डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वंसताच्या आगमनाची चाहुल, युती सरकारच्या काळात शहरांच्या नामांतरासाठी चाललेली धडपड आणि आगामी ऑल्म्पिकमधला भारताचा सहभाग यावर खुसखुशीत भाष्य करणाऱ्या या छोटेखानी नोंदी.

आला वसंत ऋतु आला

धुळकट बर्फाचा मळकट कीस बांबूच्या काडीवर थापून गुळचट चिक्कट पाकात बुडवायचा आणि शाळकरी पोरांना तो स्वस्त दरात पुरवायचा अशी योजना आता कार्यान्वित होईल. साखर कारखान्यांत न पोचू शकलेला ऊस गुऱ्हाळांच्या चरकांखाली सवलतीच्या दरात विकत मिळेल. चरक गंजलेला असल्यास रसात आलेलिंबू पिळणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक मानले जाईल. 

आता उच्च वर्णीयांच्या सधन घरांत दरदिशी चाळीस रुपयांचे तरी आइसक्रीम घेतलेच पाहिजे, हे व्रत कसोशीने पाळले जाईल. पोहोण्याचे तलाव दर आठवड्याला स्वच्छ केलेच पाहिजेत, हा नियम मागे घेतला जाईल. ज्या तलावावर पोहोण्यापेक्षा पाहाण्याचीच मजा जास्त असेल तेथील तरुण प्रेक्षकांसाठी नवे कठडे आणि गॅलऱ्या बसवण्याची कामे सुरू झाली आहेत. थंड हवेच्या ठिकाणी उकडहंडी होऊ नये म्हणून प्रत्येक अतिथिगृहात आणि सरकारी विश्रामगृहांत वाळ्याचे पंखे घेतलेल्या सेविकासुंदरींना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

काकड्या, करवंदे असल्या चैनीच्या वस्तूंवरील विक्रीकर दुप्पट करण्यात येईल, तर बाटलीतील शीतपेयांवरील विक्रीकर माफ करण्यात येईल. तरीही प्रवास, थंड हवेची ठिकाणे इत्यादी चैन परवडत नसेल तर चाळीतील रहिवाशांना एकटे अथवा सहकुटुंब गच्चीवर झोपू दिलेच पाहिजे असा कायदा करण्यात येईल. कमसे कम ‘चलो आंगणा चलो गच्ची!

----------

युतीचे नामांतर विधेयक

सत्तांतराला वर्ष झाले. दुसरे वर्ष नामांतराचे आले. आधी महाराष्ट्रात, म्हणजे महान राष्ट्रात आणि मग भारतात, म्हणजे लहान राष्ट्रात गावागावांची नामांतरे घडवून आणा असा संदेश रिमोट कंट्रोलवरून सुटला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर आणि अहमदनगरचे अंबिकानगर ही योजना पार पडलीच आहे. 

अहमदपूरला अहंकारपूर, छत्री निजामपूरला संत्रीमोसंबीपूर, इस्लामपूरला ईश्वरपूर, मलकापूरला राणीगंज, दौलताबाद आणि खुलताबादला अनुक्रमे ऋद्धिपूर आणि सिद्धिपूर, मूर्तिजापूरला मूर्तिमंतपूर, मंगरूळपीरला बेंगरूळदेव, फैजपूरला फेटेगाव, शहापूरला राजनगर, जाफराबादला म्हसवडे... इत्यादी लहानमोठी गावे आता नव्या नावांत नांदू लागतील. 

या गावांच्या नावांच्या पाट्या भगव्या पार्श्वभूमीवर किंवा निदान केशरी अक्षरात लिहिल्या गेल्या पाहिजेत असा आम्ही कायदाच करणार आहोत. यासाठी येत्या अधिवेशनातच ग्रामनामांतर हे विधेयक विधिपूर्वक मांडण्यात येईल.

----------

खेळ नवे खेळू

ऑलिंपिकमध्ये आमचा नंबर ढेग! सॉकर ऊर्फ फूटबॉलमध्ये आमच्या टीमलाच लाथेने उडवण्यात येते. हॉकीत एके काळी नंबर पहिला होता - आजही पहिलादुसरा आहे, पण शेवटून. व्हॉलीबॉल वा बास्केटबॉलला आमची उंची कमी पडते. आपल्या ऊष्ण देशात अँथलेटिक्समध्ये घामटं निघतं आणि जिमनेस्टिक्समध्ये सालटं! अलीकडे कुस्ती म्हणजे झाली आहे नुस्ती धांगडमस्ती. 

खरं सांगायचं तर आपला समुद्रकिनारा खूप मोठा आहे पण समुद्र म्हणजे अगस्ती ब्राह्मणानं घाण करून टाकलेलं पाणी. त्यात आपण उतरत नाही बुवा! कबड्डी कबड्डी कबड्डी हा ख्योळ आपल्याला जमत होता पण आता च्यामारी, त्यात जपानबी उतरतोया. आता त्याचं काही खरं नाही. कुणालाही पत्ता लागू न देता आपण चमचालिंबू, लंगडी, एका पायावरची फुगडी या खेळांची प्रॅक्टीस आता सुरू केली तर पंचवीस वर्षांच्या गुपचूप साधनेनंतर यातला एखादा खेळ ऑलिंपिकमध्ये घेता येईल. तो खेळणारा दुसरा देश नसल्यामुळे त्यात तरी आपला पहिला नंबर लागेलच की! कोणी काही म्हणो, आपण बाबा सदासुखी!

Tags: संभाजीनगर  नामांतर औरंगाबाद ऑलिम्पिक युती सरकार वसंत फिरस्ता Samhajinagar Aaurangabad Olympic Shivsena-BJP Alliance Spring Firasta weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके