डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुजोर प्रवृत्ती आणि मुजरा प्रवृत्ती

दारिद्य्ररेषेखाली असलेल्या वर्गाला वाटावयाचे 50 ते 60 टक्के रॉकेल हे पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी जाते, याची जाणीव केंद्र व राज्य सरकारला आहे. 62 रुपये लिटर दराच्या पेट्रोलमध्ये 14 रुपये लिटर दराचे रेशनचे रॉकेल मिसळले तर 38 रुपयाला एक लिटर हा भाव पेट्रोलपंपाच्या मालकाला पडतो. हा भलताच किफायतशीर धंदा झाला. तो अब्जावधी रुपयांचा होतो. तेल कंपन्यांचे मोठे डेपो नाशिक जिल्ह्यात असल्याने तेथे तो सर्वांत तेजीत आहे. हे इतके वर्षे बिनबोभाट चालते याचा अर्थ सर्व संबंधित प्रशासकीय-राजकीय साखळीची तोंडे ‘अर्थ’पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. ते सर्वच जण या पापाच्या पैशाचे वाटेकरी आहेत.

या वर्षीच्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात किडलेल्या समाजवास्तवाची सुन्न करून टाकणारी घंटा वाजली. ज्या मार्गाने प्रवास चालू आहे त्यावर हा टप्पा येणारच होता, तो शब्दश: ज्वाळांचे चटके देत आला. संवेदनशील जनमानस त्यामुळे स्तंभित, भयचकित आणि कमालीचे उद्विग्न झाले. गुन्हेगारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याच्या गृहमंत्र्यांच्या राणाभीमदेवी घोषणांवर लोकांचा विश्वास नव्हताच. ज्या मुजोरांना जेलखाना दाखवावयाचा त्यांना मुख्यमंत्रीअभय देतात. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तीव्र नाराजी नोंदवून आणि दंड ठोठावूनही त्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेस पक्षाची हायकमांड नुसतेच अभय नाही तर पदोन्नती देते; त्या महाराष्ट्रात हाच रस्ता अटळ होता. नाशिकच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनाच त्यापायी शब्दश: कोळसा व्हावे लागल्याने त्याची दाहकता, प्रक्षुब्धता वाढली एवढेच. तेलभेसळ माफियांच्या या अमानुषतेने हादरलेली नोकरशाही दुसऱ्या दिवशी एकगठ्ठा रस्त्यावर आली. तिने संताप व्यक्त केला. शक्तिप्रदर्शनही केले.

खरे तर 7 ऑगस्टला वाळू तपासणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शिरूर येथे मारहाण, 18 ऑगस्टला नेवासे येथे वाळू माफियांचा गोळीबार, 28 सप्टेंबरला नगर येथे जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी दीपक पटेल यांना ठोकून काढणे, 24 जानेवारीला पाथर्डीला वाळूतस्कराकडून मंडल निरीक्षकास मारहाण- हे झाले गेल्या वर्षातील फक्त नगर जिल्ह्यातले हल्ले. 12 सप्टेंबरला बांदा येथे वाळू माफियांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक केली तर 15 जानेवारीला मलकापूर (बुलडाणा) येथे गुंडांबरोबर झालेल्या चकमकीत पोलिस फौजदार शहीद झाला.

पेट्रोल, वाळू, भूखंड यांतील माफिया समांतर सरकार चालवतच होते. त्याचे जळजळीत दर्शन मनमाडजवळच्या पानेवाडी येथे भरदिवसा कर्तव्यदक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेट्रोल ओतून जाळल्याच्या घटनेतून घडले. संपूर्ण पेटलेले सोनवणे हे अखेरच्या क्षणापर्यंत मृत्यूशी झुंज देत आपले कर्तव्य पार पाडत होते. ज्वालांनी लपेटलेल्या सोनवणे यांनी ही नराधम कृती करणाऱ्या पोपट शिंदेला घट्ट मिठी मारून पकडला, त्यामुळे तोही पेटला व भाजून जखमी झाला. पाववड्याचा फुटकळ धंदा करणारा बेकार पोपट दत्तू शिंदे हा बघताबघता तेलमाफिया बनला. मनमाड पोलिसांनी पोपट शिंदेविरुद्ध 2001 मध्ये एक व 2003 मध्ये तीन गुन्हे दाखल केले होते. रॉकेल-पेट्रोल भेसळ करण्याबरोबरच तो समाजविघातक कारवाया करत असल्याचे गुप्त अहवालात नमूद आहे. तरीही त्याला सुनावलेली तडीपारीही त्याने मंत्रालयात जाऊन झटक्यात रद्द करून आणली. कुणा बड्या मंत्र्याच्या हस्तक्षेपाशिवाय असे आदेश निघूच शकत नाहीत, हे न समजण्याइतकी महाराष्ट्रातील जनता बालबुद्धीची नाही.

या प्रकरणाचे धागेदोरे तब्बल दीड दशक मागे जातात. 1995-96 मध्ये नाशिकच्या तेव्हाच्या विभागीय आयुक्त लीना मेहेंदळे यांनी सरकारकडे नाशिक जिल्ह्यातील इंधनमाफियांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यांनी आपल्या अहवालात या माफियांची नावे दिली होती. पण कोणतीही कारवाई झाली नाही. महाराष्ट्रात तेव्हा युतीचे सरकार होते. घडले ते एवढेच की लीना मेहेंदळे यांची चार महिन्यांत बदली करण्यात आली. आजतागायत तो अहवाल मंत्रालयात धूळ खात पडून आहे. शासनाची संशयास्पदता आणि अकार्यक्षमता सिद्ध करण्यास एवढी एकच बाब बोलकी आहे.

दारिद्य्ररेषेखाली असलेल्या वर्गाला वाटावयाचे 50 ते 60 टक्के रॉकेल हे पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी जाते, याची जाणीव केंद्र व राज्य सरकारला आहे. 62 रुपये लिटर दराच्या पेट्रोलमध्ये 14 रुपये लिटर दराचे रेशनचे रॉकेल मिसळले तर 38 रुपयाला एक लिटर हा भाव पेट्रोलपंपाच्या मालकाला पडतो. हा भलताच किफायतशीर धंदा झाला. तो अब्जावधी रुपयांचा होतो. तेल कंपन्यांचे मोठे डेपो नाशिक जिल्ह्यात असल्याने तेथे तो सर्वांत तेजीत आहे. हे इतके वर्षे बिनबोभाट चालते याचा अर्थ सर्व संबंधित प्रशासकीय-राजकीय साखळीची तोंडे ‘अर्थ’पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. ते सर्वच जण या पापाच्या पैशाचे वाटेकरी आहेत.

अशा घटनांच्या मुळाशी सैद्धांतिक पद्धतीने जाऊ इच्छिणारे काय करतात? ते सांगतात की, भारतातील औद्योगिक भांडवली लोकशाहीने आता उत्तर औद्योगिक भांडवलशाही पर्वात प्रवेश केला आहे. औद्योगिक भांडवलशाहीला एका (किमान सोयिस्कर) नैतिकतेची बूज होती. उत्तर औद्योगिक पर्व अधिक बेबंद, हिंसक आणि पैसा हाच पंचप्राण मानणारे आहे. त्यामुळे देशाच्या सध्याच्या कथित विकासाच्या वाटचालीत असे चटके वारंवार बसणार. मूळ व्यवस्थेला हात घातल्याशिवाय त्यावरचे उत्तर सापडणार नाही. दुसऱ्या बाजूला इंधनभेसळीची पाळेुमुळे खणून काढण्याचा इशारा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी दिला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात तातडीने दिडशे-दोनशे ठिकाणी भेसळविरोधी धाडी घालण्यात आल्या. त्याचे स्वागत करतानाच आजवर हे का झाले नाही याचे उत्तरही शासनाकडून अपेक्षित आहे. या शोधमोहिमेत त्यांना हेही शोधावे लागेल की नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री त्याच जिल्ह्यातले आमदार, त्यांचा मुलगाही त्याच जिल्ह्यातला आमदार आणि पुतण्या तर खासदार. जिल्ह्याशी अनेक वर्षांचे संबंध असलेल्या राजकारण्यांना जर पायाखाली काय जळते याचे भान नसेल वा भान असून काही घडले नसेल तर ते या नेत्यांच्या कार्यक्षमतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

एक मांडणी अशी केली जाते, की केवळ छापे टाकून संरक्षित नि संघटित भ्रष्टाचार थांबणार नाही. रॉकेल खुल्या बाजारात विकणे आणि गरिबांना तेवढ्या रकमेचे थेट अनुदान देणे हाच रामबाण उपाय आहे. यामुळे बाजारातील दर सर्वांना सारखाच असेल, अनुदानातील गळती थांबेल, रॉकेल माफियागिरीचा आधारच उन्मळून पडेल. मात्र अशा सूचनांबद्दल अधिक साकल्याने विचार करण्याची गरज आहे. प्रायोगिक पातळीवर तो तपासूनही पाहायला हवा. कारण कदाचित हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरेल का, अशी शंकाही या उपायाबाबत घेतली जाते.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी याबाबत केलेला प्रयोग पथदर्शक ठरावा. कोल्हापूर शहरात दरमहा नऊ लाख लिटर रॉकेल वाटले जात होते. तरीही ते कमी पडत असल्याच्या सततच्या तक्रारी होत्या. यासाठी रेशनधान्य दुकानदारांकडे रॉकेल पोचताच त्याची माहिती त्या दुकानाशी संबंधित काही कार्डधारकांना एसएमएसद्वारे कळवण्याची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी चालू केली. याबरोबरच रॉकेल टँकरवर मालकाच्याच खर्चाने एपीएस प्रणाली बसवली. त्यामुळे प्रत्येक टँकरला ठरवून दिलेल्या मार्गाने तो जातो का नाही याची पाहणी कार्यालयात बसून करणे शक्य झाले. या दोन उपायांनी कोल्हापूर शहरातील रॉकेलची मागणी दरमहा नऊ लाख लिटरवरून एकदम सहा लाख लिटरवर आली. अशा स्वरूपाच्या उपायांनी लक्षणीय फरक पडू शकतो. अर्थात अशा माफियागिरीसाठी कुख्यात असलेल्या महाराष्ट्रातील विभागांना मात्र चौदावे रत्नच दाखवावे लागेल.

या सर्वांच्या पलीकडे एक प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला येऊन भिडतो. रॉकेलमाफिया नंबर दोनचा पैसा तयार करत होते. प्रशासन, पोलिस, राज्यकर्ते यांना त्यातील आवश्यक तो वाटा देऊन बाकीचा आपल्या हितसंबंधांचा प्रभाव निर्माण करण्यासाठी वापरत होते. आज महाराष्ट्राचे राजकीय सोडाच सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक जीवनही या अथवा त्या स्वरूपात निर्माण होणाऱ्या नंबर दोनच्या पैशांच्या प्रभावाखाली आले आहे. कोणाही सोम्यागोम्याचे वाढदिवस साजरे करण्यासाठी लागणारे कटआऊट्‌स, निघणाऱ्या वृत्तपत्रीय पुरवण्या, भपकेबाज सोहळे हे त्याचे छोटे रूप आहे. दणकेबाज सांस्कृतिक सोहळे, क्रीडा स्पर्धा साजऱ्या होतात त्यांचा थाटमाट नंबर दोनच्या धनाशिवाय शक्यच नाही. वर्षभर धार्मिक उत्सवांना उधाण आलेले असते. ते कमी म्हणून की काय आपापल्या भागातल्या लोकांना अष्टविनायक वा काशीयात्रा घडवून पुण्य पदरात पाडले जाते. पुन्हा हरिनाम सप्ताह, सत्संग सोहळे यांची रेलचेल चालू असते. हे पैसे येतात कोठून? निवडणुकांतला खर्च हा त्या सर्वांचा कळसाध्याय असतो. आमदारकीचा खर्च कधीच कोटीच्या कोटी उड्डाणे ओलांडून गेला आहे.

बहुसंख्य गरिबांचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी नेहमीच कोट्याधीश असतात. शिवाय पुढच्या निवडणुकीपर्यंत ही मालमत्ता दुप्पट करण्याचा चमत्कारही ते करतात. ही लूटमार तेलातून होते, वाळूतून होते, भूखंडातून होते, का बदली करण्यासाठी झुकते माप देऊन हा प्रश्न गौण आहे. खरा प्रश्न असा की या सगळ्या नंबर दोनवाल्यांना आपण कळत नकळत मुजरा करावयास शिकलो आहोत. त्यांच्या मुजोर पैशावर निर्माण होणाऱ्या सोहळ्यांना समाजाचा विविधांगी सांस्कृतिक विकास मानावयास लागलो आहोत. मनमाडसारख्या घटनेने प्रकरण कधीतरी अगदीच हाताबाहेर जात चालल्याची जाणीव करून देणाऱ्या तीव्र झळा लागतात. उत्तर सोपे नाहीच, आव्हान व्यापक व बिकट आहे; प्रतिकार स्वत:च्या पूर्ण ताकदीने आणि तिखट ठेवावयास हवा. 

Tags: पोपट शिंदे यशवंत सोनवणे संपादकीय तेल माफिया संपादकीय popat shinde yashwant sonawane editorial oil smuggler editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके