डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वरील तीन लेख वाचून झाल्यावर त्यांच्यामधील आंतरिक सूत्र तर कोणाही वाचकाच्या लक्षात येईलच, पण तिपाई विशेषांक का म्हटले आहे त्याचाही काही अंशी बोध होईल. मात्र येथे हे स्पष्ट केले पाहिजे की, ‘विंदांच्या कवितेतील त्रिपदी’ या लेखात आनंद करंदीकरांनी ‘तिपाई’ या स्ट्रक्चरविषयी नेमकेपणाने सांगितले आहे : कोणतेही स्ट्रक्चर दोन पायांवर उभे राहू शकत नाही; खडबडीत पृष्ठभागावर चारपायी डळमळते, तिपाई मात्र स्थिर राहते. याच एका मर्यादित अर्थाने, या विशेषांकातील तीन लेख सारासार विचार करणाऱ्या वाचकमनाला स्थिर करतील, असा विश्वास वाटतो.

दरवर्षी पाच-सहा विशेषांक हे हीरकमहोत्सवानंतरच्या ‘साधना’चे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. त्यापैकी एक विशेषांक 1 मे (महाराष्ट्र दिन) किंवा 11 जून (साने गुरुजी स्मृतिदिन) हे औचित्य साधून काढला जातो. अर्थातच, विषयाचे आणि वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन तो निर्णय घेतला जातो.

या वर्षी 1 मे व 11 जून या दोनही वेळा साधण्यासाठी काही चांगले पर्याय (विशेषांकासाठीचे विषय म्हणून) आमच्यासमोर होते. पण एकापाठोपाठ एक असे तीन वेगवेगळे पण परस्परपूरक लेख जुळून आल्यावर, समोर असलेले विशेषांकांसाठीचे विषय व 1 मे/11 जून ही दोन निमित्ते बाजूला ठेवली आणि 23 व 30 मे असा जोडअंक तिपाई विशेषांक म्हणून सादर करायचे ठरवले. म्हणजे या आठवड्यात 26 मे रोजी नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा 51 वा स्मृतिदिनही 26 मे रोजी येत आहे; त्यामुळे जुळून आलेले तिन्ही लेख या दोन निमित्ताने विशेषांकाच्या रूपात वाचकांसमोर आणणे अधिक औचित्यपूर्ण वाटले.

रामचंद्र गुहा हे आजच्या भारतात राजकारण, समाजकारण, पर्यावरण, क्रिकेट इ. विषयांचे इतिहासाच्या अंगाने संशोधन-विवेचन-विश्लेषण व भाष्य करणारे अत्यंत महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांचा Politics and Play हा पाक्षिक स्तंभ कोलकात्याहून प्रसिद्ध होणाऱ्या The Telegraph या इंग्रजी दैनिकामध्ये असतो आणि तोच स्तंभ भारतातील अन्य पाच भाषांमधील नियतकालिकांत प्रसिद्ध होतो. मागील अडीच वर्षांपासून हा स्तंभ ‘साधना’तून ‘कालपरवा’ या नावाने प्रसिद्ध होतो आहे. हा स्तंभ ‘साधना’ वाचकांमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे आणि म्हणूनच रामचंद्र गुहा यांचे या स्तंभाव्यतिरिक्त काही दीर्घ व महत्त्वाचे लेखन इतरत्र प्रसिद्ध होणार असले, तर ते ‘साधना’तही त्याच वेळी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न आम्ही करतो.

त्याप्रमाणे गेल्या महिन्यात रामचंद्र गुहा यांचा Caravan या मासिकात Where are the Conservative intellectuals in India? या शीर्षकाचा दीर्घ निबंध प्रसिद्ध झाला, त्यासंदर्भात आम्ही विचारणा केली तर रामचंद्र गुहा म्हणाले, ‘‘हा निबंध ‘साधना’त प्रसिद्ध झाला तर छानच होईल.’’ तो निबंध वाचल्यावर आमच्या असे लक्षात आले की, बऱ्याच काळापासून आणि अनेक लोकांकडून विचारला व चर्चिला जाणारा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करून त्याचे अतिशय सविस्तर, अभ्यासपूर्ण आणि विचारप्रक्रियेला कलाटणी देणारे उत्तर या लेखात आले आहे. एवढेच नाही तर, गेल्या दहा वर्षांतील ‘साधना’त प्रसिद्ध झालेला हा सर्वोत्तम लेख आहे असेही आम्हाला वाटते. हा लेख ‘ओपिनियन मेकर क्लास’साठी तर महत्त्वाचा आहेच; पण राजकीय- सामाजिक भान जागृत असलेल्या आणि त्या प्रकारच्या वाचनाची सवय असलेल्या सर्वसामान्य वाचकांनाही उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद देईल.

वाय.सुदर्शन राव व दीनानाथ बात्रा या दुकलीपासून सुरुवात करून आर.सी.मुजुमदार, राधाकुमुद मुखर्जी व जी.एस.घुर्ये या त्रिकुटापर्यंतच्या उजव्या विचारसरणीच्या बुद्धिवंतांच्या भूमिकांवर दृष्टिक्षेप टाकून जे विवेचन-विश्लेषण या लेखात आले आहे ते उत्तम परस्पेक्टिव दाखवणारे आहे. त्याही पुढे जाऊन, उजव्या विचारसरणीच्या विद्यमान राजवटीला जर  आपली पाळेमुळे खोलवर रुजवायची असतील आणि समाजमनावर दीर्घकालीन प्रभाव टाकायचा असेल तर सी.राजगोपालाचारी यांचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा तटस्थ अभ्यासकालाच शोभणारा निष्कर्ष गुहा यांनी काढला आहे.

त्यांनी या लेखात (आणि यापूर्वीही इतरत्र काही वेळा) असे प्रतिपादन केले आहे की, जोपर्यंत रा.स्व.संघाच्या तावडीतून भाजपची सुटका होत नाही आणि गांधी घराण्याच्या कचाट्यातून काँग्रेस पक्ष मुक्त होत नाही, तोपर्यंत या देशात लोकशाहीचे खरे युग अवतरणार नाही. (याच रामचंद्र गुहा यांनी Makers of Modern India या त्यांच्या पुस्तकात आधुनिक भारताच्या 19 निर्मात्यांमध्ये ज्यांचा समावेश केला आहे आणि The Last Modernist असे संबोधले आहे, त्या हमीद दलवाई यांच्यावरील ‘साधना’चा विशेषांक 15 ऑगस्ट व 20 ऑगस्ट ही दोन निमित्ते साधून काढणार आहोत.)

या विशेषांकातील दुसरा लेख दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिला आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी (14 नोव्हेंबर) त्यांनी ‘आजच्या पिढीला नेहरू समजलेत का?’ या विषयावर भाषण केले होते, ते लिखित स्वरुपात देण्याची विनंती आम्ही त्यांना केली होती. गेल्या वर्षी जवाहरलाल नेहरूंचा 50 वा स्मृतिदिन आणि 125 वा जन्मदिवस अशी दोनही निमित्ते जुळून आली होती आणि त्यामुळे देशभर ‘नेहरूयुग संपले आहे का?’ अशी चर्चा सुरू झाली होती. विशेषत: नव्या भाजप राजवटीने अशा आविर्भावात पावले टाकायला सुरुवात केली होती की, ते आता नेहरूंचे नामोनिशाण पुसून टाकणार आहेत. अर्थातच, त्या चर्चेचे आयुष्य चार-दोन महिन्यांपेक्षा जास्त टिकले नाही. पण नेहरू गेल्यापासून तो प्रश्न अधूनमधून उफाळून येत असतो आणि त्यात उजव्या विचारसरणीचे लोकच आघाडीवर असतात. म्हणून दत्तप्रसाद दाभोळकर यांचा हा लेख विशेष महत्त्वाचा आहे.

मागील तीन महिन्यांत आनंद करंदीकर यांचे दोन लेख साधनातून प्रसिद्ध झाले आहेत. ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रविज्ञान’ या पहिल्या लेखातून त्यांनी अशा पद्धतीने विवेचन केले आहे की, ‘आजचे अनेक शोध आपल्या पूर्वजांनी लावले होते’ असा दावा करणाऱ्यांच्या फुग्यातील हवाच काढून घेतली आहे. नंतर ‘विंदांच्या कवितेतील त्रिपदी’ या दुसऱ्या लेखात त्यांनी सम्यक क्रांतिकारी सामाजिक जाणीव, हिंदू अद्वैत परंपरेतील संकल्पना आणि विरोधविकासातून मुक्तीच्या मार्गाचा शोध या तीन पायांवर विंदांची कविता उभी राहिली असे प्रतिपादन केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘मेंदू धुलाई : सावधान’ हा लेख पाठवला. या लेखात, मेंदू धुलाईची दहा तंत्रं त्यांनी अतिशय साध्या-संयत शब्दांत पण आखीव-रेखीव पद्धतीने उलगडून दाखवली आहेत. त्यामुळे हा लेख कोणत्याही प्रकारच्या वाचकाला उद्‌बोधक व उपयुक्त वाटेल.

वरील तीन लेख वाचून झाल्यावर त्यांच्यामधील आंतरिक सूत्र तर कोणाही वाचकाच्या लक्षात येईलच, पण तिपाई विशेषांक का म्हटले आहे त्याचाही काही अंशी बोध होईल. मात्र येथे हे स्पष्ट केले पाहिजे की, ‘विंदांच्या कवितेतील त्रिपदी’ या लेखात आनंद करंदीकरांनी ‘तिपाई’ या स्ट्रक्चरविषयी नेमकेपणाने सांगितले आहे : कोणतेही स्ट्रक्चर दोन पायांवर उभे राहू शकत नाही; खडबडीत पृष्ठभागावर चारपायी डळमळते, तिपाई मात्र स्थिर राहते. याच एका मर्यादित अर्थाने, या विशेषांकातील तीन लेख सारासार विचार करणाऱ्या वाचकमनाला स्थिर करतील, असा विश्वास वाटतो.

हे तीनही लेख दीर्घ आहेत, त्यामुळे प्रत्येक लेख वाचण्यासाठी दीड-दोन तासांची बैठक आवश्यक ठरणार आहे. या लेखांमधून अनेक प्रकारचे कुतूहल शमणार आहे, पण अनेक प्रकारचे कुतूहल वाढणार आहे; अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत, पण अनेक प्रश्न मनात निर्माण होणार आहेत.

आता राहिला प्रश्न मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळाचा. त्या संदर्भात देशातील सर्व प्रमुख माध्यमांतून बरीच साधक-बाधक चर्चा होत आहे, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. पण एवढे मात्र खरे की, वर्षभरापूर्वी जो ‘कैफ’ भाजपच्या समर्थकांमध्ये होता आणि जो उत्साह ‘अच्छे दिन’च्या घोषणेमुळे भारावून गेलेल्या सर्वसामान्यांमध्ये होता, तो कैफ आणि तो उत्साह आता बराच निवळला आहे. नरेंद्र मोदी यांना त्यांनीच निर्माण केलेली स्वत:ची लार्जर दॅन लाइफ प्रतिमा आता अडचणीची ठरू लागली आहे. अद्याप भाजपमधून त्यांना आव्हान देण्याची हिंमत कोणी करीत नाही, संघपरिवारालाही त्यांनी बऱ्यापैकी कह्यात ठेवले आहे (असे वरून पाहताना तरी दिसते.) आणि जनतेतूनही अद्याप भ्रमनिरासाला सुरुवात झालेली नाही. पण सपाटीचा मार्ग आता संपत आला आहे आणि घाटाचा मार्ग सुरू होत आहे हे मात्र खरे.

परिणामी, मोदी सरकारसाठी पुढचे वर्ष खऱ्या अर्थाने कसोटीचे म्हणजे घाट पार करून जाण्यासारखे असणार आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी भाजप सरकारला शुभेच्छा देत असतानाच, ‘साधना’ वाचकांना अधिक सजग करण्यासाठी हा तिपाई विशेषांक... 

Tags: मोदी सरकार पंडीत नेहरू आनंद करंदीकर दत्तप्रसाद दाभोलकर रामचंद्र गुहा घाट सुरू झाला आहे... संपादकीय तिपाई विशेषांक Modi Government Pandit Neharu Aanand Karandikar Dattaprasad Dabholkar Ramchandra Guha Ghat Suru Zala Aahe… editorial Tipai Visheshank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके