व्यक्तिगत जडणघडण कशी होत गेली, जीवन विषयक दृष्टिकोन कसा आकाराला येत गेला, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप टाकल्यावर काय दिसते आणि आजच्या समाजजीवनाकडे पाहताना तुम्ही काय भाष्य कराल, हे चार घटक मध्यवर्ती ठेवून या सर्व मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्या सर्वांच्या व्यक्तित्वाचा गाभा व आवाका यांची झलक या मुलाखतींमधून दिसते. त्यांच्याविषयीचे कुतूहल काही प्रमाणात शमते आणि बऱ्याच प्रमाणात वाढते. त्यातून लक्षात येते ते हेच की, या सर्व मुलाखतींमधून या प्रत्येकाची पार्श्वभूमी कितीही वेगळी असली तरी प्रत्येकाला जीवनाचे व जगण्याचे काही तरी निश्चित असे प्रयोजन सापडले आहे. काही एक प्रकारचा ध्येयवाद आणि दूरदर्शीत्व त्यांच्यात आहे. त्यामुळे आज उद्याच्या तरुण पिढ्यांना या मुलाखती दिशादर्शक ठरतील असा आम्हाला विश्वास आहे!
15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना साप्ताहिकाचे हे 75 वे वर्ष आहे. या अमृतमहोत्सवी वाटचालीत साधनाला बालकुमारांचे जसे अगत्य होते तसेच तरुणाईचेही होते. त्यामुळे बालकुमार वाचकांसाठी वर्षातून एखादा विशेषांक आणि युवा वर्गाची अभिव्यक्ती नियमित अंकांमध्ये, ही परंपरा साधनात कायम राहिली आहे. मात्र 2007-08 मध्ये म्हणजे हीरकमहोत्सवी वर्षात साधनाने बालकुमार दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर पाच वर्षांनी युवा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती, सुलभ व जलद वितरण आणि तरीही किंमत कमी अशी चतु:सूत्री वापरून या दोन्ही दिवाळी अंकांची नोंदणी व वितरण मोहीम राबवली गेली. बालकुमार अंकांची सुरुवातीची पाच वर्षे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली गेली. त्यामुळे त्या अंकाला महाराष्ट्रातील जनमानसात विशेष आदराचे स्थान प्राप्त होऊ शकले. डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर पुढील वर्षी म्हणजे 2014 पासून युवा दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात झाली. कारण त्यांना तरुणाईचे विशेष अगत्य होते. म्हणजे बालकुमार अंकांचे हे पंधरावे वर्ष आहे, तर युवा अंकांचे हे नववे वर्ष आहे.
युवा दिवाळी अंकाबाबत सुरुवातीपासून असेच धोरण ठेवले आहे की युवा वाचकांच्या जीवनविषयक धारणा व सामाजिक जाणीवा प्रगल्भ होण्यासाठी त्यातील लेखन उपयुक्त ठरावे. अर्थातच ते लेखन प्रचारकी थाटाचे नसावे. मात्र त्यातील आशय रॅशनॅलिटीच्या दिशेने जाणारा असावा. शिवाय समाजजीवनातील विविध क्षेत्रांचे व विविध समाजघटकांचे प्रतिबिंब त्यात पडावे. किंबहुना तसेच लेखक व विषय जाणीवपूर्वक निवडलेले असतात. परिणामी आधीच्या पाच वर्षांतील युवा अंकांमध्ये युवकांना आयकॉन्स किंवा आयडॉल्स वाटतील अशा नामवंतांचे लेखन मिळवले होते. ते लेखन मागील दोन-तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे असे होते. नंतरच्या चार वर्षांत मात्र आजच्या युवा पिढीचे किंवा याआधीच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन्स किंवा आयडॉल्स यांचे लेखन आहे. हे करताना विविध सामाजिक व आर्थिक स्तरांतून आलेल्या आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्यांना त्यांच्या दीर्घ मुलाखती घेऊन सादर केले आहे. साहजिकच समाजकार्य, प्रशासन, उद्योग, व्यापार, अर्थकारण, नाटक, सिनेमा, कला-क्रीडा, पत्रकारिता, शेती, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांतील 25 ते 40 वर्षे या वयोगटातील आयकॉन्सच्या मुलाखती मागील चार वर्षांतील युवा अंकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
व्यक्तिगत जडणघडण कशी होत गेली, जीवन विषयक दृष्टिकोन कसा आकाराला येत गेला, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप टाकल्यावर काय दिसते आणि आजच्या समाजजीवनाकडे पाहताना तुम्ही काय भाष्य कराल, हे चार घटक मध्यवर्ती ठेवून या सर्व मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्या सर्वांच्या व्यक्तित्वाचा गाभा व आवाका यांची झलक या मुलाखतींमधून दिसते. त्यांच्याविषयीचे कुतूहल काही प्रमाणात शमते आणि बऱ्याच प्रमाणात वाढते. त्यातून लक्षात येते ते हेच की, या सर्व मुलाखतींमधून या प्रत्येकाची पार्श्वभूमी कितीही वेगळी असली तरी प्रत्येकाला जीवनाचे व जगण्याचे काही तरी निश्चित असे प्रयोजन सापडले आहे. काही एक प्रकारचा ध्येयवाद आणि दूरदर्शीत्व त्यांच्यात आहे. त्यामुळे आज उद्याच्या तरुण पिढ्यांना या मुलाखती दिशादर्शक ठरतील असा आम्हाला विश्वास आहे!
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या