डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधना परिवारातील कॅटलिस्ट

आजही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जवळपास प्रत्येक तालुक्यात चार-दोन तरी अशा बुजुर्ग व्यक्ती वा संस्था भेटतात, ज्यांना यदुनाथांचे नाव निघाले तर कृतज्ञतेचे भरते येते. असा प्रकार स्वातंत्र्योत्तर पाऊणशे वर्षातील महाराष्ट्रात ‘मराठवाडा’चे संपादक अनंतराव भालेराव वगळता अन्य कोणाच्या बाबत घडत नसावा. आणि हे सर्व करताना यदुनाथांची सहजता ही त्यांच्या स्वभावातून आलेली तर दिसतेच; पण पक्की वैचारिक बैठक, कमालीचा आत्मविश्वास आणि कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी या त्रिवेणी संगमातून आलेली असणार हेही उघड आहे. त्यामुळे सुख-सुविधा, मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा यांच्या पलीकडे जाऊन ते अखंड कार्यरत राहिले. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत सहभागी होत राहिले, ती प्रक्रिया सुरळीत पार पाडावी किंवा पुढे सरकावी यासाठी प्रयत्नरत राहिले आणि एकदा का ती प्रक्रिया पार पडली की, त्यातून बाहेर पडून नव्या ठिकाणी नव्या प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढे सरसावत राहिले. त्यांच्या या वर्तनाचे व कार्यशैलीचे एका शब्दात वर्णन करायचे असेल तर ‘कॅटलिस्ट’ (उत्प्रेरक) हा शब्द चपखल बसेल.

दि. 5 ऑक्टोबर 1922 ते 10 मे 1998 असे पाऊणशे वर्षांचे आयुष्य लाभलेल्या यदुनाथ थत्ते यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यांची ओळख आंतरभारती आणि राष्ट्र सेवादल यांचे कार्यकर्ते, नेते अशी असली आणि शंभराहून अधिक लहान-मोठी पुस्तके त्यांच्या नावावर असली तरी साधना साप्ताहिकाचे संपादक म्हणूनच उभा महाराष्ट्र त्यांना प्रामुख्याने ओळखतो. आणि ते साहजिक आहे. कारण 15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले, त्यानंतर पाचच महिन्यांनी 26 वर्षे वयाचे तरुण यदुनाथ त्यांना सामील झाले. नाशिक जिल्ह्यातील येवला गावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि पुणे शहरातील स.प.महाविद्यालयातून विज्ञानशाखेचे पदवीधर झालेल्या यदुनाथांनी वयाच्या विसाव्या वर्षी 1942 च्या ‘चले जाव’ चळवळीत सहभागी होऊन तुरुंगवासही भोगला होता. त्यांना साने गुरुजींचा सहवास येवल्यात, पुण्यात आणि तुरुंगातही लाभला होता. त्यामुळे साने गुरुजींनी त्यांना साधनाच्या संपादकीय कामासाठी मुंबईला बोलावून घेण्याला विशेष महत्त्व होते.

अर्थात, तरुण यदुनाथ साधनात आले आणि त्यानंतर दीड वर्षांनीच गुरुजींचे निधन झाले. त्यानंतर आचार्य जावडेकर आणि रावसाहेब पटवर्धन या दोन बुजुर्ग व दिग्गज म्हणाव्या अशा व्यक्तींकडे साधनाचे संपादकपद गेले. ते दोघेही त्या काळात अन्य कामातही व्यग्र असल्याने साधनाच्या दैनंदिन संपादकीय कामकाजाची जबाबदारी यदुनाथांवरच येऊन पडली. अर्थात, वसंत बापट, सदानंद वर्दे आणि अन्य काही गुरुजींची धडपडणारी मुले यदुनाथांच्या साथीला होती. मात्र ते सर्वजण अन्य कामातही असल्याने, यदुनाथांना पूर्ण वेळ साधनासाठी द्यावा लागणे अपरिहार्य झाले. पुढील पाच-सहा वर्षे मुंबईतूनच साधना प्रकाशित होत राहिले आणि 1956 मध्ये पुण्यातून प्रकाशित होऊ लागले. दरम्यान रावसाहेब बाहेर पडले आणि आचार्यांचे निधन झाले. त्यानंतर अनेक लहानथोरांना साथीला घेऊन यदुनाथांनी साधनाचे मुख्य संपादकपद पुढील 25 वर्षे सांभाळले. वयाच्या साठीत ते निवृत्त झाले. म्हणजे 1949 ते 82 असे तब्बल 34 वर्षे यदुनाथजी साधनाच्या केंद्रस्थानी होते. इतका प्रदीर्घ काळ मिळाल्यामुळे त्यांची ओळख साधनाचे संपादक अशीच ठळक होणार हे उघड आहे. पण दीर्घ काळ मिळाला म्हणून केवळ कर्तृत्व गाजवता येते असे नाही, आणि दीर्घ काळ मिळतो याचा अर्थ तसे कर्तृत्वही असावे लागते. या पार्श्वभूमीवर यदुनाथांकडे पाहावे लागते.

यदुनाथांनी नंतरच्या पाव शतकाच्या कार्यकाळात साधना साप्ताहिकाला वैचारिक व परिवर्तनवादी साप्ताहिक अशी ओळख प्राप्त करून दिली. त्यांचे तीन प्रमुख आयाम लक्षात घेतले पाहिजेत.

1. त्यांनी अनेक तरुणांना लिहिते केले, संपादन कार्यात सहभागी करून घेतले.

2. त्यांनी अनेक संस्था व संघटनांना उभे राहण्यासाठी वा गतीने चालण्यासाठी बळ दिले.

3. अनेक सामाजिक-राजकीय प्रश्नांना वाचा फोडली, अनेक ज्वलंत विषय चव्हाट्यावर आणले.

या तिन्ही आयामांची व्याप्ती व खोली लक्षात घेतली तर यदुनाथांनी साधनासाठी काय केले याची प्रचिती येईल. मात्र दुर्दैवाने त्या प्रकारचे लेखन-संशोधनाचे काम ना साधनाच्या आतून झाले, ना साधनाच्या परिघावरील व्यक्ती-संस्थांकडून झाले, ना विद्यापीठीय वर्तुळातून झाले. यामुळे यदुनाथांचे खरे योगदान अधोरेखित करायचे राहून गेले आहे. त्यांना त्यांचे पूर्ण श्रेय मिळायला पाहिजे होते हे तर राहून गेलेच; पण अधिक नुकसान वेगळे आहे. ते असे की, त्यामुळे स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या तीन-साडेतीन दशकांच्या सामाजिक इतिहासातील काही पाने तरी अपुरी राहिली. शिवाय वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांच्या इतिहासातही यदुनाथांचे हे कार्य नीट शब्दबद्ध झालेले नाही. आणीबाणीच्या काळातील यदुनाथांचा व साधनाचा लढा खूपच गडदपणे सर्वांकडून अधोरेखित केला जातो आणि ते बरोबरच आहे. मात्र त्याच्या आड यदुनाथांनी पाव शतक चालवलेल्या साधनाचे काम काहीसे झाकोळून टाकल्यासारखे होते. उदा. बाबा आमटे व आनंदवन, हमीद दलवाई व मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि नरहर कुरुंदकरांचे राजकीय-सामाजिक लेखन यांना संपूर्ण महाराष्ट्रात मोठे व्यासपीठ मिळवून देणे, प्रतिष्ठा बहाल करणे हे काम सर्वाधिक कोणी केले असेल तर साधनाच्या माध्यमातून यदुनाथांनी. ही बाब त्या तिघांनी कृतज्ञतेने नोंदवून ठेवली आहे आणि यदुनाथांनीही आपल्या वाटचालीचा धावता आढावा घेणारा जो लेख लिहिला आहे (या अंकात तो आहे) त्यातही नोंदवून ठेवली आहे.

प्रस्तुत अंकात नरहर कुरुंदकर, कुमार सप्तर्षी, प्रकाश आमटे, रझिया पटेल, अनिल अवचट या पाच जणांचे लेख आहेत, त्यातून यदुनाथांच्या व्यक्तित्वाची व कार्यशैलीची झलक पाहायला मिळते. मात्र आजही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जवळपास प्रत्येक तालुक्यात चार-दोन तरी अशा बुजुर्ग व्यक्ती वा संस्था भेटतात, ज्यांना यदुनाथांचे नाव निघाले तर कृतज्ञतेचे भरते येते. असा प्रकार स्वातंत्र्योत्तर पाऊणशे वर्षातील महाराष्ट्रात ‘मराठवाडा’चे संपादक अनंतराव भालेराव वगळता अन्य कोणाच्या बाबत घडत नसावा. आणि हे सर्व करताना यदुनाथांची सहजता ही त्यांच्या स्वभावातून आलेली तर दिसतेच; पण पक्की वैचारिक बैठक, कमालीचा आत्मविश्वास आणि कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी या त्रिवेणी संगमातून आलेली असणार हेही उघड आहे. त्यामुळे सुख-सुविधा, मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा यांच्या पलीकडे जाऊन ते अखंड कार्यरत राहिले. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत सहभागी होत राहिले, ती प्रक्रिया सुरळीत पार पाडावी किंवा पुढे सरकावी यासाठी प्रयत्नरत राहिले आणि एकदा का ती प्रक्रिया पार पडली की, त्यातून बाहेर पडून नव्या ठिकाणी नव्या प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढे सरसावत राहिले. त्यांच्या या वर्तनाचे व कार्यशैलीचे एका शब्दात वर्णन करायचे असेल तर ‘कॅटलिस्ट’ (उत्प्रेरक) हा शब्द चपखल बसेल.

रसायनशास्त्रात कॅटलिसीस नावाची प्रक्रिया असते. काही पदार्थ असे असतात जे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात, ती अभिक्रिया अधिक सुलभ व जलद व्हावी यासाठी काम करतात आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली की, तिथून काहीही न घेता स्वत:हून बाहेर पडतात. त्या पदार्थांना कॅटलिस्ट असे संबोधले जाते.

तर अशा या यदुनाथांनी किती किती प्रकारच्या सामाजिक अभिक्रियांना मदत केली आहे, गती दिली आहे याचा लेखाजोखा मांडण्यासाठी आज अनुकूलता कमी आहे. कारण त्यांचे समकालीन व त्यांना ज्येष्ठ असे सर्व लोक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या नंतरच्या पिढीतील लोकही आता वयाच्या ऐंशी-नव्वद दरम्यान आहेत. त्यानंतरची, तिसरी पिढीही आता साठीच्या पुढे सरकली आहे. चौथ्या पिढीला तर यदुनाथजी प्रत्यक्ष पाहताही आले नाहीत (आम्ही त्यातलेच). आणि दस्तऐवजीकरणाच्या बाबतीत तर आपल्या समाजात कमालीची अनास्था आहे. मात्र आज-उद्याच्या पिढ्यांनाही यदुनाथ नावाचा कॅटलिस्ट कसा होता, त्याने किती प्रक्रियांना गती दिली हे कळायला हवे; कशासाठी? तर त्यातून ऊर्जा, स्फूर्ती, प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे यासाठी! आणि ‘कॅटलिस्ट व्हा, कॅटलिस्ट!’ या संदेशाचे एक उदाहरण पेश करण्यासाठी!

त्यासाठी यदुनाथांच्या जन्मशताब्दी वर्षांत साधनातर्फे बरेच काही विचाराधीन आहे. त्याचा प्रारंभ म्हणून हा विशेषांक आहे, या विशेषांकात दोन विभाग केले आहेत. पहिल्या विभागात ज्यांना यदुनाथांचा प्रत्यक्ष व घनिष्ठ सहवास दीर्घकाळ लाभला अशा पाच मान्यवरांचे लेख आहेत. दुसऱ्या विभागात यदुनाथांचे व्यक्तित्व व विचार यांचे दर्शन घडेल असे, त्यांचे स्वत:चे सहा लेख आहेत. या दोन्ही विभागांत आणखी काही लेख घेता आले असते, पण अंकाच्या पानांची मर्यादा असल्याने ते टाळले आहे. मात्र आगामी वर्षभरात साधनातून वरील दोन्ही विभागांतल्याप्रमाणे आणखी काही लेख प्रसिद्ध करणार आहोत. आणि याच आठवड्यात यदुनाथांच्या दोन दुर्मिळ व दुर्लक्षित पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या येत आहेत.

‘मुस्लिम मनाचा कानोसा’ आणि ‘मुस्लिम समाजातील वाहते वारे’ हीच ती दोन पुस्तके. मुळात ही दोन पुस्तके म्हणजे त्यांनी अनुक्रमे ‘सकाळ’ व ‘नागपूर पत्रिका’ या दोन दैनिकांमध्ये चालवलेल्या पाक्षिक सदरांतील निवडक लेख आहेत. सकाळमधील सदर  1975 नंतरची दहा-अकरा वर्षे तर नागपूर पत्रिकामधील सदर 1986 नंतरची दोन वर्षे चालले. ही दोनही सदरे अनुक्रमे ‘मुल्कपरस्त’ आणि ‘कलमनविस’ या टोपणनावाने लिहिली असल्याने, त्या वेळी ते लेखन खूप वाचले गेले असले तरी त्यांचा खरा लेखक कोण हे क्वचितच कोणाला माहीत असेल. शिवाय ही दोन पुस्तके प्रकाशित झाली ती त्यानंतर दहा वर्षांनी आणि त्यानंतरची दोन दशके तर ती आऊट ऑफ प्रिंट होती. त्या 15 वर्षांत त्या दोन सदरांमध्ये मिळून त्यांनी तीनशेपेक्षा अधिक लेख लिहिले आहेत, आणि ते सर्व लेख मुस्लिम समाजात त्या काळात घडत असलेल्या लहान-मोठ्या घटनांच्या निमित्ताने लिहिले गेले आहेत. असे व इतके लेखन महाराष्ट्रात एकाही मुस्लिमेतर लेखकाने केलेले असणे शक्य नाही.

यदुनाथांचे असेच तीन प्रमुख आयाम ठळकपणे पुढे आणण्यासाठी आगामी वर्षभरात आम्ही तीन मोठी पुस्तके प्रकाशित करणार आहोत. त्यातील एक असेल त्यांनी लिहिलेल्या विज्ञान व वैज्ञानिक यांच्यासंदर्भात केलेल्या लेखांचे संकलन, दुसरे पुस्तक असेल त्यांनी साधनात लिहिलेले संपादकीय व अन्य लेखांचे संकलन, आणि तिसरे पुस्तक असेल त्यांनी 1957 नंतरची बारा वर्षे काढलेल्या कुमार अंकातील अनेक थोर लेखकांचे लेख वा गोष्टी यांचे संकलन. याशिवाय आणखी काही वेगळे व कालसुसंगत असे लेखन वाटले तर तेही त्यानंतरच्या काळात प्रकाशित केले जाईल.

आता अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या साधना साप्ताहिकासाठी चालू वर्ष हे तीन भूतपूर्व संपादकांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. मागील दोन महिन्यांत वसंत बापट व ग.प्र.प्रधान यांच्यावर विशेषांक आले आहेत. हा अंक यदुनाथांवरील विशेषांक करून एक टप्पा पूर्ण केला आहे. यदुनाथांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

विशेष सूचना :

यदुनाथांनी लहान-मोठी अशी सव्वाशे पुस्तके लिहिली असावीत, असा अंदाज इतरांनी व त्यांनी स्वत:ही व्यक्त केला आहे. मात्र सध्या त्यांची जेमतेम आठ-दहा पुस्तके उपलब्ध आहेत. उर्वरित अनेक पुस्तकांच्या प्रतीही क्वचित काही ग्रंथालयात उपलब्ध आहेत. प्रकाशक माहीत नाहीत किंवा बंद पडले आहेत, अशी अवस्था त्यातील बहुतांश पुस्तकांची आहे. त्या सर्व पुस्तकांची सूची करण्याचे काम नाशिकचे डॉ.नागेश कांबळे यांनी हाती घेतले आहे. त्यांना आतापर्यंत 106 पुस्तकांचा शोध लागला आहे. ती संपूर्ण यादी उशिरा हाती आल्यामुळे आणि अंकाची सहा पाने होईल इतकी मोठी असल्याने या विशेषांकाच्या छापील अंकात घेता आलेली नाहीत. मात्र या अंकाची सॉफ्ट कॉपी (पीडीएफ) weeklysadhana.in  या वेबसाईटवर आहे, त्यात ही संपूर्ण यादी समाविष्ट केली आहे. अभ्यासकांना तिचा उपयोग करून घेता येईल.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Rare information- 27 Oct 2021

    I have seen Yadunath Thatte in my college days listened him It's a revision for us in our 60s

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके