डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

धर्माने मला दया-क्षमा-शांती, या महामंत्राची दीक्षा दिली!

ऐहिक सुखांकडे पाठ फिरवून व्रतस्थ जीवन जगण्याचा निर्णय ही माझ्या धर्माने मला दिलेली फार मोठी प्रेरणा आहे. धर्मगुरूचा अभ्यास करीत असताना मला ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वज्ञानाबरोबरच अन्य धर्मांचाही अभ्यास करावा लागला. त्यामुळे धर्मांबद्दलच्या विचारांच्या माझ्या कक्षा रुंदावल्या. अन्य धर्मांबद्दलही माझ्या मनात आदरभाव निर्माण झाला. अन्य धर्मांकडे पाहण्याची उदार दृष्टी मला प्राप्त झाली. हे माझ्या धर्माने मला दिलेले पहिले वरदान आहे असे मला वाटते. धर्मगुरू पदाचा अभ्यास करीत असताना मला उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. रोममधील ‘ग्रेगोरियन’ या जगप्रसिद्ध विद्यापीठात धर्मशास्त्राचे शिक्षण घेण्याचे भाग्य मला लाभले. या निमित्ताने युरोप खंडाचा प्रवास घडला.

कार्ल मार्क्स याचे धर्मासंबंधीचे विचार अतिशय प्रखर आहेत. त्याने म्हटलेलं आहे की, ‘धर्म ही अफूची गोळी आहे.’ या त्याच्या विधानाला तत्कालीन रशियन समाजव्यवस्था आणि राजकीय परिस्थिती जबाबदार आहे. परंतु कार्ल मार्क्सने असेही सांगितलेले आहे की, ‘शोषितांना धर्माचा आधार वाटतो.’ त्यामुळे कार्ल मार्क्सचं पहिलं विधान समजून घेताना दुसऱ्याही विधानाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अनेकदा त्याच्या विधानाच्या ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ या अर्ध्याच भागाकडे सोईस्कररीत्या लक्ष वेधले जाते आणि ‘धर्म कालबाह्य झाला आहे’ अशी भूमिका घेतली जाते. परंतु कार्ल मार्क्सने धर्माची उपयुक्ततादेखील मान्य केलेली आहे, हे लक्षात घेतलं जात नाही. भारतीय तत्त्वज्ञानात म्हटलेलं आहे की, धर्मामुळे समाजाची धारणा होत असते. (धारणा च धर्म इत्याहू धर्म धारयात प्रजा)

इतिहासाची पाने चाळल्यानंतर लक्षात येते की धर्मांचीही पाटी कोरी करकरीत नाही. धर्माच्या नावाने युद्धे खेळली गेली आहेत. रक्तपात झाला आहे. स्त्रियांना दुय्यम स्थान देऊन तुच्छ लेखलं गेलं आहे. प्रसंगी स्त्रियांचा छळही झाला आहे. आपल्या देशात धर्मानेच वर्णव्यवस्था मान्य केल्यामुळे, चार स्तरांत समाजाची विभागणी झाली आहे. पहिला स्तर तेवढा श्रेष्ठ आणि उच्चवर्णीय समजला गेला आहे. याचा अनुभव आम्हीही घेतलेला आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे आम्हांला तत्कालीन समाजात दुय्यम मानलं गेलं आहे. वेळप्रसंगी अस्पृश्याची वागणूकही दिली गेली आहे. मूळ सामवेदी ब्राह्मण असलेल्या माझ्या समाजाला केवळ धर्म बदलल्यामुळे सापत्न भावाने वागवले गेले आहे. आमच्या पूर्वजांनी पाचशे वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे समाजाची खूप भरभराट झाली आहे. धर्मांतर पूर्वकाळात आमचा समाज अडाणी होता. शिक्षणापासून वंचित होता. अर्थातच दारिद्र्यात खितपत होता. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालू केलेल्या शिक्षण संस्थांमुळे समाज सुशिक्षित व पर्यायाने समृद्ध होत गेला. तत्कालीन समाजव्यवस्थेने आम्हांला धिक्कारले; पण माझ्या धर्माने आम्हांला स्वीकारले. सन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास दिला. जातीयतेची बंधने समाजाने झुगारून दिली. ख्रिस्ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीदेखील उंबरठा ओलांडून बाहेर पडली. ‘चूल आणि मूल’ यापलीकडचे जीवन जगू लागली. जातिबंधनाच्या सोवळ्या-ओवळ्यात न अडकता शेती-भाती करू लागली. पुढे जाऊन शिकू लागली. नोकरी करू लागली. स्त्रीजीवनाच्या या परिवर्तनाचा आर्थिक व सांस्कृतिक दृष्ट्या समाज समृद्ध होण्यात फार मोठा वाटा आहे हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. याची बीजे मिशनऱ्यांच्या शिकवणीत आणि बायबलमध्ये आहेत. माझ्या धर्मात कर्मकांड, व्रतवैकल्ये यांना मुळीच स्थान नाही. ‘भेदाभेद अमंगळ’ ही शिकवण आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. मुहूर्त, उपास यांनाही स्थान नाही. उदा. लग्न करू इच्छिणारे तरुण-तरुणी त्यांच्या आणि कुटुंबाच्या सोईनुसार दिनांक आणि वेळ ठरवून चर्चमध्ये जातात आणि धर्मगुरूंकडून लग्नसंस्काराचा स्वीकार करतात.

माझ्या धर्माने स्त्रियांना समानतेची वागणूक दिली आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात समान सहभाग दिला आहे. एखादी ॠतुमती स्त्री थेट वेदीवर जाऊन पवित्र बायबलचं वाचन करू शकते, इतकी उदारता माझ्या धर्माने दाखवली आहे. याची मुळे नव्या करारातील प्रभू येशूच्या पुरोगामी शिकवणुकीत आणि त्याने केलेल्या कार्यात आहेत. काही तात्त्विक कारणांमुळे स्त्रीला गुरुदीक्षा दिली जात नसली; तरी चर्च संचालित कोणत्याही संस्थेमध्ये अगदी प्राचार्यासारख्या उच्च पदापर्यंत ती पुरुषाइतकाच वाटा उचलते. अत्यंत परिवर्तनीय असलेल्या माझ्या धर्माने समाजपरिवर्तनात फार मोठी भूमिका बजावली आहे. अशा परिवर्तित समाजाचा मी एक घटक आहे.

मी धर्माने ख्रिस्ती आहे. शिवाय एक धर्मगुरू आहे. धर्मगुरू होण्यासाठी माझ्यावर बंधनेही नव्हती आणि कोणती सक्तीही नव्हती. आईवडील, घरदार आणि कुटुंब, संसार या ऐहिक सुखांकडे पाठ फिरवून व्रतस्थ जीवन जगण्याचा निर्णय ही माझ्या धर्माने मला दिलेली फार मोठी प्रेरणा आहे. धर्मगुरूचा अभ्यास करीत असताना मला ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वज्ञानाबरोबरच अन्य धर्मांचाही अभ्यास करावा लागला. त्यामुळे धर्मांबद्दलच्या विचारांच्या माझ्या कक्षा रुंदावल्या. अन्य धर्मांबद्दलही माझ्या मनात आदरभाव निर्माण झाला. अन्य धर्मांकडे पाहण्याची उदार दृष्टी मला प्राप्त झाली. हे माझ्या धर्माने मला दिलेले पहिले वरदान आहे असे मला वाटते. धर्मगुरू पदाचा अभ्यास करीत असताना मला उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. रोममधील ‘ग्रेगोरियन’ या जगप्रसिद्ध विद्यापीठात धर्मशास्त्राचे शिक्षण घेण्याचे भाग्य मला लाभले. या निमित्ताने युरोप खंडाचा प्रवास घडला. त्याचे फलित म्हणजे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘ओयासिसच्या शोधात’ हे माझे वाचकप्रिय पुस्तक! युरोपमधील वास्तव्यामुळे एका वेगळ्या संस्कृतीचे मला दर्शन घडले. त्यामुळे माझ्या विचारांची क्षितिजे अधिक व्यापक बनली. जगाकडे पाहण्याची मला एक वेगळी दृष्टी मिळाली.

1960 च्या दशकामध्ये लॅटिन अमेरिकेत ‘लिबरेशन थिऑलॉजी’ हे मुक्तीचे तत्त्वज्ञान लोकप्रिय झाले. त्यामुळे धर्मगुरू आणि धर्मभगिनी यांनी धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक चळवळीमध्ये झोकून दिले. गुरुपदाचा अभ्यास करीत असताना या तत्त्वज्ञानाशी माझा परिचय होऊन त्याचा माझ्यावर प्रभाव पडला.

1980चे दशक हे वसई-विरार-पालघर या पट्ट्यासाठी अतिशय ‘अस्वस्थ दशक’ होते. काही समाजविघातक शक्तींनी समाजाला वेठीस धरले होते. राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे भू-माफियांनी वसईभर थैमान घातले होते. कोणीही प्रतिकार करण्यासाठी पुढे येत नव्हता. अशा वेळी प्रभू येशू ख्रिस्ताकडून प्रेरणा घेऊन काही समविचारी व्यक्तींच्या सहकार्याने मी ‘हरित वसई संरक्षण समिती’ची स्थापना केली. आम्ही जिवाची पर्वा न करता लढण्यासाठी रस्त्यावर उतरलो. या मागची प्रेरणा अर्थातच प्रभ येशू ख्रिस्ताच्या बायबलमधील शिकवणुकीची आणि लिबरेशन तत्त्वज्ञान या विचारांची होती, असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.

साहित्याची मला मुळातच आवड होती. लेखनातही मला रुची होती. माझी ही आवड लक्षात घेऊन धर्मपीठाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी साहित्याचा अधिक जवळून अभ्यास करण्याची मला संधी दिली. मीही त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या मराठी साहित्य परिषदेची ‘साहित्य आचार्य’ ही पदवी पदरात पाडून घेतली. या पदवीमुळे साहित्य लेखनातील माझा आत्मविश्वास दुणावला. मी लिहिलेल्या पत्रांना, लेखांना प्रसिद्धी मिळू लागली. पुण्याच्या ‘राजहंस’ प्रकाशनाचे पुरोगामी विचारांचे संपादक दिलीप माजगावकर यांनी माझी अनेक पुस्तके प्रकाशित केली. त्यामुळे मराठी साहित्यिकांच्या गोतावळ्यात माझा प्रवेश झाला. कविवर्य कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, वसंत बापट, विजय तेंडुलकर, दुर्गा भागवत यांसारख्या असंख्य मान्यवर विचारवंत साहित्यिकांशी जवळून परिचय होऊन त्यांच्याशी माझे आंतरिक नाते निर्माण झाले. स्वाभाविकच त्यांच्या साहित्याचा आणि विचारप्रवाहांचा नकळत माझ्यावर प्रभाव पडला. साहित्यातील अनेक पुरस्कारांचा मानकरी होण्याचे भाग्य मला मिळाले. या सगळ्यांंचा कळस म्हणजे 93 व्या अखिल भारतीय मराठी सहित्य संमेलनाचे मला मिळालेले अध्यक्षपद! माझ्या निवडीला धर्माचे परिमाण न लावता साहित्यसेवा लक्षात घेऊन मराठी सारस्वतांनी एकमताने केलेली माझी निवड हा मी माझा आजवरचा फार मोठा सन्मान समजतो. हे सगळं जरी खरं असलं तरी या पदापर्यंत पोहोचण्याच्या मुळाशी माझ्या धर्माचीच प्रेरणा आहे हे मी कदापि नाकारू शकत नाही.

जवळजवळ दोन तपे मी ‘सुवार्ता’च्या संपादकपदाची धुरा सांभाळली. त्या काळात व्याख्याने, परिसंवाद, वाचक मेळावे आणि लेखनशिबिरे भरवून समाजात मराठी साहित्यविषयक अभिरुची निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक होतकरू लेखक-कवींना व्यासपीठ निर्माण करून दिले. या माझ्या साहित्य चळवळीला धर्मपीठाचा संपूर्ण पाठिंबा होता हे लक्षात घेण्यासारखे आहे.

धर्माने मला दया, क्षमा आणि शांतीच्या महामंत्राची दीक्षा दिली आहे. ख्र्रिस्ताने आम्हांला शिकवले की वंचित, शोषित, अपंग, दिव्यांग इत्यादींची सेवा ही परमेश्वराची परमसेवा आहे. ख्र्रिस्ताने केवळ तोंडी शिकवण दिली नाही, तर त्याने प्रत्यक्ष कृतीने सेवेचा आदर्श आमच्यापुढे ठेवला आहे. त्याने कुष्ठरोग्याला कवेत घेतलं, कुबड आलेल्या एका बाईला ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. उत्तम सॅमेरिटन आणि गरजवंत स्त्रीच्या दाखल्यातून त्याने सेवा आणि दयाधर्माचाच पुरस्कार केला आहे. प्रभू ख्र्रिस्ताने शिकवलेला हा धर्म मी माझ्या अत्पमतीनुसार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मगुरुपदाच्या प्रशिक्षण काळात अनाथाश्रमाला भेट देऊन त्यांची सेवा करण्याचा अनुभव मी घेतला आहे. त्यातून मला एक वेगळंच आत्मिक समाधान लाभत असे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी माझी निवड होताच संपूर्ण पालघर जिल्ह्यातून अभिनंदनाच्या निमित्ताने शाली व पुष्पगुच्छांचा वर्षाव होऊ लागला. लोकांच्या या प्रेमाला एक विधायक वळण देण्याच्या हेतूने मी उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुबांना आर्थिक मदत देण्याचे आवाहन करताच वसईभरातून अनेक व्यक्ती आणि संस्था पुढे आल्या. सुमारे साडेतेरा लाख रुपयांचा निधी गोळा झाला. देणारे हात हजार होते. मी फक्त निमित्त होतो; पण त्या मागची प्रेरणा माझा धर्म आणि माझा येशू होता.

हरित वसईचे आंदोलन चालवीत असताना अनेक प्रकारचे कार्यकर्ते भेटले. स्वाभाविकच काही तात्त्विक मतभेद झाले. काही कार्येकर्ते मला दुरावले. त्यांनी माझ्याशी उभा दावा मांडला, तर काहींनी माझ्यासंबंधी मानहानिकारक लेखन केले. पत्रकबाजीही केली. परंतु मी यांपैकी कोणालाही याबद्दल कधी जाब विचारला नाही, की कोणाबद्दलही मनात राग ठेवला नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्यावर समाजातील एका छोट्या गटाने माझ्यावर जहरी टीका केली. परंतु अशा व्यक्तींकडे आणि या प्रकाराकडे मी समदृष्टीने पाहिले. त्यांना मनापासून क्षमा केली. जिथे शक्य होते तेथे मी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, माझ्यासंबंधीचे त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. या मागील प्रेरणा क्रुसावर खिळलेल्या प्रभू येशूची होती. दया, क्षमा या मूल्यांचे पालन केल्यामुळे आत्मिक शांतीचा फार मोठा अनुभव मी घेत आलो आहे. दया आणि क्षमा हे कोणावर केलेले उपकार नसून ते आपणच आपल्यावर केलेले उपकार आहेत अशी माझी धारणा आहे, त्यामुळे आपले जीवन अधिकाधिक  निरामय होत असते.

प्रभू ख्र्रिस्ताने म्हटले आहे, ‘‘जे शांती करतात ते धन्य’’ अशा या ख्रिस्ताकडून प्रेरणा घेऊन मी व्यक्ती-व्यक्तींमध्ये  म्हणजे पती-पत्नीमध्ये, दुरावलेल्या दोन मित्रांमध्ये  आणि पिता-पुत्रांमध्ये समेट घडवून उद्‌ध्वस्त होऊ पाहत असलेले संसार सावरले आहेत. दोन समाजामध्ये समेटाचे व शांतीचे नाते जोडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व धर्मार्ंच्या प्रतिनिधींच्या सभा-संमेलने आयोजित करून धर्माधर्मांत सुसंवाद निर्माण करण्याचाही प्रयत्न केला आहे. व्यक्तींमध्ये आणि समाजामध्ये शांती व समेट घडवून आणणे यापेक्षा मोठा आनंद दुसरा असू शकत नाही.

आता माझ्या पाठीच्या जीवघेण्या आजारामुळे खाटेला खिळलो आहे. कधीकधी वेदना असह्य होतात. तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर येतो क्रुसावर खिळलेला, जखमांनी विव्हळ झालेला, मरणयातना भोगणारा- तरीही त्याबद्दल तोंडातून ‘ब्र’ही न काढणारा; उलट मारेकऱ्यांना क्षमा करणारा प्रभू ख्र्रिस्त! त्याच्याशी एकरूप होताना मी माझ्या शारीरिक वेदना विसरून जातो.

परिवर्तनाचं साधन असलेला धर्म आज शोषणाचे हत्यार झालेले दिसून येते. राजकीय स्वार्थासाठी धर्माधर्मांमध्ये कलह निर्माण केला जातो आहे. अशा वेळी धर्माकडे सकारात्मक बाजूने पाहिले तर धर्म ही अफूची नव्हे तर औषधाची गोळी ठरू शकते. शांतिपूर्ण समाजव्यवस्था निर्माण करण्यात धर्मच महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असे माझे प्रांजळ मत आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

फादर फ्रान्सिस दिब्रिटो,  वसई, पालघर
francisd43@gmail.com

महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक, अध्यक्ष- साहित्य संमेलन 2019


Comments

  1. shivaji pitalewad- 28 Aug 2021

    आपण मार्क्स या विचारवंतांना एकेरीने का बरं बोलत असतो?

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके