डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लाखाची गोष्ट - स्वप्न व सत्य

सामान्य माणसासाठी सुविधा द्यावयास टाटांनी केलेला तंत्रज्ञानाचा उपयोग, या सामाजिकतेचे कौतुक या लाखाच्या गाडीच्या निमित्ताने सर्व ठिकाणी वाचावयास मिळाले. त्यातील तथ्यांश मान्य करू. प्रश्न असा पडावयास, हवा की तंत्रज्ञान विकासाचे हे पाऊल टाटांनी सौरऊर्जा क्षेत्रात का उचलले नाही? टाटा उद्योगसमूहात हा विभाग आहे, ज्यामध्ये कोणतेही नवे संशोधन गेले कित्येक वर्षांत झालेले नाही. महाराष्ट्रात आजही तीस लाख कुटुंबांना वीज पोचलेली नाही. भारतात ही संख्या अनेक कोटींच्या घरात आहे. अन्न शिजवायला इंधन व रात्री गरजेपुरता प्रकाश या दोन गोष्टी जरी सौरऊर्जा तंत्रज्ञान परिणामकारक व स्वस्तपणे विकसित करून देता आल्या असत्या, तरी खऱ्या ग्रामीण गरीब माणसाला तंत्रज्ञानाद्वारे दिलासा मिळाला असता. ज्या जड वाहननिर्मितीत टाटा उद्योगसमूह आघाडीवर आहे, त्यातच सार्वजनिक वाहतुकीला कार्यक्षम परिमाण प्राप्त करून देणारी मोठी वाहने निर्माण झाली असती, तर ते आम-आदमीसाठी जास्त मोलाचे ठरले असते. 

ज्ञानपीठ विजेते वि.स.खांडेकर यांचा ‘एक लाखाचे बक्षीस’हा लघुनिबंध वाचल्याचे स्मरते. लेखकाला तब्बल एक लाख रुपयाची लॉटरी लागते. लेखनकाळ 60-70 वर्षांपूर्वीचा. त्यावेळी ही रक्कम फारच भलीमोठी. त्यामधून मिळणाऱ्या सुखांची स्वप्ने पाहण्यात लेखक मश्गुल, दुष्काळात होरपळलेल्या हाडाचा सापळा झालेल्या मुलांच्या भीक मागण्याच्या आर्त हाकेने लेखकाची तंद्री भंग पावते आणि लाखाचे बक्षीस स्वत:साठी उपभोगण्याचा अधिकार नाही असे तो मनोमन बजावतो.

काळ बदलला, राजेशाही गेली. ग्राहक राजा झाला. त्याच्या हाकांनी आसमंत भरून गेला. अशीच एक अदृश्य हाक भारतातील अगग्रण्य उद्योगपती रतन टाटा यांनी चार वर्षांपूर्वी ऐकली (पाहिली). ते भर पावसात निघाले होते. एक मध्यमवर्गीय कुटुंब मोटार सायकलवरून जाताना त्यांनी पाहिले. छोटी मुलगी पुढे टाकीवर बसवून पती मोटारसायकल चालवीत होता. मागे पत्नी बसली होती, दुसऱ्या मुलाचे आई व बाप यांच्यामध्ये सँडवीच झाले होते. अशा परिस्थितीत मोटारसायकल चालविणे हे खूपच धोकादायक असते, हे रतन टाटांना जाणवले. त्या कुटुंबप्रमुखापुढे तर पर्याय नाही, मोटार त्याला परवडत नाही, सार्वजनिक वाहतूकसेवा सक्षम नाही, रतन टाटा यांनी तेव्हाच मध्यमवर्गीयांना परवडणारी एक लाखाची मोटार बनविण्याचा निर्धार केला. याबाबत अनेक शंका-कुशंका व्यक्त झाल्या. एक लाखात मोटार शक्य नाही, स्पर्धक कंपन्या किंमती कमी करून टाटांना शह देतील, परदेशातील बड्या कंपन्या आधीच असे वाहन बाजारात आणतील असे अनेक तर्क मांडले गेले. परंतु चार वर्षांतील भाववाढ लक्षात घेताही टाटांनी आपला शब्द पाळला. 

ही ‘नॅनो’ गाडी वितरकाच्या हाती एक लाखाला पडेल. राज्याराज्यातील स्थानिक कर लक्षात घेता तिची किंमत जास्तीत जास्त एक ते दीड लाखापर्यंत जाईल. मारुती 800 या सध्याच्या सर्वात जास्त खपाच्या छोट्या गाडीपेक्षा बाहेरून थोडी लहान पण अधिक जागा आत मिळणारी ही कार आहे. दर लिटरला 20 ते 25 किलोमीटर जाईल. ही मोटार ‘युरो 4’चे मापदंड पाळणारी आहे आणि ती मोटारसायकलच्या निम्म्याने प्रदूषण करेल. थोडक्यात 60-70 हजाराची मोटारसायकल घेणाऱ्या ग्राहकाला एक समर्थ पर्याय देण्यात आला आहे.कनिष्ठ मध्यममवर्ग, छोटे व्यावसायिक, मध्यम शेतकरी हेही कार वापरू शकतील.

या मोटारीच्या निर्मितीसाठी झटणारे तरुण इंजिनिअर्स हे मराठी होते, ही मराठी मनालासुखावणारी बाब आहे. छोट्या गाड्या-निर्मितीच्या क्षेत्रातही भारत जगाचे माहेरघर बनण्याची शक्यता आहे. ‘नॅनो’च्या आधीच बजाज उद्योगसमूहाने त्यांच्या छोट्या मोटारीचे प्रारूप सादर करून छोट्या मोटारीसाठी ग्राहक मिळण्याची स्पर्धा मात्र किती मोठी आहे, याची चुणूक दाखवली आहे. दिल्लीला ज्या प्रदर्शनात या ‘नॅनो’कारचे सादरीकरण झाले, त्या निमित्ताने छोट्या-मोठ्या अशा मोटारींची 60-70 मॉडेल्स बाजारात येत असल्याचे लक्षात आले. चंगळवादी संस्कृती असे म्हणून या गोष्टीकडे नाक मुरडण्याचे दिवस संपले आहेत. विशेषतः धनिकांच्या बाळांसाठी सर्व प्रकारचा चंगळवाद अनिर्बंधपणे उधळला जात असताना आणि तो रोखण्याची शक्यता सोडाच, पण मानसिकताही दिसत नसताना अशा आक्षेपांना जनाधार मिळणे अवघड बनते आहे. समृद्धीच्या स्वप्नांनी गरिबांना ललकारले आहे आणि लाखात गाडी हा त्याच कल्पनेचा फुलोरा आहे.

मात्र हे सर्व मान्य करतानाच विवेक विचाराला सोडचिठ्ठी देण्याची गरज नाही. त्या स्वप्नांना विरोध न करता त्याबरोबरच येणाऱ्या कठोर वास्तवाचे भान तरी बाळगावयास हवेच ना? आज निवासस्थानाच्या किंमती आकाशाला भिडत आहेत स्वतःच्या निवासस्थानी गाडी उभी करण्यास जागा मिळणे सोपे नाही. वाहन घेऊन ज्या सार्वजनिक ठिकाणी जाणार, तेथे तर पार्किंग या कल्पनेचा पुरा बोजवारा वाजला आहे. मुंबई शहरात 15 लाख मोटारी धावतात, त्यांच्यासाठीची पार्किंगची व्यवस्था केवळ आठ हजार ठिकाणी आहे. ‘पे अँड पार्क’असे फलक असलेल्या जागा केवळ शंभराच्या आसपास आहेत, दर चौरस किलोमीटरमध्ये दिल्लीत 163 वाहने, आंतरराष्ट्रीय सरासरी 300 वाहनांची, तर मुंबईमध्ये दर चौरस किलोमीटरमध्ये 591 वाहने आहेत. स्वस्त आणि मस्त मोटारी यात भरच घालतील. आवश्यक तेवढे मोठे व दर्जेदार रस्ते नाहीत. वाहतुकीचे नियम पाळावेत आणि इतरांना आग्रहाने पाळावयास लावावेत ही मनोभूमिका अस्तित्वातच नाही. शंभर डॉलर प्रती बॅरल या आकाशाला भिडलेल्या इंधन दराचा प्रश्न ज्वलंतच आहे. यामुळे महाराष्ट्रातील महानगरांच्या रस्त्यावरून ‘नॅनो’धावू लागेल, याऐवजी चालू लागेल हेच वर्णन अधिक चपखल आहे. यामुळेच हे वाहन शहरात न आणता प्रामुख्याने जिल्हा, तालुका स्तरावर वितरित करण्याचे धोरण जाहीर झाले.प्रत्यक्षात काय घडते ते दिसेलच. सामान्य माणसाच्या सोईसाठी वेगवान स्वप्न, कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक आणि त्याबरोबरच सायकल चालवण्याचा व चालत जाण्याचा त्याचा हक्क परिणामकारकपणे मिळवून देणारी व्यवस्था हेच खरे उत्तर आहे. लाखाच्या स्वप्नाची दिशा नेमकी उलटी आहे.

आणखी एक बाब नोंदवावी वाटते. सामान्य माणसासाठी सुविधा द्यावयास टाटांनी केलेला तंत्रज्ञानाचा उपयोग, या सामाजिकतेचे कौतुक या लाखाच्या गाडीच्या निमित्ताने सर्व ठिकाणी वाचावयास मिळाले. त्यातील तथ्यांश मान्य करू. प्रश्न असा पडावयास, हवा की तंत्रज्ञान विकासाचे हे पाऊल टाटांनी सौरऊर्जा क्षेत्रात का उचलले नाही? टाटा उद्योगसमूहात हा विभाग आहे, ज्यामध्ये कोणतेही नवे संशोधन गेले कित्येक वर्षांत झालेले नाही. महाराष्ट्रात आजही तीस लाख कुटुंबांना वीज पोचलेली नाही. भारतात ही संख्या अनेक कोटींच्या घरात आहे. अन्न शिजवायला इंधन व रात्री गरजेपुरता प्रकाश या दोन गोष्टी जरी सौरऊर्जा तंत्रज्ञान परिणामकारक व स्वस्तपणे विकसित करून देता आल्या असत्या, तरी खऱ्या ग्रामीण गरीब माणसाला तंत्रज्ञानाद्वारे दिलासा मिळाला असता. ज्या जड वाहननिर्मितीत टाटा उद्योगसमूह आघाडीवर आहे, त्यातच सार्वजनिक वाहतुकीला कार्यक्षम परिमाण प्राप्त करून देणारी मोठी वाहने निर्माण झाली असती, तर ते आम-आदमीसाठी जास्त मोलाचे ठरले असते. असो, भांडवलदारांच्याबद्दल असा भाबडेपणा बाळगणे खरे नाही, पण ‘लाखात अशी देखणी’ याचे भरभरून कौतुक करताना या वास्तवाचे भान तरी विसरता कामा नये.

Tags: नॅनो मारुती रतन टाटा टाटा उद्योगसमूह उद्योग tata industries ratan tata tata nano weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके