या वर्षीच्या युवा अंकात एकूण सात लेख आहेत. त्यातील पहिला व शेवटचा हे दोन लेख अनुक्रमे रझिया पटेल व डॉ.नरेंद्र दाभोलकर या चळवळीच्या आघाडीवर लढणारांचे आहेत, सामाजिक बदलांना गती देण्यासाठी काय लागते, ते बदल कसे होतात, होऊ शकतात हे साधे पण कठीण सत्य त्या दोघांनी अधोरेखित केले आहे. मधले पाचही लेख अनुवादित आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. गेली 68 वर्षे साधनाची ओळख एक ध्येयवादी व परिवर्तनवादी नियतकालिक अशी राहिली आहे. गुरुजींच्यानंतर आचार्य जावडेकर ते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यापर्यंतच्या संपादकांनी अनेक लेखक-वाचक-हितचिंतक यांच्या मदतीने साधनाची वाढ व विस्तार केला आहे. या सर्व काळात भारतीय संविधानाशी सुसंगत भूमिका घेत, राजकीय- सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील विश्लेषक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध होत आले आहे. या प्रक्रियेत साधना हे ‘क्लास’साठीचे नियतकालिक राहिले आहे, पण हा असा क्लास आहे जो ‘मास’साठी काम करतो.
या ‘क्लास’मध्ये उपेक्षित, शोषित, वंचित घटकांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत; तसेच साहित्य, पत्रकारिता, शिक्षण या क्षेत्रांत कार्यरत असणारे अभ्यासकही आहेत. अशा या साधना साप्ताहिकाने हीरकमहोत्सवी वर्षापासून (2008) गुणात्मक व संख्यात्मक या दोनही प्रकारची वाढ एकाच वेळी होणार असेल तरच त्याला ‘विकास’ ही संज्ञा बहाल करता येईल, अशी भूमिका घेऊन काही उपक्रम राबवायला सुरुवात केली. त्यातील सर्वांत महत्त्वाचा व सर्वांत यशस्वी उपक्रम म्हणून बालकुमार दिवाळी अंकाचा उल्लेख करावा लागेल. आतापर्यंतच्या नऊ वर्षांत दरवर्षी सरासरी तीन लाख प्रती इतक्या मोठ्या प्रमाणात बालकुमार अंक (दहा ते पंधरा वर्षे वयोगटासाठी) वितरीत झाला आहे आणि अर्थातच आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती, तरीही किंमत कमी या त्रिसूत्रीचा अवलंब करून हे यश मिळवले आहे.
त्यानंतर 2014 पासून साधनाने 16 ते 25 वर्षे वयोगटासाठी युवा दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात केली. मागील दोन वर्षे आणि चालू वर्षीही या अंकाच्या 50 हजारांपेक्षा जास्त प्रती वितरित झाल्या आहेत. अर्थातच युवा अंकासाठीही बालकुमार अंकाला वापरलेल्या त्रिसूत्रीचाच अंगिकार केला आहे. वाचकांना विचारप्रवृत्त करणारे, त्यांच्या कक्षा रूंदावणारे व त्यांच्या दृष्टिकोनाला नवे आयाम देऊ शकणारे असे लेखन या अंकांसाठी निवडले जाते. या वर्षीच्या युवा अंकात एकूण सात लेख आहेत. त्यातील पहिला व शेवटचा हे दोन लेख अनुक्रमे रझिया पटेल व डॉ.नरेंद्र दाभोलकर या चळवळीच्या आघाडीवर लढणारांचे आहेत, सामाजिक बदलांना गती देण्यासाठी काय लागते, ते बदल कसे होतात, होऊ शकतात हे साधे पण कठीण सत्य त्या दोघांनी अधोरेखित केले आहे. मधले पाचही लेख अनुवादित आहेत.
त्यातील आँग सान सु की यांच्या भाषणात विद्यापीठातील ‘कँपस लाइफ’ मुला-मुलींना काय देत असते/देऊ शकते हे अतिशय सूक्ष्म नजरेने टिपले आहे. दोन दशके स्थानबद्ध राहिलेल्या सू की यांना स्वातंत्र्याचे आणि सर्जनशीलतेचे खरे मोल व महत्त्व कळले आहे, हेच त्यातून सूचित होते आहे. रघुराम राजन यांचे भाषण सू की यांच्याच भाषणातील सूत्र पुढे घेऊन जाते आणि उदारमतवादी व विकासोन्मुख मने घडवण्यासाठी दोन मूलभूत धडे देते आहे. त्यानंतरचा रामचंद्र गुहा यांचा लेख ‘उष:काल होता होता काळरात्र आली’ या काव्यपंक्तीचा आशय पुढे करून, नव्या पिढीला सावध करीत आहे. मोनिका लुईन्स्कीचे भाषण वाचायला घेताना कुतूहल जास्त असेल, पण ते वाचून झाल्यावर कोणताही वाचक अंतर्मुख होईल. आणि इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ 19 नोव्हेंबरपासून होत आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांची मुलाखत आजच्या तरुण पिढीला आपला राजकीय वारसा जाणून घेण्यास प्रवृत्त करील.
कोणाही वाचकाला हा अंक जरा अधिक गंभीर व राजकीय-सामाजिकतेकडे अधिक झुकलेला असा वाटणार हे उघड आहे. कदाचित हा अंक लोकल कमी आणि ग्लोबल जास्त आहे, असेही बहुतेकांना वाटेल. पण आजच्या तरुण पिढीच्या हातात मोबाईल, इंटरनेट, टीव्ही चॅनेल्स ही माध्यमे आहेत, त्यांच्याद्वारे आपली साधी वाटणारी तरुणाईही ‘ग्लोबल’तेचा अर्धवट अनुभव घेत आहे... तो अनुभव पूर्णत्वाच्या दिशेने जाण्यासाठी हा अंक, एक उपयुक्त पाऊल ठरेल की नाही?
Tags: युवा दिवाळी अंक संपादकीय संपादक विनोद शिरसाठ yuwa diwali an editorial editor vinod shirsath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या