डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावरून

साधना साप्ताहिकाचा दिवाळी अंक हा पूर्वीपासूनच वर्गणीदार वाचक नसलेल्या वाचकांमध्येही विशेष दखलपात्र ठरत आलेला आहे. पण मागील चौदा वर्षे नियमितपणे बालकुमार दिवाळी अंक आणि मागील आठ वर्षे युवा दिवाळी अंकही प्रकाशित होत आला आहे. साहजिकच, मुख्य दिवाळी अंकाच्या पानांची संख्या आणि त्यातील मजकुराची विविधताही कमी होत गेलेली दिसेल. पण हे तीन दिवाळी अंक एकत्रित पाहिले आणि वर्षभरात प्रसिद्ध होणारे अन्य पाच-सात विशेषांक पाहिले तर लक्षात येईल- पूर्वीच्या तुलनेत अधिक आशय-विषय येत असून, विविधताही जास्त आहे. मात्र अलीकडच्या काळात साधनातून ललित साहित्याचा भाग कमी झालेला आहे, तो काही प्रमाणात वाढवण्यासाठी पुढील काळात वेगळे प्रयत्न करणार आहोत. साधनातील लेख अधिक शब्दसंख्येचे व गंभीर वैचारिक असतात, हा काही वाचकांच्या मनात दुरावा निर्माण करणारा प्रकार आहे. मात्र तसा आशय व तसे विषय प्रसिद्ध करण्यासाठीचे विचारपीठ म्हणून साधनाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते आशय-विषय पेलवू शकतील अशा ताकदीचे वाचकही साधनाकडे अन्य माध्यमसंस्थांच्या तुलनेत जास्त आहेत. प्रस्तुत दिवाळी अंकाकडेही त्या दृष्टीने पाहिले जावे अशी अपेक्षा आहे!

मागील दीड वर्षे संपूर्ण जगासाठी कोविड 19 ने केलेल्या वाताहतीचे होते. आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक या पाचही प्रमुख आघाड्यांवर जगाचे व त्या-त्या देशांचे नेमके किती व काय स्वरूपाचे नुकसान झाले हे स्पष्टपणे सांगायला अद्याप कोणीही मोठे  तज्ज्ञ व राज्यकर्ते पुढे येत नाहीत. आणि हे नुकसान भरून  कसे काढायचे; त्यासाठी किती काळ लागेल, याबाबत चर्चामंथन तर अद्याप बरेच दूर आहे. लहान-मोठ्या संस्था व संघटना यांच्याबाबतही कमी अधिक फरकाने अशीच स्थिती आहे. कारण कोरोना संकट संपले असे आजही ठोसपणे म्हणता येत नाही आणि तिसऱ्या लाटेची शक्यता अद्याप संपुष्टात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर साधनाचा हा अंक प्रकाशित होत आहे. मात्र यापूर्वी वेळोवेळी आम्ही साधनाच्या स्थिती गतीबद्दल वाचकांना अवगत केलेले आहे, तसेच आताही करणे आवश्यक वाटते. काहीशी पुनरावृत्ती झाली तरीही!

मागील दीड वर्षांत साधना साप्ताहिकाचे सर्व अंक त्या-त्या आठवड्यात नियमितपणे प्रकाशित होत राहिले आणि वर्गणीदार वाचकांना पाठवले गेले. फक्त पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी म्हणजे एप्रिल ते जुलै 2020 या चार महिन्यांत पोस्टखाते पूर्ण बंद होते (अंक स्वीकारत नव्हते) तेव्हाच आम्ही छापील अंक काढले नव्हते, केवळ डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध केले होते. मात्र पोस्टाचे व्यवहार सुरू झाल्यावर त्यानंतरच्या एकाच महिन्यात, आधीच्या चारही महिन्यांचे अंक ज्या वर्गणीदार वाचकांना हवेत त्यांना पाठवले होते आणि ज्यांना ते नको होते त्यांची वर्गणी संपण्याची मुदत चार महिन्यांनी पुढे ढकलली होती. त्यावेळी अनेकांनी आम्हाला असे सुचवले होते की, वर्गणी पुढे ढकलण्याची गरज नाही. कारण या काळात सर्वांचेच नुकसान झालेले आहे आणि साधनाने तर ऑनलाईन अंक काढून बहुतांश वर्गणीदार वाचकांपर्यंत पोहोचवले होते, शिवाय वेबसाईटवरही त्या-त्या आठवड्यात उपलब्ध करून दिले होते. मात्र आम्ही त्या निर्णयावर ठाम राहिलो याचे मुख्य कारण वर्गणीदार वाचकांशी साधनाचा करार आहे, तो छापील अंकासाठीचा! ही आठवण पुन्हा  करून देण्याचे कारण, अनेक वर्गणीदार वाचकांची वर्गणी खूप उशिरा आली, काहींची अद्याप आलेली नाही. हे सर्व साधनाचे हितचिंतकच आहेत, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आम्ही वेगवेगळ्या मर्यादांमुळे कमी पडलो हे खरे, पण त्यांच्या बाजूनेही अधिकची तत्परता व दक्षता घेणे अपेक्षित आहे.

मागील वीस महिन्यांच्या काळात साधनाने काढलेल्या एकूण 80 अंकांमध्ये 19 विशेषांक आहेत, त्यांच्यातील आशय-विषयांची विविधता किती आहे, हे ते अंक एकत्रित पाहिल्यावर लगेच कळेल. त्यातही या दोन्ही वर्षांचे बालकुमार व युवा अंक नुसतेच काढले असे नाही तर शक्य तेवढ्या मोठ्या प्रमाणात वितरित करण्यासाठीही आम्ही प्रयत्न केले. आणि त्यामुळेच, छापील अंक काढायचे की नाही अशी चर्चा सभोवताली चालू असताना आम्ही बालकुमार व युवा अंक,  गेल्या वर्षी अनुक्रमे 22 हजार व 10 हजार आणि या वर्षी अनुक्रमे 30 हजार व 14 हजार इतक्या प्रती छापून वितरित केले. मात्र या आघाडीवरही विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्र व वाचनसंस्कृती यांच्याशी निगडित घटकांची अनास्था किंवा मरगळ कितीही नाही म्हटले तरी जरा त्रासदायक वाटतेच!

दोन वर्षांपूर्वी  साधना साप्ताहिकाचे डिजिटल अर्काइव्ह तयार करायला सुरुवात केली. कोरोना काळ त्यासाठी इष्टापत्ती ठरला. आतापर्यंत तब्बल 44 वर्षांचे अर्काइव्ह पूर्ण झाले आहे, आगामी वर्षभरात उर्वरित 30 वर्षांचे काम पूर्ण झालेले असेल. म्हणजे साधना साप्ताहिकाचे अमृतमहोत्सवी वर्ष संपलेले असेल तेव्हा पूर्ण 75 वर्षांचे आर्काइव्ह वापरासाठी खुले झालेले असेल. असा व इतका मजकूर खूप मोठे श्रम व वित्त खर्च करून तयार होणे ही निश्चितच कोणासाठीही आनंदाची  बाब आहे. मात्र अशा सुलभ व जलद आर्काइव्हचा लाभ किती लोक घेतील हा आकडा अभिमानास्पद असेल का याची शंका आहेच!

साधना प्रकाशन हा विभाग तसे पाहिले तर स्वतंत्र नाही, साप्ताहिकाच्या अंतर्गत यंत्रणाच पुस्तकांची निर्मिती करते. त्या आघाडीवरही कोरोना काळातील सुरुवातीच्या आठ महिन्यांत आम्ही इतकी तयारी करून ठेवली होती की, नंतरच्या बारा महिन्यांत 30 पुस्तके प्रकाशित करू शकलो. (अर्थात त्यातील अर्धी पुस्तके खूप वर्षांपासून आऊट ऑफ प्रिंट असलेल्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या आहेत.) याशिवाय साधनाची सव्वाशे पुस्तके याच वर्षभरात इ-बुक स्वरूपात आणली आहेत. आणि साधना प्रकाशनाचे ऑडिओ बुक्सचे दालनही उघडले आहे. इथेही स्थिती तशी समाधानकारकच आहे; पण पुरोगामी महाराष्ट्रातील वितरणसाखळी इतकी कमकुवत आहे की, संकट येवो वा संधी तिच्यात सुधारणा तेवढी नावापुरतीच!

तर इथे ठळकपणे नोंदवायचा आहे तो मुद्दा हाच की, एखादी संस्था विशेष तत्परता दाखवून मर्यादित साधनसंपत्ती व मर्यादित मनुष्यबळ यासह काम करताना, आवश्यक पायाभूत  सुविधा निर्माण करून व बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून सातत्यपूर्ण  काम करीत राहिली तरी, आपले समाजमन व या समाजाची कार्यसंस्कृती पुरेशी प्रगल्भ नसेल तर परिणामकारकतेला मोठी मर्यादा येतेच! असो.

साधना साप्ताहिकाचा दिवाळी अंक हा पूर्वीपासूनच वर्गणीदार वाचक नसलेल्या वाचकांमध्येही विशेष दखलपात्र ठरत आलेला आहे. पण मागील चौदा वर्षे नियमितपणे बालकुमार दिवाळी अंक आणि मागील आठ वर्षे युवा दिवाळी अंकही प्रकाशित होत आला आहे. साहजिकच, मुख्य दिवाळी अंकाच्या पानांची संख्या आणि त्यातील मजकुराची विविधताही कमी होत गेलेली दिसेल. पण हे तीन दिवाळी अंक एकत्रित पाहिले आणि वर्षभरात प्रसिद्ध होणारे अन्य पाच-सात विशेषांक पाहिले तर लक्षात येईल- पूर्वीच्या तुलनेत अधिक आशय-विषय येत असून, विविधताही जास्त आहे. मात्र अलीकडच्या काळात साधनातून ललित साहित्याचा भाग कमी झालेला आहे, तो काही प्रमाणात वाढवण्यासाठी पुढील काळात वेगळे प्रयत्न करणार आहोत. साधनातील लेख अधिक शब्दसंख्येचे व गंभीर वैचारिक असतात, हा काही वाचकांच्या मनात दुरावा निर्माण करणारा प्रकार आहे. मात्र तसा आशय व तसे विषय प्रसिद्ध करण्यासाठीचे विचारपीठ म्हणून साधनाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते आशय-विषय पेलवू शकतील अशा ताकदीचे वाचकही साधनाकडे अन्य माध्यमसंस्थांच्या तुलनेत जास्त आहेत. प्रस्तुत दिवाळी अंकाकडेही त्या दृष्टीने पाहिले जावे अशी अपेक्षा आहे!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके