डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दिलेले आश्वासन पाळले गेले नाही त्याची गोष्ट

तब्बल पाच महिन्यानंतर वाचकांना त्या काळातील छापील अंक पाहता आले. चारही विशेषांकाचे एकंदरीत स्वागतच झाले. त्यातही ‘विज्ञानाने मला काय दिले’ आणि ‘तीन संपादकांच्या मुलाखती’ यांचे अधिक स्वागत झाले. त्यांच्या संदर्भात काही टीका टिप्पणी वेगवेगळ्या कारणांनी झाली, पण त्यात काही विशेष नाही. तो नित्याचा भाग म्हणून सोडून देता आला. मात्र लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्यावरील अंकांच्या संदर्भात झालेली टीकाटिप्पणी विखारी होती. अर्थात ती लिखित किंवा जाहीर म्हणावी अशी कमी होती. पण सोशल मीडिया व खासगीतील सूर नाराजीचे वा आक्षेपाचे होते. अर्थातच तो प्रकारही कोणत्याही संपादकाला अनपेक्षित वा धक्कादायक नसतो.

1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन झाले आणि त्याच दिवशी अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. गेल्या वर्षी म्हणजे 1 ऑगस्ट 2020 रोजी लोकमान्यांचा मृत्यू झाला त्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आणि अण्णा भाऊ यांचा जन्म झाला त्या घटनेलाही शंभर वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्राच्या संदर्भात हे दोघेही महापुरुष ठरले. एक अगदी उच्च समजल्या जाणाऱ्या जातीत जन्माला आला, दुसरा अगदीच तळाच्या समजल्या जाणाऱ्या जातीत जन्माला आला. एकाची जात अशी होती की, जिथले प्रस्थापित लोक उर्वरित सर्व जातीसमूहांना तुच्छ लेखत आले होते, दुसऱ्याची जात अशी होती की, तिला उर्वरित सर्व जातीसमूह तुच्छ लेखत आले होते. एकाचे बालपण राज्याची सांस्कृतिक राजधानी मानली जाणाऱ्या शहरात गेले, दुसऱ्याचे बालपण सर्व प्रकारचे दुर्भिक्ष्य असलेल्या खेड्यात गेले. एकाला त्याच्या काळातील सर्वोच्च मानले जाणारे इंग्रजी शिक्षण मिळाले, दुसऱ्याच्या वाट्याला प्राथमिक शाळाही आली नाही. एकाच्या पित्याने इतकी आर्थिक तरतूद करून ठेवली होती की, त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण विनासायास होणार होते, दुसऱ्याला लहानपणापासून कुटुंबासाठी काबाडकष्ट करावे लागल्यामुळे शिक्षण मिळाले नाही. आणि तरीही त्या दोघांनी ‘महाराष्ट्राचे मानदंड’ असे आपले स्थान निर्माण केले.

साहजिकच, एकाची मृत्यूशताब्दी आणि दुसऱ्याची जन्मशताब्दी आली, तेव्हा दोघांवरही विशेषांक काढले पाहिजेत असे आम्हाला वाटले. पण 1 ऑगस्ट 2020 हा दिवस आला तेव्हा, संपूर्ण देशात कोरोना संकट असल्याने जनजीवन नावापुरतेच चालू होते, चार महिने आधीपासून अन्य व्यवहार जवळपास ठप्प होते. माध्यम जगतात ऑनलाईनचा तेवढा बोलबाला होता. वृत्तपत्रे थोड्या छापील प्रतींसह निघत होती. पण नियतकालिके छापली जाऊ शकत नव्हती, छापली तरी वितरित होऊ शकत नव्हती, कारण स्टॉलविक्री बंद होती, पोस्टखाते अंक स्वीकारीत नव्हते.

परिणामी, एप्रिल ते जुलै या चार महिन्यांतील साधना साप्ताहिकाचे अंक फक्त ऑनलाईन प्रकाशित केले होते. ते अंक वर्गणीदार असलेल्या व नसलेल्या अशा सर्व वाचकांना इ-मेल व व्हॉट्‌सॲपद्वारे विनामूल्य पाठवले जात होते, त्या-त्या आठवड्यात वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जात होते. मात्र अनेकांना ऑनलाईन अंक वाचणे सोयीचे जात नव्हते, कटकटीचे वाटत होते. जे लोक वाचत होते त्यांची अवस्था दुधाची तहान ताकावर भागवणे, अशी होती. मात्र लॉकडाऊन हळूहळू उठवण्यास प्रारंभ झाला होता आणि पोस्टाचे व्यवहार कमी क्षमतेने पण सुरू होण्याचे संकेत मिळत होते. या सर्वांचा एकत्रित विचार करून आणि कोविड-19 वरील लेख/वृत्तांत वाचून लोकांना कंटाळा आला आहे (त्या विषयावरील लेखांची लिंक आत काय आहे हे न पाहताच डिलीट करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे), हे लक्षात घेऊन आम्ही ठरवले... ऑगस्ट महिन्याचे चारही अंक वेगवेगळ्या विषयांवरील विशेषांक करायचे. वाचकांना त्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी किंचित हातभार लावायचा. आणि पुढील महिन्यात पोस्टाने अंक स्वीकारायला सुरुवात केली तर हे चारही विशेषांक सर्व वर्गणीदार वाचकांना पाठवून पुन्हा नव्याने जोरदार सुरुवात करायची.

आणि मग ऑगस्ट महिन्यातील चार अंक चार विषयांवरील विशेषांक ठरवले. 1 ऑगस्ट : लोकमान्य टिळक स्मृती अंक, 8 ऑगस्ट : अण्णा भाऊ साठे स्मृती अंक, 15 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिन व साधनाचा वर्धापनदिन अंक (एन. राम, शेखर गुप्ता, नरेश फर्नांडिस या इंग्रजीतील तीन संपादकांच्या मुलाखती) आणि 22 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती अंक (विज्ञानाने मला काय दिले?). ते सर्व अंक त्या-त्या आठवड्यात काढले आणि ऑनलाईन सर्वदूर पोहोचवले. चौथा अंक प्रकाशित झाला आणि नेमके त्याचवेळी पोस्टखात्याने कळवले, छापील अंक वितरित करण्यासाठी आम्ही आता तयार आहोत. त्यामुळे आपला आडाखा बरोबर ठरला, या आनंदात आम्ही पोस्टखात्याकडे सर्व चौकशी करून, प्रिंटींग प्रेसबरोबर चर्चा करून, नियोजन जाहीर केले : 1 सप्टेंबर पासूनचे छापील अंक सर्व वर्गणीदार वाचकांना पोस्टाद्वारे पाठवायला सुरू करीत आहोत, त्याआधी ऑगस्टमधील चारही विशेषांक सर्व वर्गणीदार वाचकांना एकाच दिवशी पाठवले जातील. आणि एप्रिल ते जुलै या चार महिन्यांचे  छापील अंक ज्यांना हवेत त्यांना ते  चार-चारच्या गठ्ठ्याने पुढील तीन आठवड्यांत पाठवले जातील, ज्यांना ते अंक नको असतील त्यांची चार महिन्यांची वर्गणी पुढे ढकलली जाईल.

त्याप्रमाणे साधनाच्या कार्यालयीन सहकाऱ्यांनी नियोजन केले आणि सप्टेंबरमधील तीनच आठवड्यांत कार्यवाही घडवून आणली. ऑगस्टचे चारही विशेष अंक एकाच वेळी सर्व सहा हजार वर्गणीदार वाचकांना पाठवले. त्यानंतर तीन तीन दिवसांच्या अंतराने आधीच्या चार महिन्यांचे अंक (ज्या दोन हजार वर्गणीदारांनी मागणी केली त्यांना) पाठवण्यात आले. परिणामी त्या सप्टेंबर महिन्यात, एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांतील 25 अंकांच्या मिळून 82 हजार प्रती छापून घेऊन योग्य प्रकारे वितरित केल्या गेल्या. त्या वेळी सर्व प्रकारच्या नियोजनाचा व कार्यक्षमतेचा कस लागला. पण अखेरीस, सुटकेचा श्वास घेता आला. तब्बल पाच महिन्यानंतर वाचकांना त्या काळातील छापील अंक पाहता आले. चारही विशेषांकाचे एकंदरीत स्वागतच झाले. त्यातही ‘विज्ञानाने मला काय दिले’ आणि ‘तीन संपादकांच्या मुलाखती’ यांचे अधिक स्वागत झाले. त्यांच्या संदर्भात काही टीका टिप्पणी वेगवेगळ्या कारणांनी झाली, पण त्यात काही विशेष नाही. तो नित्याचा भाग म्हणून सोडून देता आला. मात्र लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्यावरील अंकांच्या संदर्भात झालेली टीकाटिप्पणी विखारी होती. अर्थात ती लिखित किंवा जाहीर म्हणावी अशी कमी होती. पण सोशल मीडिया व खासगीतील सूर नाराजीचे वा आक्षेपाचे होते. अर्थातच तो प्रकारही कोणत्याही संपादकाला अनपेक्षित वा धक्कादायक नसतो.

मात्र त्या दोन अंकांच्या संदर्भात अगदीच अनपेक्षित व धक्कादायक अशा काही प्रतिक्रिया आल्या. उदाहरणार्थ- ‘1 ऑगस्ट टिळक आणि 8 ऑगस्ट अण्णा भाऊ अशा तारखांना अंक काढले तर तुझ्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो, आधी टिळकांचा का आणि अण्णा भाऊंचा नंतर का, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो,’ असा सावधगिरीचा इशारा एका मोठ्या व ज्येष्ठ संपादकांनी गमतीने दिला- तेव्हा आम्ही हसून ते सोडून दिले. असा मूर्खपणाचा प्रश्न कोण कशाला विचारील असे वाटले. पण आश्चर्य म्हणजे तसा प्रश्न विचारणारे काही महाभाग भेटले. ‘एकाच तारखेला साप्ताहिकाचे दोन अंक काढता येत नाहीत,  टिळक आधी जन्माला आले आणि अण्णा भाऊ नंतर जन्माला आले म्हणून तसे केले’ असे उत्तर दिले तरी त्यांचे समाधान झालेले दिसले नाही. (अर्थात ते दोन्ही अंक छापून 1 ऑगस्टला वितरित केले होते हे त्यांना सांगत बसलो नाही). हे सर्व कमी म्हणून की काय, आणखी धक्कादायक म्हणाव्यात अशा दोन कॉमेंट प्राध्यापक/प्राचार्य असलेल्यांकडून आल्या. 1. साधनाला अण्णा भाऊ यांच्यावर अंक काढायचाच नव्हता, टिळकांच्यावर काढायचा होता; पण अण्णा भाऊंची शताब्दी आली, म्हणून त्यांचा नाईलाज झाला असावा. 2. जे नियतकालिक टिळकांच्यावर अंक काढते, त्याला अण्णा भाऊ यांच्यावर अंक काढायचा अधिकार नाही.

वरील दोन प्रतिक्रिया प्रातिनिधिक म्हणून दिल्या आहेत, या आशयाच्या जवळ जाणाऱ्या आणखी काही प्रतिक्रिया उमटत होत्या, त्यांचा गाजावाजा फार झाला नाही एवढेच. एकंदरीत टिळकांच्या संदर्भात तीव्र नापसंती असणाऱ्या लोकांनी, टिळकांचे जे काही कर्तृत्व असेल ते मातीमोल ठरवले होते. अशा प्रतिक्रिया लिखित स्वरूपात साधनाकडे आल्या नाहीत ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब होती.

दुसऱ्या बाजूला, अण्णा भाऊ यांच्या अंकाबाबत सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया अपवादानेही दिसल्या नाहीत, तो अंक का काढला असा नाराजीचा प्रश्नही कोणी विचारला नाही. ‘पण तो अंक आपल्यासाठी नाही’ असा सूर आम्हाला कळत-नकळत ऐकू येत होता. आणि अखेर धक्कादायक घटना कानावर आलीच. ज्या आठवड्यात ते चार विशेषांक एकाच पॅकींगमध्ये सर्व वर्गणीदाराना पाठवले, त्याच आठवड्यात कोल्हापूरच्या के.डी. मिस्त्री या वाचकाचा फोन आला. ते चार-पाच दिवस प्रयत्न करीत होते, पण फोन लागत नव्हता. अखेर लागला तेव्हा म्हणाले, ‘तुम्ही अण्णा भाऊ साठे अंकाच्या संपादकीयात सर्वांत महत्त्वाचे एक विधान केले आहे, त्यातून हा अंक कोणासाठी काढलाय हे सांगितले आहे. ज्यांनी कधीही अण्णा भाऊ वाचले नाहीत, अण्णा भाऊ ज्या समाजात वावरले तो समाज ज्यांना माहीत नाही, त्यांच्यासाठी हा अंक आहे.’ त्यापुढे मिस्त्री म्हणाले, ‘पण आमच्या कार्यालयात हे चार विशेषांक एका गठ्ठ्यात आले तेव्हा, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यातील तीन अंक स्वतःकडे ठेवून घेतले आणि अण्णा भाऊ यांचा अंक माझ्याकडे फेकत म्हणाले, हा घ्या तुमचा अंक...’

वरील प्रसंग सांगताना, के. डी. मिस्त्री यांना भरून आले होते, साने गुरुजींच्या साधनाविषयी कृतज्ञता वाटत होती आणि झालेल्या अपमानाची सल बोचत होती. बोलणे संपवताना ते म्हणाले, ‘चार-पाच दिवस फोन लावण्याचा प्रयत्न करीत होतो, सांगितल्याशिवाय राहवत नव्हते. आता मला हलके वाटत आहे.’ अशा संवादाच्या वेळी सांत्वन कसे करावे हा एक प्रश्नच होता, कारण अशा प्रकारचे अनेक अपमान त्यांनी त्यांच्या आयुष्यात झेलले असतील याची तीव्र जाणीव क्षणात झाली. त्यामुळे फोन ठेवताना त्यांना म्हणालो, ‘हो, ज्यांनी अण्णा भाऊ वाचलेले नाहीत, त्यांच्यासाठीच हा अंक होता. पण हे एवढे पुरेसे नाही, अजून खूप मजल मारणे बाकी आहे, असा याचा अर्थ आहे. पुढील वर्षीच्या 1 ऑगस्टला टिळकांच्यावर अंक काढण्याची गरज नाही, पण अण्णा भाऊ यांच्यावर आणखी एक विशेषांक काढायची गरज आहे. तसेही या अंकात अण्णा भाऊंच्या विविधांगी कर्तृत्वाचा वेध घेतला आहे. पण अण्णा भाऊंची एकही कथा वा कादंबरीचा अंश या अंकात घेतलेला नाही. आणि त्यांनी तर 31 कादंबऱ्या व 21 कथासंग्रह (साधारणतः 200 कथा) लिहिल्या आहेत. त्यातून त्यांनी ज्या समाजघटकांचे दर्शन घडवले आहे, ते समाजघटक आजही अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या स्थितीगतीत आजही मोठा फरक झालेला नाही. त्यामुळे पुढील अंक पुनर्भेट अण्णा भाऊंची या विषयावर काढू.’

वरील आश्वासन एका वाचकाला खासगी संभाषणात दिले होते, त्याबद्दल साधनाच्या तीन-चार सहकाऱ्यांकडे तेवढी वाच्यता केली होती. मात्र अण्णा भाऊ यांच्यावर 1 ऑगस्ट 2021 चा अंक काढायचा हे मनोमन ठरवले होते. पण तो अंक काढता आला नाही. या वर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात वसंत बापट, ग. प्र. प्रधान व डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक आलेत म्हणून तो अंक काढला नाही, असे के.डी.मिस्त्री यांना वाटेल, पण ते खरे कारण नाही. अडचण अशी की- तो अंक काढण्यासाठी अण्णा भाऊंच्या  जास्तीत जास्त  कथा आणि काही कादंबऱ्या वाचण्यासाठी आवश्यक तितका वेळ आम्हाला मिळू शकला नाही. एखादे सूत्र घेऊन काही कथा व काही कादंबऱ्यांतील काही अंश निवडून तो विशेषांक सादर करायचा होता. त्यासाठी जास्तीचा वेळ आवश्यक होता. म्हणून के. डी.मिस्त्री यांना दिलेले आश्वासन पाळता आलेले नाही. पण त्याचा जाहीर उच्चार तरी करायला हवा असे वाटले, म्हणून एकूणच गोष्ट संदर्भासह सांगितली. (चार महिन्यांपूर्वी के.डी.मिस्त्री यांना विचारले होते- विशेषांकाच्या संपादकीयात त्या घटनेचा उल्लेख करताना तुमचे नाव टाकू का, तेव्हा ते म्हणाले होते- ‘जरूर’).

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके