डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आजोबा म्हणाले, ‘‘चला मी आजीच्याच मनातली संख्या ओळखतो.’’ आजी हसली. तिने एक संख्या कागदावर लिहिली. कागदाची घडी केली आणि । आजोबांच्याच खिशात ठेवली. आजोबा मिशीतल्या मिशीत मनापासून हसले. दोघे मिळून खेळायला लागले.

घरात आम्ही सगळे टीव्ही पाहत बसलो होतो. आपला सचिन ‘दे दणादण’ धावा काढत होता. सचिनने बॉल फटकावला की आमच्या आरोळ्या, शिट्ट्या सुरू व्हायच्या; आणि इतक्यात लाइटच गेले. सगळ्यांचा मूड ऑफ झाला. आम्ही सगळे सचिनचे रन, चौकार, षटकार व प्रत्येक षटकातले रन अशा गप्पा मारत असताना अचानक एक नवीन खेळ सुचला. सर्वांनी मिळून खेळाचं नाव ठेवलं ‘गरमागरम आणि थंडाथंडा'. 

खेळ अगदीच सोपा. कुणालाही कुठेही खेळता येईल असा. बसल्या बसल्या किंवा चालता चालता खेळता येईल हा खेळ. कमीतकमी दोघांत आणि जास्तीतजास्त कितीही जणांत खेळावा असा हा खेळ. 

मी मनात 0 ते 100 पर्यंतची एक संख्या धरली. ती संख्या एका कागदावर लिहून तो कागद घडी घालून खिशात ठेवला. आजोबांना म्हटलं ओळखा पाहू माझ्या मनातली संख्या? डोळे बारीक करत आजोबा वैतागून म्हणाले, ‘‘थांब हं, चश्मा लावून पाहतो... ... तुझ्या मनातली संख्या दिसते का? अरे, मी का मनकवडा आहे, तुझ्या मनातली संख्या ओळखायला?’’
आजी त्यांना शांत करत म्हणाली, ‘‘अहो मनकवडेराव, त्याला प्रश्न विचारा, म्हणजे संख्याच काय त्याच्या मनातलं काहीही ओळखता येईल!’’

आता आजोबा खुलले आणि मी सावध झालो. ‘‘तुम्ही कुठलाही आणि कसाही प्रश्न विचारला तरी माझी उत्तरं नेहमी सारखी नसणार बरं'’’, असं मी म्हणताच आजोबांनी भुवया उंचावल्या. समजा मी मनात धरलेली संख्या 35 असेल आणि तुम्ही म्हणालात 75 तर मी म्हणेन बहुत थंडा. मग तुम्ही म्हणाल 50 तर मी म्हणेन थंडाथंडा. तुम्ही म्हणालात 40 तर मग मी म्हणेन गरमागरम. मग म्हणालात 30 तरीपण मी म्हणेन गरमागरम आणि म्हणालात 20 तर मग फक्त गरम.’’

हे ऐकल्यावर आजोबा म्हणाले, ‘‘हां आला लक्षात खेळ. म्हणजे जी संख्या मनात धरली असेल तिच्या पुढे किंवा पाठी पाच संख्यांपर्यंत गरमागरम. त्यापासून थोडं लांब गेलं की गरम गरम. आणि खूप लांब गेलं की थंडाथंडा, बहोत थंडा.’’ आजोबांना थांबवत आजी म्हणाली, ‘‘आणि मनातली बरोबर संख्या ओळखली तर लगेच म्हणायचं 'बिलकूल सही!’ ’’ 
    
आजोबा म्हणाले, ‘‘चला मी आजीच्याच मनातली संख्या ओळखतो.’’ आजी हसली. तिने एक संख्या कागदावर लिहिली. कागदाची घडी केली आणि । आजोबांच्याच खिशात ठेवली. आजोबा मिशीतल्या मिशीत मनापासून हसले. दोघे मिळून खेळायला लागले.

आजोबा म्हणाले, ‘‘50’’. आजी म्हणाली, ‘‘थंडाथंडा कूलकूल.’’

आजोबा म्हणाले, ‘‘70’’. आजी हात हलवत म्हणाली, ‘‘बहोत थंडा हो गया थंडा.’’

आजोबा करवादून म्हणाले, ‘‘30’’. आजी हसून म्हणाली, ‘‘थंडा हो थंडा.’’

आजोबा मिशा पुसत म्हणाले, ‘‘मग असेल 20.’’ आजी मान डोलवत म्हणाली, ‘‘गरम गरम, बरं का.’’

आजोबांचा चेहरा फुलला, म्हणाले, ‘‘10’’. आजी डोळे बारीक करत म्हणाली, ‘‘गरम गरम हो गरम गरम.’’ 

आजोबा मिशांना पीळ देत म्हणाले, ‘‘नक्कीच 5’’; आजी म्हणाली ‘‘गरमागरम हो गरमागरम.’’

‘‘चहापेक्षाही गरम.’’ आजोबा विचारात पडले. आजीकडे बारीक डोळे करत म्हणाले, ‘‘1’’. दोन्ही हातांची बोटं नाचवत आजी म्हणाली, !!गरमागरम बाई गरमागरम, तळणीतल्या वड्यापेक्षाही गरम.’’

आता आजोबा विचारात पडले. त्यांना काही सुचेना. ते चिडून म्हणाले, ‘‘0’’; आणि खुसूखुसू हसत आजी म्हणाली, ‘‘बिलकूल सही रे माझ्या मनकवड्या! बिलकूल सही!!’’

आजोबा आता हसत म्हणाले, ‘‘काऽऽय... बरोब्बर ओळखला किनई झिरो?’’ त्यावर अंगठ्याला तर्जनी लावून हात हलवत आजी म्हणाली, ‘‘म्हणून तर तुम्ही माझे हिरो!’’

यावर आम्ही सगळेच धडधडून हसलो.

आता लगेच खेळायला सुरुवात करा. मी तुमच्या गरमागरम ‘हिरो पत्रां’ची वाट पाहतोय.

Tags: ‘गरमागरम आणि थंडाथंडा’ अभिनव खेळ छोट्यांचे पान मलपृष्ठ कथा 'hot and cold' innovative game children's pages backpage stories weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके