डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साने गुरुजी कथामाला - साने गुरुजींचे जिवंत, चैतन्यदायी स्मारक

रत्नागिरी जिल्ह्यात पालगड या साने गुरुजींच्या जन्मगावी साने गुरुजींचा ज्या घरात जन्म झाला, जेथे मातेच्या पवित्र संस्कारांमुळे त्यांचे मन घडले, त्या जागेत गुरुजींच्या स्मारकाचा शुभारंभ करण्यात आला.

साने गुरुजींनी स्थातंत्र्यलढ्यात स्वतः समर्पणभावनेने उडी घेतली आणि अनेकांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. कोठेही अन्याय दिसला कि त्यांचे मन पेटून उठे आणि तो अन्याय उखडून टाकण्यासाठी ते प्राण पणाला लावीत.पण साने गुरुजी हे नेते नव्हते, मोठ्या माणसांच्या पेक्षा साने गुरुजींचे मन मुलांच्या सहवासातच रमत असे. ते जेथे जेथे जात तेथे तेथे मुलांना गोष्टी सांगत. साने गुरुजींची गोष्ट ऐकणे हा एक अपूर्व आनंद असे. केवळ लहान मुलेच नव्हे तर युवक आणि मोठी माणसेही साने गुरुजींची गोष्ट ऐकताना मंत्रमुग्ध होत. लहान मुलांचे रंजन व्हावे अशा या कथा असत. मुलांचे असे रंजन करण्यातूनच आपले प्रभूशी, परमेश्वराशी नाते जुळेल अशी साने गुरुजींच्या मनाची श्रद्धा होती. अशा गोष्टी सांगत साने गुरुजींनी असंख्य मुलामुलींना अपार आनंद दिला आणि उपदेश न करताही, त्या मुला-मुलींच्या मनावर सुसंस्कार केला. हा संस्कार सत्याचा आणि प्रेमाचा होता.

साने गुरुजी अगदी साधेपणाने गोष्टीला सुरुवात करीत आणि पाच दहा वाक्यात ते समोर बसलेल्या मुलांच्या मनात प्रवेश करीत. त्याच वेळी एकदम त्या निरागस मनांशी गुरुजी एकरूप होऊन जात. मग साने गुरुजी नावाचा प्रौढ माणूस गोष्ट सांगत नसे; पालगडला वाढलेला श्यामच गोष्ट सांगू लागे. साने गुरुजींच्या गोष्टीत सद़भावनांचा अंतःप्रवाह वाहत असे. प्रेमाच्या गुलाबपाण्याचे कारंजे थुईथुई उडत असे आणि गोष्टीचा सुगंध मुलांच्या मनात दरवळू लागत असे. 

साने गुरुजींनी लहानपणी पुराणांतील गोष्टी ऐकल्या. कॉलेजमध्ये असताना अनेक इंग्लिश, फ्रेन्च, रशियन, चिनी लेखकांच्या इंग्रजी भाषेत भाषांतरित झालेल्या कादंबऱ्या वाचल्या. बंगाली, हिंदी साहित्यही वाचले. त्या कादंबऱ्यांची कथानके त्यांच्या हृदयसंपुटात जाऊन बसली आणि आपल्या मनातील हा गोष्टींचा खजिना गुरुजींनी मुलांमुलींच्या समोर उघडला. साने गुरुजी स्वातंत्र्य चळवळीत ब्रिचनापल्ली जेलमध्ये तुरुंगात असताना त्यांना तमिळ, तेलगु, कानडी भाषेतील लोककथा ऐकायला मिळाल्या. या साऱ्या कथा-कादंबऱ्या वाचताना, ऐकताना साने गुरुजी रंगून गेले आणि त्या साऱ्या गोष्टी सांगताना त्यांनी मुलांना व्हिक्टर ह्युगो, हार्डी, चार्लस् किंग्सले, टेनिसन, टॉलस्टॉय, टागोर आदी लेखकांच्या मंतरलेल्या विश्वात नेले. 


गोष्ट कोणाही लेखकाची असो, ती सांगताना साने गुरुजींच्या स्वभावाचे रंग तिच्यात मिसळून जात. गोष्ट सांगताना गुरुजी हसत आणि मुलेही खदखदा हसत, गुरुजी एखादी करुण कथा गंभीरपणे सांगत आणि मुलांच्या डोळ्यांत पाणी येई. साने गुरुजींचे कथाकथन हा एक सप्तरंगी गोफ असे. इंद्रधनुष्याचे रंग पाहताना वेडावून जाणाऱ्या मुलांचे देहभान साने गुरुजींच्या गोष्टींमधील विविध रंग पाहताना हरपून जात असे. साने गुरुजी गोष्ट सांगताना जणू किमया करीत आणि मुलांना एका अनोख्या, आगळ्यावेगळ्या जगात नेत. साने गुरुजी कथामाला हे त्यांच्या स्मृतीला वाहिलेले फूल आहे. मुलांचे मनोरंजन करीत त्यांच्यावर संस्कार करण्याची ही चळवळ आहे. साने गुरुजी जन्मशताब्दी वर्षामध्ये गुरुजींच्या जीवनातील विविध मंगल प्रवाहांना आपण सारे जण वंदन करीत आहोत. 

साने गुरुजी कथामालेचे 32 वे अधिवेशन पुण्यामध्ये साने गुरुजी स्मारकावर, राष्ट्र सेवा दलाच्या वास्तूच्या परिसरात भव्य रीतीने साजरे झाले याचे फार समाधान वाटते. साने गुरुजी ‘राष्ट्र सेवा दल हा माझा प्राण आहे', असे म्हणत असत. साने गुरुजी जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त साने गुरुजींच्या कर्मभूमीत, अमळनेरला, साने गुरुजी जन्मशताब्दी अभियानातर्फे युवकांचा प्रचंड मेळावा, प्रा. मधु दंडवते यांच्या अध्यक्षतेखाली झाला आणि राष्ट्र सेवा दल, छात्रभारती आदी युवक संघटनांतील दहा हजारांहून अधिक युवक यात सहभागी झाले. त्यानंतर पंधरा दिवसांतच साने गुरुजी कथामालेचे अधिवेशन झाले आणि महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरून आलेल्या पाचशेहून अधिक प्रतिनिधींनी त्यात उत्साहाने भाग घेतला. 

24 डिसेंबरला, साने गुरुजी जयंतीस महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये मेळावे, सभा, ‘साने गुरुजींची जीवनगाथा' आणि ‘धडपडणाऱ्या मुलांचे साने गुरुजी' या पुस्तकांचे प्रकाशन हे कार्यक्रम नागरिक, शिक्षक, लेखक, साने गुरुजींच्या साहित्याचा संस्कार झालेले कार्यकर्ते आदींनी उत्स्फूर्तपणे साजरे केले. असंख्य शाळांतूनही साने गुरुजी जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थी-विद्यार्थिनींचे विविध कार्यक्रम झाले. रत्नागिरी जिल्ह्यात पालगड या साने गुरुजींच्या जन्मगावी साने गुरुजींचा ज्या घरात जन्म झाला, जेथे मातेच्या पवित्र संस्कारांमुळे त्यांचे मन घडले, त्या जागेत गुरुजींच्या स्मारकाचा शुभारंभ करण्यात आला. 25 आणि 26 डिसेंबर रोजी साहित्य अकादमी आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे घेतलेल्या चर्चासत्रांमध्ये नामवंत साहित्यिक आणि समीक्षक सहभागी झाले होते. या सर्व कार्यक्रमांना उत्साही आणि सहजस्फूर्त मिळणारा प्रतिसाद हा मराठी माणसाच्या मनातील साने गुरुजीबद्दलच्या प्रेमाचा आणि आदराचा उत्कट आविष्कार होता. 

साने गुरुजींनी मृत्यूपूर्वी राष्ट्र सेवा दलाच्या सांगली येथे भरलेल्या शिबिरात केलेल्या भाषणामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्राची उभारणी कशी व्हावी याबद्दलची त्यांची कल्पना त्यांच्या नेहमीच्या प्रेरणादायी पद्धतीने मांडली. साने गुरुजींच्या निधनानंतर त्यांचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने साने गुरुजी सेवापथक स्थापन केले. नाना डेंगळे यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी श्रमातून विधायक कार्य करणारी  शिबिरे घेतली. या कार्यक्रमात राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांना सहकार्य करण्यासाठी ठिकठिकाणचे ग्रामस्थ, शेतकरी, स्त्री-पुरुष सहभागी झाले. श्रमाची प्रतिष्ठा आणि नव्या समाजाची समतेवर आधारलेली रचना हा साने गुरुजींचा संदेश सेवापथकाने खेड्यापाड्यांमध्ये पोहोचविला. 

प्रकाशभाई मोहाडीकर यांना विद्यार्थिदशेपासून साने गुरुजींचा सहवास लाभला. साने गुरुजींपासून प्रेरणा घेऊन प्रकाशभाईंनी स्वातंत्र्यसंग्रामात समर्पणभावनेने उडी घेतली आणि कारावास भोगला. साने गुरुजींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक म्हणून साने गुरुजी कथामाला चालवावी ही कल्पना प्रकाशभाईंना सुचली. विद्यार्थिदशेपासून साने गुरुजींचा संस्कार झालेले यदुनाथ थत्ते हे प्रकाशभाईंचे निकटचे सहकारी. कथामालेची कल्पना प्रकाशभाईंनी यदुनाथला सांगताच, यदुनाथजींनी ‘हेच साने गुरुजींचे उचित स्मारक होईल’ असे सांगितले. 1951 साली 24 डिसेंबरला साने गुरुजी जयंतीस साने गुरुजी कथामालेचा जन्म झाला. गेल्या चार तपांच्या वाटचालीत कथामालेने दीर्घ प्रवास केला आहे. प्रकाशभाई, यदुनाथ थत्ते यांनी हे रोपटे जपले, वाढवले, आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. या सावलीत मुले-मुली हसत-खेळत, गाणी गात राहोत. येथे ना जात, ना धर्म, ना पंथ. साने गुरुजींच्या विशाल अंतःकरणाचा, प्रेमळ भावमय जीवनाचा प्रवाह कथामालेच्या रूपाने प्रगट झाला आहे. हा प्रवाह अक्षय वाहात राहो आणि मुलांमुलींची मने तो विशाल करीत राहो हीच शुभेच्छा.

Tags: संपादकीय प्रकाशभाई मोहाडीकर यदुनाथ थत्ते साने गुरुजी Editorial Prakashbhai Mohadikar Yadunath Thatte Sane Guruj weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके