डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आचार्य अत्रे दिग्दर्शित 'श्यामची आई' चित्रपटाला 1954 मध्ये देशातील सर्वोत्तम चित्रपटासाठी दिले जाणारे 'राष्ट्रपती पदक' मिळाले. त्या चित्रपटात वनमाला यांनी 'श्यामची आई'ची भूमिका केली होती; तर माधव वझे यांनी 'श्याम' साकारला होता. वनमालाबाईंचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या आठवणी जागवणारा माधव वझे यांचा लेख…

‘श्यामची आई’मधील श्यामची आई - वनमालाबाई यांचे निधन झाल्याची बातमी प्रथम 'सकाळ'ने फोनवर सांगितली आणि पाठोपाठ असंख्य आठवणींनी डोळ्यांसमोर गर्दी केली. अगदी काल घडल्याप्रमाणे आठवणींचा चित्रपट डोळ्यांसमोरून सरकू लागला.

आचार्य अत्रे यांनी 'श्याम' म्हणून निवडले, त्या आधी खरे तर एका दुसऱ्याच मुलाला घेऊन, त्यांनी 'श्यामची आई'चे चित्रीकरण सुरू केले होते. पण वनमालाबाईंनाच तो मुलगा, 'श्याम’ म्हणून आपला काही वाटेना. चित्रीकरण ठप्प झाले. मग काही दिवसांनी संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे व गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी माझे नाव सुचविले. माझी निवड करून आचार्य अत्रे (त्यांना आम्ही चित्रपटातले सगळे 'साहेब' म्हणत असू) - तर साहेब मला मुंबईला घेऊन गेले. दादरच्या समुद्र किनाऱ्यापाशी एका पहिल्या मजल्यावरच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये साहेब राहायचे. रात्रीचे साडेसात-आठ वाजले असावेत. मी थोडेफार खाऊन, गॅलरीतून समुद्र पाहत बसलो होतो. वाऱ्याच्या झुळकांनी झोप आल्यासारखे वाटत होते. तेवढ्यात निरोप आला, ‘‘साहेबांनी बोलावलं आहे.’’ निरोप बाबूने, त्यांच्या ड्रायव्हरने दिला आणि त्यानेच एका खोलीपाशी मला नेले. 

खोलीत दिव्याचा अंधूकसा उजेड होता. तिथे पलंगावर साहेब बसले होते. आणि त्यांच्या शेजारी होत्या एक बाई. बॉबकट, गोरीपान कांती, हिरवे-घारे वेध घेणारे डोळे आणि पायघोळ हिरवाकंच गाउन... खोलीच्या दारापाशीच चोरट्यासारखा मी उभा राहिलो. साहेबांनी मला नाटकातील उतारा म्हणून दाखवायला सांगितले. मी सराईतपणे तो म्हटला आणि जायला सांगितल्यावर लगेचच गॅलरीत परतलो. माझे अंथरूण गॅलरीला चिकटून असलेल्या दगडी कट्ट्यावरच घातले होते. आडवा झालो. चांदोबा आकाशात होता. गार वाऱ्याच्या झुळकांनी झोप कधी लागली ते कळलेच नाही.

सकाळी बाबूकडून कळले की त्या बाई, 'श्यामची आई' असणार आहेत. मी पार गोंधळून गेलो. पण बोलणार कोणापाशी? रात्र झाली की फार तर चांदोबाला ती गम्मत सांगता येईल... तीन-चार दिवसांनी चित्रीकरण सुरू झाले, ज्योती स्टुडिओत. माझा एव्हाना चमनगोटा केला होता. साहेब, त्या बाई आणि मी, गाडीतून स्टुडिओत पोहोचलो. रंगभूषा-वेशभूषा करण्याची पुरुषांची खोली होती. तिथे दगडू आणि कृष्णाने मला नेले. थोड्या वेळाने तिथे नऊवारी लुगडे नेसलेल्या, केसांचा खोपा घातलेल्या, केसात व गळ्यात तऱ्हेतऱ्हेचे दागिने ल्यालेल्या एक बाई आल्या. याच त्या! पण खरेच का याच त्या आहेत? विश्वास बसेना. नऊवारी लुगड्यातल्या, अंगभर पदर घेतलेल्या त्या बाई स्वतःला आरशात पाहत होत्या आणि कौतुकाने सगळ्यांकडे पाहून हसत होत्या. हसताना त्यांचे ते एकसारखे दात काय सुंदर दिसत होते. सगळे जण त्यांना 'बाई' म्हणत होते. मीसुद्धा त्यांना 'बाई' म्हणायला लागलो. मग एकदोन दिवसांत कळले की त्यांचे नाव वनमाला. आणि पुढे त्यांचे आणखी एक नाव समजले. साहेब बाईंना 'सुशीला’ म्हणायचे. मलाच उगीचच लाजल्यासारखे व्हायचे. पण मी ते लपवायचा प्रयत्न करीत असे.

श्यामची आई संध्याकाळची, गावातल्या देवळातून घरी परतली आहे. माजघरात देवापाशी दूर्वाची आजी काही म्हणत बसली आहे. आई येते आणि आधी ‘‘हे आले नाहीत वाटतं अजून,’’ असे विचारते. दूर्वाची आजी तिला काही सांगते आणि म्हणते, ‘‘अगदी लक्ष्मीसारखी दिसत्येस यशवदे ! सदू येईपत्तर असू देत हो हे दागिने...’’

चित्रीकरण सुरू होते. त्या दृश्यात मला काहीच काम नव्हते. ते दृश्य कधी संपले ते कळलेपण नाही. खूप खूप वर्षांनंतर, महाविद्यालयात नाटकातून भूमिका करीत होतो, अभिनय म्हणजे काय त्याची मित्रमैत्रिणींबरोबर रात्र-रात्र चर्चा करीत होतो, तेव्हा कधीतरी 'श्यामची आई' पुन्हा पाहिला. आणि या दृश्यापाशी डोळे भरून आले. करुण असे काहीच नसताना, गळा दाटून आला. ‘‘सदू येईपत्तर असू देत हो हे दागिने’’, या दूर्वाच्या आजीच्या सांगण्यानंतर, वनमालाबाईंनी अस्फुटसे लाजून, होकारार्थी मान हलविली आहे - सूक्ष्म आणि सुंदर अभिनयाचा साक्षात्कारच जसा काही मला झाला होता! जाणवले, की आपल्याला त्या लहान वयात, वनमालाबाईंचे हे अभिनेत्री म्हणून असलेले थोरपण नव्हते लक्षात आले! त्या वयात ते येणारच नव्हते! नाटकाचे असे मागे काही राहत नाही. चित्रपटातल्या त्या माझ्या आई - त्यांच्या अभिनयाचे सामर्थ्य, चित्रपटामुळेच अनेक वर्षांनंतरही मला समजू शकले!

श्यामने रुपया चोरल्याचे आईपाशी कबूल केले आहे. आईने वेताच्या छडीने त्याला मारले आहे आणि बजावले आहे, की पड देवाच्या पाया आणि सांग, पुन्हा असे करणार नाही म्हणून. चित्रीकरण संध्याकाळी झाले. देव्हारा मांडला होता. देवांच्या मूर्ती होत्या. निरांजन, उदबत्ती, गंध, फुले, हळद-कुंकू सगळे काही होते. ‘देऊ तू नको दुष्ट वासना, तूच आवरी आमुच्या मना' असे हुंदके देत देत श्याम देव्हाऱ्यासमोर बसून विनवतो आहे आणि आई, हलकेच मागून येते, श्यामजवळ बसते, त्याच्या गालापाशी आपला गाल नेऊन प्रेमाने विचारते, ‘‘फार लागलं नाही ना तुला श्याम?’’ - काय झाले कोणास ठाऊक! प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू झाले आणि देवाला प्रार्थना करताना मला हमसाहमशी रडू आले; डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरू झाल्या. वनमालाबाई माझ्याजवळ येऊन बसल्या. माझ्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला. त्यांच्या गालाचा स्पर्श माझ्या गालाला झाला आणि एकीकडे प्रार्थना करीत असतानाही चपापलो, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते- माझ्या गालाला ते कळत होते.

मी तर काय लहान होतो. सगळीच लहान मुले असतात तसा संवेदनशील होतो. मला आपसूक रडू आले तर त्यात खास असे काही नाही. पण व्यावसायिक अभिनेत्री असूनही, त्या क्षणी वनमालाबाईंना रडू आवरले नाही. चित्रीकरण संपल्यावर मी तर खूपच वेळ रडत होतो आणि त्याही सुन्न झाल्यासारख्या, आपल्याच स्वतःपाशी असल्यासारख्या एका जागी बसून होत्या बराच वेळ. नटनटींनी भूमिकेशी एकरूप व्हावे की होऊ नये, तसे होता येते की नाही... वगैरे वगैरे गोष्टी आता मी दिग्दर्शक नट म्हणून मित्रांशी बोलत राहतो. पण एक खरे, की त्या दिवशी, त्या क्षणाला, श्याम आणि आई या दोन्ही भूमिका आम्हां दोघांना आक्रमून गेल्या...! ‘‘श्यामची आईमधले कोणते दृश्य तुम्हांला स्वतःला सगळ्यांत जास्त आवडते,’’ असा प्रश्न वनमालाबाईंना आणि मलाही एकदा पत्रकारांनी केला, तेव्हा आम्ही दोघांनीही याच प्रसंगाचा उल्लेख उत्स्फूर्तपणे केला होता!

