डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ते सोळा-सतरा वर्षे इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी होते. परत आले तेव्हा गांधींच्या चळवळीत सामील झाले. ते राजकीय जीवनात व्यग्र. त्यांना कारावासही घडतच होता. इकडे कमला नेहरू यांची घरात हेळसांड होत होती. पण म्हणून नेहरूंचे आपल्या पत्नीवर प्रेम नव्हते काय?

गांधीविरुद्ध गांधी हे नाटक सध्या गाजते आहे. त्यात कुणी म्हणते, गांधींवर अन्याय झाला तर कुणी म्हणते अन्याय झाला नाही. कुणी म्हणते, गांधींपेक्षा हरीलाल अधिक प्रभावी आहे. गेल्या रविवारी गोविंदराव तळवलकरांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. सामान्यांचे निकष तुम्ही असामान्यांना कसे काय लावता?

लोकमान्यांना जेव्हा मंडालेला धाडण्यात आले तेव्हा त्यांच्या पत्नी म्हणाल्या की, ‘अशा लोकांनी संसार कशासाठी करावा?’ त्यांच्या त्या उद्गारात येथील अनेक स्त्रियांची कहाणी दडलेली आहे. रेव्हरंड टिळक, जवाहरलाल नेहरू, गौतम बुद्ध, सावरकर अशी नावे त्यांनी वानगीदाखल दिली आहेत.

नेहरूंसंबंधी ते म्हणतात... ते सोळा-सतरा वर्षे इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी होते. परत आले तेव्हा गांधींच्या चळवळीत सामील झाले. ते राजकीय जीवनात व्यग्र. त्यांना कारावासही घडतच होता. इकडे कमला नेहरू यांची घरात हेळसांड होत होती. पण म्हणून नेहरूंचे आपल्या पत्नीवर प्रेम नव्हते काय? पण तेही बांधले  गेले होते. त्यांना आपली जबाबदारी सोडता येत नव्हती. उद्या कोणी नेहरू पती-पत्नीचा विचार सामान्य कुटुंबाच्या दृष्टीने करून नाटक लिहिले, तर कमला नेहरूंचे जीवनही शोकांतिका वाटेल...

तळवलकरांचा हा लेख वाचता वाचता माझ्या डोळ्यांसमोर पुढील दृश्य दिसू लागले.

(नेहरू आणि कमला टेबलावर ब्रेकफास्ट घेत आहेत.)

कमला : तुमची मिटींग आटोपून तुम्ही किती वाजता परताल?

नेहरू :  ते मला काही सांगता येत नाही.

कमला : दर वेळी तुम्ही मला सांगता येत नाही असं कसं सांगता?

नेहरू : अगं, तुला माहीत आहे ना? मला शेकडो लोक भेटायला येतात. माझी मिटींग आटोपल्यावरही.

कमला : मग त्यांना सांगायचं की उद्या या म्हणून!

नेहरू : असं करून कसं चालेल! किती लांबून येतात ते! स्वराज्याच्या चळवळीला माणसं नको जोडायला?

कमला : तुम्ही त्यांच्याशी बोला, मी इकडे तुमची वाट बघत झुरते.

नेहरू :  मला समजून घेण्याचा प्रयत्न कर.

कमला : मी तुम्हाला समजून घ्यायचं. तुम्ही मात्र मला समजून घेणार नाही.

नेहरू :  अगं, पण घरी स्वरूप आहे ना?

कमला : तिचं नाव काढू नका. पाण्यात बघते ती मला.

नेहरू :  काहीतरी काय बोलतेस!
 
कमला : अहो, ती द्वेष करते माझा. लोक मला तिच्यापेक्षा सुंदर म्हणतात ना, म्हणून जळते ती माझ्यावर.

नेहरू : तुम्हा बायकांचं काहीतरीच!

कमला : काही तरीच कसं? सरळ तोंडावर बोलत नाही. टोमणे मारते. दुसऱ्यांकडे निंदानालस्ती करते. सर्व समजतं मला. येऊन सांगतात मला सर्वजण.

नेहरू : ठीक आहे! माझे वाचनालय केवढं मोठे आहे. तिथे जाऊन वाचत बस.

कमला : संबंध दिवस? तुम्ही आता निघणार वर्किंग कमिटीच्या मिटींगला. ती चालेल सायंकाळपर्यंत. मग जाणार किसान मेळाव्याला. शेतकऱ्यांनीही भाषणाला टाळ्या दिल्या की तुमचं भाषण लांबलं. तेसुद्धा तुमच्यासारखेच. सभेच्या निमित्त शहरात हिंडायला मिळतं. जातील घरी रात्री एक दोनला. तोपर्यंत घरच्या बायका बघताहेत वाट.

नेहरू : ठीक आहे. तुला माझं काहीच पटत नाही.

कमला : कसं पटेल? ह्या घराला काही शिस्त म्हणून नाही. कुणीही केव्हाही यावं, केव्हाही जावं, धर्मशाळा आहे नुसती.

नेहरू : पण त्याचा तुला काही त्रास होतो का? घरी गडीमाणसं, आचारी सर्व आहेत.

कमला:  इथंच तर तुमचे चुकतं. मी स्वयंपाकाला काय नाही म्हणते? पण वेळेवर यावं, वेळेवर खावं. काही  नाही. आणि येताना एकटे याल तर ते नाही. तुमच्याबरोबर आणखी चार देशभक्त येणार!  मामंजींचा दरबार भरणार. ह्या सर्वांत मी मात्र हरवलेली असते.

नेहरू: ठीक आहे. शांत हो. आता जातो मी, लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. प्लीज, रागावू नकोस. हसून निरोप दे.

(कमला मूकपणे मान हालवते).

Tags: गांधी लोकमान्य कमला नेहरू Drama Kamala Neharu Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके