डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘साधना’च्या वाटचालीची दिशा

अशा प्रकारची इतर काही उदाहरणे सांगता येतील, पण तरीही हे प्रमाण आमच्या अपेक्षेइतके नाही हे मान्य केलेच पाहिजे. यासाठी आम्ही काही तरुण पण सक्षम लेखकांना अभ्यासवृत्ती देऊन लेखन मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैचारिक लेखन ‘साधना’तून बऱ्यापैकी प्रसिद्ध होत असले आणि ते परिवर्तनाला पोषकच ठरणारे असले तरी प्रत्यक्ष चळवळी, आंदोलन व विधायक उपक्रम याबाबतचे लेखन मात्र फारच कमी प्रसिद्ध होत आहे, याचे खूपच असमाधान आम्हाला आहे! असे लेखन प्रत्यक्ष काम करणारे लोक क्वचितच लिहितात आणि बऱ्याच वेळा त्यात वृत्तांत किंवा औपचारिक माहितीच फक्त असते. ही मर्यादा ओलांडण्यासाठी प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी सामाजिक-राजकीय भान असलेल्या लेखकांना पाठवून ‘कार्यकर्ता’, ‘संघर्षकथा’ व ‘विधायक वाटा’ ही सदरे नियमितपणे चालतील असा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

एकविसाव्या शतकातील दहाव्या वर्षाच्या प्रारंभी ‘साधना’च्या  आगामी वाटचालीबाबत विचार करीत असताना, आमचे मन कोणत्या दिशेने धावते आहे याची थोडीबहुत कल्पना वाचकांनाही असावी असे फार तीव्रतेने वाटते; कारण ‘साधना’च्या प्रत्यक्षातील प्रवास आमच्या कार्यक्षमता आणि वाचक-लेखक,हितचिंतक-पाठीराखे यांचे सहकार्य या दोहोंवर अवलंबून आहे.

गेल्या  वर्षी ‘साधना’च्या हीरकमहोत्सवाचा सांगता समारंभ भारताच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडला,तेव्हा आम्ही दोन सूचक विधाने केली होती. 1) ‘साधना’च्या हीरकमहोत्सवाची सांगता झाली याचा अर्थ ‘साधना’च्या अमृतमहोत्सवाची पायाभरणी पूर्ण झाली असा आम्ही घेतो. 2) वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक ही ‘साधना’ची ओळख अधिक ठळक व्हावी असा आमचा प्रयत्न राहील.

या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या  संपादकीयामध्ये  आम्ही स्पष्टपणे नोंदवले आहे: संख्मात्मक व गुणात्मक या दोनही प्रकारची वाढ झाली तरच ‘विकास’ ही संज्ञा बहाल करता येते आणि त्याबाबत ‘साधना’ला आम्ही अपवाद करू इच्छित नाही.

हीरकमहोत्सवाच्या काळात (अमृतमहोत्सवाची पायाभरणी करण्यासाठी) ‘साधना’ने केलेले बहुतांश संकल्प सयाधानकारकपणे प्रत्यक्षात अवतरले, पण सर्वांत महत्त्वाचा संकल्प यात्र पूर्णत्वास गेला नाही; तो म्हणजे नवे सहा हजार वर्गणीदार-वाचक मिळविण्याचा!  अनेक कारणांमुळे व काही मर्यादांमुळे आम्ही त्या संकल्पपूर्तीसाठी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. त्यातच भर म्हणजे न चुकता दर गुरुवारी दुपारी एक वाजता अंक पोस्टात रवाना करूनही, पोस्टखात्याच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक वाचकांना ‘साधना’चे अंक मिळण्यात अनियमितपणा वाढला. शिवाय, साधना वेबसाईटवर गेल्या साठ वर्षांतील सर्व अंक असूनही, अधूनमधून होणारे तांत्रिक बिघाड व व्यवस्थापनातील दिरंगाई यामुळे वेबसाईटवरही अनियमितपणा राहिला. साधनाच्या संख्मात्मक वाढीला अडथळा ठरणाऱ्या या  तीनही त्रुटी (नवे वर्गणीदार, पोस्टाची दिरंगाई व वेबसाईटची अनिममितता) दूर करण्यासाठी आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून नियोजन करीत आहोत; त्यासाठी काही तज्ज्ञ व्यक्ती-संस्था यांचे यार्गदर्शन-सहकार्य घेत आहोत. त्याबाबतची सविस्तर याहिती देणारी निवेदने पुढील काही अंकातून प्रसिद्ध होतील.

‘साधना’च्या संख्मात्मक वाढीसाठी आवश्यक असलेल्या वरील तीन उपाययोजनांबाबत आम्ही असयाधानी असलो तरी तीन दीर्घकालीन उपाययोजनांबाबत यात्र आम्ही बऱ्यापैकी मशस्वी ठरलो आहोत. 1)यावर्षी बालकुयार दिवाळी अंकाच्या तब्बल 1 लाख 46 हजार प्रतींची विक्री झाली. हे यश आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक असले तरी तो अपघात नव्हता. मुलांसाठीच्या अंकाला मागणी भरपूर असते आणि त्या अंकाची किंमत खूप कमी होती हे खरे असले तरी, हितचिंतक व्यक्ती-संस्था-संघटना यांचे पाठबळ मिळवता आले तर छोटीशी यंत्रणाही किती परिणामकारक काम करू शकते याचा तो पुरावा होता. खपाचा विक्रम, भरपूर प्रसिद्धी वा नफा कमावणे या पलीकडे आम्ही त्या अंकाकडे पहात आहोत. ‘बालकुमार’ अंकाला असाच प्रतिसाद पुढील वर्षीही मिळाला तर त्यानंतर ‘युवा’ अंकही प्रकाशित करण्याचा विचार आम्ही करीत आहोत. सलग सात-आठ वर्षे बालकुमार व युवा अंकांतून संस्कारित झालेली नवी पिढी साधना साप्ताहिकाची नियमित वाचक होण्यास भरपूर वाव आहे (अर्थात, वितरण यंत्रणा सक्षम असेल तर!) असे आम्हांला वाटते. हे काहींना स्वप्नरंजन वाटण्याची शक्यता आहे, पण ‘मार्केट’ व ‘मॅनेजमेंट’  यांची ही अगदी पायाभूत व पुरातन तत्वे आहेत.

II) गेल्या वर्षी ‘कादंबरी’ या वाङ्‌मय प्रकाराला केंद्र मानून पहिले साधना साहित्य संमेलन पुणे येथे झाले तर या वर्षी ‘कविता’ या वाङ्‌मय प्रकाराला केंद्र मानून, दुसरे साधना साहित्य संमेलन पणजी (गोवा) येथे पार पडले. या पुढील काळात, दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत असे संमेलन भरवले जाणार आहे. ग्रामीण भागातून, बहुजन समाजातून नवे वाचक-लेखक तयार होत आहेत, त्यांना ‘साधना’शी जोडण्यात ही संमेलने उपयुक्त ठरणार आहेत. साहित्याच्या माध्यमातून समाजाशी संवाद व्हावा आणि त्यातून परिवर्तनाचा विचार पेरला जावा, या दृष्टीने साहित्य हे ‘साधना’चे प्रमुख अंग राहिले आहे. मागील दोनही संमेलनांतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारे फायदे बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहेत.

III) साधना समकालीन हा सात दिवसांचा राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक महोत्सव यागील दोन वर्षे पुणे शहरात उत्तमप्रकारे पार पडला. समकालीन प्रश्नांकडे लक्ष वेधणारा, चर्चा व चिकित्सा करणारा हा महोत्सव इतर शहरांतही भरवता आला तर त्याचाही ‘साधना’च्या संख्मात्मक वाढीला फायदाच होणार आहे. व्याख्याने, चर्चासत्रे, प्रकाशन समारंभ, वाचक-कट्टे यांचे प्रमाण वाढून, इतर शहरांतही त्यांचे आयोजन करता यावे हा या पुढील टप्पा असेल. त्याची पूर्वतयारी म्हणून लहान-मोठे वाचक मेळावे आयोजित करण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन करीत आहोत.

साधनाची संख्मात्मक वाढ होण्यासाठी तत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजनांना पूरक ठरण्यासाठी व आर्थिक स्थैर्यासाठी ‘साधना प्रकाशन’ व ‘साधना मीडिया सेंटर’ व्यावसायिक पद्धतीने (अर्थातच, मूळ गाभा न सोडता) चालविण्याचा प्रयत्न करीत आहोत.

साधना अंकांच्या गुणात्मक वाढीसाठीची आखणी ‘स्लो बट स्टेडी’ अशी आहे. विविध विषय हाताळण्यासाठी पानांची उपलब्धता व साधनसामग्रीची मर्यादा तर असतेच, पण त्याहून अधिक वेळेची मर्यादा असते. राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक असे साधना अंकाचे पाच प्रमुख घटक आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना-घडामोडींचे ताणेबाणे उलगडून दाखवणे हेही आवश्यक असते आणि त्याच वेळी विज्ञान, कृषी, शिक्षण अशा मूलभूत विषयांकडेही लक्ष वेधणे आवश्यक असते. नव्या व तरुण लेखकांचा शोध घेऊन त्यांना लिहिते करायचे असते आणि ते करताना अंकातील लेखनाचा दर्जा खालावणार नाही याचीही काळजी घ्यायची असते. शिवाय, अंक छापायला गेल्यानंतर आठवडाभरानंतर वाचकांच्या हातांत तो पडणार असतो, त्यामुळे अनेक घडामोडी हाताळता येत नाहीत किंवा तोपर्यंत परिस्थिती बरीच बदललेली असते. अशा पार्श्वभूमीवर तुलनेने दुर्लक्षित विषयांना हात घालणे, अतिपरिचित विषयांचे अंतरंग उकलून दाखवणे आवश्यक ठरते; म्हणजे केवळ माहिती देणारे नाही तर विश्लेषण करून भाष्य करणारे लेखन प्रसिद्ध करण्यास प्राधान्य द्यावे लागते.

अशा अनेक मर्यादा असल्या तरी साधना साप्ताहिकाची बलस्थानेही कमी नाहीत. सुशिक्षित, प्रौढ व समाजसन्मुख वाचक वर्ग ‘साधना’ला लाभलेला आहे. त्यामुळे राजकीय-सामाजिक प्रश्नांबाबत वाचकांना विचारप्रवृत्त करणारे व काही प्रश्नांची कोंडी फोडणारे लेखन ‘साधना’तून प्रसिद्ध करायला भरपूर वाव आहे. गेल्या वर्षीची तीन उदाहरणे लक्षणीय आहेत. 1)‘नक्षलवादाचे आव्हान’ हा विशेषांक प्रसिद्ध केला, त्यामुळे देशासमोरील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाबाबत चांगली चर्चा घडून आली. त्या अंकातील महेश भागवत यांची मुलाखत (नक्षलवादाशी लढण्याचा फॉर्म्युला) ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. नीळकंठ रथ यांनी उडिया भाषेत अनुवाद करून ओडिशातील एका मोठ्या नियतकालिकाकडे प्रसिद्धीसाठी पाठवली. 2)माजी कुलगुरू डॉ.द. ना. धनागरे यांनी ‘विद्येच्या प्रांगणात’ या सदरातील बारा लेखांतून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले, त्याची विद्यापीठ स्तरावर भरपूर चर्चा झाली. 3)दिवाळी अंकातील राजाशिरगुप्पे यांचा ‘शोधयात्रा: ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांची’ हा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित 46 पानी लेख, या वर्षीच्या सर्व दिवाळी अंकातील सर्वोत्तम लेख आहे, असे प्रसारमाध्यमातील अनेकांनी बोलून दाखवले.

अशा प्रकारची इतर काही उदाहरणे सांगता येतील, पण तरीही हे प्रमाण आमच्या अपेक्षेइतके नाही हे मान्य केलेच पाहिजे. यासाठी आम्ही काही तरुण पण सक्षम लेखकांना अभ्यासवृत्ती देऊन लेखन मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैचारिक लेखन ‘साधना’तून बऱ्यापैकी प्रसिद्ध होत असले आणि ते परिवर्तनाला पोषकच ठरणारे असले तरी प्रत्यक्ष चळवळी, आंदोलन व विधायक उपक्रम याबाबतचे लेखन मात्र फारच कमी प्रसिद्ध होत आहे, याचे खूपच असमाधान आम्हाला आहे! असे लेखन प्रत्यक्ष काम करणारे लोक क्वचितच लिहितात आणि बऱ्याच वेळा त्यात वृत्तांत किंवा औपचारिक माहितीच फक्त असते. ही मर्यादा ओलांडण्यासाठी प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी सामाजिक-राजकीय भान असलेल्या लेखकांना पाठवून ‘कार्यकर्ता’, ‘संघर्षकथा’ व ‘विधायक वाटा’ ही सदरे नियमितपणे चालतील असा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

साधना साप्ताहिक वंचित-शोषित घटकांना आपले पाठीराखे वाटावे, सक्रिय सज्जनशक्तीचे व्यासपीठ बनावे आणि समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटकांना जरब बसवणारे ठरावे असा आमचा प्रयत्न राहील. कारण साने गुरुजींचे विचार व कार्य यांचा गाभाही हाच होता!

सहयोगी संपादक मंडळाची कल्पना : कोणत्याही नियतकालिकाला कालसुसंगत राहण्यासाठी व परिणामकारक ठरण्यासाठी नवीन विषय, नवीन लेखक व ताजे लेख मिळवणे ही प्रक्रिया सतत चालू ठेवावी लागते. साधना अंकाचे संपादन करताना वाचक-लेखक व विविध क्षेत्रांतील लोकांशी आम्ही अनौपचारिकपणे तर नेहमीच बोलत असतो; पण लहान-मोठ्या बैठका घेऊन अंकाच्या नियोजनाबाबत चर्चाही करीत असतो आणि अंकाच्या निर्मितीत त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उपयोगही करीत असतो.  हेच काम अधिक सुसंगतपणे करता यावे या साठी आम्ही सहयोगी संपादक मंडळाची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. काही विषयांकडे जाणीवपूर्वक व विशेष लक्ष देण्यासाठी त्या त्या विषयांच्या जाणकार-अभ्यासकांचे सहकार्य मागितले आहे. पुढील वर्षभरासाठी आम्ही अभय टिळक (अर्थकारण), राजा शिरगुप्पे (सामाजिक), अवधूत परळकर (सांस्कृतिक) व संजय भास्कर जोशी (साहित्य) या चौघांचे सहकार्य मागितले आहे. यांनी प्रत्येक महिन्यात त्यांच्या विषयांच्या अनुषंगाने एखादा लेख द्यावा, अन्य लेखकांकडून एखादा लेख मिळवावा किंवा लेखकांची-विषयांची नावे सुचवावीत अशी अपेक्षा आहे.

या चौघांनीही देऊ केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

Tags: हीरकमहोत्सव आगामी दिवाळी अंक संपादक मंडळ आगामी वाटचाल editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके