डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

केंनेथ ई. बोल्डिंग या विख्यात अमेरिकन अर्थ- शास्त्रज्ञाच्या मते प्रचंड धरणे बांधणे हा एक विनाशकारी उपदव्याप आहे. धरणामुळे पर्यावरणावर किती घातक परिणाम होऊ शकतात हे त्यांनी 'ए ब्लेंड ऑफ इकॉलॉजिकल अवेअरनेस' या कवनात सांगितलेले आहे. त्यांचे स्वैर रूपांतर 'एकेका धरणाचा एकूण खर्च किती' या शीर्षकाखाली पुढे देत आहोत.

धरणासाठी खर्च किती? अंदाज नेहमी कमीच धरतात 

नदीकाठच्या खोऱ्यांची धूप कधी ध्यानात घेतात? 

धरणाखाली सुपीक जमीन किती बुडते? - तेही नुकसान ! 

मुळासकट नष्ट करतात केवढे थोरले घनदाट रान..

जुन्या वाडयांवस्त्यांसकट ग्रामजीवन होते नष्ट 

नियोजित शिक्षणाच्या योजनांचे वाया कष्ट 

फुक्कट सगळी प्रगती, तिची फळे कधी कोण चाखतो? 

उखडलेला गरीब किसान आता शहरी बेकार ठरतो...

बख्खळ मासे आरंभाला, पुढे त्यांची खुंटते वीण 

गाळ साचतो, निचरा थांबतो, डोंगर झिजतात पावसावीण 

धरणामधलं अमाप पाणी वाफेमधून जाते उडून 

नदीचीही होते देना, पात्रात भलतेच बदल घडून...

हुशार हुशार इंजिनियर, तेही करू शकतात गुन्हा 

गुपचुप जसे विसरून जातात- नदीत गाळ साठेल पुन्हा ! 

पाट-कालवे काढणारांना कसे समजत नाही अजून 

जमीन ओलीकच्च रहाते, वारेमाप पाण्यात भिजून

धरणामधले पाणी असो किंवा त्याचे पाणलोट म्हणा 

त्यांत माजले कृमि, कीटक, जंतू, रोग माहीत कुणा? 

पातळी जर खाली गेली, निपजतात अगणित टोळ 

असल्या लाख वास्तवांचा अज्ञानाने चालतो घोळ...

फायदेदेखील मोजता येतात, पण त्यांची एक तन्हा : 

त्यांच्यामुळे श्रीमंतांचे पुन्हा पुन्हा खिसे भरा... 

गरिबांच्या पाठीवरती सगळा बोजा पडत असतो 

खर्चवेच आणि फायदा यांचा तक्ता असाच दिसतो-

सबळ कारणे दाखवून जेव्हा माणसे बांधतात एक धरण 

पायातळी बळी देतात एकच सत्य-पर्यावरण !

- केंनेथ ई. बोल्डिंग

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके