डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शासकीय पातळीवरील चौकशी आणि न्यायालये यांच्याकडून सतीश शेट्टी यांना न्याय मिळेल अशी आशा करूया.ते तर घडायला हवेच. अशा खूनखराबीला भीक न घालता माहितीच्या अधिकाराचे शस्त्र वापरणाऱ्या सर्व संघटनांनी मावळ-मुळशी भागातील जमीन माफियांच्या काळ्या कारवाया प्रकाशात आणण्यासाठी मोहीम उभारावी आणि त्यांच्याविरोधात दंड थोपटून उभे राहावे. शेट्टी यांच्या हत्येने माहितीच्या अधिकाराची मशाल विझवण्याचा प्रयत्न आहे. ती ‘केलाजरी पोत बळेच खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळी’ या न्यायाने धगधगती ठेवावयास हवी. हेही घडेल असे मानूया. पण अव्वल दर्जाचा प्रश्न पुढचा आहे. सतीश शेट्टीवर हल्ला होत असताना ते मदतीसाठी आक्रंदत होते. वास्तव असे सांगते की, त्यांच्या मदतीला कोणीही धावून गेले नाही. घटनेला साक्षी असणाऱ्या सर्वांचे हातपाय जणू लुळेपांगळे झाले होते. असंवेदनशीलता, मोह आणि भीती या त्रिदोषाने समाजाला घेरून टाकले आहे. त्याच्या भीषण वास्तवाची ही भयसूचक घंटा आहे; तिचा आवाज काळजात न पोचण्याइतकी बधीरता समाजाला प्राप्त झाली आहे. प्रत्येक प्रश्नाकडे ‘मला काय त्याचे, असे घडतच असते’ या मख्खपणे बघण्याची संवेदनहीनता बहुसंख्य समाजाने आणि विशेषत: मध्यमवर्गाने अंगी निर्माण केली आहे. संवेदनशीलता जागृत झालीच तर क्षणाक्षणाला खुणावणारे चंगळवादाचे अफाट विश्व त्या संवेदनेला डोके वर काढू देत नाही. त्यातूनही त्या वेदनेने उसळी मारलीच तर भीतीची भावना खडा पहारा देत उभी असते. परिणाम एकच होतो, मनातल्या मनात हळहळ आणि प्रत्यक्षात मौन. ती हळहळही हळूहळू कमी होत जाते. या दोषासह कुठल्याही समाजातील लोकशाही उभी राहू शकत नाही, मग ताठ मानेने स्वत:चे स्वत्व सांभाळणे तर दूरच राहिले.

अन्याय आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात लढणाऱ्यांना वलय असते. मात्र त्याबरोबरच येणारी दाहकता तळेगाव-दाभाडे येथील सतीश शेट्टी या लढवय्या कार्यकर्त्याच्या हत्येने स्पष्ट झाली आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणे म्हणजे घरादारावर तुळशीपत्र ठेवून लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचेच काम असते.  शेट्टी यांना याची जाण होती, पण तरीही ‘पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती,होवुनिया बेभान धावलो ध्येयपथावरती’ अशी त्यांची निर्धारी वाटचाल सुरू होती.

काही वर्षांपूर्वी माहितीच्या अधिकाराचा कायदा हाती आला. त्याचा सर्वप्रथम आणि प्रभावीपणे उपयोग करणाऱ्यांच्यापैकी सतीश शेट्टी होते. तळेगाव आणि लोणावळा या भागातील जमीन माफियांची कृष्णकृत्ये त्यांनी एक एक करत उघड करावयास सुरुवात केली. शेट्टी जन्मापासून त्याच भागातील होते. आपल्या भागाचे बदलते चित्र ते पहात होते.  मुळशी-मावळचा हा निसर्गसंपन्न भाग. त्या धरणामुळे पाण्याची मुबलकता आणि मुबंई-पुण्याशी असलेली भौगोलिक जवळीक यामुळे या भागातील जमिनीला सोन्याचे मोल आले आहे. आपल्याकडील ‘काळ्या सोन्या’चे पांढऱ्या पैशात रूपांतर करून घेण्याची शेतकऱ्यांना झालेली घाई आणि जमीन माफियांकडून त्यांची होणारी अडवणूक, फसवणूक व लूट शेट्टींना अस्वस्थ करत होती. ‘लवासा’सारखे पूर्णत: स्वावलंबी पर्यटन शहरच या भागात उभे राहिल्याने राजकीय नेते, धनदांडगे, जमीन माफिया, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांची एक अभद्र युती या भागात उभी राहिली आहे. अभिमन्यूच्या निर्धाराने या चक्रव्यूहाचा भेद करण्याच्या इच्छेने सतीश शेट्टी त्यात शिरले होते. या धाडसाचे अनेकांना कौतुक होते. मात्र त्यांचा कायमचा काटा काढून चक्रव्यूह भेदले जाण्याची शक्यताच नष्ट करू इच्छिणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. आज तरी त्यांची तात्पुरती सरशी झाली आहे.

सतीश शेट्टी यांच्याकडे आपण गेलो की आपले काम निश्चित होणार, ही खात्री सामान्य माणसाला येत चालली होती. तळेगावचे ते मंजुनाथ षण्मुगम किंवा सत्येंद्रनाथ दुबे होते. कुणी सरकारी जमिनी गिळंकृत केल्या, बेकायदा बांधकाम केले, अन्याय केला की हा एकांडा शिलेदार पडेल ती किंमत देऊन त्याविरुद्ध लढायला तयार व्हायचा. या कामात असंख्य खटल्यांना सामोरे जावे लागल्यानंतरही ते कधी डगमगले नाहीत. भल्याभल्यांशी टक्कर देताना ताठ कणा आणि उन्नत मान कधी झुकली नाही. अत्यंत सचोटीने लढावे, फसवणूक झालेल्यांना न्याय मिळवून द्यावा हाच त्यांचा आनंद होता आणि तीच जीवनाची सार्थकता होती. हातात एक साधी कापडी पिशवी आणि त्यामध्ये माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांची अमोघ शस्त्रे एवढीच त्यांची मालमत्ता होती. आय.आर.बी. कंपनीचा 1800 एकर जमिनीचा गैरव्यवहार, तळेगाव नगरपरिषदेतील भ्रष्टाचार त्यांनी उघड केला. एका नगराध्यक्षाने केलेले स्वत:च्या बंगल्याचे बेकायदा बांधकाम उघडकीस आणले. त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आणि मग आपोआपच नगराध्यक्षपदही गेलेच. बेकायदा बांधलेला हा बंगलाही पाडण्यात आला हे विशेष! खोटी जन्मतारीख दाखवून शासकीय फायदे लाटणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करायला त्यांनी प्रशासनाला भाग पाडले. रेशनिंग रॉकेलचा काळाबाजार उघड केला. हे सर्व करताना हॉटेलातला साधा चहादेखील ते कधी दुसऱ्याच्या पैशाने प्यायले नाहीत.

एक व्रत म्हणून सतीश शेट्टी आपले काम करत होते. हा माणूस आपल्याला भारी ठरतो याची जाणीव झालेल्यांनी त्याला आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. साम, दाम, दंड, भेद हे सारे उपाय वापरून झाले. हत्या होण्याच्याआधी काही दिवस त्यांच्या अंगावर मोटार सायकल घालून त्यांची हत्या करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र या साऱ्या प्रकाराने जराही विचलित न होता त्यांनी आपली जनसेवा चालूच ठेवली. मात्र हे सारे आपल्या जिवावर बेतू शकते याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच पोलिसांना माहिती देऊन त्यांनी संरक्षणाची मागणी केली होती. ते संरक्षण द्यावयाचे की नाही याचा खल करण्यात पोलिसांनी दोन दिवस घालवले. तोवर मारेकऱ्यांनी आपले काम साधून घेतले.

मंजुनाथ षण्मुगम किंवा सत्येंद्रनाथ दुबे ही नावे मोठी. त्यांनी उघडकीस आणलेला भ्रष्टाचार हाही मोठ्या पातळीवरचा. माणसाच्या दैनंदिन वापरात असणाऱ्या रॉकेलमध्मे भेसळ करून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्या अधिकाऱ्यांना षण्मुगम यांनी 2006 साली जाब विचारला होता. त्याच वर्षी दुबे यांनी महामार्ग बनवणारे ठेकेदार आणि तो विषय ज्यांच्या अखत्यारित येतो ती सरकारी कार्यालये यांच्यातील लागेबांधे स्पष्ट केले होते. त्या दोघांचाही खून झाला. केंद्रीय गुप्तचर खात्याकडे दुबे यांचे प्रकरण सोपविण्यात आले. केंद्रीय गुप्तचर खात्याने दुबे यांच्या खुनाशी कंत्राटदार कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी यांचा संबंध नाही असे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. देशभर गाजलेल्या सर्वांत मोठ्या भ्रष्टाचाराला वेशीवर टांगणाऱ्या खुनाची वासलात अशी लागली. गैरकृत्ये व भ्रष्टाचार यांना चटावलेल्या व निर्धास्त बनलेल्या शक्तींनी सतीश शेट्टींचा खून करून एक उद्दाम इशारा दिला आहे. आमच्या विरोधात जीवाचे मोल देऊनच उभे रहावे लागेल, अशी ही गर्भित धमकी आहे. याचा प्रतिवाद आपण कसा करणार आहोत?

शासकीय पातळीवरील चौकशी आणि न्यायालये यांच्याकडून सतीश शेट्टी यांना न्याय मिळेल अशी आशा करूया.ते तर घडायला हवेच. अशा खूनखराबीला भीक न घालता माहितीच्या अधिकाराचे शस्त्र वापरणाऱ्या सर्व संघटनांनी मावळ-मुळशी भागातील जमीन माफियांच्या काळ्या कारवाया प्रकाशात आणण्यासाठी मोहीम उभारावी आणि त्यांच्याविरोधात दंड थोपटून उभे राहावे. शेट्टी यांच्या हत्येने माहितीच्या अधिकाराची मशाल विझवण्याचा प्रयत्न आहे. ती ‘केलाजरी पोत बळेच खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळी’ या न्यायाने धगधगती ठेवावयास हवी. हेही घडेल असे मानूया. पण अव्वल दर्जाचा प्रश्न पुढचा आहे. सतीश शेट्टीवर हल्ला होत असताना ते मदतीसाठी आक्रंदत होते. वास्तव असे सांगते की, त्यांच्या मदतीला कोणीही धावून गेले नाही. घटनेला साक्षी असणाऱ्या सर्वांचे हातपाय जणू लुळेपांगळे झाले होते. असंवेदनशीलता, मोह आणि भीती या त्रिदोषाने समाजाला घेरून टाकले आहे. त्याच्या भीषण वास्तवाची ही भयसूचक घंटा आहे; तिचा आवाज काळजात न पोचण्याइतकी बधीरता समाजाला प्राप्त झाली आहे. प्रत्येक प्रश्नाकडे ‘मला काय त्याचे, असे घडतच असते’ या मख्खपणे बघण्याची संवेदनहीनता बहुसंख्य समाजाने आणि विशेषत: मध्यमवर्गाने अंगी निर्माण केली आहे. संवेदनशीलता जागृत झालीच तर क्षणाक्षणाला खुणावणारे चंगळवादाचे अफाट विश्व त्या संवेदनेला डोके वर काढू देत नाही. त्यातूनही त्या वेदनेने उसळी मारलीच तर भीतीची भावना खडा पहारा देत उभी असते. परिणाम एकच होतो, मनातल्या मनात हळहळ आणि प्रत्यक्षात मौन. ती हळहळही हळूहळू कमी होत जाते. या दोषासह कुठल्याही समाजातील लोकशाही उभी राहू शकत नाही, मग ताठ मानेने स्वत:चे स्वत्व सांभाळणे तर दूरच राहिले.

लष्कराचे जवान, पोलिसदलातले अधिकारी यांचे हौतात्म्य धीरोदात्त असतेच, पण त्यांनी स्वीकारलेल्या पेशाचा तो एक अपरिहार्य भाग असतो. ‘की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने’ असे म्हणणारे सतीश शेट्टी ज्यावेळी अंगीकृत वसा पार पाडण्यासाठी हौतात्म्य स्वीकारतात, त्यावेळी त्याची दाहकता अधिक होते. मरगळलेल्या सामाजिक मनाला त्याने चेतना मिळाली तरच हे हौतात्म्य कृतार्थ होईल.

हा अंक छापायला पाठवण्याची तयारी झाली असताना ज्योती बसू यांचे निधन झाल्याची बातमी आली. ज्योती बसू यांच्यावरील लेख पुढील अंकात प्रसिद्ध करण्यात आला होता.

- संपादक

Tags: हौतात्म्य भ्रष्टाचार विरोध बेकायदेशीर व्यवहार तळेगाव आरटीआय अक्टिव्हिस्ट माहिती अधिकार निर्घृण हत्या सतीश शेट्टी Expection of Justice संपादकीय Editorial RTI activist Dabhade Talegao Right to information Murder Satish Shetty weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके