राजकीय-सामाजिक आघाडीवर खूप अनागोंदी असते तेव्हा, ऊर्जासंचय करण्यासाठी, पुढील वाट शोधण्यासाठी मुळाशी जावे लागते. अर्थातच त्यासाठी साहित्य संस्कृतीकडे वळावे लागते, ज्ञानमार्गाचा शोध घ्यावा लागतो. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून 'तर्कतीर्थ' आणि 'अंतर्नाद' या विषयावर हा अंक जुळवून आणला आहे. प्रस्तुत अंकात दोनच व्यक्तींच्या दीर्घ मुलाखती आहेत, प्रत्येक मुलाखत दोन भागात घेतली आहे. मुळात ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात या मुलाखती घेतल्याने, त्या ऐवजाला वेगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
विद्यमान भारतातील राजकीय-सामाजिक आघाडीवर कमालीची अस्वस्थता आहे. देश एकाधिकारशाहीकडे वाटचाल करीत आहे. समाजधुरीण हतबलतेची भावना अनुभवीत आहेत. अघोषित आणीबाणी हा शब्द मागील काही वर्षांत सर्रास वापरला गेल्यामुळे, त्याचा मूळ अर्थ गुळमुळीत झाला आहे, मात्र विद्यमान भारतातील केंद्रीय राजवट त्या मूळ अर्थाला वारंवार जागवीत आहे. मात्र राजकीय-सामाजिक आघाडीवर खूप अनागोंदी असते तेव्हा, ऊर्जासंचय करण्यासाठी, पुढील वाट शोधण्यासाठी मुळाशी जावे लागते. अर्थातच त्यासाठी साहित्य संस्कृतीकडे वळावे लागते, ज्ञानमार्गाचा शोध घ्यावा लागतो. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून 'तर्कतीर्थ' आणि 'अंतर्नाद' या विषयावर हा अंक जुळवून आणला आहे. प्रस्तुत अंकात दोनच व्यक्तींच्या दीर्घ मुलाखती आहेत, प्रत्येक मुलाखत दोन भागात घेतली आहे. मुळात ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात या मुलाखती घेतल्याने, त्या ऐवजाला वेगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या दोन्ही व्हिडिओ मुलाखती घेण्याचे ठरत असतानाच, या दोन मुलाखतींचा ऐवज एकत्र करून साधनाचा एक संपूर्ण अंक काढता येईल असा अंदाज होता. तो अंदाज अपेक्षेपेक्षा अधिक बरोबर ठरला.
'सुनीलकुमार लवटे' यांची ओळख किती विविध अंगी आहे, हे मुलाखतीच्या प्रास्ताविकात सांगितले आहे. पण त्यांनी मागील पाच वर्षांत पूर्णत्वास नेलेला 'समग्र लक्ष्मणशास्त्री जोशी' हा वाङ्मय प्रकल्प अचंबित व्हावे असाच आहे. तर्कतीर्थांच्या विखुरलेल्या साहित्याचे संपादन करून, त्यांनी 18 खंड सादर केले आहेत. कमीतकमी तीनशे पाने आणि जास्तीतजास्त नऊशे पाने असे हे खंड आहेत. एकूण छापील पानांची संख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे. अकराशेपेक्षा अधिक युनिट्स (लेख, स्फुट लेख, मुलाखती, भाषणे, पत्रे, नोंदी इत्यादी) आहेत. मुळात हे सर्व विखुरलेले साहित्य मिळवणे, त्यांचे संकलन करणे, वर्गीकरण करणे, त्याला मागचे-पुढचे संदर्भ शोधणे व जोडणे, तळटिपा लिहिणे, आणखी उत्खनन करून अज्ञाताची व गूढाची उकल करणे, विवेचन-विश्लेषण करून प्रस्तावना लिहिणे, लेखन व पुनर्लेखन करणे, आराखडे तयार करणे आणि ते विस्कटून पुन्हा जुळवणे आणि वैचारिक घुसळण करून संचित बाहेर काढणे इतकी सारी प्रक्रिया या प्रकल्पाच्या संपादनात होती. मग पुढचे काम टाईप करून घेणे, प्रुफे वाचून घेणे, पुन्हा पुन्हा वाचून दुरुस्त करणे, गरज पडेल तिथे पुनर्लेखन करणे. कमालीचं सर्जनशील व आनंददायी आणि तेवढेच कष्टाचे व थकवणारे हे काम असते. नवे काही सापडले, गूढ उकलले याचा आनंद आणि काही धागे जुळत नाहीत, कारणमीमांसा हाती लागत नाही; अशा जाणिवेने अपूर्णतेची व अस्वस्थतेची जाणीव दुसऱ्या बाजूला असा हा प्रकल्प. मागील पाच वर्षे ते हेच काम व याच प्रकारे करत आले आहेत. त्यांची कार्यक्षमता, तत्परता व योजकत्व तर त्यांना ओळखणाऱ्या अनेकांप्रमाणे आम्हालाही माहीत होतीच. परंतु या प्रकल्पात त्यांच्या सर्व क्षमतांचा कस कधी नव्हे इतका लागला असणार. कदाचित त्यांच्यासारख्या क्षमता नसणाऱ्या माणसाने हा प्रकल्प हाती घेतला असता, तर मधूनच सोडला असता किंवा इतक्या भव्यदिव्य प्रकारे पूर्णत्वास गेला नसता. अशी अवाढव्य कामे आतापर्यंत पाच-दहा जणांच्या समित्यांनी केल्याची उदाहरणे आहेत. पण एकट्या व्यक्तीने असा व इतका मोठा प्रकल्प, इतक्या उत्तम प्रकारे व इतक्या कमी कालावधीत करण्याचे उदाहरण (बाबा भांड यांनी केलेला सयाजीराव गायकवाड एक अपवाद वगळता) गेल्या पाव शतकातील महाराष्ट्रात तरी नाही.
1901 ते 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य वाट्याला आलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सार्वजनिक कार्य सात दशकांचे होते आणि त्यांचा मृत्यू होऊन तीन दशके उलटली आहेत. 1923 मध्ये त्यांना तर्कतीर्थ पदवी मिळाली. आता आपण 2024 मध्ये आहोत. तर या संपूर्ण शतकाचा मागोवा घेण्यासाठी तर्कतीर्थांनी केलेले काम प्रथमच समग्रपणे उपलब्ध होत आहे. या 18 खंडांतून काय व किती भांडार आता उपलब्ध झाले आहे त्याची झलक, सुनीलकुमार लवटे यांच्या मुलाखतीच्या उत्तरार्धात वाचायला मिळते. आणि तर्कतीर्थ मुळात होते तरी कोण, या प्रश्नाचे उत्तर मुलाखतीचा पूर्वार्ध वाचल्यावर थोडेबहुत कळेल. तर्कतीर्थांना महाराष्ट्राने कायम आदराने वागवले, प्रकांडपंडित म्हणून ओळखले, ज्ञानसूर्य वगैरे संबोधले. मात्र ज्यांनी कोणी त्यांना पाहिले, त्यांना ही मुलाखत वाचून आणि हे खंड नजरेखालून घातल्यावर तीव्रतेने जाणीव होईल ती हीच की, आपण तर्कतीर्थांना नीट समजून घेतले नाही आणि त्यांच्या सहवासाचा उपयोग पुरेसा करून घेतला नाही. अनेक अभ्यासकांना इतका जास्त व इतका महत्त्वाचा ऐवज आजपर्यंत अक्षरशः गाडलेला राहिल्याचे दुःख होईल. 'तर्कतीर्थांच्या बाबतीत महाराष्ट्र कृतघ्न राहिला का', असा प्रश्न या मुलाखतीमध्ये आम्ही सुनीलकुमार लवटे यांना विचारला. मात्र तसा आरोप महाराष्ट्रावर करायला ते तयार नाहीत. याचे कारण बहुदा, त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊन महाराष्ट्राला तर्कतीर्थांच्या ऋणातून मुक्त केले हेच असावे.
या 18 खंडांचा उपयोग माध्यमांना, विद्यापीठांना, साहित्य क्षेत्रांतील धुरीण, सामाजिक क्षेत्रातील कर्त्या-करवित्यांना, संशोधन करणाऱ्या संस्थांना खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. अर्थातच, त्यांनी त्यासाठी इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. किंबहुना त्या घटकांचे लक्ष वेधण्यासाठीच ही अशी व इतकी दीर्घ मुलाखत प्रस्तुत अंकात सादर केली आहे. या खंडांचा अभ्यास केला तर अभ्यासक संशोधकांना किती तरी वाटावळणे दिसतील, अनेक गुंते सुटतील, अंधारलेल्या वाटा उजळतील, नव्या दिशा खुणावतील. आणि म्हणून या कामासाठी संपूर्ण महाराष्ट्र सुनीलकुमार लवटे यांचा कायमचा ऋणी राहील. त्यांनी जन्माला येऊन आयुष्यात एवढे एक काम केले असते, तरी त्यांना महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती वर्तुळाने मानाचे स्थान कायम दिले असते.
तर्कतीर्थ यांचा उल्लेख प्राचीन व आधुनिक यांच्या संगमावर उभा असलेला पूल किंवा दुवा हे वाक्यही अतिपरिचयामुळे मुळातला अर्थ गमावून बसले आहे. पण मूळ अर्थ लक्षात घेता अशा दुव्यांची गरज पूर्वी कधी नव्हे इतकी आज जास्त जाणवते आहे. बहुविद्याशाखीय किंवा आंतरविद्याशाखीय अभ्यासाची चर्चा पूर्वीपासून आतापर्यंत कायम होत आली आहे, आणि आताच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा तर गाभा-घटक तोच सांगितला जात आहे. त्यामुळे ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रातील लहान-थोरांना तर्कतीर्थांचे समग्र वाङ्मय प्रकल्पातून काही ना काही वेचक-वेधक व रोचक मिळेल, त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावतील, कल्पनांचे क्षितिज विस्तारेल. स्वतः सुनीलकुमार लवटे या प्रकल्पातून अधिक अंतर्मुख व अधिक नेमके झाले असावेत. ज्ञानसागराचा परिप्रेक्ष्य पाहायला मिळाल्यावर आणि पाच वर्षे त्यामध्ये बुड्या घेण्याची व डुंबण्याची संधी मिळाल्यामुळे आयुष्याचे सोने झाले अशी भावना त्यांच्या मनात येत असेल, तर कोणालाही आश्चर्य वाटू नये.
अंकातील दुसरी मुलाखत म्हणजे 'भानू काळे' यांची, तीही दोन भागांत घेतली आहे. 1995 नंतरचे पाव शतक त्यांनी 'अंतर्नाद' हे मासिक मोठ्या निष्ठेने चालवले. 'सांस्कृतिक समृद्धीसाठी' आणि 'चोखंदळ वाचकांसाठी' ही त्यांची घोषवाक्यं होती. त्यांनी हे काम किती नियोजनपूर्वक व प्रामाणिकपणाने आणि पारदर्शकता राखून व गुणवत्तेचा आग्रह धरून केले आहे, हे त्यांच्याशी या ना त्या नात्याने थोडाफार संबंध आलेल्या सर्वांनाच माहीत असते. मात्र या मुलाखतीमधून त्याचा नेमका अर्थ कळेल. अशी व इतकी विस्तृत मुलाखत त्यांची अंतर्नादच्या वाटचालीबद्दल प्रथमच झाली आहे, मात्र याहून अधिक सखोल व विस्ताराने त्यांनी ती वाटचाल 'एका मासिकाचा उदयास्त' या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे. याच आठवड्यात ते पुस्तक 'मौज' प्रकाशनाकडून आले आहे. ते पुस्तक लिहून त्यांनी अंतर्नादच्या वाटचालीला खऱ्या अर्थाने पूर्णत्व आणले आहे.
पाव शतकात प्रकाशित झालेल्या अंतर्नादच्या अंकांची संख्या 250 दरम्यान आहे, परंतु ते अंक आखीवरेखीव आहेत. साधेपणातील सौंदर्य म्हणजे अंतर्नाद असेच त्या अंकांबद्दल म्हणता येत असे. प्रामुख्याने ते वाङ्मयीन मासिक होते. त्यात शहरी जीवनाची प्रतिबिंबं जास्त दिसत होती. पण त्यांनी सांगितलेली अंतर्नाद सुरू करण्यापूर्वीची त्यांची वाटचाल बरीचशी रोचक आहे. त्यांच्या दोन्ही कादंबऱ्या राजकीय म्हणता येतील अशाच विषयांभोवती आहेत.
त्यांनी 'हिम्मत' या इंग्रजी नियतकालिकात दशकभर काम केले. मात्र फारसे राजकीय विषय अंतर्नादने हाताळले नाहीत, याचे कारण (आणीबाणीच्या काळात त्यांचा झालेला भ्रमनिरास) या मुलाखतीतून पुढे आले आहे.
भानू काळे यांनी अंतर्नाद ही एक प्रकारची मोहीमच राबवली. प्रकाशक, मालक, संपादक या तिन्ही आघाड्या सांभाळल्या. त्यांनी अंतर्नाद पुढे चालवायला हवे होते, असे अनेकांना वाटत होते. त्यांनी स्वतः त्याला संस्थात्मक रूप द्यायला हवे होते, असे अनेकांनी बोलून दाखवले. काही लोक पुढे आले आणि अंतर्नाद पुढे चालू ठेवण्याची तयारी दाखवली होती. पण त्यांनी स्वतः ज्या पद्धतीने ते चालवले, तसे अन्य कोणी दिसत नसल्याने त्यांनी ते बंद करणे पसंत केले. यासंदर्भात त्यांच्यावर काही टीका होणेही स्वाभाविक होते. त्यांनी ते कोणाच्या तरी हाती सोपवले असते तर साहित्य संस्कृतीचे भले झाले असते, असे म्हणायला सोपे असते. मात्र ज्या सचोटीने व निष्ठेने त्यांनी एक स्वप्न पाहिलेले असते आणि वाढवलेले असते, त्याची वाताहात पाहणे हे कमालीचे क्लेशदायक असते.
नियतकालिके वाचतच ते लहानाचे मोठे होत गेले, घडत गेले; एवढेच नाही तर नियतकालिकांमधूनच गंभीर वैचारिक पुस्तके पुढे आली हे त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यातून ते नियतकालिकांकडे इतरांपेक्षा अधिक गांभीर्याने पाहात होते हेच सूचित होते. शिवाय मासिकाची जी बलस्थाने त्यांनी ओळखली ती पाहता, त्यांच्या त्या भूमिकेचा सन्मान राखला पाहिजे. 'डावीकडेही नाही आणि उजवीकडेही नाही, केवळ सरळ' असा एक संपादकीय लेख त्यांनी लिहिला, तेव्हा अनेकांनी त्याचे स्वागत केले होते; मात्र काहींनी त्यावर कठोर टीकाही केली होती; त्यांना गोलमाल संबोधले होते. धड ना इकडचे ना तिकडचे अशीही संभावना काहींनी केली. पण घरातून मिळालेला कम्युनिष्ठांचा वारसा, आणीबाणीच्या काळात केलेली पत्रकारिता आणि ऐन उमेदीच्या काळात राजकीय विषयांवर लिहिलेल्या दोन कादंबऱ्या, हे सर्व पाहता पक्षीय राजकारणाबाबत काहीशी तटस्थता किंवा अलिप्तता हे त्यांचे मानसही समजून घेतले पाहिजे.
मराठी साहित्य व्यवहारात पाव शतक हस्तक्षेप केल्यानंतर ते आता निवृत्त झाले आहेत. त्यांनी स्वतःच त्या 25 वर्षांतील सुरुवातीच्या 17 वर्षांना आनंदाची व उत्कर्षाची असे म्हटले आहे. 2013 नंतरची दहा-बारा वर्षे मात्र त्यांनी उताराची असे संबोधले आहे. 2013 हा टर्निंग पॉईंट ठरला असावा. तेव्हा मराठीतील चाळीस नियतकालिकांच्या संपादकांची एक दिवसभराची बैठक पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये भरली होती. त्या परिषदेनंतर त्यांचा मासिक चालवण्यातला रस संपला, असे त्यांनी म्हटले आहे. त्या परिषदेला प्रस्तुत संपादकही (तेव्हा कार्यकारी संपादक) उपस्थित असल्याने त्या परिषदेचे संपूर्ण चित्र आजही नजरेसमोर आहे, भानू काळे यांच्याप्रमाणेच अनेकांची त्यावेळी निराशा झाली असावी. महाराष्ट्र आणि मराठीतील वाचक यांना अशा प्रकारची गंभीर वैचारिक नियतकालिके हवी आहेत का? असा प्रश्न सर्वांच्याच मनात आला असावा. त्या संपूर्ण दिवसभराच्या बैठकीनंतर मराठीतला साहित्य व्यवहार व नियतकालिकांचा व्यवहार कोरडवाहू शेतीसारखाच आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
आता ते निवृत्तीचे जिणे जगत आहेत, मात्र अंतर्नादमधून आलेल्या निवडक साहित्याचे दहा-बारा खंड तरी सहज होऊ शकतील. त्या खंडांचे संपादन करण्याचे काम त्यांनीच करायला हवे. शिवाय ते संपूर्ण 25 वर्षांचे अंक आताच्या काळात डिजिटलाईज करून वेबसाईटवर अपलोड करायला हवेत.
दोन्ही व्हिडिओ मुलाखती घेऊन झाल्यावर आणि त्यांचे शब्दांकन-संपादन करून या अंकात प्रसिद्ध करताना आम्हाला सोळा वर्षांपूर्वी गोविंदराव तळवलकर यांनी अमेरिकेतून भारतात परत आल्यावर (2007) दिलेल्या एका भाषणाची आठवण झाली. ती त्यांची शेवटची भेट ठरली. त्या भेटीमध्ये त्यांनी पुण्यातील भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी या संस्थेत 'दृष्टीआडची अमेरिका' या विषयावर एक तासाचे भाषण दिले होते. (ते व्याख्यान शब्दांकन करून आम्ही साधनामध्ये प्रसिद्ध केले आहे.) त्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले होते, "अमेरिकेचे खरे सामर्थ्य तिथल्या लष्करी ताकदीत नाही, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळामध्ये नाही, आर्थिक सत्तेमध्येही नाही; अमेरिकेचे खरे सामर्थ्य तिथल्या बौद्धिक वातावरणात आहे!" राजकीय-सामाजिक व्यवहाराचा परिचय असणारा कोणताही सुजाण माणूस, त्या विधानाशी असहमत होण्याची शक्यता नाही. आणि म्हणूनच सुनीलकुमार लवटे आणि भानू काळे यांनी महाराष्ट्रातील बौद्धिक वातावरणासाठी दिलेले योगदान, त्यांना कृतज्ञतेचा सलाम करावा असेच आहे!
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या