डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कणकवलीमधला अनुभव तर वेगळाच. नसिरुद्दीन शहा येणार हे आधीच कळालेलं, तिथे प्रयोग झाला तो रात्री 9 वाजताचा. प्रयोग संपला आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाला. त्यामध्ये मी माझी ओळख सांगितली. ‘‘...माझं नाव- शोभा पांडुरंग बनसोडे, पुणे मनपामध्ये सफाईसेविका म्हणून काम करीत आहे. मी पुणे मनपा कामगार युनियनची कार्यकर्ती आहे. काम आणि घर आणि संघटनेचं ऑफिस यापलीकडे माझे काही नाही. नाटक म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं. नाटकाशी माझा कधीच संबंध आला नाही. या नाटकाचा सराव चालू असताना श्वास कधी बंद पडायचा, कधी चालू व्हायचा हे माहीत पडायचं नाही. एक मनामध्ये  भीती असायची. ही भीती 8 जानेवारीला रात्री संपली आणि माझ्या कुटुंबामध्ये दिवाळी साजरी केली. त्याच रात्री जीवन जगण्याला एक दिशा मिळाली.

- 1 -

काही दिवसांपुरतं किंवा महिन्याकरिता काहीतरी घेतील आणि सोडून देतील इतपत आमची मानसिक तयारी होती, किंबहुना सर्वांनी सुरुवातीला तरी असाच विचार केला असावा असं मला वाटतं. अतुल पेठेंनी काही शारीरिक तर काही मानसिक अशा प्रकारचे व्यायाम प्रकार घ्यायला सुरुवात केली. मात्र जसं महात्मा जोतिबा फुलेंचं चरित्र वाचण्यास सुरुवात झाली तसं डोक्याला सुन्न करणारं, मनाला सुन्न करणारं असं काहीतरी आपण अनुभवतोय याचा प्रत्यय यायला सुरुवात झाली. महात्मा फुलेंचं चरित्र पुढे सरकत होतं तसतसे आमच्या विचारातील-आचारातील बदलही घडण्यास सुरुवात झाली. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर मी या नाटकाच्या प्रक्रियेपूर्वी काही दिवस आधी सोमवारचा उपवास करण्यास सुरुवात केली होती. माझ्याप्रमाणेच इतरही लोक उपवास करीत होते. अतुल पेठेंनी सांगितलेल्या काही सूत्रांपैकी ‘योग्य आहार व भूक असेल तेव्हाच खा’, ‘उपवास म्हणजे व्रतवैकल्यं नसून रोजच करण्याची गोष्ट आहे’, याप्रमाणे आम्ही आचरण करण्यास सुरुवात केली. साधारण दोन महिन्यांतच मी तो उपवास करण्याचं बंद केलं. 

नाटक म्हणजे विंगा, नाटक म्हणजे मोठमोठे दिवे, नाटक म्हणजे मोठाले सेट, नाटक म्हणजे हसणं-रडणं आणि मधेमधे एखादे गाणं. अशी ढोबळ संकल्पना या आधी माझ्या तरी डोक्यात होती. परंतु  नाटकासाठी श्वासाचा व्यायाम करणं, उच्चार नीट यावेत यासाठी दक्षता घेणं, आवाज नीट यावा म्हणून गळा शाबूत राखणं, प्रयोगाआधी कितीही थकलेलो असलो तरीही प्रयोगाच्या वेळी मात्र ताजतवानं वाटतंय हे दाखवणं किती अशक्यप्राय गोष्ट आहे, ते आज आम्ही बिंधास्तपणे सांगू शकतो. प्रयोगाच्या आदल्या दिवशी आम्ही एकदा सराव करतो म्हणजे करतोच. उद्या काय करायचं त्याचं नियोजन आधीचं पक्क केलेलं असतं. ज्या दिवशी प्रयोग असेल त्या दिवशी किमान तीन तास आधी आम्ही बहुतेक सर्वजण त्या ठिकाणी हजर. बरं एवढंच नाही तर तिथल्या अनेक समस्या ज्या तिथल्या लोकांनी सोडवायच्या असतात त्या आम्ही आधीच सोडवून मोकळे. म्हणजे रंगमंचाची झाडलोट करणे, खिळे शोधणे, प्रकाशव्यवस्थेला मदत करणे अशी बरीच बारीक-सारीक काम करून आम्ही प्रयोगाच्या आधी एकदा आपापल्या दृश्यांच्या संवादाची चक्री (नव्याने परिचित झालेला नाटकी शब्द- संवादाचा सराव) मारतो. मग गाण्यांची पट्टी आणि गाण्यांचा पूर्ण सराव. अहो एवढ्यावरच संपत नाही तर दर वेळी दर प्रयोगाला कुठल्या विंगेतून प्रवेश करायचा आणि कुठल्या विंगेतून बाहेर पडायचं हे एक मोठं दिव्य आम्ही आजही करतो. 

संदीप प्रकाश मोरे, एम.ए.,एम.एस.डब्ल्यू.
सफाई कामगार  

- 2 -

माझे पती पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत. त्यांचं शिक्षण एम.ए.एम.एस.डब्ल्यू. असून ते युनियनच्या माध्यमातून ‘सत्यशोधक’ नाटकामध्ये निवेदक व अन्यही भूमिका करतात. ते नाटक सुरू होण्यापूर्वी दररोज नाटकाच्या प्रॅक्टिसकरता जातो असं सांगून जायचे. घरी आल्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांच्याबद्दल तसेच दररोज घडणाऱ्या घटनांबद्दल मला सांगायचे. आज हे वाचन झालं, आज हे व्यायाम प्रकार घेतले असं रोजच घरी आल्यानंतर सांगायला लागले. एक दिवस अतुल पेठे सरांनी नाटकासाठी एका छोट्या मुलीची गरज आहे असं सांगितलं. आम्हांला छोटी मुलगी (श्रेया) असल्याने मी आणि माझे पती आम्ही मिळून श्रेयाला नाटकात घ्यायचं असा निर्णय घेतला. मी म्हणाले की बघू आपली श्रेया करते का ते? मग काय दुसऱ्या दिवशी श्रेयाला घेऊन आम्ही प्रॅक्टिसला गेलो. आधी मला काहीच कळेना की, आता पुढे काय होणार? थोडीशी गडबडल्यासारखी मी या सफाई कामगार कलाकारांमध्ये सहभागी झाले. 

मला कधी नाटक पाहायची संधीच मिळाली नाही, कारण मी एका छोट्या वस्तीत राहणारी व घरची परिस्थिती अत्यंत बेताची. माझी आई सकाळी उठून कामाला लवकर जायची, मग मी माझ्या दोन बहिणी व छोटा भाऊ या सगळ्यांची आंघोळ, जेवण आणि घरातलं कामं सगळं करायचे. ते शाळेत गेल्यावर मग मी माझं आवरून शाळेत जात असे. परंतु माझं घरकामामुळे अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. मला शाळेतील बाईदेखील ओरडत. असं करताकरता मी कशीबशी सातवी पास झाले. मात्र माझ्या नशिबाने म्हणा किंवा योगायोगाने मला नवरा चांगला शिकलेला मिळाला. परंतु आजपर्यंत मला माझ्या पतीने शिक्षणाचा अडसर येऊ न येता समजून घेतलं. त्यांच्यामुळे आणि श्रेयामुळे मी खरं तर या नाटकात आले. त्यामुळं नाटक म्हणजे काय? ते कसं असतं? कसं करतात? हे कळालं.

अमृता मोरे

- 3 -

मी पुणे महानगरपालिकेत 2001 मध्ये वडिलांच्या जागेवर वारसा हक्काने ड्रेनेज बिगारी या हुद्‌द्यावर कामास लागलो. माझं रोजचं आयुष्य म्हणजे सकाळी उठून कामावर जाणं, त्यानंतर घरी येणं. या व्यतिरिक्त वस्तीतील एका छोट्याशा मंडळाचा अध्यक्ष असल्याने जमेल तेवढं सामाजिक कामात भाग घेणं. यामध्ये स्काऊट अँड गाइडचा ग्रुप तयार केला होता, अभ्यासिका सुरू केली होती. त्याचबरोबर एक लेझीम संघही मी तयार केलेला होता. या प्रकारे ‘सत्यशोधक’ नाटकाच्या पूर्वीचं माझं सर्वसाधारण आयुष्य. या आधी मी फक्त शाळेत अगदी मोजक्याच शब्दांत महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंचं चरित्र वाचलेलं किंवा ऐकलेलं होतं. परंतु धनंजय कीर यांनी लिहिलेलं महात्मा फुलेंचं संपूर्ण जीवन चरित्र किमान 3 ते 4 महिने रोज 3-4 तास सातत्याने वाचत होतो. त्यामुळे महात्मा फुलेंचे विचार, त्यांचं कार्य खूपच जवळून अनुभवायाला मिळालं. आम्ही चरित्र वाचत असताना प्रत्यक्ष ते प्रसंग डोळ्यांसमोर घडताहेत असंच वाटत होतं. या वाचनामुळे शालेय पुस्तकांव्यतिरिक्त इतरही अवांतर पुस्तके वाचण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे इतर प्रकारची अनेक पुस्तकं मी माझ्या कुटुंबासाठी खरेदी करून वाचण्यासाठी घेऊन येतो. 

‘सत्यशोधक’च्या नाटक दौऱ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरता आलं. नवीन माणसं, नवीन माती, तिथलं पाणी, त्यांचं जीवनमान या सगळ्या गोष्टी जवळून अनुभवायला मिळाल्या. नवीन ठिकाणी जाऊनही तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला नव्यानं शिकलो. तिथली माणसं आमच्याशी नव्यानं जोडली गेली. प्रत्येक ठिकाणी प्रयोग घेणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्ती यांनी आमच्या पूर्ण सत्यशोधक टीमचा पाहुणचार उत्तमरीत्या केला आणि करतच आहेत. ‘सत्यशोधक’च्या जलशाच्या प्रवासात बस, रेल्वे तसंच विमान या सगळ्या प्रकारच्या प्रवासाच्या साधनांचा अगदी जवळून परिचय झाला.

दत्ता सुभाष शिंदे

 - 4 -

‘सत्यशोधक’च्या प्रवासाला 21 जानेवारी 2012 पासून पुण्याच्या बाहेर पडलो. बाहेरगावचा पहिला प्रवास साताऱ्यापासूनच. माझ्या मनात असा कधी विचार आला नाही की आम्ही असा प्रवास करू. सांगलीला आमचा प्रयोग झाला. दुसऱ्या दिवशी पेपरमधील बातमी वाचली. नाट्यसंमेलन 92 वं होतं. पण ‘सत्यशोधक’ नाटकामुळे नाट्य संमेलनामध्ये जान आली. मी लगेच माझ्या मिस्टरांना फोन केला की, पेपरमध्ये ‘सत्यशोधक’बद्दल बातमी आली आहे. त्यांनाही खूप आनंद झाला. ते म्हणाले, ‘शोभा, आपण स्वप्नातसुद्धा हा विचार केला नव्हता की तू नाटकात काम करशील दिवस कुठे नेतील कुणीच सांगू शकणार नाही.’ त्यांना त्या दिवशी रात्री झोप लागली नाही. इतका आनंद झालेला. 

प्रवास पुढे चालूच होता. कणकवलीमधला अनुभव तर वेगळाच. नसिरुद्दीन शहा येणार हे आधीच कळालेलं, तिथे प्रयोग झाला तो रात्री 9 वाजताचा. प्रयोग संपला आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाला. त्यामध्ये मी माझी ओळख सांगितली. ‘‘...माझं नाव- शोभा पांडुरंग बनसोडे, पुणे मनपामध्ये सफाईसेविका म्हणून काम करीत आहे. मी पुणे मनपा कामगार युनियनची कार्यकर्ती आहे. काम आणि घर आणि संघटनेचं ऑफिस यापलीकडे माझे काही नाही. नाटक म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं. नाटकाशी माझा कधीच संबंध आला नाही. या नाटकाचा सराव चालू असताना श्वास कधी बंद पडायचा, कधी चालू व्हायचा हे माहीत पडायचं नाही. एक मनामध्ये  भीती असायची. ही भीती 8 जानेवारीला रात्री संपली आणि माझ्या कुटुंबामध्ये दिवाळी साजरी केली. त्याच रात्री जीवन जगण्याला एक दिशा मिळाली.’’

शोभा पांडुरंग बनसोडे 

- 5 -

मी पुणे मनपामध्ये जेसीबी ऑपरेटर या पदावर काम करीत आहे. तुम्ही म्हणाल जेसीबी आणि नाटक कला ह्यांचा काय संबंध? सांगतो. मशीनवर काम करत असताना सतत बसणाऱ्या हादऱ्याने माझ्या कमरेच्या स्लोडीस्कचे ऑपरेशन झाले, जेसीबीवर काम करण्यास निकामी झालो. युनियनने स्थापित केलेल्या श्रमिक कलापथकात युनियनच्या सहकार्याने मुक्तातार्इंच्या प्रयत्नाने मी सामील झालो. जेसीबी यंत्र चालवण्याआधी मी हार्मोनियम वाजवण्यास साधारण शिकलो होतो. कामचलाऊ वाजवता येत होतं. श्रमिक कलापथकात मी हार्मोनियम वाजविले. कलापथकाद्वारे ओला- सुका कचरा विभाजन करण्याचे प्रबोधन करण्याचा कार्यक्रम राबवला जात होता. कलापथकात प्रबोधन करण्यासाठी गाणी वाजवली व गायली जात होती. 

एक दिवस मुक्तातार्इंनी मला सांगितले. शेखर, अतुल पेठे हे आपल्याला बरोबर घेऊन नाटक करणार आहेत. जोतिबा फुल्यांच्या जीवनावर. ह्याआधी एकदाच एका मीटिंगमध्ये मी त्यांना पाहिलं होतं. अतुल पेठेंचा अगोदर असा काही परिचय नव्हता. आणि एक दिवस खरोखरच नाटक करावयाचे ठरले आणि जवळजवळ 35 ते 40 कार्यकर्ते नाटकात काम करण्यासाठीच्या मीटिंगमध्ये जमले. दुसऱ्या-तिसऱ्या मीटिंगला आम्ही 12 ते 15 लोक उरलो आणि बाकावरील वाचनास सुरुवात झाली. वाचनासोबत एक अचाट व्यक्तिमत्त्वाची ओळख होऊ लागली. माझ्या मनात त्यांच्याविषयी एक नाव आहे ते म्हणजे ‘नाटक योगी!’ 

योगी जसा साधना करतो तसा आमचा हा योगी नाटकाची साधना करतो. एक एक शब्द एक एक विचार लोकांपर्यंत पोचविण्यासाठी केवढी मोठी धडपड चाललेली असते. नाटकाच्या सुरुवातीला आम्हाला सरांनी सिंहगडाच्या पायथ्याशी एका बंगलावजा कोठीत नाटकाच्या शिबिरासाठी नेले. माझ्यासारख्या एक ऑपरेशन झालेल्या माणसाला सिंहगड चढायला लावला. माझ्यात वेगळाच आत्मविश्वास आला. माझ्यातच नाही तर सर्वांच्यामध्येच. आम्ही नाटकादरम्यान खूप फिरलो, जवळजवळ 60 ते 70 गावे. तीन राज्यांत आम्ही जाऊन आलो. नाटकातील प्रत्येक माणसात एका नवीन माणसाने जन्म घेतला. 

चंद्रकांत (शेखर) जाधव 

- 6 -

मी पुणे मनपामध्ये सफाईसेवक म्हणून कामाला आहे. माझे गाव मु.भैरववाडी, ता.मोहोळ, जि.सोलापूर. मी जातीने मांग आहे. आई-वडिलांची गरिबी, लोकांचे शेण-माती करून आई- वडिलांनी केरसुन्या विकून जीवन जगवले. मला चार बहिनी- मी एकुलता आहे. 1972 साली दुष्काळ पडला म्हणून मी पुण्याला आलो. 1974 साली मनपाचा सफाईसेवक म्हणून नोकरी पत्करली आणि 1977 साली कायमची नोकरी झाली. 

मला पहिल्यापासूनच गाणी, अभंग, गवळणी म्हणण्यासाठी भजनी मंडळात जाणे ही आवड होती. स्वत: गाणी लिहिणे व कामगारांच्या जीवनावरही गाणी लिहिणे हा माझा छंद होता. मी गेली 25 वर्षे महानगरपालिकेसमोर निदर्शनाच्या वेळेस युनियनच्या वतीने व त्यांच्या आधाराने गाणे, पोवाडे गात आलो. 

जेव्हा पहिल्याच दिवशी श्रमिक भवन येथे मीटिंग आयोजित केली त्या दिवशी त्यांनी आम्हांला तुम्ही काय करता, तुमच्यात कलागुण काय आहेत असे विचारले. ज्यांनी त्यांनी वेगळे विचार मांडले. पहिल्या मीटिंगला 35-40 कार्यकर्ते होते, पण जवा नाटकाचे वाचन चालू झाले तवा एक एक कार्यकर्ता गळू लागला आणि हेच अतुल पेठेंना बघायचे होते. अधूनमधून मुक्ताताई आमचे वाचन चालू असताना यायच्या, बसायच्या. पण त्या जाताना आम्हांला म्हणायच्या, ‘बघा अतुल लई रागीट आहे, तुम्हांला जमेल का, नाहीतर तुम्ही त्यानला आताच सांगा, आम्हांला जमायचं नाही म्हणून.’ शेवटच्या क्षणाला आमच्यामध्ये फक्त 15 जण उरले आणि नाटकाचे वाचन चालू झाले. त्यांनी आम्हाला प्रथम व्यायामाचे प्रकार शिकवायला सुरुवात केली, नंतर वाचन. जसजसे वाचन वाढत गेले तसतसा जोतिबांचा निर्धार आम्हांला कळायला लागला. काळजाचा ठाव घेणारा प्रसंग वाचण्यात येऊ लागला, मग मात्र आम्ही सर्वांनी निर्धार केला की आता आपण जोतिबाचे, सावित्रीबार्इंचे नाटक करायचेच. 

मुक्तातार्इंनी अतुल पेठेंना अचूक शब्द दिला होता, करतील कारण तसे ते जिद्दी कार्यकर्ते आहेत. असे करत असताना अतुल पेठेंना वाटले, ठीक. त्यांनी या कलाकारांना पुण्यात न बोलवता अचानक सिंहगड येथे शिबिर घेण्याचे ठरवले आणि सांगितले की, चार दिवस (रात्रंदिवस) तिकडेच राहायचे हे घरी सांगा, आपले लागणारे सामान घेऊन या. मी त्या दिवशी घरी गेलो आणि बायकोला म्हणलो, ‘मी नाटकाच्या रियाजाला चाललो आहे, चार दिवस येणार नाही, माझी वाट बघू नका.’ माझी बायको माझ्याकडे बघतच राहिली पाच मिनिटे. ‘हे काय आता? लेकरंबाळं सोडून कुठे चाललाय डोंगरात.’ मी म्हणालो, ‘आगं तो डोंगर नाही, मी आता झोपलेल्या समाजाला जागं करायला चाललो आहे, माझ्या जाण्यानं लाल बावट्याचं व युनियनचं नाव गाजणार आहे, मला गेलंच पाहिजे.’

नागनाथ श्रावण गायकवाड  

Tags: धनंजय कीर सत्यशोधक नाटक मुक्ता मनोहर अतुल पेठे सावित्रीबाई फुले महात्मा फुले सफाईकामगार Dhananjay Kir Satyshodhak Natak Mukta Manohar Atul Pethe Savitribai Phule Mahtama Phule SafaiKamagar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके