डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नवे वर्ष नवे आहेच पण त्याचबरोबर ते पूज्य साने गुरुजींचे जन्मशताब्दी वर्षही आहे. ‘साधना’ ला त्याचे अधिक अगत्य असणारच पण उभ्या महाराष्ट्रालाही ते आहे असा सुखद प्रत्यय येत आहे. साने गुरुजींना स्मरून, ‘जगाला प्रेम देत, बलशाली भारत होवो’ यासाठी स्वतःला समर्पित करणे आणि आपण असू त्या त्या क्षेत्रात स्वतःला पणाला लावणे हाच नव्या वर्षाच्या स्वागताचा खरा मार्ग दिसतो.

साधनेचा अंक दर गुरुवारी रवाना होतो. शुक्रवारी पोचतो. याचा अर्थ या वेळी तो 31 डिसेंबरला पोस्टात पडेल. नव्या वर्षाच्या  स्वागताबरोबर घरपोच होईल. माणूस ही मोठी अजब चीज आहे. अडीअडचणींचे, व्यथावेदनांचे डोंगर उरावर असले तरी तो हिंमत हरत नाही. कालओघाच्या आपल्या सोयीसाठी पाडलेल्या एका तुकड्याला तो अलविदा म्हणतो आणि येणाऱ्या पहाटेचे स्वागत नव्या उमेदीने करावयास सज्ज होतो.

सामान्य माणसाचा अंत पहाणारे असे सरत्या वर्षात बरेच काही घडले. बहुराष्ट्रीय कंपन्यांची सद्दी स्पष्ट झाली, देशी उद्योगधंद्यांची कंबरडे मोडली. चार दिवसच कारखाना चालविणे, सक्तीची स्वेच्छा (!) निवृत्ती, टाळेबंदी याला ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असे स्वरूप प्राप्त झाले. या मोठया उद्योगांवर अवलंबून असलेल्या लघुउद्योगांची तर वाताहत झाली. कायम रोजगार घटला. कंत्राटी कामगार प्रथा बळावली. कामगार आंदोलनाची उसळती उर्मी लुप्त झाली. शंकरराव चव्हाणांसारखे जबाबदार ज्येष्ठ नेते अगदी परवा म्हणाले, 'नव्या अर्थव्यवस्थेचा लाभ झालेला नाही’. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापारी संघटना कर्ज देताना अटी लादतात. खाजगीकरण, कामगार कपात करण्यास सांगतात. जगातील अनेक देश त्यामुळे अडचणीत आले आहेत. रोजगार संधी वाढेल असे तंत्रज्ञान हवे आहे. या दशकाच्या सुरुवातीला जीवाच्या आकांताने हे सांगणारे अनेक होते त्या वेळी. ‘पण लक्षात कोण घेतो’ अशी गुर्मी होती. भाववाढ मागील वर्षी 3.98 टक्के होती. यावर्षी ती पाच टक्यांपर्यंत काबूत ठेवण्याची सरकारची भाषा होती. प्रत्यक्षात भाववाढीने 8.85 टक्के ही पातळी या वर्षात गाठली. त्याचे चटके जनसामान्यांना बसले आणि मग सत्तारूढ पक्षाला ते बसल्याशिवाय राहिले नाहीत. ही महामंदी आणि भाववाढ लोकशाही प्रक्रियेवरच थेट आघात करण्याचा धोका आहे.

समर्थ राजकीय पर्यायाची भाषा बोलणारा भाजप पंतप्रधानांच्या चिंताग्रस्त चेहऱ्याप्रमाणेच पडेल झाला आहे. काँग्रेस तर बुडतच होती. त्यांना सोनियाचा अखेरचा आधार तात्पुरता तरी लाभलेला दिसतो. 12 जानेवारीला निवडणुकीच्या प्रचारात सोनिया गांधी उतरल्या 14 मार्चला त्या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत संसदीय काँग्रेस पक्षाच्या त्या नेत्या झाल्या. नेहरू-गांधी घराण्याचा करिष्मा, महिलांच्या राखीव जागा, तुलनेने तरुण वय यामुळे पुढच्या पंतप्रधान या नावाने त्यांची ग्वाही फिरवण्यास काँग्रेसने सुरुवातही केली आहे. काँग्रेस हा प्रस्थापितांचा एक बहुरुपी अड्डा झाला आहे. नेतृत्वात बदल होऊन त्याचे मूळस्वरूप बदलण्याची सुतराम शक्यता आम्हाला वाटत नाही. काँग्रेसच्या सहकार्याने यावर्षी जातीयवाद्यांना विरोध आणि पुढील वर्षी सत्तेत गेलेल्या काँग्रेसला स्वाभाविक विरोध यामध्ये परिवर्तनाची तिसरी राजकीय ताकद उभारण्याचे शहाणपण, कतृत्व कोठेच दाखवले जात नाही ही यावर्षीची खंत आहे आणि पुढील वर्षीही तीच बाळगावी लागणार असे दिसते. दुहेरी निष्ठेवरून एकेकाळी जनता पक्ष फुटला या दुहेरी निष्ठा आता खुद्द पंतप्रधान वाजपेयींनाच पेचात पकडणार असे चित्र दिसते. भाजपाचा बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याच्या स्वदेशी जागरणमंचापासून ते विश्वहिंदूपरिषद, बजरंग दलापर्यंतच्या आपल्या या ना त्या कारणाने वाजपेयींच्याबाबत समाधानी नाहीत. यावर्थी है स्पष्ट झाले. पुढचे वर्ष त्याचे परिणाम दाखवणारे असेल.

कायदा आणि सुव्यवस्था हे संस्कृतीचे अधिष्ठान असते. ते मूलभूत असले तरी इतके प्राथमिक असते की त्याचा विसर पडतो. याबाबत खडबडून जाग यावी अशी स्थिती सांप्रतवर्षी महाराष्ट्रात निर्माण झाली. अमृता देशपांडे या तरुणीचा अंगावर शहारे आणणाऱ्या पद्धतीने सुसंस्कृत शहरात, भरदिवसा तथाकथित एकतर्फी प्रेमातून खून झाला. शेकडो जण त्याचे भेकड मूक साक्षीदार बनले. गुन्हेगारीवरच जगणे हा सर्वात मोठा संघटित धंदा म्हणून मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीत उदयाला आला. तो होताच पण युती शासनाची पकड सुटली आहे आणि समाजावर गुन्हेगारीची पकड बसली आहे असे वाटणारी एक भेदरलेली मानसिकता ही या वर्षाची भेट. वाढती लोकसंख्या, बेकारी, चंगळवाद अशा अनेक बाबींनी याला महत्त्वाचा हातभार लावला. हे खरे आहे. पण नागरिकांच्यात ‘आजकाल काही खरे नाही' ही असुरक्षिततेची भावना निर्माण होणे हे सुसंस्कृत समाजधारणेसाठी चिंताजनक आहे. अशी मानसिकता वरपांगी कितीही जल्लोष केला तरी नव्या वर्षाचे स्वागत करू शकत नाही. आव्हान पेलू शकत नाही. मुस्लिम गायकांना बंदी, पाक क्रिकेट संघाला धोक्याचा इशारा, 'फायर' सिनेमाबाबत दंडेली हे सगळे धर्माच्या व संस्कृतीरक्षणाच्या नावाने आणि तेही सत्ता हातात असलेल्यांकडून राजरोस घडते आहे हे लक्षात घेतले तर कायदा सुव्यवस्थेबाबत परिस्थितीचे एकूण गांभीर्य लक्षात येते. काळ्याकभिन्न ढगालाही रूपेरी किनार असतेच. क्रीडा क्षेत्रात पहा. या वर्षातच कोलेझ हंपी या भारतीय छोटया मुलीने 12 वर्षांखालची जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकली. भूपती-पेस ही दुहेरी टेनिसमधली आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची जोडी झाली आहे. सचिनची बॅट उदंड तळपत आहेच आणि फार वर्षांनी हॉकीस सुवर्णतेज पुनश्च प्राप्त झाले आहे. सामाजिक क्षेत्रातही असे काही घडले आहे. शिक्षण सर्वांना हक्काचे हवे हा आवाज बुलंद होत आहे. प्राथमिक शिक्षणावर सर्वात जास्त खर्च व लक्ष देण्याचे आश्वासन पंतप्रधानांना जाहीरपणे द्यावे लागले. नाशिक जिल्ह्यातील रायते गावाहून 66 किलोमीटर, पाऊस, वारा, थंडी, ऊन यांना न जुमानता चक्क पायपीट करत शालेय विद्यार्थिनीने शिक्षणाधिकाऱ्याचे ऑफिस गाठले आणि शाळा नीट चालण्याची व शिक्षक मिळण्याची मागणी केली. तर दिल्लीच्या आसपासच्या दोन लाख विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतीना पत्रे लिहून मूलभूत हक्क म्हणून शिक्षणाचा घटनेत समावेश करा अशी विनंती केली. नवे वर्ष नवे आहेच पण त्याचबरोबर ते पूज्य साने गुरुजींचे जन्मशताब्दी वर्षही आहे. ‘साधना’ ला त्याचे अधिक अगत्य असणारच पण उभ्या महाराष्ट्रालाही ते आहे असा सुखद प्रत्यय येत आहे. साने गुरुजींना स्मरून, ‘जगाला प्रेम देत, बलशाली भारत होवो’ यासाठी स्वतःला समर्पित करणे आणि आपण असू त्या त्या क्षेत्रात स्वतःला पणाला लावणे हाच नव्या वर्षाच्या स्वागताचा खरा मार्ग दिसतो.

Tags: खेळ अर्थव्यवस्था साने गुरुजी संपादकीय नरेंद्र दाभोलकर Sport Sane Guruji Editorial Narendra Dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके