डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

  • गुरुजींचे अमृत-बोल      
  • महाराष्ट्र हिंद मजदूर सभा अधिवेशन
  • दुरुस्ती
  • आंतर भारती विद्यालय स्नेहसंमेलन
  • आंतर भारती विद्यालय ( इचलकरंजी) क्रीडा महोत्सव
  • कै. अण्णासाहेब महस्रबुद्धे यांच्या चरित्राची प्रकाशनपूर्व सवलत
  • दुःखद निधन
  • चुकीची दुरुस्ती

गुरुजींचे अमृत-बोल                                                                                                                                                                                                                           जगात खरे स्वातंत्र्य एकच आहे. ते म्हणजे आपल्या सदसद्विवेक बुद्धीप्रमाणे वागण्याचे. मानवाजवळ ही गोष्ट आहे म्हणून त्याच्या जीवनाला अर्थ आहे. 

महाराष्ट्र हिंद मजदूर सभा अधिवेशन :
‘बाळ दण्डवते नगर' मुंबई येथे महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे द्विवार्षिक अधिवेशन ता. 28-29 डिसेंबर 1981 रोजी आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी, अनेक शेतमजूर, विविध उद्योगांचे प्रतिनिधित्व करणारे कामगार-कर्मचारी प्रतिनिधी, असे 1200 च्या वर लोक हजर होते. अध्यक्षस्थानी कामगारनेते साथी शांताराम तावडे होते. ता. 28 डिसेंबर रोज सायंकाळी 4.30 वा. कामगारांची एक भव्य मिरवणूक काढण्यात अली व तिचे रूपांतर खुल्या अधिवेशनात व जाहीर सभेत झाले. अधिवेशनचे उद्घाटन कामगारनेते साथी जॉर्ज फर्नांडिस यांनी केले. व्यासपीठावर विविध कामगार नेते होते. ता. 29 डिसेंबरच्या प्रातिनिधिक अधिवेशनात पुढील ठराव मंजूर करण्यात आले.

19 जाने. 1982 ला देशव्यापी औद्योगिक सार्वत्रिक संप यशस्वी करणे, राष्ट्रीय सुरक्षा व आवश्यक सेवा संप, बंद, कायदे रद्द करणे, भटकत्या महागाईला आळा घालणे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कर्ज रद्द करणे इत्यादी. तसेच शेतीमालाला किफायतशीर भाव व शेतमजुरांना दरमहा 300 रु. किमान द्यावे; अशा प्रकारच्या वेतनविषयक मागण्या करण्यात आल्या. याच वेळी पुढील दोन वर्षांसाठी महाराष्ट्र हिंद मजदूर सभेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्यामध्ये साथी वसंत खानोलकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.

दुरुस्ती
दि. 2 जानेवारीच्या अंकात सन्मान्य देणगीदारांच्या नावामध्ये ‘कै.सौ. मालन वामन सावंत यांच्या स्मरणार्थ उदय वामन सावंत’ यांनी देणगी दिल्याचे चुकीने छापले गेले आहे. ते ‘कै. सौ. मालन वामन सामंत, यांचे स्मरणार्थ, श्री. सतीश विट्ठल सामंत यांजकडून’ असे वाचावे. चुकीविषयी दिलगीर आहोत.
-संपादक

आंतर भारती विद्यालय स्नेहसंमेलन
'आईने वाढविलेले मूल व दाईने वाढविलेले मूल यांत फरक आहे. स्वत:च्या कष्टातून उभी राहिलेली संस्था नेहमीच मोठी होते. मुले ही अनुकरणीय असतात, म्हणून आपल्या वागण्याने लहानांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. भारताचे स्वातंत्र्य घडवण्याची जबाबदारी मुलांची आहे." असे उद्गार दे. भ. रत्नाप्पा कुंभार यांनी आपल्या अध्यक्षीय स्थानावरून काढले. ता. 30 जाने. 82 रोजी शाळेच्या क्रीडांगणावर साजरे झालेल्या स्नेहसंमेलनाचे श्री. रत्नाप्पाण्णा कुंभार हे प्रमुख पाहुणे होते. स्वागतपर गीत, पाहुण्यांची ओळख, गेल्या 11 वर्षांचा शालेय अहवाल इत्यादी कार्यक्रम झाल्यावर, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक विभागाने घेतलेल्या स्पर्धा यांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

आंतर भारती विद्यालय ( इचलकरंजी) क्रीडा महोत्सव
ता. 13 जानेवारी 82 रोजी विद्यालयाचा 11 वा वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शालेय खेळाडूंनी क्रीडा-ज्योत मिरवणुकीने आणली. मिरवणुकीचे संचलन श्री. शेटे सर यांनी केले. दानशूर नागरिक श्रीमान मामासाहेब जांभळीकर यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित झाली. समारंभाचे प्रमुख पाहुणे श्रीमान नगरशेठ सीतारामजी डालया व अध्यक्ष श्रीमान मदनलालजी बोहरा यांना खेळाडूंनी संचलनद्वारा मानवंदना दिली. शाळेचे मुख्याध्यापक मा. ढबळे सर यांनी उपस्थितांचे स्वागत करून पाहुण्यांची ओळख करून दिली. शाळेच्या विविध क्षेत्रांतील यशाबद्दल पाहुण्यांनी गौरवोद्गार काढले व विद्यालयाच्या उभारणीमध्ये भरघोस मदत देण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी गटवार मुलामुलीचे कबड्डी व लंगडी सामने झाले. शेवटी आभार प्रदर्शन होऊन या महोत्सवाची सांगता झाली.

कै. अण्णासाहेब महस्रबुद्धे यांच्या चरित्राची प्रकाशनपूर्व सवलत
कै. अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांचे ' माझी घडण' हे आत्मचरित्र मार्चमध्ये प्रसिद्ध होत आहे. या आत्मचरिणाचे शब्दांकन प्रा. नरहर कुरुंदकर व सौ. कुसुमताई पटवर्धन यांनी केलेले आहे. 11 मार्च 82 रोजी कै. अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांचा दुसरा स्मृती दिन येत आहे. हे पुस्तक कार्यकर्त्यांना व संस्थांना सवलतीच्या दराने मिळावे म्हणून एका संस्थेने मदत द्यायचे ठरवले आहे. सुमारे दोनशे पानांचे पुस्तक होईल. तथापि ता. 31 मार्च पूर्वी कार्यकर्ते व संस्थांनी पाच रुपये पाठवल्यास त्यांना हे पुस्तक मिळू शकेल. रक्कम मनिऑर्डरने साधना प्रकाशन, 430-31 शनिवार पेठ, पुणे 411030 या पत्त्यावर पाठवावी ही विनंती. मनिऑर्डरसोबत कार्यकर्त्यांनी व संस्थांनी आपला परिचय व पूर्ण पत्ताही पाठवावा. पुस्तकाला प्रस्तावना कै. प्रा. नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेली आहे. हे त्यांचे शेवटचेच लिखाण असावे. आत्मचरित्रात अण्णासाहेबांचे विविध फोटो व आकर्षक मुखपृष्ठ राहील.

दुःखद निधन
पू. बाबा रेडीकर यांचे दि. 15 फेब्रु. 82 रोजी सकाळी मुंबई मुक्कामी दीर्घ आजारपणानंतर निधन झाले. बाबा रेडीकर यांनी आपल्या जीवनास मसुर आश्रमाद्वारे हिंदू शुद्धीकरणाच्या चळवळीत महत्त्वाचा भाग घेतला. त्यानंतर ते राष्ट्रीय चळवळीकडे वळले. यापुढील कार्यात त्यांनी कै. मामा क्षीरसागर यांचे समवेत कोल्हापूर येथे ग्रामसेवाश्रमामार्फत काम करण्यास सुरुवात केली. हे काम करीत असताना त्यांनी अठरापगड जातीतील तरुणांना जवळ करून ग्राम उद्धाराची चळवळ केली. आज हे सर्व कार्यकर्ते स्वतंत्ररीत्या आपापल्या ग्रामात कार्य करीत आहेत. त्यांनी अविश्रांत काम करून कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती कार्याचे स्मारक मागे ठेवले आहे. भूदान-ग्रामदान आंदोलनाला त्यांनी जीवन दिले. बाबा इतरांची सेवा लहान वा थोर सर्वांची मनोभावे करीत. त्यांच्या कार्यास उभारी देत. असा निस्सीम सेवाभावी कार्यकर्ता कालवश झाल्याने महाराष्ट्रातील विधायक कार्याची हानी झाली आहे.

चुकीची दुरुस्ती
पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागात पुण्यात गुरुवर्य रानडे स्मृती व्याख्यानमालेत डॉ. विश्वनाथ नरवणे (अलाहाबाद) यांचे इंग्रजी भाषण ‘इस्लामिक सुफी संत्रदाय' या विषयावर झाले. त्याचा स्वैर अनुवाद डॉ. अरुण लिमये यांनी 13 फेब्रुवारीच्या ‘साधने’त प्रसिद्ध केला. चुकून 'लेखक' म्हणून त्यांचे नाव छापले गेले आहे. या इंग्रजी व्याख्यानाचा स्वैर अनुवाद साधनेत छापण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे विद्यापीठाचे कुलगुररू डॉ. राम ताकवले, प्रा. प्र. न. जोशी व या विभागाचे अधिकारी या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके