डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साहित्यसंमेलनामध्ये कर्नाडांनी ठोकशाहीवाल्यांचा धिक्कार केला तो केवळ कठीण शब्दांच्या धोंड्यांनी नव्हे. उग्र सांस्कृतिक युद्धाचे रणशिंग त्यांनी फुंकले असले तरी त्याचा ध्वनी उदात्त आणि गंभीर होता.

अ. भा. सा. संमेलनाचे उद्घाटन करताना गिरीश कर्नाड यांनी आपल्या सुस्त संवेदनांची झोप उडवली आणि अतिशय मार्मिकपणे साहित्यिकांनी त्यांच्या सत्त्वाच्या रक्षणासाठी सदासज्ज राहिले पाहिजे याची जाणीव करून दिली. कर्नाडांचे भाषण सूचक असूनही सुस्पष्ट होते; घणाघाती असूनही द्वेष मत्सररहित होते.

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आकाशात जळजळीत शब्दांच्या स्फोटांचे कंप दुमदुमत राहिले आहेत. अ. भा. मराठी साहित्य संमेलनात साहित्यिक आणि सत्ताधीश यांमध्ये धुमसणाऱ्या संघर्षाचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष दर्शन वारंवार घडलेले आहे. कला आणि साहित्याच्या विश्वात ज्यांनी आपल्या तेजस्वी भूमिकेमुळे विशेष स्थान मिळवलेले आहे, त्यांपैकी काही नामवंतांनी ठोकशाहीच्या विरोधात आणि सांस्कृतिक स्वाभिमानाच्या पुरस्कारार्थ जे खडे बोल ऐकवलेले आहेत ते खणखणीत आहेत आणि विचारप्रवर्तकही. 

उद्घाटन करताना गिरीश कर्नाड यांनी आपल्या सुस्त संवेदनांची झोप उडवली आणि अतिशय मार्मिकपणे साहित्यिकांनी त्यांच्या सत्त्वाच्या रक्षणासाठी सदासज्ज राहिले पाहिजे याची जाणीव करून दिली. कर्नाडांचे भाषण सूचक असूनही सुस्पष्ट होते; घणाघाती असूनही द्वेष मत्सररहित होते. त्यांच्या भाषणाला अभिजात वाङ्मयाची प्रगल्भ झळाळी होती आणि शब्दोपजीवींचा कधीही लाचार न होण्याचा कृतनिश्चय त्यांच्या शब्दाशब्दातून व्यक्त होत होता. प्रासंगिक राजकारणाची ठिणगी कर्नाडांच्या भाषणाला निमित्त म्हणून चेतवून गेली असली तरी त्यांचे भाषण प्रासंगिकतेचे कडे उल्लंघून मूलभूत समस्यांचा वेध घेणारे होते. 

त्यांच्या भाषणाला मिळालेली दाद केवळ टाळ्यांच्या कडकडाटावरून मोजता येणार नाही. ती दाद वेगळ्या अर्थाने मिळाली ती डॉ. श्रीराम लागू यांच्यासारख्या समर्थ व्यक्तींनी अनेक परींनी दिलेल्या खणखणीत अनुमोदनांच्या रूपाने. साहित्यसंमेलनामध्ये कर्नाडांनी ठोकशाहीवाल्यांचा धिक्कार केला तो केवळ कठीण शब्दांच्या धोंड्यांनी नव्हे. उग्र सांस्कृतिक युद्धाचे रणशिंग त्यांनी फुंकले असले तरी त्याचा ध्वनी उदात्त आणि गंभीर होता. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे मराठी साहित्यिक-प्रकाशकांना पुरस्कार देण्याचा जो समारंभ पुण्यात झाला त्याचे अतिथि विशेष डॉ. यू. आर.. अनंतमूर्ती यांचे भाषण हाही कर्नाडांनी फुंकलेल्या तुतारीचा सूर दुमदुमित करणारा पडिशब्दच होता. 
त्या भाषणानेही आपली पातळी कधी सोडली नाही, वैचारिकतेचा सुरेल आवाजही बेसूर होऊ दिला नाही. 'हे तो प्रतीतीचे बोलणे' असा कर्नाड आणि अनंतमूर्ती यांच्या भाषणांचा गौरव करावासा वाटतो.

याउलट बाळासाहेब ठाकरे यांच्या महात्माजींवरील अभद्र शेऱ्यांचा किंवा लाडके व्यक्तिमत्त्व 'पुलदे' यांच्यासारख्या महाराष्ट्र भूषणाला त्यांनी दूषणे देण्याचा निषेध करण्याच्या उद्देशाने संमेलनाच्या व्यासपीठावरून दणदणीत भाषणे ठोकणाऱ्या वाचिवीरांना आणि वाचिवीरांगनांना काय म्हणावे ! शब्दबंबाळ भाषणांत मूल्यांवरील खरे प्रेम किती आणि स्वतःभोवती आरती ओवाळून घेण्यासाठी केलेली राणाभीमदेवगिरी किती याचा निवाडा करणे अवघड आहे. ही भाषणे दणकेबाज होती पण त्यांचा दणका ठाकऱ्यांसारख्या झोंडांपेक्षा सौम्य स्वभावाच्या आणि वक्त्यांच्या दृष्टीने भेकड जिभेच्या साहित्यिकांच्या पाठी बडवण्यासाठीच होता. अशा प्रवृत्तीला धैर्य म्हणत नाहीत, धटिंगणपणा म्हणतात. अशी भाषणे श्रोते ऐकून घेतात आणि 'गर्जेल ते पडेल काय' असे मनाला विचारीत सभेची रजा घेतात. आपणास हवा आहे तो प्रगाढ निष्ठेतून प्रकटलेला सच्चा सूर. केवळ बेंडबाजे बडवले तर कर्णशूळ उठतो, मस्तकशूळ पीडा देतो पण प्रबोधन ? इल्ले ! 

Tags: साहित्यसंमेलन  अनंतमूर्ती साहित्यिक बाळासाहेब ठाकरे गिरीश कर्नाड Literary conventions Anantmurti Author Balasaheb Thakare Girish Karnad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके