डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पार्श्वभूमीवरील क्षणचित्रे - साधना साहित्य संमेलन : 2010

दोन वर्षांपूर्वी ‘साधना’तून ‘कथेमागची कथा’ ही अतिशय वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण लेखमाला लिहिणाऱ्या राजन खान यांचे ‘कथा आणि कथेमागची कथा’ हे मराठी साहित्यातील अभिनव प्रयोग मानले जाणारे पुस्तक गेल्या वर्षी साधना प्रकाशनाने प्रकाशित केले. ते पुस्तक या संमेलनातील पुस्तक विक्रीच्या केंद्रावर विशेष चर्चेत होते. म्हणून समारोप सत्राचे आभाराचे भाषण राजन खान यांच्याकडे सोपवले. त्यांनी केलेले दहा मिनिटांचे आभाराचे भाषण, त्यांनी ‘संमेलनामागची कथा’ लिहिली तर कशी असेल याची झलक दाखवणारे होते.

01. साधना साप्ताहिकाने आपल्या हीरकमहोत्सवी वर्षात, अमृतमहोत्सवी वाटचालीसाठी पायाभरणी करताना जे काही उपक्रम सुरू केले, त्यांपैकी एक : साधना साहित्य संमेलन. गेल्या काही वर्षांत नवे वाचक व नवे लेखक (अगदीच ग्रामीण भागातून नाही, पण) तालुका व जिल्हा स्तरांवरून मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, या लेखक-वाचकांना ‘साधना’शी जोडून घेता यावे हा साधना साहित्य संमेलनामागचा प्रमुख हेतू आहे.

02. अलीकडच्या काही वर्षांत विविध ठिकाणी व विविध समूहांना समोर ठेवून साहित्य संमेलने आयोजित केली जातात आणि वाचनसंस्कृतीच्या दृष्टीने व्यापक विचार केला तर ती सर्व स्वागतार्ह आहेत, पण त्या संमेलनांपेक्षा वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण काय करता येईल? हा प्रश्न पुढे आला तेव्हा अ.भा.म.साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि साधना ट्रस्टचे विश्वस्त रा.ग.जाधव म्हणाले, ‘‘संमेलन असे व्हावे की त्यात चर्चासत्राचा दर्जेदारपणा आणि महोत्सवाचा उत्साह असावा.’’ असे संमेलन आयोजित करण्यासाठी काय करावे लागेल? या प्रश्नाच्या विचारातूनच प्रत्येक संमेलन फक्त एकाच साहित्यप्रकाराला केंद्रस्थानी ठेवून करावे, या विचारावर एकमत झाले.

03. अनेक साहित्यिकांशी अनेक वेळा अनौपचारिक चर्चा केल्यानंतर दर वर्षी एका साहित्यप्रकाराला केंद्रस्थानी ठेवून, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत पुढील किमान पंधरा वर्षे संमेलने आयोजित करावीत असा निर्णय साधना साप्ताहिकाने घेतला आणि पहिल्या तीन संमेलनांसाठी दहा सदस्यांची एक संयोजन समिती तयार केली गेली. रा.ग.जाधव अध्यक्ष असलेल्या या समितीत श्याम मनोहर, विलास खोले, अरुणा ढेरे, राजन खान, संजय भास्कर जोशी, संतोष शेणई, संजय आवटे आणि नरेंद्र दाभोलकर व विनोद शिरसाठ यांचा समावेश होता.

 04. अनेक घटकांचा विचार करून, सर्व साधना साहित्य संमेलने दर वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घ्यावीत असे ठरविण्यात आले. त्यानुसार 2008 मध्ये पहिले संमेलन ‘कादंबरी’ या साहित्यप्रकाराला केंद्रस्थानी ठेवून पुणे येथे झाले, दुसरे संमेलन 2009 मध्ये ‘कविता’ या साहित्यप्रकाराला केंद्रस्थानी ठेवून पणजी (गोवा) येथे झाले आणि तिसरे संमेलन ‘कथा’ या साहित्यप्रकाराला केंद्रस्थानी ठेवून 10 ते 12 डिसंमेबर 2010 या काळात कोल्हापूर येथे झाले.

05. पहिल्या संमेलनाचे संपूर्ण आयोजन साधना ट्रस्टच्या वतीने केले होते, दुसऱ्या संमेलनाचे आयोजन गोंतक साहित्य सेवक मंडळ आणि गोवा राज्याचे कला व संस्कृती संचालनालय यांच्या सहकार्याने केले तर तिसऱ्या संमेलनाचे आयोजन कोल्हापुरातील राजर्षि शाहू स्मारक ट्रस्टच्या सहकार्याने केले गेले. गोव्यातील संमेलन सुरेश नाईक यांच्या पुढाकाराने झाले होते. कोल्हापूर येथे संमेलन आयोजित करण्यासाठी साधना ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त आप्पासाहेब सा.रे.पाटील आणि राजर्षि शाहू स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुढाकार घेतला. राजन गवस व राजा   शिरगुप्पे हे साधनाचे दोन वाचकप्रिय लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यात साधना साप्ताहिकाचे एक हजारांहून अधिक वर्गणीदार आहेत, हे घटकही या संमेलनाच्या आयोजनाचा विचार करताना आमच्या मनात होते.

06. राजर्षि शाहू स्मारक ट्रस्टचे विश्वस्त असलेले सुनीलकुमार लवटे यांनी कोल्हापुरातील संमेलनाची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. साधना प्रकाशनाचा लोगो- तीन मेणबत्त्या (सत्य, शिव, सुंदराची आराधना) पेटवून संमेलनाचे उद्‌घाटन करण्याची आणि संमेलनाचे बोधचिन्ह म्हणून तेच पुढे आणण्याची कल्पना त्यांचीच होती.

07. हिंदीतील महान लेखक प्रेमचंद यांनी स्थापन केलेल्या ‘हंस’ या मासिकाचे कार्यकारी संपादक असलेले संजीव या संमेलनाचे उद्‌घाटक होते. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाच्या संमेलनाचे आयोजन राजर्षि शाहू स्मारक ट्रस्टने करण्यासाठी स्वत: कथाकार असलेल्या लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुढाकार घ्यावा आणि प्रेमचंद यांनी स्थापन केलेल्या ‘हंस’ मासिकाचे कार्यकारी संपादक असलेल्या कथाकार संजीव यांनी संमेलनाचे उद्‌घाटन करावे हा त्रिवेणी संगम मनोहर होता.

08. या संमेलनाच्या उद्‌घाटन समारंभापूर्वी अर्धा तास आधी प्रिया आमोद यांनी लिऊ झिओबो यांची कविता उद्‌घाटन समारंभात वाचून दाखविण्याची इच्छा व्यक्त केली. 10 डिसेंबर हा युनोच्या वतीने मानवी हक्क दिन पाळला जातो आणि याच दिवशी साधना साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन होत असताना नॉर्वेची राजधानी असलेल्या ऑस्लो शहरात या वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्काराचे वितरण होणार होते. या समारंभाला झिओबो यांना जाऊ देण्यास चीन सरकारने परवानगी नाकारल्याने त्यांच्या अनुपस्थितीत नोबेल पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार होता. त्यामुळे त्या संदर्भात झिओबो यांनी दोन दिवस आधी केलेल्या कवितेचा अनुवाद वाचण्याची परवानगी प्रिया आमोद यांनी मागितली. झिओबोंना नोबेल जाहीर झाले तेव्हा साधनाने ‘नोबेल समितीचा निर्दयी घाव’ या शीर्षकाचा संपादकीय लेख (साधना : 23 ऑक्टो. 2010) लिहिला होता, त्यामुळे ती कविता वाचायला परवानगी देणे औचित्यपूर्णच होते. संजीव यांनी उद्‌घाटनाच्या भाषणाचा शेवट करताना नोबेल आणि बुकर यांसारख्या पुरस्कारांवर जोरदारपणे टीका केली, ते त्यांच्या भूमिकेशी सुसंगतच होते. पण या गमतीदार विरोधाभासावर चर्चा करताना कोणी दिसले नाही, वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनीही हा विरोधाभास टिपला नाही.

 09. संमेलनाचे उद्‌घाटक संजीव, संमेलनाच्या बीजभाषक पुष्पा भावे, अ.भा.म.सा.संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष द.भि.कुलकर्णी यांनी ‘तीन मेणबत्त्या’ पेटवून व शाहू स्मारक ट्रस्टच्या फलकावर स्वाक्षऱ्या करून संमेलनाचे औपचारिक उद्‌घाटन केले. स्वाक्षरी करताना संजीव यांनी ‘प्रेरक व्यक्तित्व को सलाम’ पुष्पा भावे यांनी ‘मानवाधिकाराचे आणि महाराजांचे संस्मरण’ तर द.भि.कुलकर्णी यांनी ‘कथा म्हणजे मानवी जीवन सूक्ष्मदर्शक यंत्राखाली येणे’ असे संदेश लिहिले. त्या फलकावर लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिले, ‘ज्या कथेमुळे आपली सर्वांची मानवी जीवनाची जाण अधिक समृद्ध होते, ती माझ्यासाठी चांगली व श्रेष्ठ कथा असते!’ संजीव स्वाक्षरी करत असताना त्यांच्या सुंदर हस्ताक्षराचा उल्लेख झाला तेव्हा द.भि.म्हणाले, ‘‘हिंदीतील लोकांचे हस्ताक्षर चांगले नसते, पण यांचे आहे.’’ उद्‌घाटनाच्या भाषणात संजीव म्हणाले, ‘‘उर्दूचे साहित्यिक भाषेचा जेवढा सखोल विचार करतात तेवढा अन्य भाषेतील लोक करीत नाहीत.’’ द.भि.आणि संजीव या दोघांची वरील विधाने मार्मिक आणि उद्‌बोधक आहेत.

 10. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रात्री लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या घरी निमंत्रितांना जेवण दिले, ते आटोपल्यानंतर रात्री उशीरा अकरा वाजता अमोल पालेकर आले आणि त्यांनी पाच-सात लोकांच्या उपस्थितीत तासभर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्यात व द.भि.कुलकर्णी यांच्यात खेळीमेळीच्या वातावरणात मराठी भाषा व वाचन-संस्कृती या संदर्भात भिन्न मते व्यक्त करणारी चर्चा झाली. त्या चर्चेच्या ओघात अमोल पालेकर यांनी ‘सुरेश द्वादशीवारांचा साधनातील लेख या संदर्भात छान विश्लेषण करतो,’... ‘साधना बालकुमार दिवाळी अंकात भारत सासणेसारखा लेखक लिहितो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे’ असे सांगितले, तेव्हा अमोल पालेकर (साधनाचे वर्गणीदार आहेत हे माहीत होते, पण) साधना बारकाईने वाचतात हे प्रथमच लक्षात आले. त्याहीपुढे जाऊन त्यांनी ‘लक्ष्मीकांत देशमुख यांची साधनातील लेखमाला माझी आवडती आहे’ आणि ‘पुढील वर्षाच्या बालकुमार साधना दिवाळी अंकासाठी मी स्वत:ची चित्रे देईन’ असेही स्वत:हून सांगितले.

11. समारोपाच्या सत्रात द.भि.कुलकर्णी यांनी भाषणाच्या सुरुवातीला ‘कोल्हापूर हे माझे आवडते गाव आहे’ असे सांगून कोल्हापूरची भाषा व संस्कृती यांचे गमतीदार किस्से सांगितले आणि त्यांनी त्यांचे एक पुस्तक कोल्हापूर गावाला अर्पण केल्याची फारशी कोणाला माहिती नसलेली माहिती दिली. थोडेसे ऐसपैस भाषण करताना त्यांनी एक अतिशय महत्त्वाचे विधान केले, ते म्हणजे ‘कथा हा स्वतंत्र वाङ्‌यप्रकार आहे असे म्हणण्यापेक्षा इतर सर्व वाङ्‌यप्रकारांत कथा असतेच.’  भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कथा हा वाङ्‌यप्रकारच नाही’ या विधानाला त्यांनी एका बाजूने छेद दिला आणि दुसऱ्या बाजूने समर्थन केले असे म्हणता येईल. गणित हा वेगळा विषय नाही तर इतर सर्व विषयांच्या आकलनासाठी गणित उपयुक्त ठरते, असे विधान गणिताच्या पाठ्यपुस्तकाच्या प्रस्तावनेत केलेले असते, त्याच्याशी समांतर असे द.भिं.चे विधान आहे. या विधानाची चांगली समीक्षा व्हायला हवी, झाली असेल तर पुढे आणायला हवी!

12. दोन वर्षांपूर्वी ‘साधना’तून ‘कथेमागची कथा’ ही अतिशय वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण लेखमाला लिहिणाऱ्या राजन खान यांचे ‘कथा आणि कथेमागची कथा’ हे मराठी साहित्यातील अभिनव प्रयोग मानले जाणारे पुस्तक गेल्या वर्षी साधना प्रकाशनाने प्रकाशित केले. ते पुस्तक या संमेलनातील पुस्तक विक्रीच्या केंद्रावर विशेष चर्चेत होते. म्हणून समारोप सत्राचे आभाराचे भाषण राजन खान यांच्याकडे सोपवले. त्यांनी केलेले दहा मिनिटांचे आभाराचे भाषण, त्यांनी ‘संमेलनामागची कथा’ लिहिली तर कशी असेल याची झलक दाखवणारे होते.

13. कथा : प्रश्नमंजूषा, कथा अभिवाचन, कथा : लेखन या तीन प्रकारच्या स्पर्धा या संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केल्या होत्या. कोल्हापुरातील व आसपासच्या गावांतील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना पारितोषिक म्हणून पुस्तके देण्यात आली. या पुस्तकांत साधना प्रकाशनाच्या राजन गवस - (कैफियत) राजा शिरगुप्पे - ‘न पेटलेले दिवे’ आणि ‘शोधयात्रा’, ज्ञानेश्वर मुळे - (नोकरशाईचे रंग) या तीन कोल्हापूरकर लेखकांच्या पुस्तकांचा समावेश होता. कथा आणि कथेमागची कथा- राजन खान, ‘मन्वंतर : समूहाकडून स्वत:कडे’- सुरेश द्वादशीवार आणि ‘झपाटलेपण ते जाणतेपण’ ही साधना प्रकाशनाची अन्य पुस्तकेही स्पर्धेतील बक्षिसांत समाविष्ट केली होती.

14. समारोपाच्या सत्रात- या संमेलनाच्या संयोजनाची मुख्य जबाबदारी पार पाडणाऱ्या सुनीलकुमार लवटे यांचा द.भिं.च्या हस्ते साधना प्रकाशनाची वरील सर्व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. द.भिं.नी आपल्या भाषणात पु.ल.देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ पुस्तकातील ‘नारायण’ या व्यक्तिरेखेचा उल्लेख केला आणि त्यांच्या आधी राजन खान यांनी आभाराच्या भाषणात शाहू स्मारक ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्यांच्यातील एकाचे जे वर्णन केले ते ‘नारायण’ची आठवण करून देणारेच होते.

 15. संमेलनातील एक सत्र ‘स्थानिक कथाकारांशी संवाद’ असे होते. त्या सत्रात मोहन पाटील, सखा कलाल, सुमित्रा जाधव, निशिकांत गुरव या कथाकारांशी रणधीर शिंदे व कृष्णात खोत यांनी संवाद साधला. पण निवेदन करताना सुरुवातीलाच रणधीर शिंदे यांनी ‘‘या सत्राच्या नावात ‘स्थानिक’ हा शब्द केवळ संयोजनाच्या सोयीसाठी ठेवला असावा’’ असे सांगून, या कथाकारांना ‘स्थानिक’ संबोधणे योग्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुठेही ‘स्थानिक’ शब्द वापरला गेला नाही आणि मग समारोपाच्या सत्रात चारुता सागर, सखा कलाल इत्यादी कथाकारांचा सत्कार करताना ‘स्थानिक’ शब्दाऐवजी ‘कोल्हापूरकर’ असा शब्द वापरला गेला. चारूता सागर आपल्या थोड्याच पण वैशिष्ट्यपूर्ण कथामुंळे मराठी साहित्यात परिचित आहेत, त्यांचा सत्कार द.भिं.नी व्यासपीठावरून खाली उतरून केला तेव्हा सभागृहातील सर्वांनी उभे राहून, टाळ्या वाजवून त्यांना मानवंदना दिली.

16. संमेलनाला येताना अनंत भावे म्हणाले होते, ‘कार्यक्रम कोणताही असो, त्यातून मजा आली पाहिजे. मी या संमेलनातील अर्ध्या कार्यक्रमांना जरी बसलो तरी तुचे संमेलन यशस्वी झाले असे समजा.’ या संमेलनात अडीच दिवसांत मिळून एकूण 14 कार्यक्रम झाले. कार्यक्रम चालू असताना पाय मोकळे करायला किंवा चहा-पाण्याला थोडीफार माणसे सभागृहाबाहेर वावरताना दिसायची, त्यांच्यात अनंत भावे एक-दोन वेळाच दिसले आणि प्रत्येक कार्यक्रम संपल्यानंतरच्या छोट्याशा मध्यंतरात सभागृहाबाहेर होणाऱ्या गर्दीत मात्र हमखास दिसायचे. 

आदरांजली

गेल्या आठवड्यात पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु देवदत्त दाभोलकर, ज्येष्ठ समाजवादी नेते सुरेंद्र मोहन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुभाष भेंडे या तिघांचे निधन झाले. त्या तिघांना आदरांजली वाहणारे तीन लेख पुढील अंकात प्रसिद्ध होतील.

Tags: संमेलन रा.ग.जाधव साहित्य संमेलन अमृतमहोत्सव हीरकमहोत्सव साधना साप्ताहिक साधना साहित्य संमेलन : 2010 sane guruji narendra dabholkar r.g.jadhav sammelan sahitya sammelan amrut mahotsav hirak mahotsav sadhana saptahik Sadhana sahitya sammelan -2010 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके