डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कामावर जाणारा आठ वर्षांचा मुलगा

डॉ. कलाम यांचे ‘माय जर्नी’ हे पुस्तक रूपा पब्लिकेशनकडून 2013 मध्ये आले आहे. त्या पुस्तकातील एक लेख ‘साधना’च्या 2013 च्या बालकुमार दिवाळी अंकात, अनुवाद करून प्रसिद्ध केला होता. वयाच्या आठव्या वर्षी, कलामांना अकाली प्रौढत्वाची जाणीव करून देणाऱ्या या आठवणी हृदयस्पर्शी आहेत, म्हणून तो लेख पुनर्मुद्रित करीत आहोत.

- संपादक

रोज सकाळी इंग्रजी व तमिळ भाषेतील वृत्तपत्रांचा गठ्ठा माझ्याकडे येतो. मी परदेशात असतो तेव्हाही भारतातील घडामोडींच्या बातम्या जाणून घेण्यात मला रस असतो, म्हणून मी इंटरनेटवर जाऊन विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांतील वृत्तलेख आणि संपादकीय लेख वाचत असतो. हाताच्या बोटाने एका क्लिकवर माहितीची संपत्ती उपलब्ध होते, याने मी चकित होतो. खरे तर विज्ञान व अभियांत्रिकी या विद्याशाखांशी मी इतका जोडला गेलेलो आहे की, तंत्रज्ञानाच्या या आविष्कारांचे मला आश्चर्य वाटायला नको. पण सत्तर वर्षांपूर्वीचे दक्षिण भारतातील एका छोट्या शहरातील जनजीवन व आजचे जनजीवन यांची तुलना मी करतो, तेव्हा दिसणारा फरक मलाही अचंबित करून जातो.

माझा जन्म 1931 मध्ये झाला. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले, तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. ब्रिटनने नाझी जर्मनीच्या विरोधात युद्ध पुकारले होते आणि ब्रिटनची वसाहत असल्यामुळे भारत देश त्या युद्धात सामील झाला होता. त्या वेळी जगातील वेगवेगळ्या ठिकाणच्या युद्ध- आघाड्यांवर लढत असलेल्या भारतीय सैनिकांची संख्या ‘विक्रमी’ म्हणावी इतकी होती. पण तरीही युद्धाच्या सुरुवातीच्या काळात भारतातील जनजीवनावर विशेष परिणाम झाल्याचे दिसत नव्हते- विशेषत: भारताच्या दक्षिण टोकावर असलेल्या आमच्या गावावर तरी!

मी वर म्हटले त्याप्रमाणे, 1940 मध्ये रामेश्वरम हे छोटे शहर निवांतच असे. यात्रेकरू येत असत, तेव्हा थोडी लगबग जाणवत असे. दुकानदार व छोटे व्यापारी मुख्यत: गावातले रहिवासी असत. त्या छोट्या शहरावर मंदिरांचेच वर्चस्व असले तरी तिथे एक मशीद आणि एक चर्चही होते. गावातले रहिवासी अतिशय सलोख्याने राहत असत. इतर कोणत्याही छोट्या शहरात किंवा गावात ज्या प्रकारची छोटी-मोठी भांडणे किंवा वादावादी होत असते, तशीच ती रामेश्वरममध्येही होत असे. बस्स, त्यापेक्षा अधिक काही महत्त्वाचे तिथे घडत नसे.

गावाबाहेरच्या जगातील घडामोडींची माहिती करून घेण्याचा वृत्तपत्रे हा एकमेव स्रोत होता. वृत्तपत्रांचे वाटप करणारी एजन्सी माझा चुलतभाऊ शमसुद्दीन चालवत असे. माझ्या सुरुवातीच्या जीवनावर जलालुद्दीनप्रमाणेच शमसुद्दीनचाही मोठा प्रभाव राहिला आहे. शमसुद्दीन वाचू व लिहू शकत होता, पण तो फार शिकलेला नव्हता आणि त्याने जास्त प्रवासही केलेला नव्हता. तरीही त्याला माझ्याबद्दल इतके ममत्व वाटत असे की, तो माझ्या वाटेवरील प्रकाशाचा दिवा होता. ही दोन अशी माणसं होती, जी माझ्या मनातील खोलवरच्या भावना व विचार समजू शकत होती- जरी त्या भावना व विचार मी त्या वेळी नीट मांडूही शकत नव्हतो. माझ्यासाठी तरी ते दोघे असे प्रौढ लोक होते, जे त्यांचे दैनंदिन जीवन व व्यवसाय यापलीकडचे मोठे जग पाहू शकत होते.

शमसुद्दीनची वृत्तपत्र वितरणाची एजन्सी ही रामेश्वरममधील एकमेव होती. त्या गावात साधारणत: हजारेक लोक साक्षर होते, त्या सर्वांना तो वृत्तपत्रं घरी पोचवीत असे. भारतातील स्वातंत्र्य चळवळीच्या बातम्यांनी त्या वेळी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने व्यापलेले असत. या बातम्यांचे वाचन आणि त्यावरील चर्चा मोठ्या उत्साहाने होत असत. हिटलर व नाझी जर्मनी यांच्या संदर्भातील आणि युद्ध-आघाडीवरच्या बातम्याही वृत्तपत्रांतून येत असत. अर्थात, ऐहिक जीवनाशी संबंधित मजकूरही येत असे. त्यापैकी सोन्या-चांदीचे बाजारभाव आणि राशीभविष्य हे लोकांच्या खास आवडीचे विषय होते. ‘दीनमणी’ हे तमिळ वृत्तपत्र त्या वेळी सर्वाधिक लोकप्रिय होते.

रामेश्वरममध्ये वृत्तपत्रे येण्याचा एकच मार्ग होता. वृत्तपत्रांचे गठ्ठे सकाळच्या ट्रेनने येत आणि स्टेशनवर ठेवले जात. तिथून ते गठ्ठे उचलायचे आणि घरोघर वाटप केले जायचे. हा शमसुद्दीनचा व्यवसाय होता आणि तो सहजतेने करीत असे. पण दुसऱ्या महायुद्धाने उग्र रूप धारण केले, तेव्हा आम्हीही जगापासून अलिप्त राहू शकत नव्हतो. त्याचा एक परिणाम शमसुद्दीनच्या वृत्तपत्र वाटप व्यवसायावर आणि माझ्यावरही झाला.

ब्रिटिश सरकारने मालावर बरीच बंधने व नियंत्रणे आणली होती. देशात एक प्रकारचे आणीबाणीसदृश वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आमच्या मोठ्या कुटुंबालाही काही अडचणींचा सामना करावा लागला. अन्नधान्य, कपडे आणि घरासाठी व लहान मुलांसाठी आवश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवायला लागला. त्यांची खरेदी परवडेनाशी झाली. आमच्या घरात माझे आई-वडील व पाच भावंडे होती, शिवाय माझ्या वडिलांच्या भावांची कुटुंबंही होती. सर्वांना खायला घालणे, कपडे देणे आणि आरोग्य सांभाळणे हे करताना माझी आजी अन्‌ आईची बरीच ओढाताण होऊ लागली.

युद्ध लांबत चालल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा परिणाम आमच्या कुटुंबावरही होऊ लागला, तेव्हा शमसुद्दीनने माझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. त्यामुळे मी प्रचंड उत्तेजित झालो आणि मला खूप आनंदही झाला... सरकारी निर्बंधांमुळे रामेश्वरममध्ये न थांबता ट्रेन पुढे जाणार होती. त्यामुळे वृत्तपत्रांचे गठ्ठे कसे मिळवायचे आणि गावातील लोकांना कसे वाटप करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. शमसुद्दीनने त्यातून मार्ग काढला. ट्रेनमध्ये वृत्तपत्रांचे मोठमोठे गठ्ठे बांधून तयार ठेवायचे आणि रामेश्वरम्‌- धनुष्कोडी गाडी येईल, तेव्हा रेल्वेतल्या माणसाने प्लॅटफॉर्मवर ते गठ्ठे फेकायचे... आणि तिथे काम करण्यासाठी मला विचारले. चालत्या रेल्वेतून फेकलेले वृत्तपत्रांचे ते गठ्ठे झेलायचे आणि मग त्यांचे वर्गीकरण करून घरोघर वाटप करायचे, हे आनंददायक काम शमसुद्दीनने मला देऊ केले.

माझ्या उत्साहाला सीमाच राहिली नाही. मी जरी आठ वर्षांचा होतो, तरी मी माझ्या घरासाठी चांगली मदत करू शकणार होतो! त्याआधी बरेच दिवस मी पाहत होतो, माझ्या आईच्या आणि आजीच्या ताटातील अन्न दिवसेंदिवस कमी होत चालले होते. कारण आम्हा मुलांमध्येच उपलब्ध अन्नाचा जास्त भाग वाटप केला जात असे. मुलांना आधी खाऊ घातले जात असे. आम्हाला भुकेलेलंच ठेवलेय, असे झाल्याचे मला तरी आठवत नाही. याचे कारण, घरातील सर्वच महिलांनी त्यांच्या खाण्यात काटकसर केली होती.

त्यामुळे शमसुद्दीनचा प्रस्ताव मी मोठ्या तत्परतेने स्वीकारला, पण माझे नवे काम माझ्या दैनिक वेळापत्रकात बसवणे आवश्यक होते. माझी शाळा आणि अभ्यास आधीप्रमाणेच चालू राहणे आवश्यक होते आणि हे सर्व चालू ठेवूनच मला वृत्तपत्रं वाटपाचे काम करायचे होते. माझी भावंडं आणि चुलतभावंडं या सर्वांच्यामध्ये गणिताबाबतची माझी आवड जास्त असल्याचे खूपच लवकर लक्षात आले होते. त्यामुळे माझ्यासाठी वडिलांनी गणिताची शिकवणी लावली होती. पण आमच्या शिक्षकांची अशी अट होती की, इतर चार मुलांबरोबर मीसुद्धा रोज सकाळी भल्या पहाटे अंघोळ करून त्यांच्या घरी हजर राहिले पाहिजे. त्यामुळे जवळपास एक वर्षापासून माझा दिवस अंधार असतानाच सुरू होत असे. आई मला हलवून जागे करीत असे. ती तर माझ्या आधीच उठलेली असे आणि माझ्या अंघोळीसाठीची तयारी करून ठेवत असे. अंघोळ करून शिकवणीला पाठवण्यासाठी ती मला मदत करीत असे.

शिक्षकांच्या घरी एक तास शिकवणी झाली की, मी पाच वाजता घरी परत येत असे. त्यानंतर माझे वडील मला जवळच्याच अरेबियन शाळेत घेऊन जात असत, तिथे मी कुराणाचा अभ्यास करीत असे. कुराण-ए-शरीफचा पाठ संपल्यानंतर मी रेल्वे स्टेशनवर जात असे. तिथे मी वाट पाहत उभा असे. एक पाय थकला की दुसरा वर करून विश्रांती घेत असे आणि येणाऱ्या ट्रेनच्या दिशेने डोळे व कान लागलेले असत. आश्चर्य म्हणजे, मद्रास-धनुष्कोडी ही गाडी क्वचितच उशिरा येत असे. काही अंतरावर इंजिनातून निघालेला धूर दिसत असे. रेल्वेचा हॉर्न मोठ्या आवाजात, पण मंदपणे वाजत असे आणि गाडी स्टेशनपासून कमी वेगाने जात असे. मी असे ठिकाण शोधून ठेवले होते, जिथून गाडीतून फेकलेले गठ्ठे दिसू शकतील.

शमसुद्दीनचा माणूस अतिशय सुनियोजित पद्धतीने ते गठ्ठे प्लॅटफॉर्मवर फेकताना मला खूण करीत असे. त्यानंतर ट्रेन पुढे निघून जात असे आणि मग माझे काम सुरू होत असे. त्यानंतर मी ते गठ्ठे जमा करीत असे, वृत्तपत्रांचे  वर्गीकरण करीत असे. शेजारी-शेजारी राहणाऱ्या लोकांची वृत्तपत्रं जुळवून नवे गठ्ठे करीत असे. त्यानंतर साधारणत: तासभरात मी रामेश्वरम्‌मधील घरोघरी जाऊन ते वाटप करीत असे. लवकरच मी माणसं ओळखायला लागलो ते त्यांच्या वृत्तपत्रांच्या आवडीवरून. अनेक जण माझी वाट पाहत असत आणि ओळखीचे एक-दोन शब्द तरी त्यांच्याकडून बोलले जात. काही जण मला ‘घाई कर आणि लवकर घरी जा, म्हणजे शाळेला उशीर होणार नाही’ असे सांगत असत. मला वाटतं, आठ वर्षांच्या चुणचुणीत मुलाच्या हातून वृत्तपत्रं घेताना त्या प्रत्येकाला वेगळा आनंद मिळत असणार.

आमचं ते छोटं शहर दक्षिण भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असल्याने, साधारणत: सकाळी आठ वाजता माझे काम संपलेले असे तेव्हा सूर्य आकाशात बराच वर आलेला असे. मी घरी परत जात असे, तेव्हा आई नाश्ता तयार ठेवून माझी वाट पाहत असे. साधेच जेवण असे, पण मला किती भूक लागलेली असे! ताटातलं सर्व संपवलेलं आहे, याची खात्री झाल्यानंतरच आई मला शाळेत पाठवत असे. पण माझे काम तिथेच संपलेले नसे.

शाळा सुटल्यावर संध्याकाळी मी शमसुद्दीनच्या ग्राहकांच्या घरी बिलाचे पैसे आणण्यासाठी जात असे. त्यानंतर मी शमसुद्दीनकडे जात असे, मग तो दिवसभराचा हिशोब जुळवत असे. त्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर कुठे तरी वाऱ्याची झुळूक अंगावर घेत जलालुद्दीन किंवा शमसुद्दीन त्या दिवसाचे वृत्तपत्र उघडीत असत. आम्ही सर्व जण ‘दीनमणी’च्या मोठ्या टाइपातील ठळक बातम्या वाचत असू. एक जण मोठ्याने बातमी वाचत असे आणि हळूहळू बाहेरचे मोठे जग आमच्या अंतरंगात प्रवेश करीत असे. महात्मा गांधी, काँग्रेस, हिटलर, पेरियार रामास्वामी आणि त्यांचे शब्द त्या सायंकाळच्या हवेत आम्हाला रोमांचित करीत असत.

वृत्तपत्रांतील छायाचित्रे आणि शब्द मला खुणावत असत आणि या सर्वांचा मोठ्या जगात नेमका अर्थ काय, याचा विचार मी करत असे. तेव्हा मी असाही विचार करीत असे की, मीसुद्धा एक दिवस मद्रास, बाँबे, कलकत्ता अशा मोठ्या शहरांत जाईन... पण तेव्हा गांधी आणि नेहरू यांच्यासारखी मोठी माणसं भेटल्यावर मी काय बोलले पाहिजे? पण असे विचार मधेच तुटून जात असत, कारण माझे मित्र खेळायला बोलावत असत किंवा रात्रीच्या जेवणासाठी घरचे लोक वाट पाहत असत. त्या दिवसाचा गृहपाठही करायचा राहिलेला असे... आणि नाही तरी, आठ वर्षांच्या मुलामध्ये यापेक्षा जास्त ऊर्जा कुठून असणार? रात्री नऊ वाजता मी गाढ झोपी जात असे, कारण दुसऱ्या दिवशीची शाळा आणि कामावर जाणारा माझ्यातला माणूस वाट पाहत असे.

हे वेळापत्रक जवळपास वर्षभर चालले होते. वृत्तपत्रवाटपाचे काम करत असतानाच्या त्या वर्षभरात मी थोडा उंच झालो आणि माझ्या कातडीचा रंगही थोडा गडद झाला. माझ्या हेही लक्षात आले की, मी आता दोन ठिकाणांच्या अंतरांबाबतचा अंदाज जास्त अचूकपणे सांगू शकतो. माझ्या हातांतले वृत्तपत्रांचे गठ्ठे एका वेळी किती मोठे घ्यावेत याचाही अंदाज मला बांधता येऊ लागला. कुठे जायला किती वेळ लागेल, हेही मला नेकेपणाने कळू लागले. शमसुद्दीनच्या प्रत्येक ग्राहकाकडून किती रक्कम येणे बाकी आहे, याचे हिशोब माझ्या डोक्यात घोळू लागले आणि त्या दिवशी कोणी कोणी पैसे दिलेले नाहीत त्यांची नावेही लक्षात राहू लागली.

मी त्या काळात हा धडा शिकलो की, काम करणाऱ्या माणसाला त्या दिवसाची सर्व तयारी करावी लागते आणि ऐनवेळी उद्‌भवणाऱ्या प्रसंगांचा सामना करायला तयार असावे लागते. गृहपाठ, शिकवणी, नमाज हे सर्व चालूच होते; पण मद्रास-धनुष्कोडी ही गाडी माझ्यासाठी थांबणार नव्हती. त्यामुळे ठरलेल्या वेळेला व ठरलेल्या ठिकाणी गठ्ठे उचलण्यासाठी मी स्टेशनवर हजर असलेच पाहिजे, असेच मी स्वत:ला बजावत होतो. अंगावर जबाबदारी घ्यायची ती माझी पहिली वेळ होती आणि काहीही झाले तरी शमसुद्दीन या आपल्या चुलतभावाला दिलेला शब्द आपण पाळलाच पाहिजे, ही जाणीवही!

माझ्या तोपर्यंतच्या आयुष्यातील तो सर्वाधिक आनंदाचा काळ होता. मी त्यातला प्रत्येक क्षण अक्षरश: जगलो, प्रत्येक रात्री मी थकून गेलेला असे तरीही! मी हे काम ओढवून घेतले म्हणून माझी आई नेहमी काळजीत असे आणि ते काम सोडून द्यावे, असेही सांगत असे. पण मी हसून मानेनेच नकार देत असे. मला हे माहीत होते की, माझी त्या कामातून येणारी मिळकत घराला थोडी उपयोगी पडत आहे आणि आईला मनातून आपला अभिमान वाटत आहे. वयाच्या आठव्या वर्षी कामावर जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत आपण आहोत, या जाणिवेुळे माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य विलसत असे.

(अनुवाद: विनोद शिरसाठ)  

Tags: माय जर्नी विनोद शिरसाठ ए.पी.जे. अब्दुल कलाम कामावर जाणारा आठ वर्षांचा मुलगा अनुवाद पुस्तक बालपण My Journey Vinod Shirsath) Translation book Childhood A.P.J. Abdul Kalam Kamavar Janara Aath Varshancha Mulaga weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ए.पी.जे. अब्दुल कलाम

शास्त्रज्ञ, भारताचे ११ वे राष्ट्रपती  


Comments

  1. Shilpa surve- 27 Jul 2020

    नवीन पिढीस प्रेरणा देणारे विचार आहेत अब्दुल कलाम जी चे नेहमी उभारी येते त्यांचे विचार वाचून

    save

  1. Dattaram Vikram Jadhav- 28 Jul 2020

    कलाम साहेबांच्या श्रमांशी आपल्या श्रमांची तुलना करणे शक्य नाही पण श्रम लहानपणापासून करायला लागलो याचे समाधान आहे.

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके