डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भाजपच्या विस्तारवादाचे भय?

भविष्याचे हे चित्र काँग्रेसला व कम्युनिस्टांना भयसूचक वाटत नसेल कदाचित, पण लोकशाहीवादी व्यक्तींना व शक्तींना निश्चितच वाटते आहे. कारण डावा प्रवाह आणि मध्यवर्ती प्रवाह सशक्त राहणे ही या देशातील लोकशाही जिवंत राहण्याची, सेक्युलॅरिझम विकसित होण्याची, सर्व प्रकारच्या विषमता कमी होण्याची आणि देश आधुनिकतेच्या मार्गावर चालत राहण्याची पूर्वअट आहे!  

मागील महिनाभर संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि पाँडेचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींकडे लागले होते. गेल्या आठवड्यात निकाल लागले आणि देशाने सुटकेचा श्वास घेतला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला दोन-तृतीयांश बहुमत मिळाले आणि ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. तमिळनाडूमध्ये द्रमुकला पूर्ण बहुमत मिळाले आणि एम.करुणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्टप्रणित डावी लोकशाही आघाडी पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर आली आणि पिनराई विजयन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. आसाममध्ये भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्ता मिळाली आणि सर्वानंद सोनोवाल दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पाँडेचेरी या केंद्रशासित प्रदेशात ऑल इंडिया एन.आर.काँग्रेसचे एन.रंगसामी भाजपसोबत केलेल्या युतीमुळे काही कालखंडानंतर सत्तेवर आले आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. एकूणात पाहिले तर अशा प्रकारच्या संमिश्र यशामुळे म्हणजे विविध पक्षांना मिळालेल्या सत्तेमुळे देशातील लोकशाहीवादी व्यक्तींनी व शक्तींनी समाधान व्यक्त केले. 

सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती पश्चिम बंगालची निवडणूक. कारण मागील दहा वर्षे तृणमूल काँग्रेस, आधीची चौतीस वर्षे कम्युनिस्ट आणि त्याआधीची तीस वर्षे काँग्रेस यांची सत्ता राहिलेल्या या राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर येण्याची मोठीच शक्यता निर्माण झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपली पूर्ण ताकद पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी लावली होती, ते साहजिक होते. कारण डाव्यांचे गड असलेले पश्चिम बंगाल व केरळ या राज्यांत सत्ता मिळवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणे हा उजव्या भाजपसाठी सर्वाधिक आनंदाचा भाग ठरणार आहे. शिवाय, दोन वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला 42 पैकी 18 जागा जिंकता आल्या आहेत. 2016 पर्यंत त्या राज्यात भाजपची पक्षसंघटनाच नव्हती, त्या पार्श्वभूमीवर नंतरच्या तीन वर्षांत त्यांनी मिळवलेले यश लक्षणीय होते. शिवाय, आता पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस नामशेष झालेला आहे, डावे पक्ष असून नसल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे साम-दाम-दंड-भेद या नीतीलाही लाजवेल अशा पद्धतीने काम भाजपने केले तर ममता बॅनर्जी यांचे आव्हान मोडून काढता येईल असा विचार मोदी-शहा या जोडीने केला असेल तर तो साहजिकच म्हणावा लागेल. आणि म्हणूनच त्यांनी देशावरील कोरोना संकटाची पर्वा न करता मोठ्या प्रचारसभा घेतल्या व रॅलीज काढल्या; केंद्रातील अनेक मंत्री व विविध राज्यांतील भाजप नेते पश्चिम बंगालमध्ये धाडले होते; ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला घडवून आणण्यापासून त्यांचे घनिष्ठ सहकारी फोडून भाजपमध्ये सामील घेण्यापर्यंतची कारस्थाने केली; हे सर्व कमी पडेल म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाला हाताशी धरून तब्बल आठ टप्प्यांत आणि महिनाभर चालेल अशी निवडणूक प्रक्रिया पश्चिम बंगालमध्ये राबवली होती. इतके सर्व भाजपने करूनही जनतेने ममता यांच्या पक्षाला दोन-तृतीयांश जागा दिल्या, यासाठी जनतेचे कौतुक करायचे की ममतांचे, असा प्रश्न पडून लोकशाहीबद्दलचा आदर दुणावतो हे खरे! पण त्याच राज्यात काँग्रेस व दोन्ही कम्युनिस्ट यांना एकही जागा मिळालेली नाही आणि भाजपला तब्बल 78 जागा मिळाल्या आहेत, हे लक्षात घेतले तर भविष्यसूचक घंटानाद ऐकू येईल. तो घंटानाद हेच सांगेल की, आणखी पाच वर्षांनी अगदीच काही अनपेक्षित घडले नाही तर तेथील सत्तेवर भाजप येईल. कारण तब्बल पंधरा वर्षे सत्ता राबवल्यानंतर ममतांच्या घोडदौडीला मर्यादा पडलेल्या असणार, काँग्रेस व कम्युनिस्ट यांनी अशा पराभवातून काहीही धडे घेतलेले नसणार; आणि भाजप व संघपरिवाराने मात्र कालच्या निवडणुकीचे निकाल लागले त्याच दिवशी, 2026 मध्ये येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी तयारीला प्रारंभ केलेला असणार! 

पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेच्या इतक्या जवळ गेला आहे की, अन्य लोकांनी ‘भाजप तिथे पराभूत झाला’ असा कितीही जल्लोष केला तरी, भाजपच्या दृष्टीने तो मोठा विजयच आहे. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला भाजप आता केरळमध्ये सत्तेच्या नजिक जाण्यासाठी आगामी पाच वर्षांत मोठीच ताकद लावणार हे उघड आहे. असे सांगितले जाते की, केरळमध्ये संघ स्वयंसेवक सर्वदूर पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांनी नांगरणी केलेल्या भूमीवर पुढील मशागत करण्याचे काम भाजप कार्यकर्ते करतील आणि आणखी पाच नव्हे तर दहा किंवा पंधरा वर्षांनी तिथे भाजप सत्तेवर येईल, हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी लढत राहतील! म्हणजे केरळमध्ये डावी आघाडी व काँग्रेस आघाडी यांच्यातून वाट काढून नव्हे, तर दोन्हींपैकी एका आघाडीला नामशेष करण्यासाठी अधिक प्रयत्न करून तो जनाधार स्वत:कडे वळवण्यासाठी रणनीती राबवतील. याचा अर्थ केरळमध्ये त्या दोन्हींपैकी कोणत्या आघाडीला तो फटका बसणार, हे येत्या काही वर्षांत बघायला मिळणार. 

पश्चिम बंगाल व केरळ यांच्यापाठोपाठ भाजपसाठी अधिक मोठे व अधिक कठीण स्वप्न असेल ते तमिळनाडू राज्य जिंकण्याचे. सी.राजगोपालाचारी यांच्यानंतर तमिळनाडूमध्ये काँग्रेस पक्ष अगदीच क्षीण रूपात आहे. तिथे राज्याची सत्ता द्रमुक व अद्रमुक यांच्यात फिरते आहे, ती मागील पाच दशकांपासून. त्या दोन्ही प्रादेशिक पक्षांचे संस्थापक नेते व पहिल्या फळीचे नेते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत आणि दुसऱ्या-तिसऱ्या पिढ्यांच्या हाती त्या-त्या पक्षांची सूत्रे आली आहेत. त्यामुळे तिथे भाजपला आपली पक्ष संघटना वाढवण्यासाठी आता पूर्वीपेक्षा तुलनेने अधिक वाव राहणार आहे. तसेही अद्रमुकशी युती करून भाजपने मागील पाच वर्षांत पायाभरणी केली आहे, पुढील पाच वर्षांनी अद्रमुकची सत्ता आली तर त्यात भाजप सहभागी होऊ शकतो. हिंदू धर्माला किंवा वैदिक धर्माला आणि एकूणच रूढ अर्थाने मानली जाते त्या भारतीय संस्कृतीला व हिंदी भाषेला कडवा विरोध ज्या राज्यातून होत आला आहे, तिथे सत्ता मिळाली तर तो भाजपसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल. 

वरील तीन राज्यांव्यतिरिक्त तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, पंजाब, काश्मीर असेही काही प्रदेश आहेत, तिथे भाजपला पूर्ण सत्ता मिळवायची आहे, पण तिथे भाजप बऱ्यापैकी पोहोचलेला आहे. मागील पाच वर्षांत त्रिपुरा व आसाम ही दोन राज्ये त्यांनी काबीज केलेली आहेतच. ही सर्व पार्श्वभूमी एकत्रित लक्षात घेतली तर भाजप मागील तीन दशके दमदार व सातत्यपूर्ण वाटचाल करीत असून आगामी दोन दशकांत पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू या तीन राज्यांसह संपूर्ण देशभर पसरलेला असेल. म्हणजे 1947 मध्ये काँग्रेसचे जे स्थान या देशात होते ते स्थान 2047 मध्ये भाजपने घेतलेले असेल. 

भविष्याचे हे चित्र काँग्रेसला व कम्युनिस्टांना भयसूचक वाटत नसेल कदाचित, पण लोकशाहीवादी व्यक्तींना व शक्तींना निश्चितच वाटते आहे. कारण डावा प्रवाह आणि मध्यवर्ती प्रवाह सशक्त राहणे ही या देशातील लोकशाही जिवंत राहण्याची, सेक्युलॅरिझम विकसित होण्याची, सर्व प्रकारच्या विषमता कमी होण्याची आणि देश आधुनिकतेच्या मार्गावर चालत राहण्याची पूर्वअट आहे!  

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके