Diwali_4 शंभर दिवसांच्या अखेरीस तिहेरी आव्हान
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

शंभर दिवसांच्या अखेरीस तिहेरी आव्हान

म्हणजे पहिल्यांदा टाळेबंदी जाहीर झाली आणि देशाचा गाडा ठप्प झाला त्याला शंभर दिवस पूर्ण होत असताना, तिहेरी आव्हान उभे ठाकले आहे. जगातल्या अन्य कोणत्याही देशापेक्षा भारतासमोरचे आव्हान कठीण आहे. त्यातही विशेष हे आहे की, तिन्ही आव्हानांबाबत कमालीची अनिश्चितता आहे. ही आव्हाने आणखी किती काळ राहणार, या आव्हानांचे परिणाम नेमके काय होणार आणि त्यावर मात करण्यासाठी नेमके काय करायला हवे, या तिन्ही प्रकारची ही अनिश्चितता आहे. कोरोना महामारी आणखी किती फैलवणार आहे आणि तिच्यापासून बचाव कसा करायचा, याबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अद्यापही ठोस असे काही सांगू शकत नाहीत, उपाययोजना देऊ शकत नाहीत. प्रत्येक स्तरावर विस्कटलेल्या अर्थकारणाने नेमके किती नुकसान केले आहे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे, याबाबत कोणतेही अर्थतज्ज्ञ ठोसपणे काही सांगायला तयार नाहीत. चीनने आता ही कुरापत का काढली आणि त्यांचे पुढचे इरादे काय आहेत, याबाबत परराष्ट्र धोरणातील मुत्सद्दी कोणतीही शक्यता ठामपणे व्यक्त करू शकत नाहीत.

डिसेंबर महिन्यात चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोनाच्या साथीने पुढील तीन महिन्यांत संपूर्ण जग पादाक्रांत केले. मार्चअखेर युरोप व अमेरिकेमध्ये हाहाकार माजवला. त्यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताने 25 मार्चपासून संपूर्ण देशात टाळेबंदी घोषित केली. ती टाळेबंदी तीन वेळा वाढवण्यात आली आणि मागील महिनाभरापासून मर्यादित प्रमाणात उठवण्यात आली. म्हणजे आता बरोबर शंभर दिवस झालेत आणि तरीही देशातील जनजीवन सुरळीत नाही. भारतात टाळेबंदी जाहीर केली तेव्हा, कोरोनाची लागण झालेली आहे असे देशभरात मिळून एक हजारपेक्षा कमी लोक होते, आता तो आकडा सात लाखांच्या जवळ गेला आहे. शंभराव्या दिवशीचा (24 तासांतील) तो आकडा 25 हजारांच्या जवळ आला आहे. भारतातील टाळेबंदीनंतर महिनाभर देशात व विदेशातही असे कौतुकवजा बोलले जात होते की, इतकी प्रचंड लोकसंख्या असूनही भारतात कोरोनाची लागण इतकी अत्यल्प कशी! मात्र त्याच वेळी असेही भाकीत केले जात होते की, हे सुखसमाधान जास्त दिवस टिकणार नाही. अखेरीस ते भाकीत खरे ठरले.

आता कोरोनाची सर्वाधिक लागण झालेल्या देशांमध्ये जागतिक क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आला आहे. पहिल्या क्रमांकावर असलेली अमेरिका व भारत यांच्या आकडेवारीत बरीच तफावत असली तरी, भारत लवकरच प्रथम क्रमांकावर जाणार हे शंभराव्या दिवसाचा आकडा सांगतो आहे. आता त्याबाबत समाधान आहे ते एवढेच की, कोरोनामुळे झालेल्या भारतातील मृत्यूंचे आकडे सुसह्य म्हणावेत असे आहेत. मात्र हे समाधानही किती काळ टिकणार याबाबत कोणालाच काही खात्रीने सांगता येत नाही.

कोरोनाचे आव्हान किती काळ ठाण मांडून राहणार आहे, हे कळावयास मार्ग नाही; कारण उतार तर सोडाच, पठार अवस्थेवरही ते आलेले नाही. परिणामी आर्थिक संकट अधिकाधिक उग्र रूप धारण करीत आहे. गेल्या महिन्यात बरीच पथ्ये पाळून व बरेच निर्बंध कायम ठेवून काही प्रमाणात जीवन-व्यवहार सुरू केले आहेत. पण बस, रेल्वे, विमान आणि खासगी वाहने या दळणवळणाच्या यंत्रणा अगदीच नावापुरत्या चालू आहेत. सरकारी कार्यालये व पोस्टल सेवा 10 टक्के कर्मचाऱ्यांसह धडपडत आहेत. शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे सुनसान अवस्थेत आहेत, तेथे ऑनलाईन धुगधुगी तेवढी चालू आहे. कारखाने अद्याप धडधडू लागलेले नाहीत. खासगी कार्यालये व लहान-मोठी सेवा, उद्योग नावापुरते चालू आहेत. बाजारपेठांमध्ये चैतन्य नाही. शेतीक्षेत्र तुलनेने बऱ्या अवस्थेत आहे, पण संपूर्ण जगाचा गाडाच रडतखडत चालू असल्याने तिथेही भयग्रस्तता आहेच. एकंदरीत काय तर देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे; देशातील शेती, उद्योग, सेवा ही तिन्ही क्षेत्रे जबरदस्त पिछेहाट अनुभवत आहेत;  प्रत्येक व्यक्ती, संस्था, उद्योग, व्यापार अडचणीत सापडले आहेत.

कोरोनाच्या साथीने आलेले आर्थिक संकट म्हणजे देशासमोर दुहेरी आव्हान आहे. मात्र हे सर्व कमी म्हणून की काय, भारताला आता तिसरे संकट खुणावत आहे...

भारताचा सर्वांत बलाढ्य शेजारी आणि सर्वांत धोकादायक शत्रू मानला जातो त्या चीनने हे संकट उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात भारताचे वीस सैनिक मारले जाणे, काही सैनिक जखमी होणे, काहींना पकडून ठेवून नंतर सोडणे, अशी म्हटली तर छोटी पण मानहानीकारक चकमक गेल्या महिन्यात झाली. भारताचा काही भूभाग चीनने बळकावला, अशा खऱ्या-खोट्या बातम्या येणे आणि सीमेवर सैन्याची जमवाजमव करणे, हे सर्व प्रकार क्रमाने वाढत गेले आहेत. त्यामुळे भारताच्या बाजूने चिनी कंपन्या व उद्योग-व्यापार यांच्यावर काही बंधने आणण्याचे प्रकार चालू आहेत. पंतप्रधानांनी सीमेवरील लडाख परिसरात दौरा केला आहे, काही सूचक विधाने केली आहेत. परिणामी युद्धसदृश्य वातावरणाची चाहूल लागली आहे. आगामी काही दिवसांत आणखी काही चकमकी किंवा छोटे का होईना युद्ध होऊ शकते, असा अंदाज प्रबळ होताना दिसत आहे.

म्हणजे पहिल्यांदा टाळेबंदी जाहीर झाली आणि देशाचा गाडा ठप्प झाला त्याला शंभर दिवस पूर्ण होत असताना, तिहेरी आव्हान उभे ठाकले आहे. जगातल्या अन्य कोणत्याही देशापेक्षा भारतासमोरचे आव्हान कठीण आहे. त्यातही विशेष हे आहे की, तिन्ही आव्हानांबाबत कमालीची अनिश्चितता आहे. ही आव्हाने आणखी किती काळ राहणार, या आव्हानांचे परिणाम नेमके काय होणार आणि त्यावर मात करण्यासाठी नेमके काय करायला हवे, या तिन्ही प्रकारची ही अनिश्चितता आहे. कोरोना महामारी आणखी किती फैलवणार आहे आणि तिच्यापासून बचाव कसा करायचा, याबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अद्यापही ठोस असे काही सांगू शकत नाहीत, उपाययोजना देऊ शकत नाहीत. प्रत्येक स्तरावर विस्कटलेल्या अर्थकारणाने नेमके किती नुकसान केले आहे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे, याबाबत कोणतेही अर्थतज्ज्ञ ठोसपणे काही सांगायला तयार नाहीत. चीनने आता ही कुरापत का काढली आणि त्यांचे पुढचे इरादे काय आहेत, याबाबत परराष्ट्र धोरणातील मुत्सद्दी कोणतीही शक्यता ठामपणे व्यक्त करू शकत नाहीत.

अशा अनिश्चिततेतून निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा सामना कसा करायचा हा प्रश्न देशातील संवेदनशील नागरिकांच्या पुढे उभा ठाकलेला आहे. व्यक्तींच्या स्तरावर मानसिक ताण वाढत आहे, अद्याप संघटित मनाचे उद्रेक होताना दिसत नाहीत. पण समाजमनात जोरदार घुसळण चालू आहे. त्यामुळे, धीर एकवटून कार्यरत राहणे भल्याभल्यांना कठीण जात आहे. अशा वेळी विचारांची व्याप्ती वाढवणे आणि मानवी आयुष्याची अपूर्णता समजून घेणे या दोन्ही आघाड्यांवर काम करायला हवे. जगाचा रहाटगाडा काही हजार वर्षे चालू आहे आणि प्रत्येक शतकात नैसर्गिक वा मानवनिर्मित संकटाने जगाला किंवा जगातील मोठ्या समूहाला वेठीस धरलेले आहे. त्या प्रत्येक वेळी जगाचा अंत जवळ आला आहे की काय, इथपर्यंत चर्चा झालेल्या आहेत. पण त्या सर्व प्रक्रियेतून पुढे जात मानवी संस्कृतीचा उत्कर्षच होत आला आहे. व्यक्तींच्या व संस्थांच्या बाबतीत जरा वेगळी स्थिती असते. अशा प्रत्येक संकटात काही व्यक्ती व काही संस्था, काही समूहदेखील नामशेष झाले आहेत. पण त्यांचेच प्रतिनिधित्व करणारे, त्यांचाच वारसा सांगणारे लोक, नवे जग घडवण्यात सहभागी राहिलेले आहेत. त्यामुळे मागून चालत आलेला वारसा काळजीपूर्वक सांभाळणे, त्यात प्रयत्नपूर्वक भर टाकणे आणि पुढच्या पिढीच्या हाती तो सोपवणे यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे, असे मनाला बजावत राहिले पाहिजे. ते जमले तर जीवनाची क्षणभंगुरता जाणवत नाही, कार्यरत राहण्यात अडचण येत नाही...!

Tags: संपादकीय विनोद शिरसाठ महामारी कोरोना three challenges covid 19 pandemic virus corona vinod shirsath editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात