डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साहित्य संमेलनाचे साद-पडसाद

ताठ कण्यापेक्षा लवचीक लाचार कणा हा यशस्वितेची गुरुकिल्ली बनत आहे. हे सारे मान्य नसलेला माणूस भांबावून हतबल होऊन हे पाहत आहे. त्याला आशेचा धुमारा फुटेल, बदलाची खूण पटेल माणुसकीची साद ऐकू येईल असे काही ऐकावयास मिळायला हवे, वाचायला लाभायला हवे. अन्यथा विज्ञानाच्या साह्याने अनंताची स्पंदने टिपणारा तो वैश्चिक साहित्यिक आपल्या शेजारच्याच्या गळ्यात घुसमटलेला हुंदका समजण्यास असमर्थ ठरेल. विज्ञान हवेच पण वैश्विक विज्ञानाआधी मानवी मूल्याची, करुणेची ही विश्वव्यापी जाण होणे हे साहित्यिकांसाठी कितीतरी अधिक गरजेचे आहे.

मुंबईतील साहित्य संमेलने विद्रोहाने गाजली. एका संमेलनाचे तर नावच ते होते. तळागाळाच्या, कष्टकरी जनतेच्या, दडपलेल्यांच्या साहित्यांचा, लोकसाहित्याचा प्रवाह हाच खरा मुख्य प्रवाह आहे हे अधोरेखित करण्यासाठी सर्व शक्तीने प्रयत्न करण्याचा निर्धार धारावीत भरलेल्या या संमेलनात होता. हा विद्रोह द्वेषापोटी नाही तर स्वत्वाच्या आविष्कारासाठी आहे, उमलण्यावर आलेली बंधने तोडण्यासाठी आहे, असा समंजस सूरही त्यात होता. बंड एकदाच करून भागत नाही. ते वारंवार करावे लागते.

संपूर्ण असहकाराऐवजी निमंत्रण मिळाले तर तेथेही जाऊन आपले मत ठामपणे मांडावयास हवे असा ज्येष्ठांचा सल्लाही होता. या विद्रोहाचे मानकरी राजू कोरडे, हेमू अधिकारी, आ. ह. साळुंखे, पुष्पाताई भावे ही व इतर अनेक संयोजक हे आमचे व्यक्तिगत मित्र व ‘साधना’चेही विचारमित्र. मोठ्‌या संख्येने महाराष्ट्रातून आलेला प्रतिनिधी वर्ग आणि बहुजन समाजातील तरुण वक्त्यांची प्रभावी मांडणी यांमुळे या विद्रोहाला धार आली. हा प्रवाह समृद्ध व सर्वांगीण होणे यातच समाजाचे हित आहे असे आम्हांला वाटते. दादर व धारावी या दोन्ही ठिकाणी काही मुद्दे समान होते. पण प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. पहिला मुद्दा अर्थातच शिवसेनाप्रमुखांच्या वक्तव्याचा होता.

‘बाळ’बुद्धीने केलेल्या शिवसेनाप्रमुख ठाकरेंच्या उद्गारांनी संमेलनात खरी जान आणली. आमचे 25 लाख रुपये घेता मग आमचे मिंधेच राहिले पाहिजे असा दम साहित्यिकांना भरणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्याएवढे असुसंस्कृत नेतृत्व आजपर्यंत महाराष्ट्रात निर्माण झाले नव्हते. याला संमेलनाध्यक्षांनी दिलेल्या ‘मुंहतोड’ जबाबाने संमेलनाला एकदम टोक आले. 'पंचवीस लाखच काय पण पंचवीस कोटी जरी कोणी दिले तरी आम्ही आमच्या आत्म्याचा विक्रय करणार नाही. गुंडाना भीत जाऊ नकोस म्हणावे. कारण त्यांना नमविणे सर्वांत सोपे असते.' असे सडेतोड उत्तर बापटांनी दिले. पैसे सामान्य जनतेच्या करातून आलेले आहेत. ठाकरे यांच्या घरचे नाहीत, हेदेखील बजावले. याच मुद्यावर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना मात्र है पैसे साहित्य महामंडळाने स्वीकारणे गैर वाटले. ‘साहित्य संमेलने भरजरी असण्याऐवजी कमी खर्चात त्याचे आयोजन कसे करता येईल,’ याचा विचार करा असा सल्ला त्यांनी दिला.

पुष्पाताई भावे यांनी तर 'थोडा तरी स्वाभिमान शिल्लक असेल तर साहित्यिकांनी संमेलनातील भोजन घशाखाली ढकलू नये', असे आवाहन केले. राग होताच; पण संतापाच्या अभिव्यक्तीचे शब्द वेगवेगळे होते एवढाच याचा अर्थ. सांस्कृतिक चळवळी स्वसामर्थ्याने उभ्या राहाव्यात हे हवेच आहे. पण लोकशाही देशात लोकांनी निवडून दिलेले सरकार समाजाच्या भल्यासाठी प्रामाणिक भावनेने मदत करू लागले तर त्यालाही नकार देणे आवश्यकच आहे का? मरू लागलेल्या मराठीबद्दलची गंभीर व्यथा अध्यक्षीय भाषणात बापटांनी मांडली. दुसरीकडे ‘विद्रोही’ मध्ये बोलताना श्री. बाबूराव बागूल यांनी 'मराठी भाषा आमच्या मौखिक परंपरांनीच टिकवली. आम्ही आमच्या जगण्यातील भाषा मराठी साहित्यात आणून मराठी भाषा समृद्धच केली. तेव्हा जागतिकीकरणाच्या नादी लागलेल्यांनी मराठी भाषेच्या जगण्या-मरण्याची काळजी आता तरी सोडून यावी,’ असा टोला दिला. हा विषय वादाचा नाही, व्यथेचा नाही तर मराठी हा एक अभ्यासविषय म्हणून टिकविणे कठीण झाले आहे; या विदारक वास्तवाचा आहे. मातृभाषेतूनच सर्व शिक्षण घेतले पाहिजे असा कायदा करण्याची मागणी श्री. वसंत बापट यांनी केली. असा कायदा केला तर तो कोर्टात अजिबात टिकणार नाही, हे या बाबतच्या आधीच्या निर्णयावरून लक्षात घ्यावयास हवे.

प्रत्येकाचे शिक्षण मातृभाषेतून हा विचार योग्य वाटतो. पण तसा कायदा झाला तर असंख्य मराठी व इतर भाषक पालक आपली मातृभाषा इंग्रजी ही नोंदवतील, अशी साधार भीती आहे. शिक्षणातील मराठी आणि इंग्रजीचे स्थान सर्व पातळ्यांवर समान राखावयास हवे, या व्यवहारी भूमिकेवर राज्य मराठी विकास संस्था व जागतिक मराठी अकादमी आली आहे. कोठारी आयोगाने तीस वर्षांपूर्वी प्रादेशिक माध्यमाचा पुरस्कार केला होता. पण इकडे जागतिकीकरणाच्या विरोधात असलेल्या पश्चिम बंगालच्या कम्युनिस्ट शासनाने तेथील शाळांत तिसरीपासून इंग्लिश सुरू केले आहे. भाषा ही व्यवहार, संपर्क, संगणकीकरण, जागतिकीकरण, रोजगारनिर्मिती या साऱ्या क्षेत्रांत हवी आहे आणि आज तरी जगात ती जागा इंग्लिशला मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मातृभाषेच्या आग्रहाचा प्रश्न असा बहुआयामी बनत आहे. "गेल्या अर्धशतकातील वाङ्मयीन चळवळीमुळे मराठी साहित्याची गुणवत्ता वाढली काय, या बाबत बोलताना ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी उपस्थित केलेला मुद्दा दीर्घ काळ आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारा ठरणार आहे. रसाळ यांच्या मते वाङ्मयीन चळवळीला वास्तवाचे अधिक कसदार अनोखे आकलन हवे व त्याच्या अभिव्यक्तीचे नवे मार्ग हवेत. मराठीत दलित साहित्य, स्त्री-साहित्य, ग्रामीण साहित्य या साहित्याबरोबरच सामाजिक, राजकीय चळवळीचा भाग होत्या. त्या निखळ वाङ्मयीन चळवळी ठरत नाहीत म्हणूनच त्यातून मराठी साहित्याची गुणवत्ता वाढली नाही.

डॉ. रसाळ यांची भूमिका व त्याचा प्रभावी प्रतिवाद हे दोन्ही या निमित्ताने वाचकांसमोर सविस्तरपणे यावे असा प्रयत्न ‘साधना’तून आम्ही करत आहोत. वसंतराव गोवारीकरांचे उद्घाटनाचे भाषण खूप गाजले. त्यांचा कळीचा मुद्दा असा की, संगणकाच्या रूपाने समाज विज्ञानमय आणि वैश्विक होण्याची वास्तवता आणि शतकानुशतके सर्व हालअपेष्टा सोसत अखंड चाललेली पंढरीची वारी या दोन्ही मानसिकता या देशात एकाच वेळी व सुखेनैव वावरत आहेत. तेव्हा वैश्विक वैज्ञानिक सत्य व दुसरीकडे अनंत काळ खोलवर रुजलेली श्रद्धेची भावनिकता यांमधून आरपार पाहण्याचे 'क्ष' किरण साहित्यिकाकडे हवेत. कारण आपण कधीच न पाहिलेला नवा अस्वस्थ, गतिमान जागतिक समाज आता नव्या साहित्याचा विषय होणार आहे. हे सत्य आहेच; पण हे पूर्णसत्य नव्हे तर अर्धसत्य आहे. विज्ञानाच्या या वैश्चिकतेच्या विजयात मूल्याची भयचकित करणारी घसरण चालू आहे.

स्वकेन्द्री समृद्धता हीच जीवनसर्वस्व बनली आहे. त्यासाठी कोणालाही कोणत्याही मार्गाने ओरबाडणे याला समाजमान्यता लाभली आहे. विषमता पूर्वी होतीच, ती वेगाने वाढत चालली आहे आणि स्वकर्तृत्वाने हवे ते जीवनमान खेचण्याची संधी हवीच असे समर्थन विषमतेचा प्रच्छन्न पुकारा करणारे मिळवीत आहेत. ताठ कण्यापेक्षा लवचीक लाचार कणा हा यशस्वितेची गुरुकिल्ली बनत आहे. हे सारे मान्य नसलेला माणूस भांबावून हतबल होऊन हे पाहत आहे. त्याला आशेचा धुमारा फुटेल, बदलाची खूण पटेल माणुसकीची साद ऐकू येईल असे काही ऐकावयास मिळायला हवे, वाचायला लाभायला हवे. अन्यथा विज्ञानाच्या साह्याने अनंताची स्पंदने टिपणारा तो वैश्चिक साहित्यिक आपल्या शेजारच्याच्या गळ्यात घुसमटलेला हुंदका समजण्यास असमर्थ ठरेल. विज्ञान हवेच पण वैश्विक विज्ञानाआधी मानवी मूल्याची, करुणेची ही विश्वव्यापी जाण होणे हे साहित्यिकांसाठी कितीतरी अधिक गरजेचे आहे.

Tags: विश्वव्यापी जाण विदोही साहित्य मराठी साहित्य संमेलन worldwide awareness rebel literature marathi literary convention weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके