डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हम है नये, अंदाज क्यूँ हो पुराना?

या अंकाला विषय म्हणून मध्यवर्ती सूत्र किंवा कल्पना असे काही नाही. पण तरीही या अंकातील सर्व लेखांना जोडणारा सयान धागा आहे.  तो म्हणजे, या सर्व नऊ युवकांच्या लेखनातून सामाजिक भान व मूलभूत काम करण्याची ऊर्मी यांचे दर्शन घडते. या अंकातील लेख 17 ते 34 या वयोगटातील तरुणांनी लिहिले आहेत. हे सर्व युवक वेगवेगळ्या क्षेत्रांतील आहेत, पण ते त्या त्या क्षेत्रांतील तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारे नाहीत. त्यांनी चाकोरी मोडलेली नसली तरी ते चाकोरीत अडकलेलेही नाहीत. हे सर्व जण आपापल्या क्षेत्रात अतिशय गांभीर्याने वेगळे काही करू इच्छितात.

पंचविसाव्या युवक दिनाच्या (12 जानेवारी) पार्श्वभूमीवर हा अंक प्रकाशित होत असला तरी, हा अंक नियोजनपूर्वक तयार केलेला नाही. या अंकासाठी लेखक व विषय तर ठरवलेले नव्हतेच, पण असा अंकही काढायचे ठरवले नव्हते. यागील महिनाभरात चार युवकांचे लेख ‘साधना’कडे आले, तेव्हा युवकदिनाच्या निमित्ताने अंकात एक विभाग करण्याचे ठरवले, आणि त्यासाठी आणखी पाच युवकांना ‘तुम्हांला महत्त्वाचं वाटतं असं काहीतरी सांगा’ असे सुचवले. त्यांच्याकडून आलेले लेख वाचून संपूर्ण अंकच युवक दिनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्याचे ठरवले.

या अंकाला विषय म्हणून मध्यवर्ती सूत्र किंवा कल्पना असे काही नाही. पण तरीही या अंकातील सर्व लेखांना जोडणारा सयान धागा आहे.  तो म्हणजे, या सर्व नऊ युवकांच्या लेखनातून सामाजिक भान व मूलभूत काम करण्याची ऊर्मी यांचे दर्शन घडते.

या अंकातील लेख 17 ते 34 या वयोगटातील तरुणांनी लिहिले आहेत. हे सर्व युवक वेगवेगळ्या क्षेत्रांतील आहेत, पण ते त्या त्या क्षेत्रांतील तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारे नाहीत. त्यांनी चाकोरी मोडलेली नसली तरी ते चाकोरीत अडकलेलेही नाहीत. हे सर्व जण आपापल्या क्षेत्रात अतिशय गांभीर्याने वेगळे काही करू इच्छितात.

संकल्प आणि विनायक तर अनुक्रमे सतरा-अठरा वर्षांचे आहेत, म्हणजे आता कुठे  त्यांना ‘युवक’ हे संबोधन लावता येईल. त्यांनी महात्मा गांधी व चेतन भगत या ‘आयडॉल्स’च्या संदर्भातून जे लिहिलेय, ती कोवळ्या वयातील परिपक्वतेची खूण आहे.

गणपत या मित्राविषयी दीपकने लिहिलेला लेख प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या कोणालाही ऊर्जा तर देईलच, पण गणपतच्या समाजनिष्ठ असण्याचे अधिक कौतुक करील. अशोकने सांगितलेला अनुभव तळागाळातील दाहक वास्तव अधोरेखित करणारा आहे. नीलेशने त्याच्या लेखातून आजच्या तरुणाईवर टाकलेले कवडसे, अंतर्मुख करणारे आहेत. हमीद आणि चंद्रशेखर यांनी राजकीय-सामाजिक क्षेत्रांत काम करू पाहणाऱ्यांपुढे मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रसन्न आणि स्नेहा यांनी अगदीच वेगळ्या क्षेत्रांच्या सामर्थ्याकडे लक्ष वेधले आहे.

या सर्व युवकांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यांची मांडणी केवळ प्रामाणिक व मुद्देसूद नसून, बांधेसूद आहे. त्यात काट-छाट करायला जवळपास वाव नव्हता! ही अभिव्यक्ती इतर तरुणाईला अंतर्मुख करणारी ठरू शकेल आणि मोठ्या माणसांना स्वत:चे विचार तपासून घ्यायला उद्युक्त करील. या युवकांच्या क्षमता पाहता, समाजात असे अनेक युवक आहेत, हे तर उघडच आहे. त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर विकास कसा होईल आणि त्यांना कसे जोडता येईल हा खरा प्रश्न आहे. श्री.म. माटे यांचा 50 वर्षांपूर्वीचा लेख पुनर्मुद्रित करण्यामागे तरुणाईच्या प्रचंड क्षमतेचे भान अधोरेखित करण्याची सूचकता आहे.

पुणे शहरातील ‘रेडिओ सिटी’ आणि ‘रेडिओ मिर्ची’ या स्टेशन्सवर रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत,काही गाणी पुन्हा पुन्हा ऐकवली जातात. गेल्या सहा महिन्यांपासून, ‘दिल चाहता है’ या दहा वर्षांपूर्वीच्या हिंदी सिनेमातील  ‘हम है नये, अंदाज क्यूँ हो पुराना’ हे गाणे तर रोज दोन-तीन वेळा ऐकवले जाते. जावेद अख्तर लिखित या गाण्यात तरुणाईचा जोश आणि आवेश तर आहेच, पण तारुण्याची खास लक्षणेही आहेत. ‘हम है नये, अंदाज क्यूँ हो पुराना’ हे गाणे चित्रपटाच्या कथानकात तितकेसे समर्पक वाटत नाही; कारण हा ‘अंदाज’, वर्तन व विचार या दोहोंशी संबंधित आहे. मागच्या पिढीपेक्षा वेगळा विचार करणे, वेगळे नीतीनियम बनवणे आणि कालसुसंगत बदल करताना जुन्या रूढी-परंपरा मोडून काढणे, हे तारुण्याचे प्रमुख लक्षण असते. त्यामुळे ‘अंदाज’ पुराना नसलेल्या युवकांना विचार करण्याचा व ते व्यक्त करण्याचा आनंद पुरेपूर उपभोगायला मिळतो, तेव्हा तो तारुण्याचा सर्वांत मोठा सन्मान असतो. तरुणाईचा असा सन्मान करण्यात ‘साधना’ला आनंदच वाटेल!

Tags: संपादकीय विशेषांक युवा अभिव्यक्ती अंक युवा संपादकीय sampadakiy young writers yuva abhivyakti ank editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके