डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लालूप्रसादच्या राजकीय यशाचा हा पाया होता व आहे. आता एका बाजूला वरिष्ठ जातीचे, वर्गाचे हल्ले चालू, मग्रुरी कायम आणि त्यांच्या पुंडाव्यामुळे दलितांना तुलनेने आपले वाटणारे सरकारही बरखास्त- अशी ही राजकीय खेळी आहे.

चंपारण्यातील लढ्‌यात ज्या बिहारमध्ये अभूतपूर्व तेज प्रकट झाले, लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी जेथून संपूर्ण क्रांतीचा नारा दिला, तो बिहार आज रणबीर सेनेच्या नरसंहारात होरपळत आहे. बिहारच्या जेहानाबाद जिल्ह्यातील शंकरबिघा गावच्या 23 दलितांचे बळी जमीनदारांच्या बेकायदा रणवीर सेनेने या वर्षीच्या प्रजासत्ताकाच्या आदल्या दिवशीच घेतले आणि त्याच जिल्ह्यात त्याच कुप्रसिद्ध सेनेने नारायणपूर या गावी पंधरा दिवसांत बारा दलितांचा बळी घेतला. पहिले हत्याकांड हे संबंधित दलित डाव्या अतिरेकी सेनेचे पाठीराखे आहेत, या सुडातून झाले. दुसऱ्या संहाराची पार्श्वभूमी जमिनीची आहे. जमिनीचे तंटे वर्षानुवर्षे चालतात. सावनबिघा हे असेच एक प्रकरण, ते अजून न्यायालयात आहे. तेथे हवा तसा न्याय मिळवण्यासाठी त्यातील तीन साक्षीदारांच्या मागावर रणवीर सेनेचे हल्लेखोर होते. ते सापडले नाहीत म्हणून हल्लेखोरांनी या साक्षीदारांच्या कुटुंबीयांना ठार केले. 

बिहारचे पोलीस प्रमुख श्री. के. ए. जेकब यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा सूड घेण्याचा एक मार्ग म्हणून ‘रणवीर सेने’ने दलितांची हत्या केली असे सांगितले. मध्य व दक्षिण बिहारातील या दोन परस्परविरोधी सेनांमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी सुरू असलेली रक्तरंजित लढाई असा पठडीबाज दृष्टिकोन जेकब यांचा आहे. केन्द्रीय पाहणी पथकाचे प्रमुख गृहखात्याचे विशेष सचिव कपूर यांनी पत्रकारांना मुलाखत देऊन जमीन सुधारणा, सामाजिक सुधारणा यांचा कार्यक्रम अमलात आणला गेला नसल्याने दलितांवर हल्ले होतात असा निष्कर्ष सांगितला. मात्र या सर्व प्रकारांमागे हितसंबंधांची जी गुंतागुंत व व्यापक राजकारण आहे त्याची जाण दोघांच्याही निवेदनात आढळत नाही.

राबडीदेवी सरकारला पोलिसांना वठणीवर आणता आले नाही. हा त्यांचा नाकर्तेपणा आहेच, पण बिहारची यंत्रणा ही नेहमीच वरिष्ठ जाती व जमीनदार यांना मिलीजुली राहिली आहे. बिहारमध्ये अगदी अलीकडेपर्यंत वेठबिगारी होती. मामुली कर्जासाठी जन्मभर राबावे लागे. डाव्या चळवळीने याला छेद दिला. पण जमीनदारी अजूनही प्रभावी आहे. कष्टकऱ्यांना जमीन कसता येत नाही. या शोषणाला पुन्हा जातीचा एक जबर तिढा आहे. 1850 मध्ये रजपूत या कनिष्ठ जातीविरोधी भूमिहार या वरिष्ठ जातीचा संघर्ष रणवीर चौधरीने केला.

भोजपूर जिल्ह्यातील बेलूर या आपल्या गावातून रजपूतांना दहशत बसवून पळवून लावले. भूमिहारांनी या रणवीर चौधरीच्या नावाने रणवीर सेनेची स्थापना सप्टेंबर 1995 मध्ये केली. आज मात्र बेलूर व त्याच्या शेजारच्या गावात मार्क्सवादी-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव वाढला आहे. दलित आपल्या हक्कांविषयी जागरूक बनून जमिनीची मागणी करत आहेत. मार्क्सवादी-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेलूर गावाच्याच सिद्धनाथ राय या भूमिहार जमीनदाराचा खून करून त्याची जमीन दलितांना वाटून टाकली. दलितांची जमिनीच्या हक्काची ही जागृती वेळीच मोडून काढली नाही तर जमिनीच्या फेरवाटपाची मागणी जोर पकड़ेल. सरकार आपली जमीन काढून घेईल असे होऊ नये म्हणून बेलूरचे भूमिहार जमीनदार हरिकरन चौधरी याने रणवीर सेनेची स्थापना केली. दलितांना पळवून लावण्याचे व शक्य तर त्यांचा निर्वंश करण्यावे या सेनेचे उद्दिष्ट आहे.

जमीनदारांचीच सेना असल्याने त्यांच्याकडे मुबलक पैसा व त्यातून येणारी अत्याधुनिक शस्त्रे आहेत. या मूळ मुद्याला स्पर्श न करता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. सुंदरसिंग भंडारी हे राज्यपाल. त्यांनीच नारायणपूर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून राबडीदेवींनी राजीनामा द्यावा असे राजकीय नेत्यासारखे विधान स्वतः केले. राबडीदेवी असे सांगतात की, निमलष्करी दलाची मदत मागूनही ती वेळेवर दिली गेली नाही. रणवीर सेनेमार्फत माझे सरकार बरखास्त करण्यासाठी हा कट भाजपाने घडवून आणला. भाजपा व समता पार्टी यांना वाटते, की राबडीदेवीचे सरकार बरखास्त झाल्याने आता बिहार सुटकेचा निःश्वास टाकेल. या पक्षांनी काँग्रेसलाही या कृत्याला अप्रत्यक्ष जबाबदार धरले आहे. कारण त्यांचा राबडीदेवी सरकारला पाठिंबा आहे. सोनिया गांधी यांच्या मते सत्तेवर राहण्याला नैतिक हक्क बिहार सरकारने गमावला होता. पण बरखास्तीबद्दल त्या मौन बाळगतात. डाव्या पक्षाच्या मते ही बरखास्ती अयोग्य आहे. प्रत्येक जण आपापल्या राजकीय हिशोबातून घटनेकडे पाहत आहे. या हत्येमागे राजकारण तर आहेच. ते व्यापक हितसंबंधांचे आहे आणि हितसंबंधांच्या मागे संघटित ताकद राजकीय पक्षांची असू शकते म्हणून त्यांचेही आहे.

गुजरातमध्ये ख्रिश्वनांवर हल्ले झाले. सरकार ज्यांचे त्यांच्याशी संबंधित संघटनांनी हल्ले केल्याने अडचणी निर्माण झाल्या. मग गुजरातचे हल्ले थांबले व ओरिसात पद्धतशीर वाटावे या प्रकारे चालू झाले. हे आपोआप झाले काय? याबरोबरच बिहारमध्ये दलितांना दहशत बसावी अशी हत्याकांडे घडली. खरे तर केन्द्रीय गृहसचिव यांनी शंकरबिघा पाहणीनंतर आणखी एका हल्ल्याची शक्यता स्पष्टपणे वर्तवली होती. पण आपला अहवाल त्यांनी 10 ते 12 दिवस होऊन गेले तरी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना दिला नाही. पुढच्या कारवाईचे आदेश संभाव्य हल्ला लक्षात घेऊनही देण्यात आले नाहीत ही अकार्यक्षमता संशयास्पद आहे. राबडीदेवीचे सरकार अनेक चुका करतच होते. पण बिहारमधील दलितांना लालूप्रसाद यादवच्या रूपाने आपल्या आत्मसन्मानाची ओळख पटत होती.

लालूप्रसादच्या राजकीय यशाचा हा पाया होता व आहे. आता एका बाजूला वरिष्ठ जातीचे, वर्गाचे हल्ले चालू, मग्रुरी कायम आणि त्यांच्या पुंडाव्यामुळे दलितांना तुलनेने आपले वाटणारे सरकारही बरखास्त- अशी ही राजकीय खेळी आहे. राज्यात होणाऱ्या हत्यांमुळे ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांचे पद गेले. तर राबडीदेवीचे बिहारमधील सरकार बरखास्त झाले. दोन्ही राज्यांतील या हत्यांबद्दल त्या राज्यातील मुख्यमंत्री खरोखरच किती जबाबदार आहेत याची चर्चा आणि तपासणी काही काळ सुरू राहील. सत्तेवर असलेल्यांना हाकलण्यासाठी राज्यात हत्या घडवून आणण्याचा नवा पायंडा या दोन्ही राज्यांतील घटनांनी पाडला आहे का ही शंका अगदीच निराधार नाही.

ओरिसा आणि बिहार या राज्यांत भाजपाची सरकारे नव्हती तेथे कारवाई झाली आणि गुजरातमध्ये झाली नाही, याची नोंद केली जाईलच. कुणाविरुद्धही ही पद्धती विधिनिषेधशून्य राजकारणात उघड वापरली जाईल हा मोठा धोका आहे. रणवीर सेनेला कागदोपत्री बंदी आहे, पण ती त्यांनी कस्पटासमान मानली आहे, सेनेचा प्रमुख बाहेर आहे. तो आणि त्याचे सहकारी यांना हुडकणे, सर्वांची शस्त्रे काढून घेणे आणि दलितांना जीवित-वित्ताची हमी देणे हे काम सुंदरसिंग भंडारी यांना करावयाचे आहे. रणवीर सेनेला भाजपाचा वरदहस्त आहे असे बोलले जाते. तो असो वा नसो, पण या सेना मूठभर 'आहे रे' वर्गाच्या हिंसक सेना आहेत. वर्गवर्ण्य वर्चस्वाचे ते रक्तरंजित नागडेउघडे चित्र आहे. भंडारी यांच्या हातात सत्ताकेन्द्र आल्यानंतर यात काय बदल होतो ते पाहायचे. बिहारच्या दुःस्वप्नाचा शेवट होणे आवश्यक आहे. अन्यया ते दुःस्वप्न शेवटी भारतीय लोकशाहीचा शेवटचा श्वास ठरेल.

Tags: लालुप्रसाद राबडीदेवी रणवीर सेना शोषितांवर अन्याय बिहारचे राजकारण राजकीय laluprasad rabadidevi ranveer sena injustice to minors politics of bihar political weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके