डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधना परिवारातील समाजशिक्षक

प्रधानसरांनी स्वत:विषयीसुद्धा बरेच लिहून ठेवले आहे आणि 11 वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले तेव्हा साधनाने त्यांच्यावर विशेषांक काढला होता. आणि त्यानंतरही त्यांच्याविषयी साधनात व अन्यत्र काही लेखन प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे प्रस्तुत विशेषांक मर्यादित हेतूनेच काढला आहे.

26 ऑगस्ट 1922 ते 29 मे 2010 असे 88 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या ग. प्र. प्रधान यांचे जन्मशताब्दी वर्ष कालच्या 26 ऑगस्टला सुरू झाले आहे. त्यांचे सार्वजनिक आयुष्य सहा दशकांचे होते. स्वातंत्र्यसैनिक, प्राध्यापक, राष्ट्र सेवादलाचे कार्यकर्ते, समाजवादी पक्षाचे नेते, विधान परिषदेचे सदस्य, साधना साप्ताहिकाचे संपादक आणि मराठी व इंग्रजीत विपुल लेखन करणारे लेखक अशी त्यांची सप्तरंगी ओळख सांगता येईल.

महात्मा गांधी यांच्या जीवनदृष्टीचा त्यांच्यावर प्रभाव होता, साने गुरुजी हे त्यांचे दैवत होते आणि एस.एम.जोशी व नानासाहेब गोरे हे त्यांचे राजकीय गुरू होते. त्यांची मराठी भाषा साधी सोपी व प्रवाही होण्यासाठी संतचरित्रकार महिपती कारणीभूत ठरले, इंग्रजी भाषा अचूक व अर्थवाही होण्यासाठी त्यांच्या शाळेतील पटवर्धनसर कारणीभूत ठरले आणि स्वातंत्र्यलढ्यहात उडी घेण्यास वि.स.खांडेकर यांच्या कादंबऱ्या (विशेषत: ‘क्रौंचवध’) कारणीभूत ठरल्या. ‘भगवी वस्त्रे  परिधान न करणारा संन्यासी’ असे त्यांना संबोधले गेले. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी त्यांना ‘कृतार्थ साधक’ असे संबोधले, अरुण टिकेकर यांनी त्यांचे वर्णन करताना ‘साधुमुखे समाधान’ असे लिहिले, गोविंद तळवलकर यानी ‘निरलस, सालस आणि प्रांजळ’ मोहन धारिया यांनी ‘महान योगी’, भाई वैद्य यांनी ‘भावनांचा अथांग सागर’, तर सुभाष वारे यांनी ‘डोंगराएवढा आदर्श’ असा त्यांचा उल्लेख केला. आणि प्रधानसरांनी स्वत:च लिहून ठेवले आहे की, रामदास व तुकारामाएवढा रोकडा व्यवहार मला झेपत नाही, एकनाथ हा प्रापंचिकांचा संत आहे तो मला जवळचा वाटतो.

अशा या प्रधानसरांनी साधना साप्ताहिकाला ‘माझी बहीण’ असे संबोधले होते. 1948 मध्ये साधना साप्ताहिक सुरू झाले तेव्हापासून अखेरपर्यंत ते साधनाशी निगडित होते. लेखक, संपादक, विश्वस्त या नात्यांनी. त्यांची मराठी व इंग्रजीत मिळून दोन डझनांहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत, त्यातील डझनभर तर साधना प्रकाशनाकडून आली आहेत. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे व्यक्तित्व, विचार व कार्य यांना नव्याने उजाळा देण्याचे काम आणि त्यांचा वारसा नेमका काय आहे हे अधोरेखित करण्याचे कामही साधना ट्रस्टमार्फत केले जाणे साहजिक आहे. त्या प्रक्रियेचा प्रारंभ म्हणून हा विशेषांक आहे. 

प्रधानसरांनी स्वत:विषयीसुद्धा बरेच लिहून ठेवले आहे आणि 11 वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले तेव्हा साधनाने त्यांच्यावर विशेषांक काढला होता. आणि त्यानंतरही त्यांच्याविषयी साधनात व अन्यत्र काही लेखन प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे प्रस्तुत विशेषांक मर्यादित हेतूनेच काढला आहे. तो हेतू असा की, प्रधान विचार व प्रधान चरित्र यांच्याकडे आज-उद्याच्या नव्या पिढ्यांनी वळावे आणि त्यातून काहीएक बोध घ्यावा! आणि म्हणून प्रधानांच्या अनेकविध पैलूंपैकी प्रमुख पैलूंचे दर्शन घडवणारे त्यांचे पाच लेख पुनर्मुद्रित केले आहेत. समाजवादी विचारांशी त्यांचे नाते सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहिले, पण समाजवादी पक्षाच्या निवडणुकीच्या राजकारणात ते 1964 ते 84 असे वीस वर्षे राहिले. त्याच काळात विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी तब्बल 18 वर्षे काम केले (त्यातली दोन वर्षे तर विरोधी पक्षनेते म्हणून). त्यामुळे या देशातील बऱ्या-वाईट राजकारणाचे त्यांना चांगलेच आकलन होते. हे लक्षात घेऊन ‘माझे विधान परिषदेचे दीड तप’ या दीर्घ लेखातील प्रारंभीचा भाग या अंकात घेतला आहे. त्यालाच जोडून ‘राजकारणी लोकांची भाषा’ या विषयावरील ललितरम्य लेखही घेतला आहे. हे दोन्ही लेख वाचल्यावर प्रधानांचे राजकीय आकलन काय दर्जाचे होते याची झलक पाहायला मिळते.

कथा, कादंबरी, कविता, नाटक इत्यादी प्रकारातील ललित लेखन प्रधानसरांनी केले नाही. मात्र त्यांचे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमधील ललित सहित्याचे वाचन अफाट होते, त्यावरचे ते उत्तम भाष्यकारही होते. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी वीस वर्षे इंग्रजी वाङ्‌्‌मयाचे अध्यापन केले. थॉमस हार्डीच्या कादंबऱ्या, शेक्सपियरची नाटके, रॉबर्ट फ्रॉस्टच्या कविता इत्यादींवर ते किती समरसून बोलत असत, याविषयी अनेकांनी आपल्या आठवणीत लिहून ठेवले आहे. त्यांच्या त्या पैलूची झलक पाहायला मिळावी म्हणून ‘टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद’ या पुस्तकातील एक पत्र या अंकात घेतले आहे.

प्रधानसर सर्वप्रथम स्वातंत्र्यसैनिक झाले आणि आयुष्यभर त्यांनी जे लेखन केले त्यातील बहुतांश लेखन स्वातंत्र्यलढा, त्यातील नेते आणि स्वातंत्र्यानंतर स्वराज्याकडे वाटचाल करणारा भारत यांचीच ओळख करून देणारे आहे. आणि म्हणून त्यांच्या दोन अगदीच वेगळ्या व तुलनेने दुर्लक्षित पुस्तकांतील दोन छोटे भाग या अंकात घेतले आहेत. 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले तेव्हा युद्धरेषेवर जाऊन सैनिक व नागरिक यांच्याशी केलेला संवाद करून लिहिलेले पुस्तक आहे ‘हाजीपीर’. तर 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले ते बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर. तेव्हा त्या युद्धभूमीवर जाऊन तेथील सैनिक व नागरिक यांच्याशी बोलून प्रधानसरांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘सोनार बांगला’. वरील दोन्ही पुस्तकांतील या अंकात घेतलेले भाग वाचले तर प्रधानसरांची भाषा, शैली, विचार आणि त्यांच्या भावना यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो.

याशिवाय प्रधानसरांशी तब्बल सहा दशके घनिष्ट संबंध येत राहिला ते पन्नालाल सुराणा, प्रधानसरांचे विद्यार्थी राहिलेले अशोक जोशी, प्रधासरांचे दांडगे वाचक राहिलेले दिलीप धोंडगे आणि प्रधानसरांचे काही अंतरावरून पण बरीच वर्षे दर्शन घडत राहिले ते गुलाबभाई, या चौघांचे लेख या अंकात आहेत. या प्रकारच्या स्नेहीजनांचे आणखी काही लेख घेता आले असते, पण ते टाळले आहे. याचे एक कारण प्रधानसर गेले तेव्हाच्या साधना विशेषांकातून व नंतरही तसे अनेक लेख प्रसिद्ध केले आहेत. शिवाय पूर्वी व आताही अनेकांनी अन्य वृत्तपत्रांत व नियतकालिकांत तसे लेखन केले आहे. आणि दुसरे कारण असे आहे की, आगामी वर्षभरात प्रधान सरांविषयी त्या प्रकारचे आणखी काही लेखन (अधिक सकस व सखोल म्हणावे असे) लिहून घेतले जाणार आहे, ते साधना साप्ताहिकातून व कर्तव्य साधना या डिजिटल पोर्टलवरून प्रसिद्ध करणार आहोत. कर्तव्यवरून तर काही ऑडिओ व काही व्हिडिओही प्रसिद्ध  होणार आहेत. प्रधानसरांची आकाशवाणीवर झालेली भाषणे, बीबीसी व अन्य वृत्तवाहिन्यांनी केलेल्या ध्वनिचित्रफिती, प्रधान सरांच्यावर केले गेलेले लघुपट व माहितीपट हेही या ना त्या प्रकारे पुढे आणले जाणार आहेत.

आणि या सर्वांच्या पलीकडे अधिक महत्त्वाचे म्हणजे प्रधानसरांची साधना प्रकाशनाकडून आलेली, पण आऊट ऑफ प्रिंट असलेली पुस्तके नव्या आवृत्त्यांच्या स्वरूपात सादर केली जाणार आहेत. प्रधानसरांची अन्य प्रकाशकांनी काढलेली, पण आता ते (या ना त्या कारणाने) प्रकाशित करू शकत नाहीत, अशी पुस्तकेही साधना प्रकाशनाकडून येतील.

या महिन्यात जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होत असताना त्यांची तीन मोठी व महत्त्वाची पुस्तके साधनाने प्रकाशित केली आहेत. त्यात त्यांनी अ.के.भागवत यांच्यासह इंग्रजीत लिहिलेले ‘लोकमान्य टिळक चरित्र’ अनुवाद करून मराठीत आणले आहे, 65 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले हे प्रधानसरांचे पहिले पुस्तक आहे. तेव्हा ते केवळ 33 वर्षांचे होते. हे पुस्तक मराठीत ज्या पद्धतीने आले आहे ते पाहून त्यांना कमालीचा आनंद झाला असता. त्यांच्या ‘माझी वाटचाल’ आणि ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ या दोन्ही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्याही आल्या आहेत. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात त्यांच्या पुढील पाच पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या येतील- ‘हाजीपीर’, ‘सोनार बांगला’, ‘कांजरकोट’ (हे कच्छच्या सत्याग्रहावरील छोटे पुस्तक आहे) ‘टॉलस्टॉयशी पत्रसंवाद’, ‘लोकनायक जयप्रकाश’... त्यानंतर- जन्मशताब्दी वर्ष संपण्याच्या आत- त्यांच्या साधनात व अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या पण असंग्रहित असलेल्या उत्तम लेखांमधून दोन किंवा तीन पुस्तके आकाराला येतील.

प्रधानसरांचे सर्वांत महत्त्वाचे पुस्तक म्हणून कदाचित ‘साता उत्तराची कहाणी’चा उल्लेख करावा लागेल. त्यात 1940 ते 80 या काळातील भारतातील सात राजकीय विचारप्रवाहांची वाटचाल शब्दबद्ध केलेली आहे. शिवाय 1980 ते 2005 या काळातील आठ प्रवाहांच्यावर असलेले आठा उत्तराची कहाणी हे पुस्तकही आहे, हे पुस्तक अखेरच्या काळातील असल्याने त्याला काही मर्यादा पडल्या आहेत. तर त्या दोन्ही पुस्तकांच्या निमित्ताने पुणे येथे दिवसभराचा परिसंवाद घडवला जाणार आहे; त्याला नामवंत अभ्यासक-संशोधक आमंत्रित केले जाणार आहेत. कोरोना संकट पूर्णत: हटायला अद्याप तयार नाही, म्हणून जाहीर कार्यक्रम करण्यात अडचणी आहेत. मात्र जन्मशताब्दी वर्ष संपायच्या आत तो परिसंवाद घडवून आणता येईल अशी आशा आहे. याशिवाय, काही व्याख्याने व इतर उपक्रमही विचाराधीन आहेत. त्यासंदर्भात साधनाच्या वाचकांकडून येणाऱ्या सूचना, अपेक्षा यांचे स्वागतच आहे! 

Tags: प्रधान जन्मशताब्दी प्रारंभ ग. प्र. प्रधान weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके