डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तारेवरच्या कसरतीसाठी शुभेच्छा!

मात्र साहित्य संमेलनात कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद झाले पाहिजेत अशी आपल्या समाजाची धारणा असल्याने, देशमुख यांनाही चार-दोन वादांना सामोरे जाण्याचे प्रसंग येतील. उदा. या वर्षीचे संमेलन गुजरातमध्ये होणार आहे, म्हणजे नरेंद्र मोदींच्या राज्यात. तिथे विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत; सत्तांतर झाले किंवा नाही झाले तरी विकासाचे गुजरात मॉडेल हा यावेळी वादविवादाचा विषय होऊ शकतो. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनवले या कारणासाठी मोदींवर टीका होत होती.

फेब्रुवारी 2018 मध्ये गुजरात राज्यातील बडोदा शहरात होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला. पंचरंगी लढत झाली आणि त्यातून लक्ष्मीकांत देशमुख विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर रवींद्र शोभणे तर तिसऱ्या क्रमांकावर राजन खान राहिले. चौथ्या व पाचव्या क्रमांकाचे स्थान अनुक्रमे किशोर सानप व रवींद्र गुर्जर यांना मिळाले. सानप यांची ओळख प्रामुख्याने संतसाहित्याचे अभ्यासक तर गुर्जर यांची ओळख अनुवादक अशी आहे. उर्वरित तिघांची ओळख मात्र कथाकार-कादंबरीकार अशी आहे, जरी त्यांनी ललितेतर म्हणावे असे अन्य काही लेखन केले असले तरी! या तिघांपैकीच एकजण अध्यक्ष होणार हे सुरुवातीपासून स्पष्ट होते आणि त्यातही देशमुख यांची शक्यता सर्वांत जास्त होती. याची अनेक खरी/खोटी कारणे सांगितली गेली, त्यातील बहुतांश कारणे साहित्यबाह्य होती. परंतु ही सर्व कारणे बाजूला ठेवली तरी देशमुख यांचीच शक्यता जास्त होती, याची तीन प्रमुख कारणे अशी.

एक- कथा व कादंबरी या मुख्य साहित्यप्रकारांसह ललितेतर लेखनही त्यांच्या नावावर इतरांच्या तुलनेत जास्त आहे, त्यामुळे वेगळा वाचकसमूह त्यांना लाभलेला आहे. दुसरे- प्रशासकीय अधिकारी या नात्याने त्यांनी 35 वर्षांपेक्षा अधिक काळ कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, अकोला आणि मराठवाड्यातील काही जिल्हे अशा विविध प्रांतात वास्तव्य केलेले आहे. या सर्व ठिकाणी काम करणारे साहित्यिक व साहित्यसंस्था यांच्याशी देशमुखांनी संपर्क-संवाद ठेवलेला होता. आणि तिसरे कारण- आधी विसेक वर्षे राज्याच्या प्रशासकीय सेवेत प्रथम वर्ग अधिकारी व नंतरची दहा-बारा वर्षे केंद्र सरकारच्या सेवेत आयएएस अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. त्या काळात, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या मर्यादेत राहून, पण आऊट ऑफ बॉक्स विचार करून ‘जाऊ तिथे साहित्य संस्कृतीविषयक उपक्रम राबवू’ असे धोरण ठेवले होते. या सर्व कारणांचा विचार केला तर त्यांची अध्यक्ष म्हणून निवड होणे, यात अनपेक्षित असे काही नाही.

देशमुख यांचे साहित्य आणि विचार पुढील काही महिन्यांत विविध स्तरांतील नव्यांकडून वाचले जाईल, ज्यांनी आधी वाचले होते ते अधिक दखल घेऊ लागतील. त्यांचे काही लेखन अलक्षित राहिले होते, त्याकडे आता यथायोग्य आणि काही वेळा जास्तच लक्ष वेधले जाईल. त्यातून होणाऱ्या टीका-टिप्पणींचा सामनाही त्यांना कमी- अधिक प्रमाणात करावा लागेल. परंतु मुळातूनच समन्वयवादी प्रवृत्ती व उदारमतवादी वर्तन असल्याने ते त्यावर सहज मात करतील किंवा दुर्लक्ष करतील. मात्र साहित्य संमेलनात कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद झाले पाहिजेत अशी आपल्या समाजाची धारणा असल्याने, देशमुख यांनाही चार-दोन वादांना सामोरे जाण्याचे प्रसंग येतील. उदा. या वर्षीचे संमेलन गुजरातमध्ये होणार आहे, म्हणजे नरेंद्र मोदींच्या राज्यात. तिथे विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत; सत्तांतर झाले किंवा नाही झाले तरी विकासाचे गुजरात मॉडेल हा यावेळी वादविवादाचा विषय होऊ शकतो. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनवले या कारणासाठी मोदींवर टीका होत होती.

आता मात्र त्या विकासाच्या मॉडेलवरच टीका होत आहे, किंबहुना त्याच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या विषयावर संमेलनाच्या अध्यक्षाला वेगवेगळ्या प्रसंगी प्रश्न विचारले जाणार आहेत. क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचे तर ऑफ स्टंप, बाऊंन्सर आणि गुगली. या प्रश्नांची उत्तरे देतांना कितीही जपून व तंत्रशुद्ध पद्धतीने खेळ केला तरी अडचणीचेच! म्हणजे हिंदुत्वाची प्रयोगशाळा आणि विकासाचे मॉडेल यासंदर्भात खरी व स्पष्ट मते सांगितली तर झेलबाद आणि टोलवाटोलवी करायचे ठरवले तर दांडी उडण्याची शक्यता. म्हणूनच या प्रकारच्या खेळीला तारेवरची कसरत असेही म्हणावे लागते. ही तारेवरची कसरत सुखरूप पार पाडण्यासाठी, किंबहुना अशी कसरतच त्यांच्या वाट्याला येऊ नये यासाठी आमच्या मन:पूर्वक शुभेच्छा!  

Tags: साहित्य संमेलन लक्ष्मीकांत देशमुख तारेवरच्या कसरतीसाठी शुभेच्छा! संपादकीय sahitya sammelan laxmikant deshmukh Tarevarchya kasaratisathi Shubhecha! Editorioal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके