डॉ.दाभोलकरांनी गेली 15 वर्षे ‘साधना’ची धुरा सांभाळताना, मनुष्यबळाची व साधनांची आणि साध्यसाधनविवेकाची घडी अशी बसवून दिली होती की, साधना साप्ताहिक अमृतमहोत्सवी वर्षांपर्यंतचा प्रवास सहज करू शकेल. डॉक्टरांपाठोपाठ अण्णा धारिया गेल्यामुळे आमचा आधार आणखीच कमी झाला आहे हे खरे, पण कार्यकारी विश्वस्त आप्पासाहेब सा.रे.पाटील व विश्वस्त सचिव हेमंत नाईकनवरे आणि अन्य विश्वस्तांनी आवश्यक ती ‘ताकद’ साधनाच्या मागे उभी केली आहे. दरवर्षी दिवाळी अंकासाठी अर्ध्या जाहिरातींचा वाटा आप्पासाहेब उचलत आले आहेत, या वर्षी त्यांनी आपला वाटा दोनतृतीयांश केला आहे. आणखी कितीतरी मित्र, हितचिंतक पुढे आले आहेत, येत आहेत आणि सहकार्याचा व मदतीचा हात पुढे करीत आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रतिकूलता, टीका-टिप्पणी व आव्हानांचा सामना करीत साधना साप्ताहिक पुढे पुढेच जात राहील!
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली त्याला आता सत्तर दिवस होऊन गेले आहेत. अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. त्या संदर्भातील आमच्या भावना आता दिवाळीच्या काळात तरी व्यक्त करण्याचे आम्ही टाळत आहोत. पण तरीही आमच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील लाखो लोकांना या वर्षीची दिवाळी साजरी करण्यात आनंद वाटणार नाही. त्यामुळे ‘दिवाळीच्या शुभेच्छा’ हे शब्द औपचारिकता म्हणून उच्चारण्यालाही काही अर्थ नाही.
गेल्या पंधरा वर्षांतील साधनाच्या नव्या-जुन्या वाचकांना डॉ.दाभोलकरांची खूपच सवय झाली होती, भले ते साधनातून लिहीत असोत वा नसोत! याचे कारण त्यांची भाषणे, मुलाखती, वृत्तपत्रांतील बातम्या व दूरचित्रवाहिन्यांवरील छोटे-मोठे बाईटस् यांच्याद्वारे साधनाच्या वाचकांना डॉक्टरांचे दर्शन या ना त्या स्वरूपात होत होते. या पार्श्वभूमीवर, ते गेल्यानंतर ‘साधना’चे दहाही अंक वेळेवर आणि यथायोग्य पद्धतीने छापायला जाऊन त्यांचे वितरण होत असूनही एक प्रकारचे रिकामेपण आम्ही अनुभवत होतो. या काळात त्यांची कमतरता आम्हाला ठायी-ठायी जाणवत होती, यात विशेष असे काही नाही. पण या काळातील प्रत्येक छोट्या-मोठ्या यशाच्या क्षणी त्यांची आठवण जास्त होत होती आणि त्यामुळे त्या यशाचा आनंदही घेता येत नव्हता.
बालकुमार दिवाळी अंकाची वितरण मोहीम आणि मुख्य दिवाळी अंकाची जाहिरात मोहीम, या दोनही मोहिमा डॉक्टरांच्या दृष्टीने ‘मोठे यश’ म्हणावे अशा आहेत. आपल्या अनुपस्थितीत आपल्या लोकांनी चोख काम केले तर त्याचा होणारा आनंद डॉक्टरांना सर्वोच्च दर्जाचा वाटत होता, हे अशा प्रसंगी लक्षात येते आणि मग एक वेगळ्याच प्रकारची उदासी दाटून येते. म्हणजे त्यांच्या नसण्यामुळे येणारे अडथळे किंवा मर्यादा यांची खंत एका बाजूला आणि मिळालेल्या यशानंतरची उदासी दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून बाहेर पडायला किती काळ लागेल हे कळावयास मार्ग नाही.
‘शोध आणि बोध’, ‘वेग आणि वेध’, ‘मागोवा आणि कानोसा’ अशा तीन ‘थीम’ घेऊन मागील तीन दिवाळी अंक साधनाने काढले होते. या वर्षी ‘गाभा आणि आवाका’ अशी थीम घेऊन अंक काढायचा विचार होता, त्याप्रमाणे नियोजनाला सुरुवातही झाली होती. पण डॉक्टरांची हत्या झाल्यानंतर सारीच समीकरणे बदलून गेली आणि म्हणून या वर्षी ती ‘थीम’ घेऊन दिवाळी अंक काढायचा विचार सोडून दिला. पण तरीही, या दिवाळी अंकात दोन विभाग जुळून आले आहेत. पहिला विभाग तर डॉक्टरांच्या संदर्भातील लेखनाचा आहे. (म्हणून अंकाच्या मुखपृष्ठावरही त्यांचा 60 वर्षांपूर्वीचा फोटो घेतला आहे.) या विभागातील लेखनातून डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचे बरेच पैलू पुढे आले आहेत. अर्थातच अनेक पैलू उघड होणे बाकी आहे. दुसऱ्या विभागातील पाचही लेखांत एक प्रकारचे अंतर्गत सूत्र आहे. या पाचही लेखांचे विषय व त्यातींल छायाचित्रे पहिली तरी त्यांत काही समान धागे असल्याचे लक्षात येईल.
या दोन विभागांच्या बरोबरच ‘साधना विशेष’ या विभागातील चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे यांच्या मुलाखतीतून हीरकमहोत्सवानंतरच्या साधनाच्या सर्वाधिक यशस्वी मोहिमेवर व साने गुरुजींना सर्वाधिक अगत्य होते त्या विषयावर काही कवडसे पडले आहेत. ही मुलाखत प्रसिद्ध करण्याचे मुख्य कारण, साधनाच्या बालकुमार अंकाचा एक टप्पा पार झाला आहे. पहिल्या वर्षी ज्या पाचवीच्या मुलांनी हा अंक खरेदी केला होता ती मुले आता अकरावीत जाणार आहेत... आणि म्हणून (पूर्वी ठरल्याप्रमाणे) आम्ही पुढील वर्षी ‘युवा दिवाळी अंक’ सुरू करणार आहोत. बालकुमार अंकाच्या जवळपास दुप्पट पानांचा व संपूर्ण रंगीत असा युवा दिवाळी अंक अवघ्या 20 रुपयांत उपलब्ध करून द्यायचा आणि एक लाख प्रतींचे उद्दिष्ट ठेवून त्याचे वितरण महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात करायचे असा संकल्प केला आहे. अर्थातच त्याला अनेकांनी साथ-संगत देऊ केली आहे.
डॉ.दाभोलकरांनी गेली 15 वर्षे ‘साधना’ची धुरा सांभाळताना, मनुष्यबळाची व साधनांची आणि साध्यसाधनविवेकाची घडी अशी बसवून दिली होती की, साधना साप्ताहिक अमृतमहोत्सवी वर्षांपर्यंतचा प्रवास सहज करू शकेल. डॉक्टरांपाठोपाठ अण्णा धारिया गेल्यामुळे आमचा आधार आणखीच कमी झाला आहे हे खरे, पण कार्यकारी विश्वस्त आप्पासाहेब सा.रे.पाटील व विश्वस्त सचिव हेमंत नाईकनवरे आणि अन्य विश्वस्तांनी आवश्यक ती ‘ताकद’ साधनाच्या मागे उभी केली आहे. दरवर्षी दिवाळी अंकासाठी अर्ध्या जाहिरातींचा वाटा आप्पासाहेब उचलत आले आहेत, या वर्षी त्यांनी आपला वाटा दोनतृतीयांश केला आहे. आणखी कितीतरी मित्र, हितचिंतक पुढे आले आहेत, येत आहेत आणि सहकार्याचा व मदतीचा हात पुढे करीत आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रतिकूलता, टीका-टिप्पणी व आव्हानांचा सामना करीत साधना साप्ताहिक पुढे पुढेच जात राहील!
Tags: संपादकीय हेमंत नाईकनवरे सा.रे.पाटील अण्णा धारिया युवा दिवाळी अंक गिरीश सहस्रबुद्धे बालकुमार दिवाळी अंक डॉ.नरेंद्र दाभोलकर साधना Editorial Hemant Naiknavre S R Patil Anna Dhariya Yuva Diwali Ank Girish Sahstrabuddhe Balkumar Diwali Ank Dr Narendra Dabholkar Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या