'द्रौपदीसी बंधू शोभे' या गीताचे चित्रीकरण सुरू होते. श्यामची आई आणि आम्ही तिची मुले, तिच्या जावा आणि दूर्वाची आजी. पण खूपशी समीप दृश्ये वनमालाबाईंची होती. माझे दृश्यात काम असो-नसो, मी अगदी स्वतःला हरवून, इतरही दृश्यांचे चित्रीकरण पाहत होतो. अशी वनमालाबाईंची समीप दृश्ये- क्लोजअप सुरू असताना, आचार्य अत्रे कॅमेऱ्याजवळून ओरडले (ते सहज बोलले, तरी गरजल्यासारखे वाटायचे !), ‘‘सुशीला, नारायणराव...’’ वनमालाबाईंनीही स्मितहास्य केले. दृश्याचे चित्रीकरण सुरू झाले आणि वनमालाबाईंनी गीत गाताना दोन-तीनदा मान वेळावली. मला ते जाणवले. कारण तालीम करताना त्यांनी तसे केले नव्हते. 'नारायणराव' असे साहेबांनी म्हटले, म्हणून ते तसे झाले. मला गंमत वाटली. कोण नारायणराव? मी दामूअण्णांना विचारले. दामूअण्णा जोशी आचार्य अत्रे यांना नाटककार म्हणून उभे केलेले दिग्दर्शक व नाटक कंपनीचे मालक. आता ते साहेबांकडे उदरनिर्वाह करीत होते. - तर दामूअण्णा म्हणाले, ‘‘नारायणराव म्हणजे बालगंधर्व. नारायणराव राजहंस.’’

बालगंधर्व कोण - कुठले ते मला काहीच माहीत नव्हते - खूप वर्षे निघून गेल्यानंतर समजले की बालगंधर्वांसारखा अभिनय असावा, असे जेव्हा जेव्हा आचार्य अत्रे यांना वाटायचे, तेव्हा ते एवढेच म्हणायचे, ‘‘सुशीला, नारायणराव’’ - आणि वनमालाबाईंना सारे काही लक्षात येई.

हे सगळे दिसायला तसे छान होते. पण जसजसा मी वयाने मोठा होत गेलो, तसतसे 'श्यामची आई'च्या वेळचे वातावरण आठवून मी अस्वस्थ होत असे. अजूनही होतो. बाई तशा एकट्या, एकाकी होत्या. श्यामची आई मरते, तसे आपणही आता मरून जायचे, असे त्या वेळी त्या का बरे म्हणत होत्या? दृश्याचे चित्रीकरण मनापासून, उत्कटतेने करणाऱ्या बाई दृश्य संपले आणि दिवे विझले की एका बाजूच्या खुर्चीत एकट्याच बसून राहायच्या, ते का म्हणून? आणि राष्ट्रपतिभवनातली ती भली मोठी पार्टी त्या रात्री संपली आणि दुसऱ्या दिवशी साहेब आमच्या हॉटेलवर आले - त्यांनी बाईंना त्यांच्या खोलीत जाऊन निरोप द्यायला मला पाठवले, तेव्हा सगळे सामानसुमान आणि लहानसा देव्हाराही बरोबर घेऊन, बाई दिल्लीहून चालत्या झाल्या होत्या. ते तरी का म्हणून? आणि काही वर्षांपूर्वी, ‘सोनेरी-चंदेरी’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमात आम्ही एकत्र आलो, तेव्हा साहेबांचे नाव आपण काही उच्चारणार नाही... माधवच त्यांच्या दिग्दर्शनाबद्दल बोलेल, असे त्यांनी तिथे स्टुडिओतच कार्यक्रमाच्या निर्मात्याला ऐकविले, ते तरी का?

बाईंशी बोललो नाही त्याबद्दल कधीच. मला अंदाज होता. थोडी माहितीही होती. पण आई-मुलाचे नाते मनात राहिले असल्यामुळे असेल कदाचित - पण त्यांच्या त्या नात्याबद्दल मी अवाक्षरही काढले नाही ते बरेच झाले म्हणायचे. आता मी आठवतो ते फार विलोभनीय आहे. राष्टपतिभवनातल्या पार्टीमधून, माझ्या इच्छेविरुद्ध त्यांनी मला बाहेर काढले होते... मी का त्यांचा खरेच मुलगा होतो?... माझ्या सहीच्या वहीत त्यांनी संदेश लिहिला, "सत्कर्म योगे वय घालवावे। सर्वामुखी मंगल बोलवावे" आणि खूप खूप वर्षांनंतर, माझ्या- शैलाच्या विवाहाला त्या आवर्जून आल्या... अलीकडेच काही वर्षांपूर्वी पुण्यात आल्यावर फोन करून घरी जेवायला आल्या... माझ्या आईबरोबर खूप वेळ बोलत बसल्या... आठवणींचा महापूर सताड वाहतो आहे...

Tags: वनमालादेवी - चित्रपटातील श्यामची आई ‘राष्ट्रपतिपदक’प्राप्त चित्रपट ‘श्यामची आई’ आठवणी Vanmaladevi - Shyam's Mother in Film 'Rashtrapati Padak Received Film 'Shyamchi Aai' Memories weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव वझे
vazemadhav@hotmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके