डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रत्येकाने आपल्याला हवा तो कागद घ्यायचा. कितीही मोठा किंवा अगदी छोटा कागद. एकदम पातळ किंवा चांगला जाडजूड कागद. वहीचा किंवा वर्तमानपत्राचा कागद. लक्षात ठेवा, घडी घालायची म्हणजे एका टोकाला दुसरे टोक जोडायचे. माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्हांला नऊपेक्षा जास्त घड्या घालताच येणार नाहीत; का...य, लावता पैज?

आज वर्गात गेल्यावर मुले म्हणाली, "आम्हांला कागदाची आणखी एक गंमत सांगा." 

बहुधा मुलांचे आपापसांत काहीतरी ठरलेलं असावं, असं वाटलं. कारण मुले घरून येतानाच जुन्या वर्तमानपत्रांचे कागद घेऊन आली होती. त्यातीलच एक कागद हातात घेऊन मुलांना विचारलं, ‘‘आता हा कागद कापता येईल, फाडता येईल आणि...’’ पुढे मुलेच बोलू लागली, "दुमडता येईल, चुरगळता येईल, जाळता येईल. याला भोकं पाडता येतील, भिजवून याचा लगदा करता येईल, पतंग करून उडवता येईल, बॉल करता येईल..."

थोडक्यात काय, तर या कागदाच्या अनेक गमती जमती करता येतील. आज आपण कागदाच्या घड्या घालण्याचा खेळ खेळू या. ‘‘कागदाच्या पुन्हा पुन्हा घड्या कुणाला घालता येतात?’’ असं विचारल्यावर सगळा वर्ग एका सुरात ओरडला, ‘‘आम्हांला! आम्हांला!"

‘‘किती घड्या घालता येतील?’’ या प्रशाला मात्र सगळ्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. सिमरन म्हणाली, ‘‘दहा’’. गणेश म्हणाला, ‘‘पंधरा’’. मिहिर म्हणाला ‘‘अठरा’’; तर शिल्पा म्हणाली, ‘‘कागद जेवढा मोठा असेल तेवढ्या घड्या अधिक’’. वर्गात प्रत्येकाचा आकडा वेगळा, त्यामुळे गोंधळ सुरू झाला. यावर सोपा उपाय म्हणजे प्रयोगाला लगेचच सुरुवात करणे. 

प्रत्येकाने आपल्याला हवा तो कागद घ्यायचा. कितीही मोठा किंवा अगदी छोटा कागद. एकदम पातळ किंवा चांगला जाडजूड कागद. वहीचा किंवा वर्तमानपत्राचा कागद. लक्षात ठेवा, घडी घालायची म्हणजे एका टोकाला दुसरे टोक जोडायचे. माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्हांला नऊपेक्षा जास्त घड्या घालताच येणार नाहीत; का...य, लावता पैज?

हे ऐकल्यावर मुले उसळलीच! म्हणाली, "हो, हो; लावतो पैज! आम्हांला तुम्ही समजलात काय? आम्ही सगळे मिळून एक आयडिया करू. आम्ही मोठ्यात मोठा कागद घेऊ आणि नऊच काय पण सत्तावीस घड्या घालू. पण ही पैज जिंकूच जिंकू! चला... मोठा कागद घेऊ या. मोठा कागद तयार करू या आणि ही फुसकी पैज जिंकू या."

सिमरनने वर्तमानपत्राचा मोठा डबल कागद घेतला. मिहिर आणि शिल्पाने दोन डबल कागद एकमेकांना चिकटवून एकच मोठाच्या मोठा कागद तयार केला. गणेश ऑफिसमधून फुलस्केप कागद घेऊन आला. मग पट्टीने त्याचे माप घेऊन, वहीत काहीतरी आकडेमोड केली. मग कागदाला कागद जोडून पुन्हा काहीतरी आकडेमोड. गणेश चिंतातुर झाला होता. चारुताने कागदाच्या पट्ट्या कापल्या. त्या एकमेकांना चिकटविल्या आणि एक लांबच लांब कागदी पट्टी तयार केली. ही पट्टी वर्गाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत लांब होती. चारुता आनंदाने फसफसत होती.

आपण आपल्या जवळच्या कागदाच्या किती घड्या घालू शकतो हा आपला अंदाज आपापल्या वहीत आधी लिहून ठेवायचा असं ठरलं. सगळी जणं कागद घेऊन सरसावून बसली. सगळ्यांच्या अंगात उत्साह नुसता सळसळत होता. प्रत्येकाला वाटत होतं, आपण ठरवल्याप्रमाणे किमान पंधरा ते वीस घड्या सहजच घालू. कागदाच्या घड्या घालण्यासाठी मुलांची बोटं शिवशिवत होती.

हा काही नुसता खेळ नाही; तर हा विज्ञानाचा प्रयोग आहे, याची जाणीव आता मुलांना झाली होती. त्यामुळे आता पुरेशा गांभीर्याने प्रयोगाला सुरुवात झाली.

सिमरन, मिहिर, गणेश, शिल्पा, चारुता सगळ्यांनी आपापल्या कागदाची एक घडी घातली. लागोपाठ दुसरी व तिसरी घडी घातली. कागदाची चौथी घडी घालणं खूपच त्रासदायक झालं. दोघा-तिघांनी मिळून एकेका कागदाची चौथी घडी घातली. आता मुलांमध्ये कुजबुज सुरू झाली. चौथ्या घडीलाच जर ही पाळी आपल्यावर आली तर मग आणखी वीस घड्या घालणार तरी कशा? चारुता विचारात पडली. गणेशने पुन्हा काहीतरी आकडेमोड केली.

गणेशकडे माझे लक्ष होतंच, पण तो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्याला विचारायचं नाही, असं ठरवलं होतं.

आता पाचवी घडी घालण्यासाठी सर्व वर्ग एकाच कागदावर तुटून पडला. फक्त गणेश त्याचा कागद आणि वहीतील ती आकडेमोड यांच्याशी झटापट करत होता. सर्वांनी प्रयत्न करूनही पाचवी घडी म्हणावी तशी नीट झाली नाही. पण आता यापुढे सहावी घडी घालणं अजिबात शक्य नाही, हे मात्र आता मुलांच्या चेहऱ्यावरूनच ओळखता येत होतं. तरीपण मिहिर, सिमरन व चारुताने दात-ओठ खाऊन प्रयत्न केला... पण फुस्स! कुणालाच सहावी घडी काही घालता आली नाही. वर्गातले सगळे पैलवान थकले आणि तितकेच अचंबित पण झाले... ‘‘असं का म्हणून?’’

आपल्याला कागदाची सहावी घडी का घालता आली नाही? याचं उत्तर आता गणेश सांगेल, असं म्हणताच गणेश दचकला. हाताची बोटं मोजत त्याने कुठलासा गुणाकार केला आणि अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाला, ‘‘नऊच काय- पण आठ घड्यासुद्धा करता येणार नाहीत!’’ 

त्याने असं म्हटल्यावर वर्गातले सगळे पैलवान ओरडले, ‘‘का...?’’ 

आणि गणेशने गणित सोडवलं.

"कागदाची घडी घालताना कागदाचे पदर भूमितिश्रेणीने वाढत जातात. म्हणजे पहिल्या घडीला दोन, दुसऱ्या घडीला चार, तिसऱ्या घडीला आठ... आणि पाचव्या घडीला कागदाचे बत्तीस पदर एकत्र आले. त्यांची टोकं जुळवणं जमलं. याच पद्धतीने सहाव्या घडीला चौसष्ट आणि सातव्या घडीला एकशे अठ्ठावीस पदर एकत्र येतील. इतके कागद एकाच वेळी हाताने दुमडणे शक्य नाही. त्यासाठी... मशीनच हवे की! काय?"

कागद लहान घेतला किंवा मोठा घेतला तरी घडी घालताना कागदाचे पदर भूमितिश्रेणीनेच वाढणार ही यातली गंमत आधी न कळल्याने मुलांचा गोंधळ झाला होता.

मुलांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. मुले म्हणाली, "आता पुढच्या वेळी तुम्ही याच कागदाला एक भोक पाडा आणि मग त्या छोट्याशा भोकातूनच आम्ही सर्व मुलं आरामात बाहेर पडू... कागद अजिबात न फाडता. का...य? करता येईल अशी जादू तुम्हांला?"

"मलाच काय तुम्हांलापण करता येईल ही जादू!" असं मी म्हणालो, इतक्यात शाळा सुटल्याची घंटा झाली. मुले म्हणाली, "या वेळी दारातून बाहेर जाऊ, पण पुढच्या वेळी कागदातून बाहेर जाऊ!"

तोपर्यंत मी तुमच्या 'घडीदार पत्रां’ची वाट पाहायची का?

Tags: विज्ञानाद्वारे शिक्षण छोट्यांचे पान मलपृष्ठ कथा education through science page for kids backpage story weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके