Diwali_4 पहिल्याशी तुलना होणारच!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

या वर्षी एक पुढचे पाऊल टाकायचे ठरवले होते; ते असे की, नवे दालन खुले करून देणारे किंवा दृष्टिकोनाला नवे आयाम बहाल करणारे असे लेख असले पाहिजेत. त्याप्रमाणे अंक जुळवून आणला आहे, पण वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. या अंकात एकूण सात लेख आहेत. रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुस्तकात ज्या 19 भारतीयांची ओळख करून दिली आहे, त्यात हमीद दलवाई यांचा समावेश केला आहे. आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी (20 ऑगस्ट 2015) साधनाचा हमीद दलवाई विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हमीद दलवाईंची एक कथा आणि डॉ.हमीद दाभोलकर यांचा लेख युवकांसमोर आणणे आवश्यक वाटले.

साधना साप्ताहिकाच्या हीरकमहोत्सवी वर्षापासून, म्हणजे 2008 पासून साधनाचा बालकुमार दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती, सुलभ व जलद वितरण आणि तरीही किंमत कमी, अशा प्रकारचा तो अंक मागील सहा वर्षांत सरासरी साडेतीन लाख प्रती इतक्या मोठ्या प्रमाणात वितरित झाला आहे. त्या अंकाला सातत्याने मिळत गेलेले यश आणि वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी त्याची उपयोगिता याविषयी महाराष्ट्रातील जाणकार वाचकांना बऱ्यापैकी माहिती आहे, त्यामुळे त्याविषयी इथे काही सांगण्याची आवश्यकता नाही.

पण बालकुमार अंकाचीच चुत:सूत्री वापरून व उद्दिष्टे समोर ठेवून मागील वर्षी (2014) पहिला युवा दिवाळी अंक प्रसिद्ध केला. संपूर्ण बहुरंगी असा 60 पानांचा तो अंक प्रकाशनपूर्व सवलतीत फक्त 20 रुपयांत उपलब्ध करून दिला आणि त्याच्या जवळपास पाऊण लाख प्रती महाराष्ट्राच्या तरुणाईपर्यंत पोहोचवल्या. तो अंक इतका लोकप्रिय ठरला की, काही हितचिंतकांनी थोड्याशा काळजीच्या सुरात आम्हाला प्रश्न विचारला होता, ‘अरे, हा अंक इतका चांगला झालाय, पण पुढच्या वर्षी काय करणार?’ म्हणजे तसा अंक पुन:पुन्हा काढता येत नसतो, असा त्या चिंतेचा सारांश होता. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी गेल्या वर्षीचा अंक वाचला होता, त्यांच्या हातात हा अंक पडला तर... तर या अंकाची ‘त्या’ अंकाशी तुलना होणारच! त्या अंकाच्या तुलनेत हा अंक कसा व किती कमी पडला, अशा प्रकारची प्रतिक्रिया काही वाचकांकडून येईल; तर गेल्या वर्षीपेक्षा हा अंक कशा प्रकारे व किती वेगळा आहे, अशी प्रतिक्रिया काही वाचकांकडून येईल. अर्थात, जे काही आमच्यापर्यंत येईल, ते आम्ही पुढच्या वर्षीच्या युवा अंकाच्या संपादकीयात सांगून मोकळे होऊ.

पण गेल्या वर्षीचा व या वर्षीचा युवा अंक तयार करताना आमचे मानस कोणत्या प्रकारचे होते, याबाबत थोडेसे सांगणे आवश्यक वाटते. गेल्या वर्षी पहिलाच युवा दिवाळी अंक तयार करीत असताना, अंक कमालीचा वाचनीय (हायली रिडेबल) झाला पाहिजे, हा विचार केंद्रस्थानी होता. त्यामुळे केवळ लेखकाचे नाव वाचून  किंवा केवळ लेखाचे शीर्षक वाचूनसुद्धा लेख वाचावा असे वाटायला हवे अशी ती भूमिका होती. त्यामुळे, त्या अंकाला मिळालेला प्रतिसाद अपेक्षितच होता. या वर्षी एक पुढचे पाऊल टाकायचे ठरवले होते; ते असे की, नवे दालन खुले करून देणारे किंवा दृष्टिकोनाला नवे आयाम बहाल करणारे असे लेख असले पाहिजेत. त्याप्रमाणे अंक जुळवून आणला आहे, पण वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. या अंकात एकूण सात लेख आहेत. रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुस्तकात ज्या 19 भारतीयांची ओळख करून दिली आहे, त्यात हमीद दलवाई यांचा समावेश केला आहे. आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी (20 ऑगस्ट 2015) साधनाचा हमीद दलवाई विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हमीद दलवाईंची एक कथा आणि डॉ.हमीद दाभोलकर यांचा लेख युवकांसमोर आणणे आवश्यक वाटले.

ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते सदाशिव अमरापूर यांचे गेल्या वर्षीच्या दिवाळीत निधन झाले, त्यांची कन्या ‘रिमा’ हिने लिहिलेले पत्र या अंकात आहे. आशुतोष कोतवाल या अमेरिकास्थित वैज्ञानिकाची आई माणिक कोतवाल आशुतोषच्या वाटचालीवर चरित्रमय पुस्तक लिहीत आहेत. ते पुस्तक पुणे येथील राजहंस प्रकाशनाकडून प्रसिद्ध होणार आहे. त्यातील एक प्रकरण या अंकात घेतले आहे. त्यामुळे मुलीने पित्याविषयी आणि आईने मुलाविषयी अशा प्रकारचे लेख रिमा व माणिकताई यांचे आहेत. अमेरिकेत भारताचे कौन्सल जनरल असलेले ज्ञानेश्वर मुळे यांनी न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कविषयी लिहिलेला हा लेख अंतर्मुख करायला लावणारा आहे.

तर विवेक सावंत यांनी लिहिलेला लेख विज्ञान व समाजजीवन, माणूस आणि यंत्र यांच्यातील नात्यांचा नव्याने विचार करायला प्रवृत्त करणारा आहे आणि कुमार संगकारा नुकताच निवृत्त झालेला आहे, त्याचे हे भाषण क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम मानले जाते; भारताचा शेजारी असलेला श्रीलंका हा देश व श्रीलंकेतील समाजजीवन यांची ते नव्याने ओळख करून देते.

Tags: प्रेरक युवा दिवाळी अंक 2015 संपादकीय inspirational articles yuwa Diwali ank 2015 editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात