवे आणि त्याचवेळी सामाजिक परिवर्तनासाठी लढणारांनी आपली अभिव्यक्ती करताना जबाबदारीचे भान ठेवायला हवे, तोल जाणार नाही याची काळजी घायला हवी. प्रस्तुत अंक वाचणाऱ्यांनाही हीच आग्रहाची विनंती आहे.

Tags: संपादकीय राजा ढाले Editorial Raja Dhale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके