डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या पुस्तकावर तरी गाईड काढू नका रे!

‘तीन मुलांचे चार दिवस’ हे पुस्तक अभ्यासक्रमाला लागल्याचे जाहीर झाले, त्या दिवशी विविध ठिकाणच्या प्राध्यापकांनी आम्हांला फोन करून आनंद व्यक्त केला, एक अप्रतिम पुस्तक अभ्यासक्रमास आले म्हणून. पाच वर्षांपूर्वी टी.वाय.बी.ए.च्या तीन मुलांनी लिहिलेले हे पुस्तक टी.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमाला लागले याचाही तो आनंद होता. मात्र त्या सर्वच प्राध्यापकांनी संवादाच्या अखेरीस एक चिंताही व्यक्त केली. ती अशी की, फार कमी विद्यार्थी व प्राध्यापक मूळ पुस्तक वाचतील, त्याचा अभ्यास करतील, बहुतांश प्राध्यापक व विद्यार्थी गाईडवरच आपली गुजराण करतील. आणि विक्रेत्यांकडे व ग्रंथालयात मूळ पुस्तक जाण्याआधीच त्यावरील गाईड्‌स व नोट्‌स त्या ठिकाणी पोहोचलेल्या असतील. त्यामुळे आमच्या त्या संवादाच्या अखेरीस त्या प्राध्यापकांचा उत्साह कमी झालेला दिसत होता. त्या सर्वांच्या मनात असलेले, पण (उपयोग होणार नाही म्हणून) न उच्चारलेले वाक्य होते, ‘या पुस्तकावर तरी गाईड काढू नका रे!’

15 ऑगस्ट 2016 चा अंक साधना साप्ताहिकाने ‘तीन मुलांचे चार दिवस’ या विषयावर काढलेला विशेषांक होता. पुणे येथील तीन तरुणांनी गडचिरोली व छत्तीसगड या प्रदेशांतील आदिवासी भागांत केलेल्या सायकलप्रवासाचे अनुभवकथन असा तो अंक होता. आदर्श पाटील, विकास वाळके आणि श्रीकृष्ण शेवाळे हीच ती मुले. त्यातील दोघे टी.वाय.बी.ए.चे शिक्षण घेत होते, तिसऱ्याचे ते नुकतेच पूर्ण झाले होते. ‘माणूस समजून घेण्यासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी’ अशी थीम घेऊन नऊशे किलोमीटर सायकल प्रवास त्यांच्या नियोजनात होता. या प्रवासात कमीत कमी वस्तू बरोबर ठेवायच्या आणि आदिवासी पाड्यांवर व वस्त्यांवरच मुक्काम करायचा, त्यांच्याशी संवाद करायचा, त्यांचे जीवन त्यांची भाषा, त्यांची संस्कृती यांच्याशी ओळख करून घ्यायची अशी ती सफर होती. त्यामुळे पुणे ते नागपूर हा प्रवास त्यांनी (सायकली टपावर टाकून) एसटी बसने केला. तिथून पुढे ठरवलेल्या मार्गाने सायकल प्रवास. पण ते जसजसे पुढे जाऊ लागले तसतसे त्या दुर्गम समजल्या जाणाऱ्या प्रदेशांबाबत सावधगिरीचे इशारे त्यांना मिळू लागले. तो डेंजर झोन आहे, नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेला प्रदेश आहे, तिकडे हिंसाचार नेहमीच होत असतो, तिकडे जाल तर अडचणीत याल, आयुष्याची जोखीम कशाला घेत आहात, असे ते इशारे होते. ते देणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य माणसे होती, तसेच वाटेत येणारे सुरक्षारक्षकही होते आणि सामाजिक क्षेत्रातील काही कार्यकर्तेही होते. पण या तीन तरुणांचा निश्चय पक्का राहिला आणि ते पुढे-पुढे जात राहिले. तो प्रदेश, ती माणसे, ते समाजजीवन यांचा अनुभव घेत राहिले. मात्र एका पाड्यावर त्यांची विचारपूस झाली. कुठून आलात, कशासाठी, कुठे चाललात इत्यादी...  त्यांच्याविषयी थोडा संशय निर्माण झाला. मग त्यांना थांबायला सांगण्यात आले. बाहेर निरोप देण्यात आला. मग आणखी चौकशी करण्यासाठी पुढच्या पाड्यावर पाठवण्यात आले. मग पुन्हा चौकशी आणि आणखी पुढच्या पाड्यावर, असे ते चार दिवस गेले. पोलिस किंवा पोलिसांचे खबरे नाहीत, अशी खात्री पटल्यावर त्यांना सोडून देण्यात आले.

दरम्यान महाराष्ट्रातील गडचिरोली परिसरातील मित्रांशी व कुटुंबीयांशी असलेला त्यांचा दूरध्वनी संपर्क तुटला होता. मेल, मेसेज थांबले होते. मग ‘ही तीन मुले हरवली’ इथपासून ‘नक्षलवाद्यानी त्यांचे अपहरण केले असावे,’ अशा बातम्या वृत्तपत्रांतून व दूरचित्रवाणीवर झळकल्या. शोधाशोध सुरू झाली. महाराष्ट्र व छत्तीसगड पोलीस कामाला लागले. काहीशी सनसनाटी निर्माण झाली. मात्र चार दिवसानंतर ते सापडले अशा बातम्या आल्या. त्यांना केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरमध्ये बसवून रायपूरला (छत्तीसगडची राजधानी) हलवले, तिथे यांच्याकडून सर्व वृत्तांत समजून घेतला आणि मग नागपूरला पाठवण्यात आले, तिथून पुण्याला रवानगी करण्यात आली.

तर त्यांच्या त्या चार दिवसांची डायरी आणि त्या मोहिमेच्या मागची-पुढची पार्श्वभूमी असा दीर्घ लेख आदर्शने लिहिला होता.  सुभाष वारे यांच्यामार्फत तो साधना साप्ताहिकाकडे आला. त्यातील परिपक्वता व ताकद लक्षात घेऊन विकास व श्रीकृष्ण यांनाही त्या प्रवासाचे आपापले अनुभव शब्दबद्ध करा असे सांगितले. त्यांचेही दीर्घ लेख आले. एकाच प्रवासातले तिघांचे लेख. घटना व प्रसंग यांचे साम्य असणार होतेच, पण त्या-त्या प्रसंगांना सामोरे जातानाचा प्रतिसाद आणि तिघांचे मानस यात काही साम्य व काही फरक असा तो प्रकार होता. त्यामुळे तिन्ही लेख कमालीचे वाचनीय झाले होते. त्यांनी पूर्वी फारसे काही लिहिलेले नव्हते, पण हा प्रत्यक्ष जगलेला व मुरलेला अनुभव होता, त्यामुळे खूपच जिवंत पद्धतीने ते लेख कागदावर उतरले होते. शिवाय त्या प्रवासातली भरपूर रंगीत छायाचित्रे त्यांनी काढली होती. त्यामुळे त्या तीन दीर्घ लेखांचा विशेषांक काढला. तब्बल शंभर पानांचा, पूर्ण बहुरंगी. साधनाच्या इतिहासातला सर्वांत मोठा विशेषांक. त्याचे प्रकाशन पुणे येथील एस.एम.जोशी फाऊंडेशनच्या सभागृहात झाले. सुभाष वारे अध्यक्ष आणि मिलिंद बोकील प्रमुख पाहुणे. त्याच कार्यक्रमात शोधयात्री राजा शिरगुप्पे यांनी या तीन मुलांची मुलाखत घेतली. (राजा शिरगुप्पे यांनी साधनासाठी महाराष्ट्र, बिहार व ईशान्य भारत अशा तीन मोठ्या शोधयात्रा केल्या आहेत.)

त्या विशेषांकाच्या आठ हजार प्रती काढल्या होत्या, पुढील आठवडाभरात त्या संपल्या. सर्व स्तरांतून प्रचंड स्वागत झाले. अनेक प्रतिक्रिया आल्या. एक प्रतिक्रिया तर काही डॉक्टरांची होती, एक मोठे व गुंतागुंतीचे ऑपरेशन चालू असताना मधल्या वेळेत त्यांनी तो अंक कसा वाचला, हे सांगणारे तपशील आणि तिथली छायाचित्रे त्यांनी या मुलांना मेलद्वारे पाठवली होती. हा अंक इंग्रजी व अन्य भाषांमध्ये जायला हवा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. या अंकावर सिनेमा काढायला हवा अशीही सूचना काहींनी केली. साहजिकच, या अंकाचे पुस्तक आणावे लागणार होते. मग फार वेळ न दवडता पुढील चारच महिन्यांनी तसेच आकर्षक पुस्तक साधना प्रकाशनाच्या वतीने काढले. त्याचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाले. विद्यापीठाचा मराठी विभाग व विद्यार्थी कल्याण मंडळ यांनी तो कार्यक्रम आयोजित केला. मनोहर जाधव व प्रभाकर देसाई या प्राध्यापकांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. तत्कालीन कुलगुरु वासुदेव गाडे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन आणि अतुल पेठे व मिलिंद बोकील प्रमुख पाहुणे होते. बोकील यांना पुन्हा बोलावण्याचे कारण, त्यांनी ‘भारतातील आदिवासी समाज’ या विषयावर भाषण करावे अशी अनेकांची इच्छा होती. त्या कार्यक्रमाला व पुस्तकालाही जोरदार प्रतिसाद मिळाला. पाच वर्षे झाली त्या सर्व घटनाक्रमाला.

आणि आता (गेल्या आठवड्यात) बातमी आली आहे- ‘तीन मुलांचे चार दिवस’ हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात टी.वाय.बी.ए.च्या मराठी भाषा विषय अभ्यासक्रमाला प्रथम सत्रासाठी लावले आहे. या विद्यापीठात पुणे, नाशिक व अहमदनगर हे तीन मोठे जिल्हे येतात. त्यामध्ये मिळून 360 महाविद्यालये आहेत, जिथे हे पुस्तक अभ्यासक्रमाला असेल. म्हणजे एका एका वर्षी पाच-सात हजार विद्यार्थी. पुढील पाच वर्षे हे पुस्तक अभ्यासक्रमात असेल. कदाचित त्यानंतर अन्य एखाद्या विद्यापीठात ते अभ्यासक्रमाला लावले जाईल. ‘तीन मुलांचे चार दिवस’ या अंकाच्या प्रकाशन समारंभात मिलिंद बोकील म्हणाले होते, ‘आपली विद्यापीठे संकुचित आहेत, अन्यथा या मुलांना एवढ्या एका कामासाठी/लेखनासाठी एम.ए. किंवा एम.फील पदवी प्रदान करायला हवी.’ शब्दशः तसे काही झाले नसले तरी, वेगळ्या अर्थाने त्यांच्या अपेक्षेपेक्षा बरेच जास्त घडले आहे, असे आता म्हणता येईल. हे पुस्तक अभ्यासक्रमासाठी लावताना अभ्यासक्रम निवड मंडळाच्या सदस्यांनी तसा संकुचितपणा दाखवलेला नाही. किंबहुना आऊट ऑफ बॉक्स जाऊन विचार केलेला आहे, ही विशेष आनंदाची बाब आहे.

अर्थात, एखादे पुस्तक अभ्यासक्रमाला लागणे ही काही आता विशेष कौतुकाची व प्रतिष्ठेची बाब राहिलेली नाही. किंबहुना अभ्यासक्रमाला एखादे पुस्तक लागले तर काही लोक त्याकडे संशयाने पाहू लागतात. याचे एक कारण, एखाद्या लेखकाचे किंवा एखाद्या प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासक्रमाला लावण्यासाठी काही जण किती प्रकारच्या (गैर)खटपटी करतात हे सर्वपरिचित आहे. दुसरे कारण, अभ्यासक्रमाला लावण्यासाठी जी संपादित पुस्तके तयार केली जातात, त्यातील अनेक पुस्तकांचा दर्जा अगदीच सामान्य/कधी कधी सुमार असतो. तिसरे कारण, विद्यार्थी व प्राध्यापक आता अभ्यासक्रमाला लागलेल्या पुस्तकांकडे विशेष प्रेमाने पाहत नाहीत. आणि चौथे कारण असे की, अभ्यासक्रमाला लागलेले पुस्तक खूपच कमी विद्यार्थ्यांकडून वाचले जाते. त्या पुस्तकावरील गाईडस किंवा नोट्‌स यांच्या आधारावरच अभ्यास(?) केला जातो. ‘फक्त परीक्षेसाठी’ अशा पद्धतीने त्याकडे प्रामुख्याने पाहिले जाते. परिणामी महाराष्ट्रातील (आणि अर्थातच देशातील अनेक राज्यांतही) गाईडसंस्कृती फोफावली आहे, कला (आट्‌र्स) शाखेतील सर्व विषयांच्या बाबतीत तर त्याला कमालीचे हिणकस रूप आले आहे. त्यातून सुमार दर्जाचे शिक्षण(?) देणे चालू आहे. किंबहुना विद्यार्थी वाचतात, परीक्षा देतात, उत्तीर्ण होतात, प्रमाणपत्रे मिरवतात. पण त्यातून विद्या मिळालेली असतेच असे नाही, शिक्षण हरवलेले असते. त्यामुळे शिक्षणाचा मूळ हेतू माणसाला सुसंगत व कृतिशील विचार करायला शिकवणे, हा गायब झाल्याचा अनुभव अनेक ठिकाणी घ्यावा लागतो.

आपल्या एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये अनेक दोष असले आणि त्याला अनेक अपरिहार्य कारणे असली तरी, त्याच्या उपयोजनात किंवा कार्यवाहीत असलेला सर्वात मोठा दोष म्हणजे गाईडसंस्कृती! खरे तर संस्कृती हा शब्द वापरणे इथे योग्य ठरत नाही, पण विकृती हा शब्द जरा जास्त कठोर व निर्दयी होईल. शिवाय, गाईड म्हणजे मार्गदर्शक हा अर्थ खूपच चांगला आहे, पण त्याची अर्थच्छटा पार बिघडून गेली आहे. कारण रेडिमेड उत्तरे देणारे ते गाईड कसे असू शकते? उत्तरांच्या दिशा शोधण्यास मदत करणारे ते गाईड असा मूळचा अर्थ आहे. मात्र अभ्यासक्रमाला असलेल्या पुस्तकावर तयार प्रश्न व तयार उत्तरे देणारे पुस्तक म्हणजे गाईड, असा अर्थ आता सर्वत्र रुजला आहे. मुला-मुलींच्या माथ्यावर ते तिसरी-चौथीत असताना मारले जाते आणि पदवी-पदव्युत्तर वाटचालीपर्यंत ते तशीच वाटचाल करतात. वस्तुतः प्रश्न पडायला लागणे आणि मग उत्तरांचा शोध घेणे हे शिक्षणप्रक्रियेत अभिप्रेत आहे. पण गाईडमुळे प्रश्न रेडिमेड आणि उत्तरेही!

अशी गाईड काढण्याची व वापरण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात तरी 1970 च्या दशकात खऱ्या अर्थाने उदयाला आली असे सांगितले जाते. म्हणजे मागील पन्नास वर्षे तो सिलसिला चालू आहे. याचा अर्थ शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण ही प्रक्रिया अधिक गतिमान व्हायला लागली आणि त्याचबरोबर गाईड्‌स तयार व्हायला लागली, वापरली जायला लागली. हे खरे आहे की, सुरुवातीच्या त्या काळात चांगले शिक्षक पुरेसे नाहीत, त्यांना प्रशिक्षण देण्याला अनेक मर्यादा होत्या आणि शाळा महाविद्यालयांत दाखल होणारी मुले-मुली अशा वातावरणातून आलेली की, जिथे आधुनिक मानले जाते त्या शिक्षणाची पार्श्वभूमी नाही. वरील तिहेरी अडचणीमुळे गाईड्‌स आली आणि त्यांनी काही एक प्रमाणात औपचारिक शिक्षणाचा विस्तार करण्यास हातभार लावला. पण त्याचा अतिरेक इतका वाढत गेला की, मूळ पाठ्यपुस्तक पडले बाजूला आणि गाईड्‌स आली मध्यवर्ती. आणि मग शिक्षकांनी कष्ट घेण्यास नकार द्यायला सुरुवात केली, विद्यार्थ्यांना डोके खाजवत बसण्यात मजा वाटेनाशी झाली, मुलांनी पास होणे व अधिकाधिक गुण मिळवणे यातच पालकांना रस वाटू लागला... आणि किती मुलांना शिक्षण दिले जाते आहे, या आकडेवारीवारीलाच तेवढे महत्त्व सरकार-दरबारी मिळू लागले. या सर्व प्रक्रियेचा गैरफायदा गाईड्‌स निर्मितीच्या क्षेत्रातील घटकांनी उचलायला सुरुवात केली. त्यात जास्तीचे स्मार्ट समजले जाणारे शिक्षक-प्राध्यापक आले, प्राचार्य-संस्थाचालक आले, ग्रंथपाल व पुस्तके विक्रेते आले. यातूनच काही ठिकाणी तर अनिष्ठ साखळी घट्ट होऊ लागली. पुढे-पुढे तर त्या सर्व घटकांमध्ये इतक्या अपप्रवृत्ती बोकाळल्या की, त्यांच्या सुरस व चमत्कारिक कथा ऐकायला मिळू लागल्या. साहजिकच अनेक ठिकाणच्या शिक्षणप्रक्रियेवरचा विश्वासच उडून जाऊ लागला.

असो. हा खूप मोठा व गहन गंभीर विषय आहे. इथे त्याला स्पर्श करण्यास ‘तीन मुलांचे चार दिवस’ कारणीभूत ठरले आहे. हे पुस्तक अभ्यासक्रमाला लागल्याचे जाहीर झाले, त्या दिवशी विविध ठिकाणच्या प्राध्यापकांनी आम्हांला फोन करून आनंद व्यक्त केला, एक अप्रतिम पुस्तक अभ्यासक्रमास आले म्हणून. पाच वर्षांपूर्वी टी.वाय.बी.ए.च्या तीन मुलांनी लिहिलेले हे पुस्तक टी.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमाला लागले याचाही तो आनंद होता. मात्र त्या सर्वच प्राध्यापकांनी संवादाच्या अखेरीस एक चिंताही व्यक्त केली. ती अशी की, फार कमी विद्यार्थी व प्राध्यापक मूळ पुस्तक वाचतील, त्याचा अभ्यास करतील, बहुतांश प्राध्यापक व विद्यार्थी गाईडवरच आपली गुजराण करतील. आणि विक्रेत्यांकडे व ग्रंथालयात मूळ पुस्तक जाण्याआधीच त्यावरील गाईड्‌स व नोट्‌स त्या ठिकाणी पोहोचलेल्या असतील. त्यामुळे आमच्या त्या संवादाच्या अखेरीस त्या प्राध्यापकांचा उत्साह कमी झालेला दिसत होता. त्या सर्वांच्या मनात असलेले, पण (उपयोग होणार नाही म्हणून) न उच्चारलेले वाक्य होते, ‘या पुस्तकावर तरी गाईड काढू नका रे!’

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके