डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाण्यावाचून जीवन नाहीच. सामाजिक तसेच राजकीय दृष्टयाही पाणी ही महत्त्वाची गोप्ट आहे. त्यामुळे समता हे मूल्य प्रस्थापित होण्यासाठी देखील पाण्याचे नियोजन आवश्यक ठरते. पाणी नियोजनाच्या सध्याच्या धोरणाचा विचार करावा, त्याला जरुर तेथे विकल्प शोधावा, मोठ्या धरणांच्या गरजेचा अभ्यास करावा, आदींसाठी पाणी नियोजनाच्या पर्यावरणीय भूमिकेवर परिसर ने आयोजिलेल्या चर्चासत्राचा हा वृत्तांत.

'मानवी'च काय, एकूणच जीवनासाठी पाणी म्हणजे अत्यावश्यक घटक! त्याच्याविना पृथ्वीवरल्या जवळपास सर्वच प्रक्रिया 'थंडा'वतील. भारतासारख्या विकसनशील देशासाठी तर पाणी नियोजन हा अत्यंत महत्वाचा विषय ठरतो. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आम्ही मुख्यतः शेतीप्रधान असून आपली सर्व शेती ही मोसमी पावसावर अवलंबून असते. भारताचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान पाहिले तर पुरेसे पाणी असल्याचे दिसते; परंतु हे सर्व पाणी भारतभर विषम प्रमाणात विभागले जाते. सगळा पाऊस पावसाळ्यात काही दिवसांतच पडून जातो. बाकीचे जवळ जवळ उभे वर्ष कोरडे. त्यामुळे एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे महापूर असे दृश्य नेहमीच दिसते.

वर्षभर खात्रीशीर पाणीपुरवठा हवा असेल तर नियोजन विशेषच महत्वाचे ठरते. स्वातंत्र्यानंतर आपण धरणबांधणीचा एक राष्ट्रव्यापी कार्यक्रम हाती घेतलेला असला, आणि कालव्यांमधून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आपण करीत असलो तरी नेमाने येणाऱ्या दुष्काळांना आणि पुरांना आपण अटकाव करू शकलेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. एवढेच नव्हे तर या प्रकल्पामुळे पर्यावरणीय समतोल ढळला आहे आणि मानवी सांस्कृतिक जीवनाची मोठया प्रमाणावर वाताहात झालेली असल्याचे दिसून येते.

या पार्श्वभूमीवर ‘परिसर’ ने 16 व 17 जानेवारी रोजी ‘पाणी नियोजन पर्यावरणीय भूमिका' या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राचे उद्देश पाणी नियोजन विषयक सध्याच्या धोरणाचा विचार करणे, या टीकात्मक चर्चेतून पर्यावरणीय समतोलाकडे लक्ष दिले जाईल अशा वैकल्पिक धोरणांची निर्मिती करणे. भारतीय जलनियोजनामध्ये सध्या मुख्यत्वे मोठ्या धरणांवर भर दिला जातो. त्यामुळे त्यांच्यामुळे होणारे मानवी व नैसर्गिक विस्थपन हा या चर्चासत्रातील उपविषय होता.

या सर्व प्रश्नांचा सर्वांगीण विचार व्हावा यासाठी अनेक नामवंत, जलनियोजन विषयाशी संबंधित व्यक्तींना या चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यात आले होते, यामध्ये केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष व सरकारी अधिकारी, अर्थशास्त्रज्ञ, जलनियोजनाचे अभ्यासक, पर्यावरणवादी गटांचे प्रतिनिधी, पत्रकार, प्रत्यक्ष या प्रश्नावर जनजागृती करून चळवळ उभारणारे कार्यकर्ते, तसेच जलनियोजनाचे प्रत्यक्ष प्रयोग ज्यांनी राबवले आहेत असे प्रयोगकर्ते आदींचा समावेश होता. पहिल्या दिवशी भारतीय जलसिंचनाचा इतिहास, सध्याची धोरणे, त्यांची उपयुक्तता व परिणामकारता, तसेच त्यामूळे उद्भवणारे सामाजिक व पर्यावरणीय प्रश्न, यांवर चर्चा झाली. 

भारतीय जलसिंचनाच इतिहास खूप जुना आहे. कौटिल्य, कश्यप, चक्रपाणी इत्यादींनी पाण्याच्या उपयोगासंबंधी महत्त्वाची प्रमाणे ठरवून दिली आहेत. ही गृहीते निसर्गाशी कमीतकमी संघर्ष, तलावांचा आकार ठरवण्यासाठी सुवर्णमध्य व पाणी वापराच्या सोप्यात सोप्या पद्धती, यांवर आधारित आहेत. सिंचनाचा विचार प्रथमतः वारंवार पडणाऱ्या दुष्काळाच्या संदर्भात सुरू झाला. ब्रिटिशांनी मोठया प्रमाणावर कालव्यांचे जाळे निर्माण केले, तरी ब्रिटनमध्ये कालवे हे मुख्यतः जलवाहतुकीसाठी वापरले जात. त्यामुळे इथले कालवेही असेच बांधले गेले. अर्थातच सिंचनासाठी ते पूर्णपणे उपयोगी नव्हते. सध्याची जलनियोजन उद्दिष्टे, सिंचन व जलविद्युत् या दोनच गोष्टींशी जास्तीत जास्त निगडीत आहेत. आपल्या राष्ट्रीय जल अर्थसंकल्पाचा बराच मोठा भाग मोठी धरणे बांधण्यासाठी खर्च होतो. या धरणांचा उपयोग सिंचन व जलविद्युत् निर्मितीबरोबरच पूरनियंत्रण व मत्स्य शेतीसाठी करण्यात येतो. परंतु श्री. अल्वारीस यांनी सांगितल्याप्रमाणे, 'धरणे आपणहून पाणी निर्माण करीत नाहीत. त्यामुळे नुसते धरण बांधणे हा पाणी नियोजनाचा उपाय असू शकत नाही.' अनेक तज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे की ही मोठी धरणे पाण्याचा प्रश्न सोडवीत तर नाहीतच, परंतु इतर अनेक गंभीर प्रश्न आपल्याबरोबरच उभी करीत आहेत ! जवळपास सर्व मोठ्या धरणांचा खर्च ठरल्यापेक्षा अवाढव्य होतो. ती कधी वेळेवर पूर्ण होत नाहीतच. केवळ एवढ्या एका कारणाकरता देखील या धरणांमुळे होणारे फायदे त्यांच्यावर होणाऱ्या खर्चापुढे नगण्य ठरतात. शिवाय अशा प्रकल्पांमुळे होणारा फायदा मोजताना त्यामुळे होणारा पर्यावरणीय नाश व तोटा कधीच विचारात घेतला जात नाही. जंगल- संपत्तीचा नाश, पाण्याखाली जाणारी जमीन, पाण्याच्या साठयामुळे भूकंपाचे वाढते संभव, धरणाखाली जाणाऱ्या गावांमधील हजारो लोकांचे विस्थापन, जमीन पाणथळ व क्षारयुक्त होणे, जलजन्य रोगांचा प्रादुर्भाव, गाळ बसल्याने जलसाठ्यांचे आयुष्य कमी होणे इ. बाबींचा धरणापासून होणारा फायदा मोजताना विचार होत नाही. 

याही पलीकडे जाऊन - बहुतेक सर्व मोठी धरणे ही ‘योजना’ म्हणून बांधली जातात. परंतु एखाद्या क्षेत्रातील वर्षावाचे नियोजन करण्याची दूरदृष्टी यात दिसत नाही. धरण जेथे होणार, ज्यांचा त्यामुळे फायदा होणार अशा सर्व भूभागांचे रहिवाश्यांचे सर्वेक्षण, त्यांची माहितीसुद्धा उपलब्ध नसते. या सर्वांवर कळस चढतो तो नोकरशाहीच्या उदासीनतेमुळे, अकार्यक्षमतेमुळे. धरण बांधून झाल्यावरही त्याचा फायदा संपूर्ण अपेक्षित अशा क्षेत्राला मिळत नाही. अशा पाणी नियोजनामुळे विषमतेची मुळे रुजत जातात.

दुस-या दिवसाची चर्चा 'पाणी नियोजनाची पर्यावरणीय भूमिका आणि जलनियोजनाचे पर्याय ' या विषयावर झाली. तांत्रिक व आर्थिक बाजूंचा विचार होतो त्याच पद्धतीने पर्यावरणाचा केवळ विचार करून चालणार नाही, तर जल - नियोजनात ‘ पर्यावरण ' ही एक भूमिका असली पाहिजे असे आग्रही प्रतिपादन या वेळी करण्यात आले.

पर्यावरणीय भूमिकेतून पाणी नियोजनाकडे पाहणे, म्हणजेच पाणी हा एक जिवंत घटक मानायला हवा. निसर्गाकडे पाहिले, तर असे लक्षात येते की निसर्गातील प्रत्येक घटक, प्रत्येक 'सिस्टीम' ही एका परमोच्च स्थितीकडे जात आहे. (Ecosystems are moving towards a climax ) अशा प्रकारच्या ‘सिस्टीम’ मध्ये प्रत्येक घटकाचा (ऊर्जा, पाणी इ.) पूर्णपणे वापर होत असतो. (optimality) या निसर्गचक्रात काहीही वाया जात नसते आणि प्रत्येक प्रक्रियेचे आपले स्वतःचे असे एक महत्त्व असते. (अर्थातच हे आपल्याला दिसेलच असे  नाही !) उदाहरणार्थ, आपण म्हणतो की नदीचे पणी नुसते वाहून चालले आाहे, त्यामुळे जर आपण ते अडविले नाही तर ते वाया जाईल. खरे तर हे पाणी वाया जात नसते, तर नदीच्या खालच्या भागात जो गाळ, कचरा, प्रदूषण साठलेले असते, ते वाहून न्यायला या पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळेच, निसर्गात पाणी हे कधीच 'वाया' जात नसून पाणी याला एक जिवंत स्वरूप आहे याची जाणीव म्हणजेच पाण्याकडे पाहण्याचा पर्यावरणीय दृष्टिकोन असे म्हणता येईल. पर्यावरणीय भूमिकेतून पाण्याचे नियोजन करावयाचे, तर निसर्गातील जलचक्राचा अभ्यास करून मानवी गरजांचा त्याच्याशी सुसंगत पद्धतीने सांधा जुळवून देता यायला हवा. यासाठीच पाणलोट क्षेत्राचे नियोजन करणे, असा हेतू हवा आणि सर्वक्षण, फक्त धरण बांधण्यायोग्य जागांचे होऊ नये, अशी अपेक्षा चर्चेत व्यक्त करण्यात आली. जलनियोजनाशी संबंधित अशा जमीन जंगल इ. गोष्टींचे नियोजनही याबरोबरच करायला हवे. याचसाठी मोठ्या अवजड योजनांऐवजी छोटा योजना राबवल्या पाहिजेत; कारण सर्वांगीण विचार करून राबविलेल्या छोट्या योजनांमुळे बसणारे छोटे धक्के पचवण्याची क्षमता निसर्गात असते, परंतु मोठ्या योजनांच्या नियोजनातील 'छोट्या' चुकांमुळेदेखील मानवी जीवनावर व संस्कृतीवर मोठे घाव पडतात. त्यांच्याशी जुळवून घेण्याची क्षमता निसर्गात असत नाही. 

चर्चेच्या दरम्यान असे देखील प्रतिपादन करण्यात आले की, पाणी ही एक सामाजिक तसेच राजकीयदृष्ट्या ' उपयुक्त ' गोष्ट ठरली आहे. त्यामुळे समता हे सामाजिक मूल्य म्हणून प्रस्थापित होण्यासाठी पाण्याचे समान वाटप होणे हेसुद्धा आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठीसुद्धा 'मोठया' योजनांपेक्षा ' लहान' योजना जास्त साहाय्यभूत होतील.

* ‘पर्यावरणीय भूमिका' या विषयावर चर्चा झाल्यानंतर पाणी नियोजनाचे अनेक लोकांनी विविध स्तरांवर जे प्रयोग केले आहेत त्यांच्यावर चर्चा झाली. या मध्ये पाणी पंचायतीच्या ‘पाण्याचे समान वाटप' यापासून ते संपूर्णपणे नैसर्गिक ऊर्जा व पाणी यांवर आधारित पीक पद्धती (ज्या मध्ये पाणी व ऊर्जा, या बाबत स्वयंपूर्णता प्राप्त करण्याचे प्रयोग करण्यात आले आहेत) यापर्यंतच्या अनेक प्रयोगांचा समावेश होता. मुंबईच्या श्री. के. आर. दाते यांनी अशाच काही प्रयोगांबद्दल माहिती दिली. महाराष्ट्रात नंदुरबार, सांगली व इतर ठिकाणी असेच प्राकृतिक शेतीचे प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगांनी हे सिद्ध करायचा प्रयत्न आहे की केवळ तीन एकर जमिनीत, कुठल्याही बाह्य गोष्टींचा (पाणी, ऊर्जा, खत) वापर न करता एका कुटुंबाच्या सर्व गरजा भागवता येतील. श्री. घारे यांनी अंबेजोगाई येथील प्रयोगाविषयी सांगितले. या प्रयोगात पावसाचे पाणी 14 लहान लहान टाक्यांमध्ये साठवून त्याचा उपयोग संपूर्ण वर्षभराच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यशस्वीरित्या केला आहे. आपल्या पारंपरिक पद्धतींच्या मागेही पर्यावरणाचा किती विचार होता, आणि त्या खरोखरच किती उपयोगी होत्या याचे एक सुंदर उदाहरण निवृत्त सिंचन अधिकारी श्री. ठाकुर यांनी दिले. श्री. ठाकुर हे सिंचन अधिकारी होते, तेव्हा त्यांना डिग्रज (जि. सांगली) या गावी श्री. फराटे नावाचे एक शेतकरी भेटले. ते संपूर्णपणे प्राकृतिक आणि पारंपरिक पद्धतीने शेतीकरीत असत. अशा पद्धतीने शेती करूनही त्यांना भरपूर पीक मिळत असे. पण पुढे गावात सिंचन आले तेव्हा फराटे यांनीही या 'वैज्ञानिक' पद्धतीचा वापर सुरू केला. काही काळातच त्यांची जमीन पाणथळ, आणि शेतीसाठी निकामी झाली. यावरून लक्षात येते की पारंपरिक पद्धती या लोकांच्या आणि निसर्गाच्या अनेक वर्षांच्या सहवासाने तयार झालेल्या असल्याने त्या आपोआपच पर्यावरणीय संतुलन सांभाळून असतात.

या चर्चासत्राच्या शेवटी जरी कोणतीही घोषणा करण्यात आली नसली अथवा कोणतेही जाहीर प्रकटन करण्यात आलेले नसले तरी एका बाबतीत सर्व उपस्थितांचे एकमत झाले. सध्याच्या पाणी नियोजनामध्ये अनेक त्रुटी असून त्यांचा विशेषतः पर्यावरणीय संदर्भामध्ये मूलगामी पुनर्विचार होण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या पर्यावरणीय भूमिकेच्या साधारण चौकटीविषयीही बहुतांशी एकमत होते. या चौकटीचे तपशील स्पष्ट होण्यासाठी पर्यायी रचनांवर अजूनही अनेक प्रयोग व्हायला हवेत, त्याचप्रमाणे अशा प्रयोगांची फलिते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावीत याकरिता व अशा माहितीच्या सुसूत्रीकरणासाठीच्या प्रयत्नांचीही गरज आवर्जून मांडण्यात आली.

चर्चासत्रात पुढे आलेल्या अनेक मुद्यांवर व सूचनांवर विचार आणि काम व्हावे यासाठी चर्चासत्राच्या शेवटी काही कार्यक्रम निश्चित करण्यात आले. केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष श्री. चितळे यांनी आवाहन केले होते की कुठल्याही पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे मूल्यांकन जर ‘परिसर' अथवा चर्चेस उपस्थित कोणी इतर करण्यास तयार असेल, तर सरकारतर्फे त्यांना या कार्यक्रमासाठी अधिकृत परवानगी, तसेच आर्थिक साहाय्य जल आयोग मिळवून देईल. तसेच, जर कोणत्याही ‘खोऱ्याच्या संपूर्ण नियोजना' साठी आराखडा तयार करण्यास कोणी तयार असेल, तर त्यांना देखील सर्व मदत देऊ असे श्री. चितळे यांनी सांगितले.

हे कार्यक्रम हाती घेण्यासाठी चर्चेस उपस्थित असणारांतील काही जणांची एक समिती तयार करायची असे निश्चित झाले. ही समिती काही दिवसांतच कार्यरत होईल.

आठ एप्रिल हा दिवस सर्वत्र 'पाणी दिन' म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी सरकारच्या समारंभात परिसरने ‘पाणी नियोजन पर्यावरणीय भूमिका' मांडावी असे आमंत्रण श्री. चितळे यांनी दिले.

चर्चासत्रावर आधारित अशा एक दिवसाच्या कार्यशाळा महाराष्ट्राच्या विविध भागात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Tags: बांध  लघु सिंचन प्रकल्प सिंचन जल प्रभंद Dam Irrigation projects Irrigation #Water management weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके