डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधना परिवारातील राजहंस

वसंत बापट साधनाच्या पहिल्या अंकापासून साधनाशी निगडित होते, 1984 ते 1998 ही चौदा वर्षे तर संपादक होते. त्या पन्नास वर्षांत त्यांनी साधनात अनेक लेख लिहिले, संपादकीय लेख लिहिले. त्यातील निवडक लेखांची दोन पुस्तके आगामी वर्षभरात साधना प्रकाशनाकडून येतील. साधनाने पूर्वी प्रकाशित केलेल्या त्यांच्या कविता संग्रहांच्या नव्या आवृत्त्या येतील. शिवाय त्यांचे काही लेखन ऑडियो बुक स्वरूपात उपलब्ध करून दिले जाईल. 1993 मध्ये साधना प्रकाशनाने वसंत बापट यांच्याच आवाजात 33 कविता रंग वसंताचे या शीर्षकाखाली रेकॉर्ड केल्या होत्या आणि त्या दोन ऑडियो कॅसेटस्‌मध्ये उपलब्ध केल्या होत्या. त्या कॅसेट्‌स गेली काही वर्षे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे त्या सर्व 33 कविता kartavyasadhana.in  वर उपलब्ध करून दिल्या आहेत.

1922 मध्ये जन्माला आलेली साने गुरुजींची तीन धडपडणारी मुले साधना साप्ताहिकाला संपादक म्हणून लाभली. तिघांचेही जन्मशताब्दी वर्ष आता सुरू होत आहे. वसंत बापट यांचे 25 जुलै रोजी, ग. प्र.प्रधान यांचे 26 ऑगस्ट रोजी आणि यदुनाथ थत्ते यांचे 5 ऑक्टोबर रोजी. तिघांनीही 1942 च्या चळवळीत भूमिगत होऊन, नंतर तुरुंगवासही भोगला होता. साधना साप्ताहिकाला सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत आणण्यात तिघांचाही मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या वारशाला उजाळा देण्याचे काम त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात साधना साप्ताहिकाकडून होणे आवश्यक आहे. त्यासाठी आगामी वर्षभरात विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्या संदर्भातील निवेदने व अन्य तपशील साधना साप्ताहिकातून वेळोवेळी प्रसिद्ध होत राहतील. मात्र त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होत असताना तिघांवरही तीन स्वतंत्र विशेषांक आणि तिघांच्याही प्रत्येकी तीन पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित केल्या जाणार आहेत. वसंत बापट यांची तीन प्रवास वर्णने, ग. प्र. प्रधान यांची तीन वैचारिक पुस्तके, यदुनाथ थत्ते यांची मुस्लिम समाजजीवनाशी संबंधित तीन पुस्तके.

वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होत असताना हा विशेषांक आणि यासोबतच त्यांच्या प्रवासवर्णनाच्या तीन पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या आणल्या आहेत. त्यातील ‘बारा गावचं पाणी’ हे पुस्तक 1963 मध्ये त्यांनी केलेल्या भारत भ्रमणावर आधारित आहे, ‘अहा देश कसा छान!’ हे पुस्तक 1990 दरम्यान त्यांनी केलेल्या  कोकण, राजस्थान, हिमालय व नेपाळ येथील प्रवासवर्णनाचे आहे, तर ‘गोष्टी देशांतरीच्या’ हे पुस्तक अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथील दौऱ्यांचे वर्णन आहे. अर्थात, ही रूढ अर्थाने/प्रचलित अशी प्रवास वर्णने नाहीत. या पुस्तकांमध्ये तो प्रदेश, ती माणसे, ती संस्कृती यांचे एका सौंदर्यपूजक व आस्वादक मनाने घेतलेले दर्शन तर घडतेच; पण त्यांच्यातील कवी, समीक्षक व संपादक त्या सर्व ठिकाणी जागा होता. एका अर्थाने ही वैचारिक प्रवासवर्णने आहेत. म्हणून मागील काही वर्षे आऊट ऑफ प्रिंट असलेली ही पुस्तके नव्याने पुढे आणण्यासाठी प्राधान्य दिले आहे.

प्रस्तुत विशेषांकाचे नियोजन करताना तीन भागांमध्ये रचना ठरवली होती. वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक नव्या जुन्या वाचकांना पाहता यावी म्हणून त्यांचे तीन-चार लेख पहिल्या विभागात. त्यांचे  प्राध्यापक, कवी, सेवादल कार्यकर्ता आणि संपादक साधना हे योगदान अधोरेखित करणारे काहीसे विश्लेषणात्मक लेख दुसऱ्या विभागात. आणि त्यांच्याशी या ना त्या नात्याने संबंध आलेल्या काही व्यक्तींच्या आठवणी/अनुभव तिसऱ्या विभागात. असे मूळ नियोजन होते. मात्र दुसऱ्या विभागात लेखन मिळवण्यासाठी दोन मर्यादा आडव्या आल्या. एक म्हणजे त्यांचे समकालीन तर नाहीतच पण त्यांच्या नंतरच्या पिढीतील लोकही आता फारसे उरलेले नाहीत, दुसरी मर्यादा अशी की त्यांनी त्या चारही क्षेत्रांत केलेल्या कामाची व्याप्ती इतकी जास्त आहे की, उपलब्ध वेळ व उपलब्ध जागा लक्षात घेता कोणालाही नव्याने तसे लेख लिहिता येणे अवघड होते. आणि त्या प्रकारातील पूर्वप्रसिद्ध लेख तर विशेषांकात घ्यायचे नाहीत असे आम्ही ठरवले होते. म्हणून सर्व लेख हाताशी आल्यावर प्रस्तुत विशेषांकात तसे तीन ठळक विभाग करणे टाळले आहे.

तरीही या अंकात तीन विभाग अस्पष्टसे दिसतील. वसंत बापट यांचे त्या तीन प्रवासवर्णनांतील तीन लेख आणि त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त मंगेश पाडगांवकर यांनी साधनात लिहिलेला लेख, असा चार लेखांचा पहिला विभाग म्हणता येईल. त्यातून वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा हाती लागतो. त्यानंतर नीलिमा गुंडी, मीना गोखले, झेलम परांजपे, श्यामला वनारसे व उषा मेहता यांनी लिहिलेल्या पाच लेखांचा दुसरा विभाग मानता येईल. त्यातून  प्राध्यापक, कवी आणि सेवा दलाच्या कला पथकाचे कर्ते करविते या तीन बाजूंवर प्रकाश पडतो. आणि रामदास भटकळ, संगीता बापट, आनंद करंदीकर व गोपाळ अवटी यांनी लिहिलेल्या चार लेखांचा काहीसा अपुरा पण तिसरा विभाग म्हणता येईल. त्यातून त्यांच्या संपादक, साहित्यिक या बाजूंवर कवडसे पडतात.

वसंत बापट यांची मुख्य ओळख ‘कवी’ अशी आहे आणि बापट-करंदीकर-पाडगांवकर हे कवी त्रिकूट 1960 नंतरची तीन दशके मराठी साहित्यात तेजाने तळपत होते. ते तिघेही समकालीन. तिघांची मैत्री त्यांच्या वयाच्या पंचवीशी-तिशीच्या दरम्यान झाली आणि त्यानंतर पन्नास वर्षे टिकली. इस 2002 मध्ये बापट यांच्या निधनामुळे त्या त्रिकुटातील दुवा निखळला. उर्वरित दोघे त्यानंतरच्या दशकात काळाच्या पडद्याआड गेले. बापट यांच्या निधनानंतर मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने एक तासाचा लघुपट केला. त्यात विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे की, बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाला नऊ अंगे होती ती अशी : प्राध्यापक, कवी, शाहीर, गीतकार, समीक्षक, संपादक, कार्यकर्ता, वक्ता, शोमन. आणि त्याच लघुपटात पाडगांवकर यांनी बापट यांचे वर्णन ‘चैतन्याने सळसळणारे यौवनाचे झाड’ असा केला असून, पुढे म्हटले आहे : ते मुख्यतः कवी होते आणि शाहिरी काव्य व अर्वाचीन काव्य यांना जोडणारा तो प्रतिभासंपन्न दुवा होता. वरील दोन साहित्यश्रेष्ठ मित्रवर्यांचे अभिप्राय लक्षात घेतले तर वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा व आवाका हाती लागतो.

मात्र तरीही बापट हे काय प्रकरण होते याचा अंदाज नेमकेपणाने येणार नाही. त्यांची लहान-मोठी अशी साडेचार डझन पुस्तके नीट नजरेखालून घातली तर अचंबित व्हायला सुरुवात होते. त्यांच्यातला कवी किती स्तरांवर वावरला हे पाहिले तर लक्षात येते निसर्ग कविता, प्रेम कविता, लावणी, पोवाडे, देशभक्तीच्या कविता, बालकविता इतके प्रमुख प्रकार आहेत. वर उल्लेख केला आहे ती तीन प्रवासवर्णने आणि प्रवासाच्या कविता (मौज प्रकाशन) हे चौथे पुस्तके नजरेखालून घातले आणि त्यांच्यातील वैविध्य व सखोलता पाहिली तर अचंबा वाढीस लागतो. ‘शतकांच्या सुवर्णमुद्रा’ हे मराठी कवितेच्या समीक्षेचे पुस्तक, ‘जिंकुनी मरणाला’ हे व्यक्तिचित्रांचे पुस्तक, ‘ताणेबाणे’ हे आत्मकथनात्मक पुस्तक, ‘विसाजीपंतांची बखर’ हे राजकीय विडंबनाचे पुस्तक चाळले तर अचंबित होण्याची तीव्रता आणखी वाढते. आणि त्यांनी केलेल्या ‘महाराष्ट्र दर्शन’, ‘भारत दर्शन’, ‘शिवदर्शन’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ इत्यादी प्रयोगांच्या हकिगती ऐकल्या (म्हणजे त्यातील लेखन, दिग्दर्शन, अभिनय, सादरीकरण इत्यादी प्रकारांतील सहभाग कळला) तर तोंडात बोट घालण्याची वेळ येते.

शिवाय, हे सर्व चालू असताना त्यांनी तीस चाळीस वर्षे वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी कॉपीरायटिंग चालू ठेवले होते, त्याकडे ते सर्जनशीलतेचा अविष्कार म्हणूनच पाहात होते. त्यांची विविधता किती असावी? उदाहरणार्थ : आयुर्विमा, फिशिंग नेट (मासे पकडणारे जाळे), जम्बो आईस्क्रीम, फिनोलेक्स पाईप, केअर फ्री सॅनिटरी नॅपकिन, कॅमल पेन्सिल, गोकुळ दूध इत्यादी. अनेक दुकानांना नावे, अनेक नामवंतांसाठी मानपत्रे. अनेक संस्थांना ब्रीदवाक्ये. उदा. महाराष्ट्र टाइम्सचे घोषवाक्य ‘पत्र नव्हे मित्र’ आणि लोकसत्ताचे घोष वाक्य ‘लोकमान्य लोकशक्ती’ हे वसंत बापट यांनीच दिलेले. आणि हो, ‘स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधनां । करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना’, हे ब्रीदवाक्यही वसंत बापट यांचीच देण आहे. या संदर्भातील भूमिका व अनुभव मांडणारा छोटा लेख त्यांनी चिन्ह दिवाळी 1988 अंकात लिहिला आहे. (हा लेख आता कर्तव्य साधना डिजिटल पोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे.)

शोमन हे वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे अंग होते, त्याची प्रचिती घेण्यासाठी आता फारच थोडी साधने उपलब्ध आहेत. पण वसंत बापट यांनी घेतलेल्या एस.एम.जोशी व कुमार गंधर्व यांच्या प्रत्येकी एक तासाच्या मुलाखती मुंबई दूरदर्शन you tube  वर उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या पाहिल्या तर आशय उकलणाऱ्या व फुलवणाऱ्या मुलाखती किती सहजतेने घेतल्या जाऊ शकतात याचा वस्तुपाठ मिळतो. त्याचप्रमाणे त्यांनी केलेले कलापथकांचे काही ऑडियो व्हिडिओ उपलब्ध झाले तर  सादरीकरण कशाला म्हणतात ते दाखवता येईल. त्या प्रक्रियेविषयी भरभरून बोलू शकणारे लीलाधर हेगडे व अन्य थोडेच साक्षीदार आता हयात आहेत. वसंत बापट यांच्या अनेक कविता शाळा-शाळांमधून प्रार्थना किंवा स्फूर्तीगीते म्हणून आजही  रोमांचित करतात. उत्तुंग आमुची उत्तर सीमा... हे गीत आजही 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला खेड्यापाड्यांतील शाळांमधून घुमते तेव्हा विद्यार्थ्यांची मने उचंबळून येतात. आभाळाची आम्ही लेकरे... ही कविता बाबा आढाव त्यांच्या अनेक कार्यक्रमांच्या प्रारंभी स्वतःबरोबर श्रोत्यांनाही म्हणायला लावतात तेव्हा वातावरणात प्रसन्नता शिरकाव करते. अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांना पत्र हे वसंत बापट यांनी केलेले रूपांतर आहे. मागील 40 वर्षे महाराष्ट्रातील हजारो प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये भिंतीवर लावलेले असते. ते पत्र लिंकनच्या साहित्यात कुठेच उपलब्ध नाही, तर मग बापट यांनी घेतले कुठून? असा वाद काही वर्षांपूर्वी निर्माण झाला होता. ते सांगण्यासाठी आता बापटसर हयात नाहीत आणि त्यांच्या सहवासातील कोणालाही सांगता येत नाहीये. पण ‘लिंकन माझा सख्खा सोयरा’ असे म्हणणाऱ्या बापट यांना ते अमेरिकेतील एखाद्या मित्राकडून मिळाले असणार, ते लिंकनचेच की चरित्रात्मक कादंबरी सदृश्य लिहिणाऱ्या अन्य कोणाचे हे कळायला मार्ग नाही. मात्र वसंत बापट यांनी केलेले रूपांतर हा मास्टरपीस आहे. अन्यथा, त्या पत्राचे पोस्टर मिळवण्यासाठी 2020 मध्येही, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी प्रदेशातील गावकरी फोन करतो आणि कुलभूषण जाधव यांचे वडील केवळ ते पोस्टर खरेदी करण्यासाठी साधना कार्यालयात येतात याचा अर्थ काय?

वसंत बापट साधनाच्या पहिल्या अंकापासून साधनाशी निगडित होते, 1984 ते 1998 ही चौदा वर्षे तर संपादक होते. त्या पन्नास वर्षांत त्यांनी साधनात अनेक लेख लिहिले, संपादकीय लेख लिहिले. त्यातील निवडक लेखांची दोन पुस्तके आगामी वर्षभरात साधना प्रकाशनाकडून येतील. साधनाने पूर्वी प्रकाशित केलेल्या त्यांच्या कविता संग्रहांच्या नव्या आवृत्त्या येतील. शिवाय त्यांचे काही लेखन ऑडियो बुक स्वरूपात उपलब्ध करून दिले जाईल. 1993 मध्ये साधना प्रकाशनाने वसंत बापट यांच्याच आवाजात 33 कविता रंग वसंताचे या शीर्षकाखाली रेकॉर्ड केल्या होत्या आणि त्या दोन ऑडियो कॅसेटस्‌मध्ये उपलब्ध केल्या होत्या. त्या कॅसेट्‌स गेली काही वर्षे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे त्या सर्व 33 कविता kartavyasadhana.in  वर उपलब्ध करून दिल्या आहेत.

वसंत बापट यांच्या लेखनावर एम.फिल. व पीएच.डी. केली आहे त्या बाळासाहेब गुंजाळ यांनी बापट यांच्या साहित्याचा वेध घेणारी तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत आणि ‘बापट उवाच’ या चौथ्या पुस्तकात वसंत बापट यांच्या काही भाषणांचे व काही मुलाखतींचे संकलन केले आहे. शिवाय, नागेश कांबळे यांनी वसंत बापट यांच्या प्रसिद्ध झालेल्या (संग्रहित व असंग्रहित) लेखांची आणि त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या लेखांची अशी समग्र सूची करण्याचे काम संपवत आणले आहे. ते तपशील इतके जास्त आहेत की, ती सूची चारशे ते पाचशे पानांची होईल. वसंत बापट यांची अन्य काही पुस्तके आऊट ऑफ प्रिंट आहेत, ते ते प्रकाशक आगामी वर्षभरात त्यांच्या नव्या आवृत्त्या आणतील. त्यापैकी काहींना शक्य नसेल त्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या साधना प्रकाशनाकडून येतील. वसंत बापट यांच्याशी या ना त्या नात्याने घनिष्ट संबंध आला अशा काही लहान थोरांचे मनोगत/आठवणी यांचे व्हिडिओ तयार करून कर्तव्य साधनांवर प्रसिद्ध केले जातील. शिवाय, सेवादलाच्या वतीने कार्यक्रम-उपक्रम आयोजित केले जातील. साहित्य अकादमी व अन्य काही संस्थाही काही ना काही करू इच्छित आहेत. हे सर्व स्वागतार्ह आहे.

वसंत बापट  यांच्या विविध अविष्कारांची काहीशी अनुभूती घेतली आणि कल्पकता ताणली तर त्यांचे वेगळेपण उठून दिसते. त्यांचे गद्य लेखन व कविता यामधून तर त्याचा प्रत्यय येतोच, पण त्यांची भाषणे व  मुलाखती वाचल्यावर ते अधिक ठसते. उदाहरणार्थ, ‘कविता हा प्रकार अभ्यासक्रमातून काढून टाकला पाहिजे, कारण ती अनुभव घेण्याची कला आहे’ हे त्यांचे विधान असो, किंवा ‘निर्मनुष्य ठिकाणी निसर्ग असू शकत नाही आणि माणसे व समाज असतो तिथे निसर्ग असतोच’ हे त्यांचे विधान! मुंबई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना व हुकूमशाही प्रवृत्तीला ज्या पद्धतीने सुनावले होते, तेही अफलातूनच! त्यांची एकंदर अभिव्यक्ती आणि औरस चौरस व  दिमाखदार वावर लक्षात घेता, साधना परिवांरातला तो राजहंस होता असेच म्हणावे लागते. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

Tags: जन्मशताब्दी विशेषांक विनोद शिरसाठ वसंत बापट visheshank janmshatabdi vasant bapat vinod shirsath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके