डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वाटचालीत उमटलेले ठसे आणि भावी कालाबद्दलची अपेक्षा


'साता उत्तरांची कहाणी'च्या चित्रणात उमटलेल्या 
व्यक्तींच्या विचारांच्या आणि 
प्रत्यक्ष व्यवहारातील ध्येयाच्या 
पूर्तीसाठी करावा लागणारा 
नित्यनूतन संघर्ष....

दरवेळी त्यात केवढे काटेदगडांचे वैभव... 
ही न संपणारी कथा व्यक्तीला 
स्वतःशीच भेटण्याची संधी देते.

अशीच स्वतःशी भेट घेण्याच्या
प्रयत्नांतून उमटलेली ही
निवेदनाची पावले!

काही आकार...
लेखकाच्या मनाचे,
काही समाजाचे, 
काही... तुमचे आमचेही...
 

॥ खंड : 1॥

आत्मचरित्र लिहिणे मला जमेल असे वाटत नाही. एकतर मला स्वतःबद्दल बोलणे इष्ट वाटत नाही. शिवाय पंचवीस वर्षांपूर्वी मी जी 'साता उत्तराची कहाणी' लिहिली, तिच्यामध्ये माझ्या पिढीतील वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या माझ्या सात मित्रांच्या राजकीय जीवनाच्या वाटचालीचे चित्र रेखाटण्याचा मी प्रयत्न केला होता. तरीदेखील साधनाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर ज्यावेळी मला म्हणाले, की मी माझ्या राजकीय व सामाजिक जीवनातील वैचारिक वाटचाल कशी झाली ते लिहावे; आणि त्या अनुषंगाने काही घटनांचाही उल्लेख करावा. त्या वेळी मी त्यांना ‘प्रयत्न करून पहातो’, असे म्हणालो. हाच तो प्रयत्न.

मी मध्यमवर्गीय पांढरपेशा कुटुंबात जन्मलो. माझे वडील 1910 सालचे ग्रॅज्युएट होते. त्यांना आणि माझ्या आईलाही वाचनाची फार आवड होती. त्यामुळे लहानपणापासून माझ्याभोवती भरपूर पुस्तके असत. मुलांसाठी असलेली 'आनंद' आणि 'शालापत्रक' ही दोन मासिके आमच्याकडे नियमाने येत. 'आनंद'च्या 'राजा शिवाजी' खास अंकात वासुदेव गोविंद आपटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे छोटे रसाळ चरित्र लिहिले होते. ते मी मराठी तिसऱ्या इयत्तेत असताना वाचले; आणि मला ते फार आवडले. माझे डोळे लहानपणापासून अधू होते आणि मला कुठलाच खेळ नीट खेळता येत नसे. त्यामुळे वाचनाचा छंद मला लागला.

मी पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या लोकल बोर्डाच्या शाळेत चौथी पास होईपर्यंत शिकलो. आमचे शिक्षक फार चांगले होते. त्यांच्यामुळे गणित आणि भाषा हे विषय पक्के झाले. नंतर वडिलांची बदली सातारला झाली. सातारा हायस्कूलमध्ये पाटणकर सर आम्हांला इंग्रजी सुंदर शिकवीत. शिवाय घरी वडील तर्खडकर भाषांतर पाठमाला करून घेत. त्यामुळे इंग्रजी विषय मला आवडू लागला. वडील मला सातारच्या शहर वाचनालयात घेऊन गेले आणि सभासद म्हणून माझे नाव नोंदवले. त्या वाचनालयातून मी 'गड आला पण सिंह गेला' ही हरी नारायण आपट्यांची कादंबरी, 'सावळ्या तांडेल' ही नाथ माधवांची कांदबरी, 'सुखाचा मूलमंत्र' हे नारायण हरी आपटे यांचे पुस्तक वाचले.

पांढरपेशा जगाला हादरा 
आमच्या घरात आम्ही नऊ भावंडांपैकी तिघेच जण, माझ्या दोन मोठ्या बहिणी आणि मी जगलो. सर्वांत थोरल्या बहिणीचे लवकर लग्न झाले. मी धाकटा आणि एकटा मुलगा म्हणून माझे घरात खूप लाड होत. मात्र अभ्यासाच्या बाबतीत आईची शिस्त कडक असे. एखाद्या वेळी जरी मार्क कमी मिळाले, तरी ती फार रागावत असे. माझ्याबरोबर कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांचा मुलगा आप्पा पाटील होता. त्याची व माझी मैत्री होती. त्याच्याबरोबर सातारला मंगळवार पेठेत धनिणीच्या बागेत जे मुलांचे वसतिगृह होते, तेथे मी जाऊ लागलो. तेथील वातावरण पाहून मी चकित झालो. मुले हाताने भांडी घासतात, झाडतात, सगळेजण एकाच पंक्तीत, जात-धर्म असला विचार न करता मजेत जेवतात; हे सारे मला नवीन, अनपेक्षित होते. शिवाय हे साधे राहणारे विद्यार्थी- माझा मित्र भास्कर पाटील वर्गात पहिला नंबर मिळवीत असे. कर्मवीर अण्णांना मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्यांची पांढरीशुभ्र दाढी, त्यांच्या हातातला सोटा, त्यांचा मोठा आवाज यामुळे माझे मन दडपूनच गेले. अण्णांच्या या बोर्डिंगमुळे माझ्या पांढरपेशा जगाला हादरा बसला. आपल्या सुरक्षित पण संकुचित घरकुलापेक्षा हे विशाल कुटुंब आहे हे माझ्या लक्षात आले; आणि माझ्या मनाला ते वातावरण भावले. आमच्या घरी सोवळे-ओवळे फारसे नसे; पण आई-वडिलांचे उपास, ठराविक सणवार हे होतेच. आम्ही मंगळवार पेठेत विश्वेश्वराच्या देवळाजवळ रहात होतो. तेथे सतत चालणारी कीर्तने, रामाच्या गोटातील राममंदिरातील उत्सव, या वातावरणापेक्षा कर्मवीर अण्णांच्या सावलीत आणि शिस्तीत कष्ट करणारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मुक्त जीवन मला अधिक आकर्षक वाटले..

मी स्वभावाने बुजरा, एकलकोंडा होतो. मित्रांपेक्षा पुस्तकांच्यात माझे मन रमत असे. सातार्याहून वडिलांची बदली पारनेरला झाली आणि तेथे हायस्कूल नसल्यामुळे आई, माझी बहीण आणि मी यांचे पुण्यात बिर्हाड झाले. माझे मामा पुण्यातच वकील होते. माझा जन्मही पुण्यात आजोळीच झाला. त्यामुळेच पुण्याशी ऋणानुबंध होताच.

1935 साली आम्ही पुण्यात आलो. 1938 साली माझ्या वडिलांनी सदाशिव पेठेत लहानसे घर घेतले. गेली 65 वर्षे मी त्या घरातच राहतो. माझे मुंबईचे मित्र मला 'खास सदाशिवपेठी पुणेकर' म्हणूनच ओळखतात. पुण्यामध्ये मॉडर्न हायस्कूलमध्ये मी जाऊ लागलो. त्या वेळी मॉडर्न हायस्कूल नुकतेच सुरू झाले होते आणि ते शनिवार पेठेत मेहुणपुर्यात तीन समोरासमोरील जुन्या वाड्यांमध्ये होते.

पटवर्धन सरांनी उघडलेले इंग्रजीचे दालन 
आम्हांला इंग्लिश शिकवायला वाय. जी. पटवर्धन सर होते. त्यांच्यामुळे इंग्रजी भाषा आणि इंग्रजी साहित्य यांच्यातील सौंदर्य मला समजू लागले आणि त्या भाषेवर व साहित्यावर मी प्रेम करू लागलो. पटवर्धन सर हे असामान्य शिक्षक होते. ते व्याकरणही वेगळ्याच शैलीत शिकवीत. ते आम्हांला सहावीत (आताच्या दहावीत) व्याकरण शिकविताना एका तासाला म्हणाले, “आज मी तुम्हांला सिनॉनिम्स् म्हणजे समानार्थी शब्द शिकविणार आहे. नेसफील्डने सिनॉनिम्सवर एक प्रकरण दिले असले तरी मला ते बरोबर वाटत नाही. कारण कोणतेच दोन शब्द समानार्थी नसतात. प्रत्येक शब्दाच्या अर्थाची छटा वेगळी असते." जरा थांबून सरांनी ग्रामर उघडले आणि ते म्हणाले, "हे पहा नेसफील्ड साहेबाने जॉय, डिलाइट अॅण्ड हॅपिनेस हे तीन शब्द समानार्थी दिले आहेत. हे बरोबर नाही. लहान मुलाला फुगा, चेंडू मिळाला म्हणजे जो आनंद होतो त्याला म्हणतात, जॉय. तुम्हांला क्रिकेट, मॅच पाहताना, गाणे ऐकताना जो आनंद होतो त्याला म्हणतात डिलाइट; आणि हॅपिनेस् याचा अर्थ आता या वयात तुम्हांला कळायचा नाही. पुढे मोठे झाल्यावर ज्या वेळी अनहॅपिनेस वाट्याला येईल, तेव्हा हॅपिनेस म्हणजे काय ते कळेल." पटवर्धन सरांनी जेन ऑस्टिनचे 'प्राइड अॅण्ड प्रेज्युडिस' ज्या तऱ्हेने शिकवले त्यामुळे श्रीमंत इंग्रज लोकांमधील दांभिकतेवरील सूक्ष्म विनोदाची खुमारी समजली. पटवर्धन सरांची माझ्यावर खास मर्जी होती. ते ग्रंथालय प्रमुख होते; आणि मला दर आठवड्याला एक इंग्रजी पुस्तक वाचायला देत. मॉडर्न हायस्कूलच्या त्या छोट्या ग्रंथालयातील 'गॅलीव्हर्स ट्रॅव्हल्स' 'ऑलिव्हर डिस्ट', 'डेव्हीड कॉपरफील्ड, ' 'रिप् व्हॅन् विंकल' इत्यादी कितीतरी पुस्तकांच्या संक्षिप्त आवृत्त्या वाचल्या. डिकन्स हा लेखक मला फार आवडू लागला. कॉलेजमध्ये गेल्यावर मी त्याच्या मूळ कादंबऱ्या वाचल्या आणि एका वेगळ्याच जगाची मला ओळख झाली. औद्योगिक क्रांतीनंतर सुरुवातीस इंग्लंडमध्ये कामगारांचे जीवन किती हलाखीचे व कष्टाचे होते आणि या कष्टमय जीवनातही माणुसकीचे पाझर कसे वहात होते, याचे डिकन्सने केलेले चित्रण अप्रतिम आहे. डिकन्स हा राजकीय नेता वा विचारवंत नव्हता. पण त्याच्या कादंबऱ्यांमुळे असंख्य वाचकांच्या मनात कष्टकरी गरिबांबद्दल सहानुभूती निर्माण झाली.

जयप्रकाशांच्या पुस्तकाची चर्चा
जयप्रकाश नारायण यांच्या 'व्हाय सोशलिझम्' या पुस्तकाचे नानासाहेब गोरे यांनी मराठीत रूपांतर केले होते. त्याचे वाचन आमच्या स्टडी सर्कलमध्ये चालत असे. एखाद्या मुद्याचे पुस्तकातील विवेचन संपल्यावर नानासाहेब किंवा एस. एम. जोशी त्यावर बोलत आणि नंतर चर्चा सुरू होई. बंडू गोरे आणि विनायकराव खूप आवेशाने बोलत असत; आणि त्यांचे मुद्देही चांगले असत. मी केवळ श्रोता असे. कारण मी स्वभावाने बुजरा होतो आणि एखादी शंका विचारली तर ती इतरांना अगदीच प्राथमिक, हास्यास्पद वाटणार नाही ना, असे मला वाटे. वाचन संपल्यावर राजकारणावर चर्चा चाले. त्या चर्चेत मला हळूहळू रस वाटू लागला. मधु लिमये ठामपणे त्याचे म्हणणे मांडत असे; आणि एस. एम. त्याचे नेहमी कौतुक करीत.

जयप्रकाश नारायण यांच्या पुस्तकात बाबू भगवानदास या भारतीय तत्त्वचिंतकांच्या अध्यात्मपर भूमिकेचे सविस्तर खंडन केले होते. त्यावर बोलताना नानासाहेब गोरे म्हणाले. हिंदुस्थानात आध्यात्मिक भूमिकेचा जो प्रचंड पगडा लोकांच्या मनावर आहे. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्यासारख्या ऐहिक ध्येयासाठी लढायला लावणे सोपे नाही.' यावर मधू म्हणाला, 'भगवानदासांची आध्यात्मिक भूमिका मलाही मान्य नाही. पण महात्मा गांधींच्या विचारात अध्यात्म प्रवणता असूनही त्यांनी दक्षिण आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि 1920 आणि 1930-32 साली आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. हे तुम्हांला मान्यच केले पाहिजे.' यावर गोरे म्हणाले, 'गांधींचे मोठेपण मी मान्य करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीतच एस. एम. आणि मी सत्याग्रह करून तुरुंगात गेलो. परंतु गांधी हे एक असामान्य अपवाद आहेत. आणि गांधींचे मोठेपण मान्य केले तरी राजकारणात अध्यात्म किंवा धर्म आणू नये असेच माझे मत आहे. 1920 साली गांधीजींनी असहकाराच्या चळवळीस खिलाफतीचा प्रश्न जोडला हे बरोबर झाले नाही, असे मला वाटते. पंडित जवाहरलाल नेहरूंचेही तेच मत त्या वेळीही होते. एस. एम. जोशींनीही गोर्यांच्या म्हणण्यालाच पाठिंबा दिला. मधू शेवटी म्हणाला, 'मला हे मान्य आहे की अध्यात्म आणि राजकारण यांची सरमिसळ योग्य नाही.’

शिरूभाऊंची "जम्मत"
त्या वेळी शनिवार पेठेत कन्या शाळेसमोरच्या रस्त्याला चंद्रचूड वाड्यात काँग्रेसचे कार्यालय होते. एस. एम. जोशी हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी होते. त्याच वाड्यात शिरुभाऊ लिमयांची खोली होती. त्यांच्या खोलीत मधु लिमये, बंडू गोरे, माधव लिमये आदी मित्र जमत. मीही तिकडे मधून मधून जाऊ लागलो. शिरुभाऊंच्या खोलीवर राजकारणावरील पुस्तके होती. ते मला म्हणाले, 'तू कोणतेही पुस्तक घेऊन जा.' मी तेथूनच 'स्वराज्य मार्गदर्शक लोकमान्य टिळक' हे आपटे गुरुजींनी लिहिलेले पुस्तक वाचले. शिरुभाऊंनी मला स्वा. वीर सावरकर यांचे 'माझी जन्मठेप' हे पुस्तक दिले. ते वाचताना देहभानच हरपले. शिरुभाऊ मला म्हणाले, 'मी तुला आणखी काही पुस्तके देईन. पण ती तुला येथे वाचता येणार नाहीत. कोठे जाऊन ती वाचायची, हे मी तुला सांगेन.’ तेव्हा प्रभात रोड होता, पण बंगले तुरळक होते. कचरे पाटलांची विहीर जेथे होती तेथे एक पडळ होती. तेथे मैदान आणि लहानशा दोन खोल्या होत्या. ही जागा शिरुभाऊंनी मिळवली होती. आडबाजूच्या या जागेकडे कोणी फारसे फिरकतही नसे. त्या जागेला शिरुभाऊ 'जम्मत' म्हणत. जम्मतवर दर रविवारी सकाळी आम्ही राष्ट्रध्वजाला वंदन करण्यासाठी जमत असू. वासू गाडगीळ आणि चिंतु करंदीकर हे सेवादलातील दोघेजण या ध्वजवंदनाच्या वेळी आम्हांला ओळीत उभे करीत आणि ध्वजवंदन केल्यावर आम्ही ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’ हे गीत म्हणत असू. 'जम्मत' मध्ये कोणाच्या लक्षात येणार नाही असे एका कोपऱ्यात एक जुने कपाट होते. त्यात ब्रिटिश सरकारने जप्त केलेली अनेक पुस्तके होती, मी तेथेच जाऊन 'भारत में अंग्रेजी राज' आणि 'सेडिशन कमिटी रिपोर्ट' वाचला. या सरकारी अहवालात अरविंद घोष, बारिन्द्रकुमार घोष, खुदिराम बोस, उल्हासकर दत्त यांची तसेच माणिकताळा बॉम्ब केसची व बंगालमधील 'युगांतर' आणि 'वंदे मातरम्' या क्रांतिकारकांची संपूर्ण माहिती होती. ‘भारत में अंग्रेजी राज’ मध्येही शचिंद्र संन्याल, काकोरी कटाचा खटला इत्यादींची माहिती मिळाली.

शिरुभाऊंनी मोठ्या परिश्रमाने सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाणार्या क्रांतिकारकांच्याबद्दलची अनेक पुस्तके जमवली होती. त्या पुस्तकांमधून मला वासुदेव बळवंत फडके, नाशिकची अभिनव भारत संघटना, इंग्लंडमधील श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम कामा, स्वा. वीर सावरकर, सेनापती बापट आदींच्या कार्याची माहिती मिळाली. तसेच बंगालमधील श्री यतिन मुखर्जी (बाघा जतीन) यांनी एम्. एन. रॉय यांना बटेव्हियातून शस्त्रे मिळविण्यासाठी कसे पाठविले, बाघा जतीन यांच्या बालासोर येथील गुप्त जागेला ब्रिटिश लष्कराने वेढा घातल्यावर ते त्यांच्याशी लढताना गतप्राण कसे झाले, ही रोमहर्षक कहाणी एका पुस्तकात मला वाचायला मिळाली.

अमेरिकेत क्रांतीची तयारी करणारी गदर पार्टी, विष्णु गणेश पिंगळे, लाला हरदयाळ आदींची माहिती एका पुस्तकात होती. 'देशत्यागाचा इतिहास' यात शौकत उस्मानी हा तरुण अजमेरहून निघून अफगाणिस्तानमार्गे रशियाला कसा गेला हे सांगितले होते. तर दुसऱ्या एका पुस्तकात पहिल्या महायुद्धाच्या वेळी वृंदावनजवळचे जमीनदार राजा महेन्द्र प्रताप हे परदेशातून मदत मिळविण्यासाठी युरोपात, तसेच अफगाणिस्तान व रशियात कसे गेले ते आणि प्रा.बरकतुल्ला यांना काबूलला काही दिवस 'प्रोव्हिजनल गव्हमेंट ऑफ इंडिया' कसे चालविले, ही माहिती होती. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, आदींच्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची तसेच लाहोर कटाचा खटला जतिन्द्रनाथ दास यांचे प्राणार्पण, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांचे फासावर जाणे आदी साद्यंत वृत्त देणारे पुस्तक वाचताना माझी झोपच काही दिवस उडून गेली.

याच वेळी रशियन राज्यक्रांतीची समग्र हकीकत देणारे एक पुस्तकही मी वाचले. स्वाभाविकपणेच त्या 17-18 वर्षांच्या वयात मला सशस्त्र क्रांतीबद्दल आकर्षण वाटू लागले. याच वेळी 1939 साली आमच्या गटातील कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यलढ्याची तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांत काम करायचे ठरविले. त्याप्रमाणे विनायकराव कुलकर्णी कोल्हापूरकडे गेले. गंगाधर ओगले नगर जिल्ह्यात साखर कामगारांच्यात काम करण्यासाठी गेले, मधु लिमयेला इंटरच्या परीक्षेत उत्तम मार्क होते. त्याने इंग्लिश ऑनर्स घ्यावेत, असे इंग्रजीच्या प्राध्यापकांना वाटत होते. परंतु मधूने कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो साने गुरुजींच्या समवेत काम करण्यासाठी अमळनेरला गेला.

या सर्व योजना आखल्या जात असताना ज्या बैठका होत त्याला मी हजर नसलो, तरी बंडू गोरे मला सर्व सांगत असे. मला माझ्या या मित्रांच्या ध्येयवादी निर्णयामुळे त्यांच्याबद्दल विलक्षण आदर होता. मी काही करीत नसल्यामुळे माझे मन फार अस्वस्थ होते. याच वेळी मी म.गांधींची आत्मकथा वाचली. क्रांतिकारकांचा आत्मसमर्पणाचा मार्ग आणि गांधीजींचा अहिंसात्मक सत्याग्रहाचा मार्ग यांतील श्रेष्ठ मार्ग कोणता याबद्दल माझ्या मनात खूप गोंधळ उडाला. मी एक दिवस बंडू गोरे यांच्याजवळ हे बोललो. तेव्हा 'तू उद्या रात्री लवकर जेवून आठ-साडेआठ वाजता माझ्याकडे ये. आपण फिरायला जाऊ आणि मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देईन.' असे बंडू म्हणाला.

या स्वप्नरंजनातून बाहेर यावे लागेल
दुसर्या दिवशी मी बंडूबरोबर रात्री फिरायला गेलो. पर्वतीच्या काही पायऱ्या चढून आम्ही एका बाजूला जाऊन बसलो. बंडू खूप वेळ बोलत होता. तो म्हणाला, 'प्रधान, तू रोमँटिक, स्वप्नाळू वृत्तीने स्वातंत्र्यलढ्याकडे पाहतोस ते बरोबर नाही. लेनिन म्हणाला त्याप्रमाणे क्रांती हे शास्त्र आहे. क्रांतीला विचारांचे भक्कम अधिष्ठान असले पाहिजे, क्रांतीसाठी कार्यकर्त्यांची खंबीर संघटना असली पाहिजे आणि संघटित प्रयत्नांतून व्यापक जनआंदोलन केले पाहिजे, म्हणजे आपली स्वराज्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. मार्क्सने समाजवादाचा विचार शास्त्रीय रीतीने मांडला. त्या विचारांवर आधारलेला बोल्शेविक पक्ष लेनिनने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संघटित केला आणि या संघटित पक्षाच्या व लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियन लोकांनी झारशाहीविरुद्ध बंड केले, म्हणून रशियन राज्यक्रांती यशस्वी झाली. भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांच्याबद्दल माझ्या मनात प्रेम आहे, आदर आहे. त्यांचा त्यागही फार मोठा आहे. परंतु मूठभर देशभक्तांच्या हौतात्म्यातून स्वराज्य मिळणार नाही. आपल्याला मास मुव्हमेंटच केली पाहिजे. मी गांधींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान स्वीकारलेले नाही. पण आपल्या देशातल्या सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, कामगारांना स्वातंत्र्य चळवळीत आणण्याचे गांधींचे सामर्थ्य असामान्य आहे. त्यांच्या प्रयत्नांना संघटनेची जोड मात्र दिली पाहिजे. आपल्यातला विनायक कोल्हापूरला गेला. मधू अमळनेरला गेला. यात रोमॅटिक काही नाही. बहुजन समाजात काम करीत त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा जागृत करण्याच्या आपल्या गटाच्या प्रयत्नांची ही सुरुवात आहे. अशी खंबीर संघटना जर आपल्या समाजवादी पक्षाने देशभर उभी केली, तर स्वातंत्र्य आंदोलनाचे आपण नेतृत्व करू शकू.’

बंडू मध्येच थट्टेने म्हणाले, 'तुला वि.स.खांडेकरांच्या कादंबऱ्या आवडतात. खांडेकरांच्या मनात गरिबांच्याबद्दल प्रेम आहे. स्वातंत्र्य आणि समता या ध्येयांकडे त्यांचे नायक झेपावतात. हे उदात्त असले तरी अखेर स्वप्नरंजनच आहे. तुला या स्वप्नरंजनातून बाहेर यावे लागेल.'

बंडू खूप वेळ बोलत होता. मॅझिनी, लेनिन यांच्या विचारांबद्दल त्यांच्या जीवनातील घटनांबद्दल, कम्युनिस्ट पक्षाच्या संघटनेबद्दल आणखी कितीतरी गोष्टींच्याबद्दल बोलत होता. मात्र त्याच्या बोलण्याचे मुख्य सूत्र हे होते, की देशप्रेम या उत्कट भावनेची आवश्यकता आहेच. परंतु स्वातंत्र्यलढा विचारांवरच आधारलेला असला पाहिजे आणि तो सुरू करण्यापूर्वी विचार आणि कृती यांच्याबाबत सुस्पष्टता असलेल्या ध्येयवादी कार्यकर्त्यांची संघटना बांधली पाहिजे. अशा संघटनेत प्रत्येकाला त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे काम दिले जाते. बंडू म्हणाला, ओगले साखर कामगारांच्यात काम करायला गेला. विनायक कोल्हापूरच्या प्रजापरिषदेत गेला. तुला आम्ही कदाचित शिक्षक होऊन विद्यार्थ्यांमध्ये काम करायला सांगू. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले कार्यकर्ते लढ्याची तयारी करतील आणि नंतरच मास मुव्हमेंट सुरू करता येईल. तू रोमँटिक भूमिकेतून बाहेर ये. जगातील स्वातंत्र्यलढ्यांचे, वेगवेगळ्या क्रांत्यांचे इतिहास वाच. 

मी तुला लेनिनचे चरित्र वाचायला देईन. ते वाचल्यावर क्रांतीचे, स्वातंत्र्यलढ्याचे शास्त्र असते, हे तुला समजेल.' नंतरही चार-पाच वेळा मी आणि बंडू एकत्र बसलो. मी त्याला माझ्या शंका विचारीत असे आणि तो विस्ताराने उत्तर देत असे.

स्वातंत्र्यलढ्याची हाक येईल तेव्हा.... 
या सुमारास सप्टेंबर 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. बंडू मला त्या दिवशी म्हणाला, 'आयलँडमधील देशभक्त म्हणत की England's difficulties are Ireland's Opportunities. आपल्याही बाबतीत हे खरे आहे. स्वातंत्र्यलढ्याला अनुकूल काळ जवळ आला आहे. तू नेहमी पुस्तकात डोके खुपसून बसतोस. स्वातंत्र्यलढ्याची हाक येईल त्या वेळी घरदार, कॉलेज, पुस्तक सगळं सोडायला लागेल, हे लक्षात ठेव.' बंडू गोरे बरोबर झालेल्या या चर्चांच्यामुळे माझ्या मनातील गोंधळ पुष्कळसा कमी झाला आणि स्वप्नसृष्टीत रमणाच्या माझ्या मनाला वास्तवाचे भान येऊ लागले आणि मी वैचारिक साहित्य अधिक वाचू लागलो. 

त्या वेळी पुण्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांची स्टडी सर्कल्स चालत. कम्युनिस्ट पक्षाच्या स्टडी सर्कलमध्ये एस. के. लिमये यांची मार्क्सवादावर भाषणे चालत. त्या स्टडी सर्कलमध्ये एक दिवस भाई डांगे याचे भाषण होते. मी ते ऐकायला गेलो. डांग्यांच्या बोलण्यातील उपरोध, त्यांचा खट्याळ विनोद आणि तरी अत्यंत आग्रही रीतीने विचार मांडण्याची त्यांची खास शैली हे सारे मला फार आवडले. परंतु एस. के. लिमयांची शैली मात्र मला कमालीची रूक्ष वाटली. मी माझा कम्युनिस्ट मित्र भाऊ फाटक याला म्हणालो, 'मार्क्सवाद घटपटाच्या शास्त्री पंडित पद्धतीने मांडल्यामुळे त्यातला मानवतावादी आशयच संपतो.' फाटक माझ्या या विधानावर एकदम उखडला आणि म्हणाला, 'तुम्ही सोशलिस्ट युटोपियन आहात. मार्क्सवाद हे क्रांतीचे शास्त्र आहे हे नीट समजून घे.'

रॉविस्ट पक्षाच्या स्टडी सर्कलमध्ये, जी.डी. पारीख यांची व्याख्याने फार प्रभावी होत. मी त्या वेळी बंडू गोरेबरोबर पां.वा. गाडगीळांच्याकडेही जात असे. पां.वा. गाडगीळ हे एक उत्तम शिक्षक होते. ते कॅपिटलचा सारग्रंथ लिहीत होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो की ते लिहिणे थांबवून मार्क्सच्या एखाद्या विचारावर बोलू लागत, आणि अगदी सुगम सोप्या रीतीने एखाद्या सिद्धांताचे विवरण करीत. त्या वेळी य.गो. जोशी हे वादविवेचन मालेतील पुस्तके प्रसिद्ध करीत. 'फॅसिझम', 'कम्युनिझम्' आदी विचार सामान्य वाचकाला कळावा अशा रीतीने मांडणाऱ्या या मालेतील आचार्य जावडेकरांची 'लोकशाही आणि राष्ट्रवाद' यावरील पुस्तके, ना. ग. गोरे यांचे 'विश्वकुटुंबवाद' आणि पां.वा.गाडगीळ यांचे 'फॅसिझम' ही पुस्तके मला फार उद्बोधक वाटली.

याच वेळी मी आगरकरांचे लेखन वाचले आणि हिंदुस्थानात राजकीय आणि आर्थिक प्रश्नांइतकाच सामाजिक सुधारणेचा मार्गही बिकट आहे, याची तीव्रतेने जाणीव झाली. मात्र स्वातंत्र्यलढ्यालाच आपण अग्रक्रम दिला पाहिजे, असे मला वाटत असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच आर्थिक आणि सामाजिक समतेच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल, असेच आमच्या वर्तुळातील मित्रांचेही मत होते. पारतंत्र्यामुळे सर्व जीवन खुरटले होते. या शृंखला तोडल्यानंतरच अन्य समस्या सोडविणे शक्य होईल, असेच मनोमन वाटत असे.

तरुण मनाला लढ्याचे आकर्षण
पारतंत्र्याची खंत जवळपास सर्वांनाच वाटत असे. काही थोडे विद्यार्थी मात्र राजकीय प्रश्नांबाबत अधिक जागरूक असत. स्वातंत्र्य मिळाले पाहिजे याबद्दल जरी या जागरूक विद्यार्थ्यांमध्ये मतैक्य असले तरी स्वातंत्र्य कोणत्या मार्गाने आणि कोणासाठी, या प्रश्नांची उत्तरे मात्र सर्वांची एक नसत. माझ्या काही मित्रांना कम्युनिस्ट पक्षाबद्दल आकर्षण वाटत असे. रायरीकर आणि भालेराव हे माझे मित्र रॉयवादी होते. मधू देवल हा संघात जात असे. आमच्या तीन वर्षे पुढे असलेला एस.पी. कॉलेजमधील पटवर्धन हा खादी वापरीत असे आणि गांधींच्या मार्गाने जाण्याचा त्याचा निर्धार होता.

जागतिक राजकारणात त्या वेळी हिटलरने आक्रमक भूमिका घेतली होती. संघात जाणाऱ्या माझ्या समकालीनांना हिटलरबद्दल मोठे आकर्षण वाटे. संघाची शिस्त ही हिटलरच्या पक्षातील शिस्तीसारखी पोलादी आहे असे ते अभिमानाने म्हणत. सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आम्ही प्राण पणाला लावू, असेही ते म्हणत. संघात जाणारा एक आक्रमक हिंदुत्ववादी गट पुण्यात होता. त्यांनी मे दिनाच्या दिवशी एस.एम. जोशींच्या नेतृत्वाखाली निघालेली मिरवणूक उधळण्यासाठी तिच्यावर हल्ला केला. एस. एम. ना भुवईजवळ खोक पडली. मिरवणूक उधळली मात्र गेली नाही. या हिंदुमहासभावादी तरुणांचे नेतृत्व ना.द.आपटे करीत असे.

1939 साली दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि व्हाइसरॉयने हिंदुस्थान ब्रिटिशांच्या आघाडीमध्ये युद्धात सामील झाला असे जाहीर केले. याचा निषेध म्हणून काँग्रेसच्या सर्व सात मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. पुण्याला काँग्रेस नेत्यांची एक बैठक काँग्रेस हाऊसमध्ये झाली. मी त्या बैठकीच्या वेळी स्वयंसेवक म्हणून तेथे काम करायला गेलो होतो. त्यानंतर काही दिवसांनी समाजवादी पक्षाची प्रांतिक बैठक लोकशक्तीच्या कार्यालयात शनिवार पेठेत झाली. एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे हे प्रमुख होते. या बैठकीत स्वातंत्र्य चळवळ आपण तीव्र केली पाहिजे असे एकमताने ठरले; आणि कार्यक्रम काय असावा, याबद्दलही चर्चा झाली.

याच्याइतकीच महत्त्वाची चर्चा राष्ट्र सेवा दलाच्या स्थापनेपूर्वी झाली. ती चर्चाही मला ऐकायला मिळाली. कारण शिरुभाऊ लिमये यांनी 'तू बैठकीला हजर रहा आणि सविस्तर टिपणे घे.' असा मला आदेश दिला. त्यावेळी शाळा-कॉलेजांतून प्रत्यक्ष शिक्षणाचाच एक छोटा भाग म्हणून व्यायामाचा, खेळाचा तास असे. संध्याकाळी काहीजण स्काऊट ग्राऊंडवर जात. काही खोखो, आट्यापाट्या खेळायला जात. परंतु अनेक पांढरपेशे विद्यार्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जात. काँग्रेसचे सेवादल नसल्यामुळे काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मुलेही संघात जाऊ लागली होती. अलीकडे संघातील काहीजण अतिशय आक्रमक झाले होते. संघ हिंदुराज्य स्थापन करील, आणि काँग्रेसला नेस्तनाबूत करील, असे ते जाहीरपणे म्हणत. या परिस्थितीसंबंधी विचार करण्यासाठी नानासाहेब गोरे, शिरुभाऊ लिमये, वि.म. हर्डीकर, आणखी इतर तीन-चार जणच होते. एस. एम. जोशी आणि बंडू गोरे हे त्या वेळी युद्धविरोधी भाषण केल्याबद्दल तुरुंगात होते.

ऐक्याची भूमिका
सुरुवातीस बोलताना गोरे म्हणाले, 'हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळ दुबळी रहावी म्हणून ब्रिटिश सरकार 'फोडा आणि झोडा,' हे दुष्ट धोरण चालवीत असून कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीपासून त्या धोरणाप्रमाणे हिंदू आणि मुसलमान यांच्यात फूट पाडण्याचे उद्योग ब्रिटिश सरकार सतत करीत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून लो. टिळकांनी काँग्रेसच्या लखनौ येथील अधिवेशनात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा ठराव केला. गांधीजी आणि काँग्रेस हीच ऐक्याची भूमिका घेऊन स्वातंत्र्यचळवळ पुढे नेत आहेत. अशा वेळी संघाची हिंदू राष्ट्राची भूमिका ब्रिटिशांच्या धोरणाला पूरक ठरेल. मुसलमान लोक स्वातंत्र्यचळवळीपासून दूर जाऊन सरकारलाच मदत करू लागतील. म्हणून तरुण पिढीला ऐक्याची भूमिकाच पटवून दिली पाहिजे. याकरता आपण तरुणांची संघटना स्थापन केली पाहिजे.

यानंतर शिरुभाऊ लिमये म्हणाले, 'गोरे म्हणतात ते बरोबर आहे. परंतु आपली संघटना वाढायची असेल, तर केवळ हिंदु- मुस्लिम ऐक्याची संघविरोधी भूमिका घेणे पुरेसे नाही. आपण आपल्या संघटनेत स्वातंत्र्यचळवळीत भाग घेणारे तरुण तयार केले पाहिजेत, अशी पॉझिटिव्ह भूमिका तरुणांना अधिक अपील होईल.’

काही वेळ चर्चा झाल्यानंतर नानासाहेब म्हणाले, 'मला शिरुभाऊंची भूमिका मान्य आहे. तरुण मनाला नेहमीच लढण्याचे आकर्षण असते. मी अठरा एकोणीस वर्षांचा असताना स्वातंत्र्यलढ्यात 1930 साली भाग घेताना मला जे वाटले तेच आजच्या तरुण पिढीलाही वाटेल, ही मला खात्री आहे. आपण आपल्या संघटनेत हिंदू राष्ट्राची भूमिका स्वातंत्र्य चळवळीला घातक ठरेल हे सांगतानाच तरुणांना आता येणाऱ्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला पाहिजे, अशी शिकवण दिली पाहिजे. तरुणांना या तऱ्हेने संघटित करण्याचे काम आपल्यामध्ये एस.एम.च उत्तम रीतीने करू शकेल असे मला वाटते. तो सुटून आल्यावर त्याच्यावरच या संघटनेची जबाबदारी टाकावी.'

या चर्चेनंतर एस. एम. जोशी तुरुंगातून सुटून आल्यावर 1941 ला राष्ट्रसेवादलाची स्थापना झाली आणि एस. एम. जोशी दलप्रमुख झाले. मी अर्थातच पहिल्याच दिवशी राष्ट्र सेवादलाच्या शाखेवर गेलो. आमची ही शाखा सदाशिव पेठेत पंतांच्या गोटातील मैदानावर भरली. नाना डेंगळे आमचा शाखानायक होता. वसंत बापट, यदुनाथ थत्ते, मी आणि नाना डेंगळे यांची दोस्ती सेवादलामुळे अधिकच घट्ट झाली. कसबा पेठेत लालजी कुलकर्णी, पानसे, आदी मित्रांनी सेवादलाची शाखा सुरू केली. एस. एम. जोशींनी घेतलेले पहिले बौद्धिक मला आजही आठवते. त्या बौद्धिकात 'तुम्ही तरुणांनी स्वातंत्र्यलढ्यात धडाडीने काम केले पाहिजे', हेच त्यांनी मुख्यतः सांगितले.

दोन महत्वाच्या घटना
1941 च्या जानेवारीअखेर घडलेल्या एका घटनेने देशभर प्रचंड खळबळ उडाली. ही घटना म्हणजे सुभाषचंद्र बोस यांचे सीमोल्लंघन. सुभाषबाबूंना सरकारने त्यांच्या घरातच स्थानबद्ध करून ठेवले होते, आणि त्यांच्या घराभोवती कडेकोट पोलिसपहारा होता. सुभाष बाबूंच्यावर एका लेखाबाबत सरकारने खटला भरला आणि तो लवकरच सुरू होणार होता. त्या खटल्याच्या संदर्भात सुभाषबाबूंचे वकील रीतसर परवानगी घेऊन त्यांना भेटण्यासाठी गेले. त्या वेळी सुभाषबाबू त्यांच्या खोलीतच नव्हते. कडक पोलीस पहारा असताना सुभाषबाबू शिताफीने कोणालाही न कळवता घराबाहेर पडले. ते कोठे गेले, हे कोणालाच माहीत नव्हते. ब्रिटिश सरकार या घटनेने हादरले. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही कचरेपाटलांच्या विहिरीजवळच्या पडळीवर जमलो होतो. शिरुभाऊ म्हणाले, 'सुभाषबाबू नक्की देशाबाहेर गेले असणारच. युद्धाच्या काळात परदेशातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मदत मिळवायचीच, हा त्यांचा प्रयत्न असणार." माझ्या अंगावर हे ऐकत असताना रोमांच उभे राहिले.

त्याच सुमारास आणखी एक महत्त्वाची घटना घडली. जयप्रकाश नारायण यांना त्या वेळी राजस्थानमधील देवळी तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांनी तेथे आगामी स्वातंत्र्यलढा कसा करावा लागेल, याचा तपशीलवार आराखडा तयार केला होता. जयप्रकाशजींना भेटण्यासाठी त्यांच्या पत्नी प्रभावतीदेवी गेल्या असताना जयप्रकाशजींनी त्यांच्याजवळ एका लिफाफ्यात तो आराखडा दिला. परंतु नंतर पोलिसांनी प्रभावतीदेवींची झडती घेऊन तो जप्त केला आणि सरकारनेच त्यातील काही भाग प्रसिद्ध करून हिंसेचा पुरस्कार करणाऱ्या जयप्रकाशांचा गांधींनी निषेध केला पाहिजे, असे म्हटले.

म. गांधींनी हरिजनमधून सरकारी पत्रकाला स्पष्ट उत्तर दिले. त्यात त्यांनी पुढील आशयाचा लेख लिहिला होता. 'मला स्वातंत्र्यलढा अहिंसेच्या मार्गानेच करावयाचा आहे, हे मी सुरु केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहातून स्पष्ट झाले आहे. असे असले तरी मी जयप्रकाश नारायण यांचा निषेध करणार नाही. सरकारने लोकांच्या रास्त आकांक्षा चिरडून टाकल्या, तर त्यांची प्रतिक्रिया अशीच होणे अपरिहार्य आहे. जयप्रकाश नारायण यांची सर्व मते मला मान्य नसली, तरी ब्रिटिश सरकारने लोकांची स्वराज्याची आकांक्षा समजून घेऊन शहाणपणाचे धोरण स्वीकारले पाहिजे, हेच मला आग्रहाने सांगावेसे वाटते. सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून जयप्रकाश नारायण यांनी आगामी चळवळीत केवळ सत्याग्रह करणे पुरेसे नाही, सरकार खिळखिळे (परॅलाइज) करणारा भूमिगत चळवळीचा मार्ग आपल्याला स्वीकारावा लागेल, असे म्हटले होते.

भूमिगत चळवळ
काही दिवसांनी त्या पत्राचा संपूर्ण तपशील शिरुभाऊंना मिळाला, तेव्हा त्यांनी आम्हा काही मित्रांना प्रभात रोडच्या नेहमीच्या जागेवर बोलाविले. जयप्रकाशजींची भूमिगत चळवळीची कल्पना त्यांच्या पत्रावरून आम्हांला समजली. हिटलरने युरोपातील जे देश जिंकले, त्यांपैकी काही देशांमध्ये तेथील स्वातंत्र्यवादी तरुणांनी भूमिगत चळवळ करून हिटलरची फॅसिस्ट राजवटही खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. हे करताना भूमिगत चळवळ चालवून त्यांनी पूल उडवणे, रेल्वेचे रूळ उखडणे, तारा तोडणे आदी साबोटेजिंगचा कार्यक्रम साहसाने चालविला होता. अशीच भूमिगत चळवळ आपल्याला आगामी स्वातंत्र्यलढ्यात करावी लागेल आणि साबोटेजिंगचा कार्यक्रम यशस्वी करून लष्कर व पोलीस यांच्या दळणवळणाचे मार्ग नष्ट करावे लागतील आणि सरकार खिळखिळे करावे लागेल, असे जयप्रकाशजींनी सुचविले होते.

हे वाचून दाखवल्यावर शिरुभाऊ म्हणाले, 'मला हे वाचून फार उत्साह वाटला. आपल्याला आत्तापासून या चळवळीची तयारी करावी लागेल. काय करायचे ते मी ठरविले आहे; आणि लवकरच आपल्या सगळ्यांना कामाला लागावे लागेल. या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून गुप्त पत्रक सायक्लोस्टाइल कसे व कोठे करावयाचे हे मी तुम्हांला पुढील बैठकीत सांगेन.'

आईची कठोर शिस्त
स्वातंत्र्यसंग्राम आता दाराशी येऊन ठेपला, याची मला तेव्हा जाणीव झाली. मात्र याचा माझ्या अभ्यासावर परिणाम होत नव्हता. याचे एक कारण म्हणजे मला इंग्रजी साहित्याबद्दल विलक्षण आवड निर्माण झाली होती. प्रा. मनोहर भाटे यांच्यामुळे 'लिटररी क्रिटिसिझम्' या विषयातील संकल्पनांच्या संबंधी ते सांगतील ती सर्व पुस्तके मी वाचत होतो. शिवाय आईची अभ्यासाबाबतची कठोर शिस्त मी जी प्राथमिक शाळेपासून पाळत आलो. तिचे उल्लंघन करण्याची हिंमत बी. ए. च्या वर्गातही मला कधी झाली नाही. माझ्या राजकीय हालचाली मी तिच्यापासून दडवून ठेवल्या असल्यामुळे वेळेवर घरी येऊन मी अभ्यास करत बसत असे.

'हरिजन'चा अंक ज्या दिवशी येई, त्या दिवशी म.गांधींचा अग्रलेख वाचला की मन क्षुब्ध होत असे. अभ्यासात लक्ष लागत नसे. परंतु अन्य दिवशी मी निर्धाराने रात्री एक दीडपर्यंत वाचत असे. लिटररी हिस्ट्री, लिटररी क्रिटिसिझम् या विषयांची माझी उत्तम तयारी होती. प्रॉसोडी म्हणजे छंदोरचना, हा भाग मात्र मला कंटाळवाणा वाटे. काव्य समजण्यासाठी त्यांची आंतरिक लय समजली म्हणजे पुरे. इंग्रजी छंदाची रचना कळणे मला अनावश्यक वाटे. सिनिअर बी.ए. च्या सेकंड टर्मला माझे असे दुहेरी जीवन चालू होते. परीक्षा जवळ येत होती आणि चळवळही जवळ आलेली होती. परीक्षा आटोपून चळवळीत पडता येईल तर बरे, असे वाटे. सुदैवाने ते जमले. एप्रिलमध्ये शेवटचा पेपर दिला आणि सुटकेचा निःश्वास टाकला.

मेहेरअलींचे भाषण

मे महिन्यात राष्ट्र सेवादलाच्या शिबिराला पुण्यात गेलो. काँग्रेस हाऊसमध्ये झालेल्या शिबिरात अनेक नवीन दोस्त मिळाले. मला मैदानी कार्यक्रमात मात्र रस वाटत नसे. ते शिबिर संपल्यावर काही दिवसांनी पुण्यामध्ये आम्हा समाजवादी कार्यकत्यांचे एक चार दिवसांचे शिबिर शिरुभाऊंनी घेतले. या शिबिरात मेहेरअल्ली आले होते. त्यांचे भाषण मला फार स्फूर्तिदायक वाटले. शिबिरात भूमिगत चळवळीची आखणी करण्यात आली. मुख्य विभाग साबोटेजिंगचे काम ज्यांच्यावर सोपवावयाचे त्यांचा होता. या विभागाला नाव होते 'डी स्क्वॉड' म्हणजे डिस्ट्रक्शन स्क्वॉड. या स्क्वॉडची माहिती आम्हांला देण्यात आली. सरकार खिळखिळे करायचे असेल तर दळणवळण तोडले पाहिजे; यासाठी तारा तोडणे, पूल उखडणे आदी कार्यक्रम समजून सांगण्यात आले. याचे ट्रेनिंग देण्याची व्यवस्था केली जाईल, असेही सांगण्यात आले. दुसरे बुलेटिन स्क्वॉड. यामध्ये सायक्लोस्टाइलवर बुलेटिन्स काढणे, बुलेटिन्स गुप्तपणे वाटणे इत्यादी कामे होती. 'डी स्क्वॉड' ची माहिती ऐकून मन भारावून गेले.

रात्री मी विचार करीत असताना हे आपल्याला झेपेल का या शंकेने मी अस्वस्थ झालो, परंतु बराच वेळ विचार केल्यावर प्रांजळपणे आपली मर्यादा सांगून आपल्याला झेपेल ते करायचे असे मी ठरविले. मी शिरुभाऊंना सांगितले, की ही स्क्वॉडला काम करणे मला जमेलसे वाटत नाही. मी पकडला गेलो आणि माझ्या तोंडून सहकाऱ्यांची नावे गेली तर मी चळवळीचा घात केल्यासारखे होईल. त्यापेक्षा मला बुलेटिन्सचे काम द्या. शिरुभाऊ हसले आणि म्हणाले, 'तू स्कॉलर विद्यार्थी. तू बुलेटिन्स लिही आणि वाट. ते मात्र न भिता कर.' शिरुभाऊंनी माझी मर्यादा समजून घेतली. यामुळे माझ्या मनावरचे ओझे उतरले.

जूनमध्ये बी.ए. चा रिझल्ट लागला. मी इंग्लिश ऑनर्स मिळवून दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झालो आणि माझी बहीण मराठी ऑनर्स घेऊन उत्तीर्ण झाली. माझ्या आई-वडिलांना फार आनंद झाला. माझे वडील 1910 सालचे बी.ए. ते म्हणाले, 'मी आपल्या घरातला पहिला ग्रॅज्युएट. तुम्ही दोन्ही भावंडे आपल्या घरातली पहिली ऑनर्स ग्रॅज्युएट. मला आज धन्य वाटते. माझ्या वडिलांची अपेक्षा होती, की एम. ए. होऊन प्रोफेसर व्हावे. मी त्यांना धीटपणे म्हणालो, 'पण आपल्याला स्वराज्य मिळणं जास्त महत्त्वाचं नाही का?' ते एकदम चपापले. आई भडकली आणि म्हणाली, 'आपण गरीब माणसं. शिकलास तर आपलं घर चालेल. तुला काय करायचंय स्वराज्याशी?" मी वाद घातला नाही पण आईला संशय आला. ती म्हणाली, 'मामांचा बाबू (म्हणजे आईचे मामेभाऊ बी.टी. रणदिवे) इतका हुशार; पण सारखा तुरुंगात जातो. त्याला चार भाऊ आहेत. ती बडी माणसं (आईचे मामा मोठे अधिकारी होते) आपल्याला नाही ते झेपायचं.'

घरात केव्हातरी वादळ होणार, याची मला कल्पना आली. मला त्याचे काहीच वाटले नाही. घर केव्हा सोडायचं इतकाच निर्णय घ्यायचा होता. घरच्यांना संशय येऊ नये म्हणून मी एम.ए.ला नाव घातले. भाटेसरांना भेटलो तेव्हा ते म्हणाले, 'प्रधान तुला ऑनर्स मिळाले; पण माझ्या अपेक्षेपेक्षा तुला मार्क कमी पडले. एम.ए.ला सुरुवातीपासून अभ्यास कर. मी वरवर 'हो' म्हणालो, परंतु जुलै महिन्यात मी एकाही तासाला गेलो नाही. आम्हा मित्रांची खलबते चालत. 'डी स्क्वॉड' मध्ये गेलेल्या वसंत बापट, वसंत नगरकर यांचा मला हेवा वाटे. माझी त्यांच्यासारखी हिंमत नाही, याची खंत वाटे. पण मी नियमाने सायक्लोस्टाइल चालवीत असे. करंट डुप्लिकेटर वरही एका पत्राच्या पन्नास प्रती निघत. या सामानाची जुळवाजुळव चालू होती.

वर्ध्याला काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली आणि वर्किंग कमिटीने पास केलेला 'चले जाव' ठराव (क्विट इंडिया रेझोल्युशन) वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला, त्या वेळी आता चळवळ जवळ आली, या जाणीवेने मन धुंद झाले. 6 ऑगस्टला मी 'मामाच्याकडे मुंबईस जातो’ असे सांगून घर सोडले आणि मुंबईला गेलो. मुंबईला मामा गावदेवीला रहात. तेथून गवालिया टॅंक मैदान जवळ होते. आम्ही मित्रांनी कोठे जमायचे ते ठरले होते. 

7 आणि 8 ऑगस्ट हे अभूतपूर्व दिवस होते. 8 ऑगस्टला गांधीजींचे भाषण ऐकताना आपण किती भाग्यवान, असे वाटले. गांधीजी शांतपणे संथ लयीत बोलत होते आणि आम्ही हजारो श्रोते जिवाचा कान करून त्यांचे भाषण ऐकत होतो, 'चले जाव' ठराव पास झाला आणि आम्ही आकाशाला भिडतील अशा घोषणा दिल्या.

चळवळीत सुरुवातीला यदुनाथ थत्ते, ठाकूर आणि मी यांना एकत्र काम करायला सांगितले होते. एका आठवड्याने नाशिकला देशमुख म्हणून विद्यार्थी कार्यकर्ता होता; त्याला व मला खडकीला जायला सांगितले होते. जुन्या खडकीत एका लहानशा खोलीत आमचे सायक्लोस्टाइल मशीन होते. पुढे ऑक्टोबरमध्ये आमचा सगळा गट पकडला गेला.

येरवडा विद्यापीठाने आयुष्याला निश्चित दिशा दिली
येरवडा तुरुंग हे माझ्या विचारांच्या वाटचालीत अनपेक्षितपणे आलेले विद्यापीठ होते. आचार्य भागवत आणि आचार्य जावडेकर हे दोन थोर ज्ञानोपासक पूर्वी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शिकवत असत. येरवडा तुरुंगातही या दोघांकडे नियमाने शिकणाऱ्या आम्हा दहा बारा तरुण कार्यकर्त्यांना त्यांनी मुक्तहस्ताने ज्ञानदान केले. या दोन आचार्यांच्या अध्यापन शैलीत मात्र फार मोठा फरक होता. आचार्य भागवत हे व्याख्यान देत आणि त्यांच्या रसाळ आणि ओजस्वी वक्तृत्वामुळे श्रोते मंत्रमुग्ध होत. आचार्य भागवतांची तत्त्वज्ञानावरील व्याख्याने ऐकण्यास आमच्या गटासमवेत अन्य सत्तर-ऐंशी प्रौढ कार्यकर्ते असत. आचार्य जावडेकरांच्या समवेत आम्ही 'टोवर्डस् दि अंडरस्टँडिंग ऑफ मार्क्स', 'व्हॉट मार्क्स रिअली मेंट' आणि 'मॉस्को डायलॉग्ज' अशी तीन पुस्तके वाचली. आमच्यापैकी एकजण वाचीत असे आणि आचार्य जावडेकर मधून मधून भाष्य करीत. ते करताना ते सतत म्हणत, 'मार्क्सचा विचार प्रथम नीट समजून घ्या. मार्क्सने केवळ जीवनाबद्दल तत्त्वचिंतन केले नाही. समाजातील अन्यायाचे आणि विषमतेचे मूळ कशात आहे हे सांगतानाच या अन्यायाचे आणि विषमतेचे निर्मूलन कोणत्या मार्गाने करता येईल, हेही मार्क्सने सांगितले. मार्क्सच्या विचारांच्या आधारे क्रांती करता येईल असे कम्युनिस्टांना वाटते. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे जो कष्टकरी वर्ग अन्याय सोसत होता, त्याला आपण आपल्या बेड्या तोडू शकू, असा आत्मविश्वास वाटू लागला. तुम्ही हे समजून घ्या, की मार्क्सचा विचार हा कृतीला प्रेरणा देणारा, कृतीसाठी अनेकांना प्रवृत्त करणारा आहे. 

आचार्य जावडेकर यांना मार्क्सचा 'साध्य उदात्त असेल तर कोणतीही साधने वापरण्यास हरकत नाही.’ हा विचार मान्य नव्हता. त्यासंबंधी बोलताना आचार्यांनी म. गांधींची 'साधने ही साध्याला अनुरूपच असली पाहिजेत; उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी शुद्ध साधनेच वापरली पाहिजेत.’ हा विचार आम्हांला विस्ताराने समजावून सांगितला.

आचार्य जावडेकरांचा तास संपल्यावर अनेकदा माझ्या मनात विचारांचे काहूर उठत असे. जावडेकरांच्या अध्यापन शैलीचे वैशिष्ट्य हे होते, की विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे विचार करायला ते प्रवृत्त करीत. स्वतःची भूमिका स्पष्टपणे मांडतानाही ते कधी अभिनिवेशाने बोलत नसत.

आचार्य भागवतांची शैली याच्याहून अगदी भिन्न होती. अभिनिवेशाने ते त्यांना पटलेल्या विचारांचे समर्थन करीत; आणि जो विचार त्यांना मान्य नसेल, त्याचे खंडन अत्यंत आक्रमक शैलीमध्ये करीत. आचार्य भागवतांची भाषणे विद्वत्तापूर्ण असत. त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची आम्हांला ओळख करून देण्यासाठी प्लेटोपासून बर्गसॉपर्यंत सर्व महान तत्त्वज्ञांच्यावर जवळजवळ तीस व्याख्याने दिली. भारतीय तत्त्वज्ञानातील षड्दर्शने आणि महत्त्वाची उपनिषदे त्यांनी आम्हांला समजावून सांगितली. नंतर बुद्ध, महावीर, ख्रिस्त, महंमद पैगंबर यांच्यावरही व्याख्याने दिली.

ग्यानबाचे अर्थशास्त्र
त्या वेळी काकासाहेब गाडगीळ हे त्यांचे 'ग्यानबाचे अर्थशास्त्र' हे पुस्तक लिहीत होते. त्या विषयाची ओळख सामान्य कार्यकर्त्यांना व्हावी म्हणून ते त्यांच्यासमोर प्रथम व्याख्याने देत. मी त्या व्याख्यानांना जाऊन बसत होतो. सोपी, व्यवहारातील उदाहरणे देत काकासाहेब अर्थशास्त्रासारखा विषय सुलभ करून समजून देत आणि गरिबांच्यावर अन्याय करणारी भांडवलशाही व्यवस्था बदलली पाहिजे हे सांगत. ही भाषणे ऐकताना आर्थिक समतेचा मुद्दा श्रोत्यांना मनोमन पटत असे. व्याख्यान म्हणजे पांडित्य नव्हे हे मी काकासाहेबांपासून शिकलो. 'ग्यानबाचे अर्थशास्त्र' या विषयावरील काकासाहेबांची व्याख्याने हा कार्यकर्त्यांचे शिक्षण कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच होता.

मर्यादा आणि अभिनिवेश
येरवडा कारागृहात जे ऐकले, जे वाचले, त्यामुळे मला माझ्या मर्यादा समजल्या आणि अद्याप खूप वाटचाल करावयाची आहे. याची जाणीव झाली. याचे एकच उदाहरण आम्ही काही मित्र बोलत असलो असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विषय निघाला. मी अभिनिवेशाने म्हणालो, 'डॉ. आंबेडकर विद्वान आहेत, याबद्दल माझ्या मनात आदर आहे. पण ते स्वातंत्र्य चळवळीत आले नाहीत. याचे कसे समर्थन करता येईल?' त्या वेळी आचार्य भागवत तेथून चालले होते. ते थबकले आणि आमच्यात येऊन बसले आणि म्हणाले, 'थांब, मीच तुला ते समजून सांगतो. आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे. 8 ऑगस्टच्या 'चले जाव' ठरावात उद्याचे स्वराज्य कोणासाठी आहे, याबद्दल काय लिहिले आहे?’ मी तत्काळ म्हणालो, 'मी ठराव वाचला आहे. उद्याचे स्वराज्य श्रमजीवींच्यासाठी असेल. 'फॉर टॉइलर्स इन दी फील्डस् अँण्ड फॅक्टरीज' असे या ठरावात आहे.'

आचार्य भागवत म्हणाले, 'बरोबर सांगितलेस तू. म्हणजे या ठरावात उद्याच्या स्वराज्यामध्ये अस्पृश्यता नष्ट होईल; भंग्यांना डोक्यांवरून मैला वाहावा लागणार नाही, असे आश्वासन आपण दिले नाही, हे खरे ना?’ मला यावर उत्तर सुचेना.

आचार्य पुढे म्हणाले, 'गांधींनी पूना पॅक्टच्या वेळी काँग्रेस अस्पृश्यतेचे निर्मूलन करील, असे आश्वासन आंबेडकरांना दिले होते. केलं का आपण काही त्यासाठी? आपल्या स्वातंत्र्य चळवळीत आपण अस्पृश्य बांधवांचा विश्वास संपादन केला नाही. तो केला असता, पारतंत्र्य असले तरी अस्पृश्यता नष्ट करायला आपल्याला ब्रिटिशांनी बंदी केली नव्हती. आपण जर अस्पृश्यता घालवण्यासाठी काम केले असते तर आपल्याबरोबर चळवळीत आपले अस्पृश्य बांधव नक्कीच आले असते आणि आंबेडकरही त्या चळवळीचे नेतृत्व करायला पुढे आले असते, हे समजून घे. आंबेडकर आणि त्यांचे बांधव स्वातंत्र्य चळवळीपासून दूर राहण्यास आपण जबाबदार आहोत हे लक्षात ठेव. उद्या सकाळी माझ्याकडे ये, म्हणजे याबद्दल आणखी पुष्कळ सांगेन."

दलितांच्या प्रश्नांची ओळख
दुसऱ्या दिवशी आचार्य भागवतांच्याकडे मी गेल्यावर त्यांनी दीड तास जातिव्यवस्था, वर्णाश्रम आदींच्याबद्दल माझे बौद्धिक घेतले आणि शेवटी ते म्हणाले, 'तू चळवळीत पकडला गेलास म्हणजे फार मोठी मर्दुमकी गाजवलीस असं समजू नकोस. पुढील आयुष्यात काय केलं पाहिजे, याचा नीट विचार कर.' मी तोपर्यंत म. फुले आणि महर्षी शिंदे यांचे लेखन वाचलेच नव्हते. आचार्य भागवतांच्यामुळे दलितांच्या प्रश्नाचे गांभीर्य माझ्या बरेचसे लक्षात आले आणि माझे विचार अद्याप अपरिपक्व आहेत, हेही लक्षात आले.

शंकरराव मोरे यांनी एकदा चर्चेमध्ये ग्रामीण भागातील मुला-मुलींचे शिक्षण यावरची त्यांची मते आणि सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे, हा विचार ज्या प्रभावीपणे मांडला, त्यामुळे मी अंतर्मुख झालो.

साने गुरुजींची आंतरभारती
येरवडा तुरुंगात साने गुरुजींच्याबरोबर एका बराकीत काही महिने राहण्याचे भाग्य मला लाभले. साने गुरुजी बौद्धिके घेत नसत; पण त्यांच्या सहवासात जे मी शिकलो ते शब्दांत सांगता येणार नाही. साने गुरुजींनी 'आंतरभारती' या विषयावर व्याख्यान दिले नाही. आम्ही काही जण त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारले, 'गुरुजी, तुम्ही आम्हांला बंगाली शिकवाल का?" तेव्हा साने गुरुजी म्हणाले, 'शिकवीन की, तुम्हांला बरचसं बंगाली येतंच. मी थोडं जास्त शिकवीन.' आम्हांला गुरुजींचे बोलणे हे कोड्यासारखे वाटले.

दुसऱ्या दिवशी आम्ही पाच-सहा जण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दुपारी 4 वाजता त्यांच्याकडे गेलो. साने गुरुजींनी जेलरकडून फळा आणि खडू मागून घेतला होता आणि फळ्यावर नागरी लिपीत रवीन्द्रनाथ टागोरांची एक कविता लिहिली होती- गुरुजी म्हणाले, 'आता तुम्हीच वाचा ही कविता आणि सांगा तुम्हांला तिचा अर्थ कळला की नाही. 'संन्यासी उपगुप्त' ही ती कविता होती. आम्ही ती वाचल्यावर आम्हांला कवितेचा आशय कळला. साने गुरुजी हसून म्हणाले, 'तुम्हांला बंगाली येतं असं मी म्हणालो तेव्हा मी तुमची थट्टा करतोय, असं तुम्हांला वाटलं; आणि आता तुम्हीच म्हणताय की कविता समजली. थोडं थांबून साने गुरुजी म्हणाले, 'सगळ्या भारतीय भाषा या बहिणी बहिणी आहेत. सगळ्यांची ओळख आपण करून घेतली पाहिजे. मी तर राजमहेंद्री तुरुंगात तमिळही सहज शिकलो. थोडे कष्ट केले तर दक्षिण भारतातल्या भाषाही शिकता येतील. खरी अडचण लिपीची आहे. बंगाली लिपी मी तुम्हांला चटकन् नाही शिकवू शकणार, पण नागरी लिपीत लिहिलेली बंगाली, गुजराथी तुम्हांला सहज कळेल.' आम्ही मान डोलावल्यावर साने गुरुजी पुढे म्हणाले, 'कवितेचा थोडा बहुत अर्थ समजला, म्हणजे कविता समजली असं मात्र समजू नका. मी आता ही कविता तुम्हांला शिकवतो.’ 

साने गुरुजी त्यानंतर अर्धा तास रवींद्रनाथांच्या कवितेवर इतकं सुंदर बोलले की मी मंत्रमुग्ध झालो. प्रा. गोकाकांचे शेलेवरचे व्याख्यान मला त्या वेळी आठवले.

असे होते आमचे येरवडा विद्यापीठ! तिथं परीक्षा नव्हती; पण मनाला पंख फुटत होते आणि बुद्धीला ज्ञानाच्या विशाल क्षितिजाचे दर्शन होत होते.

तुरुंगातील दोन अनुभव
तुरुंगात असताना घरच्या कोणाचीही भेट होत नव्हती. याचा त्रास माझ्या आईला वडिलांना झाला. पण मी ऐन विशीत असल्यामुळे आणि मित्रांसमवेत तुरुंगात राहणे हा एक मनाला उत्साह देणारा अनुभव असल्यामुळे मला विशेष काहीच वाटत नव्हते. किंबहुना लवकर पकडला गेल्यामुळे भूमिगत चळवळीत साहसी कृत्ये करणाऱ्या माझ्या मित्रांपेक्षा मी कमी पडलो याचीच मला खंत वाटत होती. तुरुंगातील दोन अनुभवांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. एक दिवस संध्याकाळी छन्नुसिंग, विभुते, किसन वीर, बलदेव प्रसाद आणि पांडू मास्तर हे जेलच्या भिंतीवरून पलीकडे उड्या टाकून पळाले. रोज संध्याकाळी राजबंद्यांची संख्या मोजत. त्यामध्ये पाचजण कमी भरल्यामुळे जेलमधील अधिकारी आणि पोलीस यांची धावपळ सुरू झाली आणि नंतर आम्हांला बराकीत कोंडून भवसूचक घंटा (अलार्म बेल) वाजवण्यात आली. दिवशीच्या लाठीमारात एका सार्जंटने काकासाहेबांच्या डोक्यावर बेटनचा प्रहार केला. काकासाहेबांचे डोके फुटून रक्त वाहू लागले, तरीही त्यांनी आम्हांला शांत रहायला सांगितले. आम्ही त्यांची आज्ञा ऐकली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

पुढे 1943 साली जेव्हा म. गांधींनी आगाखान पॅलेसमध्ये 21 दिवसांचे उपोषण सुरू केले. तेव्हा आम्ही सर्व राजबंदी क्षुब्ध झालो. बारा-तेरा दिवसांनंतर जेव्हा गांधीजींची प्रकृती खालावू लागली, तेव्हा सर्वांच्या मनाची तडफड सुरू झाली. गांधीजींचा मृत्यू समीप आला आहे, असे वाटू लागले. तुरुंगाच्या गजाआड असल्यामुळे उपोषणापेक्षा अधिक काही आम्ही करू शकणार नाही या असहायतेची जाणीव होऊन एकीकडे संताप येत होता आणि तरीही चरफडण्यापलीकडे आम्ही काही करू शकत नव्हतो. तो दाहक अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही. महात्माजी उपोषणाच्या अग्निदिव्यातून वाचले, तेव्हा आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला.


काही दिवसांनी महात्माजींची सुटका झाली आणि नंतर आमच्यातीलही एकेक तुकडी सुटू लागली.

गांधीजींचे स्वयंसेवक
1944 साली माझी सुटका झाल्यावर काही दिवसांनीच गांधीजी पुण्याला निसर्गोपचार केंद्रात विश्रांती व उपचार यांसाठी आले. स्टेशनच्या मागील बाजूस ताडीवाला रोडला डॉ. दिनशा मेहता यांचे हे निसर्गोपचार केंद्र होते. मला तेथे स्वयंसेवक प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मी दिवसभर तेथेच रहात असे. त्या पंधरा-वीस दिवसांत म.गांधींचा निकटचा सहवास लाभला. गांधीजींनी कार्यपद्धती जवळून पहायला मिळाली. पहाटे पाच वाजता होणाऱ्या प्रातः प्रार्थनेच्या वेळी गांधीजी, प्यारेलालजी, डॉ. सुशिला नायर असे चार-पाच जणच असत. त्यावेळी अभंग म्हणण्यासाठी रोज कोणाला तरी आणण्याची मला व्यवस्था करावी लागे. त्या प्रसन्न वातावरणात गांधीजींच्या समवेत प्रार्थनेला बसणे हा एक अपूर्व अनुभव होता.

गुप्त भेटीचे साहस
गांधीजींच्या त्या मुक्कामात भूमिगत चळवळीच्या नेत्या अरुणा असफअल्ली त्यांना भेटायला येणार होत्या. ही भेट गुप्तपणे पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर होती. निसर्गोपचार केंद्राभोवती चोवीस तास पोलीस पहारा असल्यामुळे हे सोपे नव्हते. माझे एक साहसी मित्र दत्तोबा जगताप यांच्या मदतीने हे मी पार पाडण्याचे ठरविले. त्या निसर्गोपचार केंद्रात काही वृद्ध पार्शी स्त्री-पुरुष होते. अरुणाबाई मध्यमवयीन पार्शी बाईचा वेष घेऊन आल्या. त्यामुळे पोलिसांना संशयही आला नाही. पण भेट संपवून त्या परत जाईपर्यंत माझे काळीज धपापत होते. दत्तोबांना पोलिसांशी दोन हात करायला मिळावेत असे वाटत होते आणि म्हणून त्यांनी रिव्हॉल्वर सज्ज ठेवले होते. ती वेळच आली नाही. दत्तोबांचे हात शिवशिवतच राहिले. अरुणाबाई भेट आटोपून परत गेल्या. नंतर पहाटे तीन वाजताच्या रेल्वेगाडीने त्या मद्रासकडे गेल्या. त्या सुखरूप गेल्याचे प्यारेलालजींना कळविण्याची जबाबदारी माझी होती. गाडी सुटल्यावर मी व दत्तोबा जगताप निसर्गोपचार केंद्रावर परत आलो. तेव्हा गांधीजी व्हरांड्यात खुर्चीवर बसून होते. मी खुणेने सर्व व्यवस्थित पार पडले असे सांगितले. त्या वेळी गांधीजींनी मंद स्मित केले आणि ते झोपायला गेले. त्या क्षणी मला गांधीजींना राष्ट्रपिता का म्हणतात, ते उमजले.

॥ खंड : 2॥

जीवनसंग्रामाला वळण
याच सुमारास मला आयुष्याला वेगळे वळण देणारा एक निर्णय घ्यावा लागला. माझे वडील मला म्हणाले, 'तू तुझ्या मनाप्रमाणे चळवळीत गेलास. परंतु आता तुला संसाराची जबाबदारी घेतली पाहिजे. मी आता रिटायर झालोय. आपले लहानसे का होईना, पण स्वतःचे घर व्हावे म्हणून मी जवळचे सगळे पैसे खर्च केले. पेन्शनचाही काही भाग घालावा लागला. तू एकटा मुलगा आहेस. तुझ्यावर आमची दोघांची जबाबदारी आहे. कुमुदचे लग्न व्हायचे आहे. तू लागलीच नोकरी धर. मी सर्वांत धाकटा मला भाऊ नाही, त्यामुळे ही सर्व जबाबदारी घ्यावयास हवीच होती. मी आई-वडिलांना म्हणालो, 'तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्यासाठी शक्य ते करीन.'

मी लागलीच मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी धरली. मला पहिला पगार चाळीस रुपये मिळाला, तेव्हा आत्मविश्वास वाटला. मात्र मला एम. ए. व्हायचे होते. प्रा. मनोहर गोविंद भाटे यांनी मला उत्तेजन दिले. हवी ती पुस्तके दिली आणि मुख्य म्हणजे माझे मित्र अ.के.भागवत यांनी आपण एकत्र अभ्यास करू.' म्हणून सांगितले. भागवतांचे वाचन माझ्यापेक्षा खूप जास्त होते. त्यांची साहित्याची जाणही प्रगल्भ होती. त्यामुळे त्यांच्यासमवेत अभ्यास करताना माझ्या मनाला नवा हुरूप आला. एक वर्षभर आम्ही दोघांनी बरोबर वाचन केले. विस्तृत टिपणे काढली. काही अडचण आली की भाटेसर मार्गदर्शनाला होतेच. माझ्याबरोबर तुरुंगात असलेले आणि तेव्हा सुटलेले के. एल. जोशी, गोपाळ परदेशी, मोहन धारिया धडाडीने विद्यार्थी चळवळीत काम करू लागले. पण मी अभ्यासावरच लक्ष केंद्रित केले. फक्त रोज एक तास सेवादलात जात असे. 1945 साली मी एम.ए. दुसऱ्या वर्गात पास झालो.


"नीट विचार कर...."
फर्गसन कॉलेजमध्ये ट्यूटर-कम्-लेक्चरर अशी जागा होती. मी भाटेसरांना भेटलो. ते म्हणाले, 'तुला लेक्चरर व्हायचे असेल तर खूप अभ्यास केला पाहिजे. एम. ए. झालास म्हणजे कसे वाचायचे ते शिकलास. यापुढे उत्तम वाचन कसे करायचे हे समजून घे. मुख्य म्हणजे राजकीय चळवळीपासून तुला दूर राहावे लागेल. सत्याग्रह, भाषण करणे हे मुळीच करता येणार नाही. शिक्षकाने राजकारणापासून अलिप्तच राहिले पाहिजे. नीट विचार कर; आणि ही बंधने स्वीकारणार असशील तरच अर्ज कर. मी खूप अस्वस्थ झालो. पण परिस्थितीची बंधने स्वीकारणे भाग होते.

दुसऱ्या दिवशी मी भाटेसरांना, 'आपण सांगाल तसा मी वागेन' असे कबूल केले आणि मला फर्गसन कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. पहिल्या वर्षी मला महिन्याला 75 रुपये पगार मिळणार हे कळल्यावर आनंद वाटला आणि मी पहिला खादीचा सूट शिवायला टाकला.

भाटेसर तसे फार सौम्य होते परंतु त्यांनी माझ्या वाचनाला शिस्त लावली, लेक्चरची तयारी कशी करायची, तेही शिकवले. मी त्यांना विचारले, 'सर, मी राजकारण करणार नाही, पण मला सेवादलाचे काम करता येईल ना?'

सर म्हणाले, 'कॉलेजमधील काम उत्तम केले पाहिजे. अन्य कामामुळे एकही तास चुकता कामा नये; आणि वाचनही कमी होऊन चालणार नाही. मी सांगितलेली बंधने पाळून तू दोन-तीन वर्षांत नीट शिकवू लागल्यावरच तुला नोकरीत कायम केले जाईल.

दुसरा टप्पा
मला सात वर्षांनी फर्गसन कॉलेजात कायम करण्यात आले. या काळात भाटेसरांच्या सांगण्याप्रमाणे मी साहित्य तर भरपूर वाचलेच. शिवाय मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान यांचीही काही निवडक पुस्तके वाचली. दोन तीन वर्षे माझे शिकवणे चाचपडत चाले. विद्यार्थी सहिष्णू असल्यामुळे सुरुवातीस निभावले. नंतर मात्र हळूहळू मला शिकवण्याचा आत्मविश्वास वाटू लागला. माझे स्वातंत्र्य चळवळीतील मित्र मधु लिमये, राजहंस, नाथ पै हे धडाडीने राजकीय काम करू लागले होते. नाना डेंगळे, यदुनाथ थत्ते, मायदेव, लालजी कुलकर्णी आदी मित्र राष्ट्र सेवादलाचे काम सर्ववेळ करू लागले. माझ्या त्या क्षेत्रातील मर्यादांमुळे मी अस्वस्थ होत असे. तेव्हा संघटनात्मक कामाला फार वेळ देता आला नाही, तरी सेवादलातील बौद्धिक विभागात जीव ओतून काम करावयाचे असे मी ठरविले. माझ्या सहकार्यांनी माझ्या मर्यादांसह सेवादलाच्या कामात मला सामावून घेतले आणि येथे माझ्या वैचारिक घडणीचा दुसरा टप्पा सुरू झाला.

देशभक्तांच्या जीवनाचा परिमल 
राष्ट्र सेवादलातील संस्कारक्षम वयातील विद्यार्थ्यांच्यावर देशप्रेमाचा संस्कार करावयाचा असेल तर त्यांना देशासाठी बलिदान केलेल्या देशभक्तांच्या जीवनाची ओळख करून दिली पाहिजे, असे मला तीव्रतेने वाटले. त्यासाठी मी माझ्या विद्यार्थीदशेत ज्या क्रांतिकारकांची चरित्रे वाचली होती ती पुन्हा नीट वाचली आणि त्या  क्रांतिकारकांच्या कथा सांगू लागलो. त्याचप्रमाणे 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धापासून सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेना आणि 1946 मधील नाविक बंडापर्यंतचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील वेगवेगळे समर प्रसंगही मी सेवादलात सांगत असे. यासाठीही मी भरपूर वाचन केले. मुलांचा जो प्रतिसाद मिळत असे तो लक्षात घेऊन मी माझी निवेदनशैलीही निर्दोष आणि प्रभावी व्हावी म्हणून प्रयत्न करू लागलो.

आनंद आणि वेदना वज्राघात
1946 व 1947 ही वर्षे आयुष्यात अविस्मरणीय ठरली. एकीकडे स्वातंत्र्य समीप आले आहे या जाणीवेने मनाला विलक्षण उत्साह वाटत होता आणि त्याच वेळी देशातील हिंदु- मुस्लिम दंग्यांच्यामुळे मन व्यथित होत होते. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात मी ध्येयधुंद अवस्थेत होतो, परंतु स्वातंत्र्यापूर्वीच्या वाटाघाटी चालू असताना माझ्या मनावर असहायतेचे सावट पडले होते. 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा ब्रिटिश साम्राज्याचा युनियन जॅक खाली उतरून भारताचा राष्ट्रध्वज विजयाने फडकला त्या वेळी मन आनंदाने बेभान झाले. परंतु त्याच वेळी देशाची फाळणी झाल्यामुळे एक डोळा हसत असताना दुसऱ्या डोळ्यातून अश्रू आले.

प्रचंड आघात
स्वातंत्र्य मिळताना देशाची फाळणी झाली. ब्रिटिशांच्या 'फोडा आणि झोडा' या कुटिल नीतीने स्वातंत्र्यसंग्रामात निर्माण झालेल्या एकात्मतेवर मात केली. त्या वेळी रक्तपात न होता हिंदू आणि मुस्लिम जनतेची अदलाबदल करता आली असती का, हा प्रश्न मला आजही अस्वस्थ करतो. पंजाब आणि बंगालमध्ये भीषण कत्तली झाल्या. अनेक स्त्रियांनी आत्महत्या केली. अनेकांचे अपहरण झाले. पाकिस्तानातून दिल्लीला येणार्या आगगाडीतील मुडदे पाहून दिल्लीमध्ये आगडोंब उसळला. पंधरा ऑगस्टला देशभर स्वातंत्र्याचा उत्सव होत असतानाच म. गांधी मात्र कलकत्त्यातील एका झोपडपट्टीत राहून दुःखितांचे अश्रू पुसत होते आणि द्वेषाचा आगडोंब विझवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर दिल्लीतील दंगली थांबाव्यात म्हणून गांधीजींनी उपोषण केले. त्या परिस्थितीत फाळणी का झाली. ती अटळ होती का, आदी प्रश्नांचा शांतपणे विचार करण्याच्या मनःस्थितीत लोक नव्हते. रक्ताचे पाट वहात असताना तशी अपेक्षाही करणे शक्य नव्हते. परंतु हिंदू विरुद्ध मुस्लिम या भावनेपेक्षा गांधींच्या विरोधात जो भीषण विषारी प्रचार चालू होता त्याची आज कोणाला कल्पनाही येणार नाही. या विषारी मनोवृत्तीचे पर्यवसान 30 जानेवारी 1948 ला म. गांधींच्या हत्येमध्ये झाले. म.गांधींच्या हत्येची बातमी ऐकताच माझ्या मनावर वज्राघात झाला. मन दुःखाने विदीर्ण झाले. कोट्यवधी लोकांच्या मनावर प्रचंड आघात झाला. या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्याची तीव्र प्रतिक्रिया झाली. त्या वेळी राष्ट्र सेवादलातील गडहिंग्लज जवळच्या सिद्धप्पा रानगेंसारख्या सैनिकांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून निरपराध कुटुंबाना वाचविले, हे मला आजही आठवते. साने गुरुजींनी तीन आठवड्यांचे उपोषण केले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आम्ही काही कार्यकर्ते साने गुरुजींच्या जवळ असताना गुरुजी जे बोलले ते मी कधीच विसरू शकणार नाही. 'म.गांधी फाळणी टाळू शकले नाहीत. परंतु त्यांच्या हौतात्म्यामुळे द्वेषाचा आगडोंब निवाला आहे.' साने गुरुजींना पुढे बोलवेना. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वहात होत्या. ते फक्त म्हणाले, 'गांधीजी गेले आणि माझ्या मनाचा आधारच हरपला असं मला वाटतं.'

'साधना' साप्ताहिकाचा पहिला अंक 
साने गुरुजींची त्या वेळची विव्हल अवस्था फार टिकली नाही आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी 'साधना' साप्ताहिक काढण्याचे ठरविले. हा निर्णय घेताना साने गुरुजी आम्हांला म्हणाले होते. 'महात्माजींच्या हत्येनंतर माझ्या मनाला विफलता आली होती. परंतु मी तसाच राहिलो तर ती महात्माजींशी प्रतारणा होईल. माझी ताकद कमी आहे पण माझ्या लेखणीत जी शक्ती आहे, ती पणाला लावून मी 'साधना' सुरू करणार आहे. 15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी 'साधना'चा पहिला अंक प्रसिद्ध केला. त्या अंकातील साने गुरुजींच्या अग्रलेखाने माझ्या मनावर विलक्षण परिणाम केला. आयुष्याला वळण देणारे असे साने गुरुजींचे ते अविस्मरणीय शब्द होते.

उत्कट बौद्धिक आनंद
1945 ते 1955 या दहा वर्षांमध्ये मला मनासारखे भरपूर वाचन करता आले. फर्गसन कॉलेजच्या समृद्ध ग्रंथालयामध्ये हवी ती पुस्तके सहज मिळत होती. आणि वाचायला वेळही भरपूर होता. माझ्याबरोबर कॉलेजमध्ये अध्यापन करणारे ए.बी. शहा, श्रीनिवास दीक्षित, देवदत्त दाभोलकर, अ.के. भागवत हे बुद्धिमान आणि व्यासंगी मित्र मिळाल्यामुळे उत्कट बौद्धिक आनंदाने माझे जीवन समृद्ध झाले. आम्ही पुणे विद्यापीठ अध्यापक संघ स्थापन केला. आणि आम्ही आमच्या असोसिएशनतर्फे 'इंटिग्रेटेड लेक्चर सेरीज’- सर्वांगीण ज्ञान देणारी विविध विषयांवरील व्याख्याने घडवून आणली. माझे इंग्रजीचे अध्यापन चांगले व्हावे, यासाठी मी जगातील मोठ्या लेखकांचे इंग्रजीत उपलब्ध असलेले साहित्य अधाशीपणाने वाचीत गेलो. हार्डीची एक कादंबरी शिकवण्यापूर्वी हार्डीच्या सर्व कांदबर्या मी वाचल्या. शेक्सपिअर, इब्सेन, बर्नार्ड शॉ, टॉलस्टॉय, चेकॉव्ह, डोस्टोव्हस्की, हेमिंग्वे आदी महान लेखकांचे साहित्य वाचताना विशाल मानवी जीवनाचे दर्शन मला झाले. मराठी साहित्यही मी सतत वाचीत असे. शरदबाबूंच्या कादंबऱ्यांमुळे मी अतिशय प्रभावित झालो. माझ्या विद्यार्थ्यांमध्ये अनेकजण अत्यंत बुद्धिमान होते. त्यांना शिकवणे हे एक आव्हानच असे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सतत अभ्यास केला. मी यशस्वी किती झालो हे सांगणे कठीण आहे. मात्र या हुशार विद्यार्थी-विद्यार्थिनींच्याबरोबर संवाद साधताना मला अनिर्वचनीय आनंद मिळाला हे निश्चित.

उत्तम पुस्तकांचा परिचय 
हाच अनुभव मला सेवादलात बौद्धिके घेतानाही आला. बौद्धिके चाकोरीबद्ध होऊ नयेत, यासाठी मी फार प्रयत्न केले. भाई वैद्य, बापू काळदाते अशा निवडक कार्यकर्त्यांच्या गटाला मी अनेक उत्तम पुस्तकांचा परिचय करून दिला. सी.ई.एम. जोडचे 'गाईड टू मॉडर्न थॉट', निओ ह्युबरमान या लेखकांचे 'मॅन्स वर्ल्डली गुड्स', 'पोलिटिकल आयडिअल्स' अशा कितीतरी पुस्तकांचे आम्ही एकत्र वाचन केले. 'लिव्हिंग बायॉग्राफीज सेरीज' मधील पुस्तकांच्या आधारे जगातील तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, कलावंत यांच्या जीवनाची ओळख मी माझ्या या तरुण मित्रांना करून दिली. एका वर्षी, 'आयडिआज् दॅट् मुव्हड् दि वर्ल्ड', 'मेन हू मुव्हड् दी वर्ल्ड', 'बुकस् वुईच इनफ्लुएन्स्ड दि वर्ल्ड' अशा प्रत्येकी दहा व्याख्यानांच्या तीन व्याख्यानमालिका मी गुंफल्या.

ग्रामीण प्रश्नांची ओळख
राष्ट्र सेवादलातील निवडक कार्यकर्त्यांनी केवळ ठोकळेबाज बौद्धिके ऐकू नयेत, त्यांना स्वतंत्र विचार करता यावा यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि भाई वैद्य, बापू काळदाते आदी मित्रांनी मला सतत उत्तम प्रतिसाद दिला. बौद्धिके रूक्ष होऊ नयेत यासाठी मी खूप परिश्रम करीत असे आणि माझे साहित्याचे वाचन त्यासाठी फार उपयोगी पडले. ऑक्टोबर आणि मे महिन्यांत राष्ट्र सेवादलाची महाराष्ट्रात अनेक शिबिरे होत आणि प्रौढ सैनिकांची बौद्धिके घेण्यासाठी मला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत जाण्याची संधी मिळाली. यामुळे ग्रामीण भागातील अनेक ध्येयवादी कार्यकर्त्यांशी माझी मैत्री झाली. त्यांच्यामुळे ग्रामीण भागातील विविध प्रश्नांचे स्वरूप मला समजू लागले. धुळ्याचे दशरथ पाटील, नाशिकचे परीट गुरुजी, नगरचे मामा गवारे, सातारचे भाऊ एकबोटे, कोल्हापूरचे श्याम पटवर्धन, सावंतवाडीचे जयानंद मठकर आदी मित्र मिळाल्यामुळे मी केवळ ग्रंथांत गुरफटून न राहता, जीवनाचा ग्रंथही डोळसपणे वाचू लागलो.

लोकशाही समाजवाद : कार्यकर्त्यांचे शिक्षण
राष्ट्र सेवादलातील कार्यकर्त्यांना लोकशाही समाजवादाची व्यवस्थित ओळख करून देण्यासाठी मला अशोक मेहता यांच्या 'डेमोक्रेटिक सोशलिझम्', 'स्टडीज इन एशियन सोशलिझम्' या पुस्तकांचा फार उपयोग झाला. अशोक मेहतांनी लोकशाही समाजवादाची उद्दिष्टे, साधने आदी पैलूंचे विवेचन करताना, मुख्य मुद्यांच्या स्पष्टीकरणार्थ तक्ते (चार्टस्) काढले होते. त्या बारा चार्टस्च्या आधाराने लोकशाही समाजवादावरील बारा व्याख्याने मी सलग देत असे आणि वर्गात शिकवल्याप्रमाणे कार्यकर्त्यांना टिपणे घ्यावयास लावीत असे. पुढे डॉ. लोहियांच्या लेखांच्या आणि पुस्तकांच्या आधारे मी हा अभ्यासक्रम पूर्ण करीत असे. माझ्या या शिकवण्यामुळेच माझे प्रधानमास्तर हे नाव सेवादलात रूढ झाले. कार्यकर्त्यांच्या वैचारिक शिक्षणासाठी सेवादलामध्ये सुरुवातीस कोल्हटकर मास्तर, बंडू गोरे, मधू लिमये यांनी, त्यानंतर सदानंद वर्दे, नरहर कुरुंदकर, मी आदींनी सातत्याने काम केले. बंडू गोरे, मधू लिमये आणि कुरुंदकर यांचा फार मोठा प्रभाव कार्यकर्त्यांवर होता. वर्दे, मी आणि वसंत बापट यांनी एकाच वेळी काम केले. पण मी जे पाच व्याख्यानात सांगत असे ते वसंत बापट अधिक प्रभावीपणे एका गीतात सांगत. गद्य आणि काव्य; अभ्यास आणि प्रतिभा यांमध्ये हा फरक पडणारच. मी अभ्यासू शिक्षक होतो, तर वसंत बापट प्रतिभावान कवी होते.

'जनवाणी'तील उमेदवारी
समाजवादी पक्षाने 'जनवाणी' हे साप्ताहिक 1947 पासून सुरू केले. नानासाहेब गोरे त्याचे संपादक होते आणि मा.ग. बुद्धिसागर हे सहसंपादक होते. प्रा.अ.के. भागवत आणि मी बुद्धिसागरांना मदत करीत असू. भागवतांनी आणि मी जनवाणीत लिहावयास जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला खूप शिकायला मिळाले. लहानशा स्फुटाचा मजकूरही बुद्धिसागर चिकित्सकपणे तपासत आणि काय सुधारणा हवी, ती स्पष्टपणे सांगत. त्या वेळी समाजवादी पक्षाचे 'जनता' हे इंग्रजी साप्ताहिक मुंबईहून प्रसिद्ध होत असे. त्यातील काही निवडक लेखांचे भाषांतर करण्याचे काम नानासाहेब गोरे आमच्यावर सोपवीत असत. जयप्रकाश नारायण यांनी 'माय पिक्चर ऑफ सोशलिझम्' असे चार विस्तृत लेख जनतात लिहिले. भागवतांनी आणि मी त्यांचे भाषांतर केले. बुद्धिसागरांनी ते आमचे लेखन तपासताना ज्या सूचना केल्या त्या फार मौलिक होत्या. बुद्धिसागर हे इंग्रजी आणि फिलॉसफी घेऊन एम.ए. झाले होते. प्रत्येक शब्दाची अर्थच्छटा नेमकी आली पाहिजे, याबद्दल ते दक्ष असत. त्यांच्या हाताखाली काम करताना माझे लेखन हळूहळू सुधारत गेले. 'जनवाणी'तील ही सहा-सात वर्षे केलेली उमेदवारी माझ्या पुढील लेखनास आधारभूत ठरली.

एस. एम. यांचे दिशादर्शन
कॉलेजमध्ये अध्यापन करीत असताना समाजवादी पक्षातील माझ्या मित्रांच्याशी माझा निकटचा संबंध होताच.1952 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचा जो दारुण पराभव झाला, त्या वेळी आमच्यामध्ये झालेल्या चर्चा आणि विशेषतः एस. एम. जोशींनी कार्यकर्त्यांना केलेले मार्गदर्शनपर भाषण मला आजही आठवते. ते म्हणाले, 'काँग्रेसला पर्याय म्हणून समाजवादी पक्षाला स्थान मिळावे ही आपली आकांक्षा योग्यच आहे. परंतु आपल्याला जनमानस समजले नाही आणि आपली संघटनाही फार अपुरी पडली हे आपण मान्य केले पाहिजे. परंतु पराभवाने खचून जाण्याचे कारण नाही. सामाजिक न्याय आणि समता या आपल्या ध्येयासाठी आपण निष्ठापूर्वक काम करीत राहिले पाहिजे. विधानसभेत आणि लोकसभेत आपले अगदी थोडे प्रतिनिधी असले तरी जनतेचे लढे आपण सतत लढवले पाहिजेत.’ भाषणामुळे माझ्या मनावरील निराशेचे मळभ दूर झाले आणि त्याचबरोबर लोकशाही समाजवाद्यांना खडतर मार्गाने जावे लागणार आहे, याची जाणीव झाली.

जयप्रकाशजी यांच्या मनातील वादळे

यानंतर काही दिवसांनी जयप्रकाश नारायण यांनी पुण्यामध्ये तीन आठवडे उपोषण केले. त्या वेळी एस. एम. जोशींनी मला रोज तीन तास तेथे जाऊन जयप्रकाशजींच्या पत्रव्यवहारात त्यांना मदत करण्यास सांगितले. त्या वेळी जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे यांच्यामध्ये होणाऱ्या चर्चा मला ऐकायला मिळाल्या. ही एक अभूतपूर्व संधी होती. त्या चर्चा ऐकताना जयप्रकाशजींच्या मनातील वादळाची मला चाहूल लागली; आणि आपल्याला भारतातील समाजाचे जे परिवर्तन करावयाचे आहे, ते राजकीय कार्यातून साध्य होणार नाही, असे त्यांना वाटू लागले आहे, याचीही थोडीबहुत कल्पना आली. पाच वर्षांपूर्वी 1948 साली नाशिक येथे झालेल्या समाजवादी पक्षाच्या अधिवेशनात जयप्रकाश नारायण यांनी साधनशुचितेवर जो भर दिला होता, तो मला आठवला. एस. एम. आणि गोरे यांच्याबरोबरच्या चर्चेत एक दिवस ते मार्क्स आणि गांधी यांच्या साध्य-साधनविषयक भूमिकांबद्दल बराच वेळ बोलत होते आणि गांधीजींच्या मार्गानेच आपल्याला गेले पाहिजे, ही त्यांची भूमिका हे आग्रहाने मांडीत होते. या संदर्भात त्यांनी एक लेख माझ्याकडून सांगून लिहून घेतला. तो लिहून घेताना जयप्रकाश नारायण यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय मला आला आणि त्यांची नैतिक भूमिकाही उमजली.

अशोक मेहता यांची भूमिका
अशोक मेहता यांच्याबद्दल माझ्या मनात आदर होता. परंतु त्यांनी समाजवादी पक्षाच्या पुढील भूमिकेसंबंधात अविकसित अर्थव्यवस्थेतील अटळ अपरिहार्यता (कंपलशन्स ऑफ बॅकवर्ड इकॉनॉमी) हा जो सिद्धांत मांडला, तो मला तितकासा पटला नाही. मागास देशांमध्ये सत्ताधारी पक्षाला केवळ विरोध न करता विरोधी पक्षाने त्या पक्षाबरोबर सहमतीच्या क्षेत्रांमध्ये (एरिआज ऑफ अग्रिमेंट) सहकार्य केले पाहिजे, असे अशोक मेहतांचे प्रतिपादन होते. या सुमारास माझे मित्र राम जोशी हे पुण्याला आले होते. ते माझ्या घरी नेहमीप्रमाणे आले होते. त्या वेळी त्यांनी विस्ताराने मला अशोक मेहतांची भूमिका समजावून सांगितली. राम जोशींना ती भूमिका मनोमन पटली होती. त्यांचे म्हणणे मी ऐकून घेतले; परंतु माझे समाधान झाले नाही.

डॉ. लोहिया यांचे नवे विचार
यानंतर काही महिन्यांनी समाजवादी पक्षाचे अधिवेशन पंचमढी येथे झाले. मी कॉलेजमध्ये नोकरी करीत असल्यामुळे अधिवेशनात जाऊ शकलो नाही. परंतु त्या अधिवेशनातील डॉ. लोहिया यांचे भाषण मला वाचायला मिळाले आणि लोहियांच्या समाजवादाच्या नव्या मांडणीमुळे मी अतिशय प्रभावित झालो. कम्युनिस्ट पक्ष भांडवलशाहीला तीव्र विरोध करीत असला तरी उत्पादन पद्धतींबद्दल दोघांचाही दृष्टिकोन एकच आहे. मोठ्या यंत्रांच्या साहाय्याने उत्पादन केले पाहिजे आणि राजसत्ता व अर्थसत्ता यांचे केंद्रीकरणच आवश्यक आहे. अशीच कम्युनिस्टांची भूमिका असून ती लोकशाहीला विघातक आहे, असे डॉ. लोहिया यांचे प्रतिपादन होते. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात सर्वांच्या हातांना काम मिळेल, असे सुयोग्य तंत्रविज्ञान (अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी) आपण स्वीकारले पाहिजे, हे सांगून डॉ. लोहिया यांनी छोट्या यंत्रांचे समर्थन केले होते. डॉ. लोहियांचे ते भाषण वाचताना त्यांच्या प्रतिभेचा प्रत्यय आला. डॉ. लोहियांच्या त्या विचारांमुळे नवा प्रकाश समाजवादी चळवळीत आला. आजही मला ते विचार फार महत्त्वाचे वाटतात. अशोक मेहता आणि डॉ. लोहिया या दोन नेत्यांच्या भूमिका दोन टोकाच्या होत्या. अशोक मेहतांना, विरोधी पक्षाने विधायक विरोध करताना काही समस्यांच्या बाबतीत सत्ताधारी पक्षाशी सहकार्य करावे असे वाटत होते. याउलट विरोधी पक्षाने विरोधाची धार तीव्र केली पाहिजे हे सांगताना डॉ. लोहिया हे काँग्रेस आणि समाजवादी यांचे मूलभूत मतभेद स्पष्टपणे मांडीत होते. राजकीय पक्षांमध्ये मतभेद हे होणारच, विचारमंथन हे सतत झालेच पाहिजे. मतभेद होणेही अटळ असते. परंतु मतभेद होत असताना एकमेकांच्या हेतूंच्याबद्दल संशय घेऊन आपापसांत संघर्ष करणे योग्य नसते, असे मला वाटते. समाजवादी पक्षांमध्ये ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः' असे न घडता लोहिया व अशोक मेहता या दोनही नेत्यांनी अभिनिवेशाने परस्परांवर प्रहार केले आणि त्यातून पक्षात फूट पडली.

मतभेदांचे आगडोंब
1953 साली सुरू झालेल्या या फाटाफुटीतून काही शिकण्याऐवजी मतभेदांतून, वर्दळीवर येऊन एका काळचे सहकारी एकमेकांवर कडवट टीका करू लागले. फाटाफूट हाच समाजवादी पक्षाचा स्थायीभाव बनला आणि अखेर आमचा पक्ष संपला. 

या दुहीमुळे असंख्य निष्ठावान कार्यकर्त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त झाले आणि समाजवादी चळवळ क्षीण झाल्यामुळे देशातील पुरोगामी राजकारणाची मोठी पिछेहाट झाली. यामध्ये अधिक दोषी कोण, याची चर्चा करण्यात मला यत्किंचितही स्वारस्य वाटत नाही. परंतु मतभेदांच्या या आगडोंबात मी आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते होरपळून निघाले, हे मला स्पष्टपणे सांगितल्याशिवाय राहवत नाही.

जयप्रकाशांचे जीवनदान
याच्या इतकाच दुसरा मोठा आघात म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी पक्ष सोडून भूदान चळवळीला जीवनदान करण्याचे ठरविले. त्या वेळी नानासाहेब गोरे यांनी जयप्रकाशजींना लिहिलेले पत्र त्यांनी मला दाखविले होते. नानासाहेबांनी पुढील आशयाचे पत्र लिहिले होते... ‘भूदान ही एक उदात्त कल्पना आहे. आपल्या देशातील जमीन वाटपातील विषमता दूर व्हायला हवी, हे मला मान्य आहे. परंतु भूदानातून सर्व प्रश्न सुटतील असे मला वाटत नाही. या चळवळीलाही मर्यादा आहे. भूदान आंदोलनात किती काम करावयाचे हा निर्णय घेण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. परंतु समाजवादी चळवळीचे महत्त्वही आपण लक्षात घ्यावे असे मला वाटते.’ जयप्रकाशजींनी नानासाहेबांना काय उत्तर लिहिले, ते मी त्यांना विचारले नाही, त्या वेळी माझे मन फार प्रक्षुब्ध झाले होते.

मी जयप्रकाशजींना भावनेच्या आवेगात पत्र लिहिले. मी त्या पत्रात पुढीलप्रमाणे लिहिले होते, 'लोकमान्य टिळक आणि म. गांधी यांनी त्यांच्या अनुयायांना चळवळीच्या प्रवाहात आणल्यावर मध्येच कधी सोडले नाही. मात्र अरविंद घोष यांनी अनेकांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली. त्यातले काहीजण फाशी गेले. अनेकांनी अंदमानमध्ये वीस वीस वर्षे कारावास भोगला आणि अरविंदबाबूंना अध्यात्माची हाक येताच त्यांनी राजकारण सोडून पाँडेचरीस आश्रम काढून आयुष्यभर साधना केली. आपणही असेच करून आम्हा समाजवादी कार्यकर्त्यांना सोडून दिले.'

तू स्वतःचा मार्ग शोध
माझ्या पत्राला जयप्रकाशांनी फार सडेतोड उत्तर लिहिले होते. त्यांनी लिहिले होते, 'एका वेळी राजकीय चळवळीतून माझ्या स्वप्नातील भारत निर्माण होईल, असे मला वाटत होते. आज मला तसे वाटत नाही. राजकीय चळवळ हे समाजपरिवर्तनाचे साधन होऊ शकेल असे मला वाटत नाही. म्हणून मी सत्तेच्या राजकारणापासून दूर झालो. मला जे प्रामाणिकपणे वाटते त्याचप्रमाणे मी वागणार. ज्यावरचा माझा विश्वास उडाला आहे ते मी पूर्वी बोललो व केले म्हणून आज तेच बोलत राहिलो आणि केले तर तो अप्रामाणिकपणा होईल. मी स्वतःशी प्रतारणा केली तर तुमचीही ती फसवणूक होईल.’ पत्राच्या शेवटी त्यांनी मला 'तू माझ्याकडे लक्ष न देता स्वतःचा मार्ग शोध' असे स्पष्टपणे लिहिले होते. जयप्रकाशजींशी मी वाद केला नाही. कारण त्यांच्या जीवनाला नैतिकतेचे जे अधिष्ठान होते, त्याची मला जाणीव होती. परंतु त्यांनी समाजवादी पक्ष सोडल्यामुळे पक्षाचे, समाजवादी चळवळीचे अतोनात नुकसान झाले हे कटुसत्य नाकारता येणार नाही.

श्रेष्ठ नेत्यांनी जबाबदारी स्वीकारली का?
या संदर्भात नानासाहेब गोरे यांनी 1960 साली काढलेले उद्गार मला उद्धृत करणे आवश्यक वाटते. नानासाहेब म्हणाले, ‘1948 साली समाजवादी पक्षाने काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय बरोबर होता, त्याचबरोबर आमचा पक्ष एकजुटीने चालविण्याची नैतिक जबाबदारीही पक्षाच्या नेत्यांवर पडली होती. परंतु दुर्दैवाने आमच्या श्रेष्ठ नेत्यांनी ती पाळली नाही. अच्युतराव पटवर्धनांनी राजकारणातून दूर होऊन संन्यास घेतला. जयप्रकाशजी भूदान आंदोलनात निघून गेले. अशोक मेहता व डॉ. लोहिया यांच्यातील मतभेद विकोपाला जाऊन पक्ष फुटला. एस. एम. यांच्याबरोबर मी आणि आमच्या बरोबरीचे बरेच सहकारी काम करीत राहिले. परंतु आम्ही अखिल भारतीय नेते नव्हतो. त्यामुळे पडलेले घर आम्ही पुरेसे सावरू शकलो नाही. या सगळ्या घटनांमुळे समाजवादी पक्ष दुबळा झाला आणि अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवनाची वाताहत झाली, याची मला फार खंत वाटते.'

गोवा सत्याग्रह
याच कालखंडातील आणखी एका घटनेचा उल्लेख करणे आवश्यक आहे. भारत स्वतंत्र होत असताना 1946 साली डॉ. लोहिया गोव्यात गेले होते आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गोव्यातील काही जणांनी तेथे स्वातंत्र्य चळवळ सुरू केली होती. परंतु पोर्तुगीज सरकारने त्या देशभक्त नेत्यांना हद्दपार करून दीर्घ मुदतीच्या शिक्षा दिल्या. अर्थात या जुलुमामुळे गोव्याच्या जनतेच्या मनातील स्वातंत्र्याच्या आकांक्षेचा स्फुल्लिंग विझला नाही.

गोव्यातील चळवळ थोडीफार चालू होतीच. भारत सरकारने हस्तक्षेप करून गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त करावा, असे अनेकांना वाटत होते. परंतु ते घडत नव्हते. म्हणून 1954 साली नानासाहेब गोरे यांनी गोव्यातील स्वातंत्र्य चळवळीस साहाय्य म्हणून भारतातून सत्याग्रह्यांनी गोव्यात जावे, असे आवाहन करून स्वतः पहिल्या सत्याग्रह तुकडीचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे 1955 पासून सत्याग्रह सुरू झाला. नानासाहेब गोरे, शिरुभाऊ लिमये, मधु लिमये, मधु दंडवते आदींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रही तुकड्या आत गेल्या. त्याचवेळी हिरवेगुरुजीही आपली तुकडी घेऊन गोव्यामध्ये शिरले. तिच्यावर गोळीबार झाला आणि हिरवेगुरुजी हुतात्मा झाले. अनेकांना अमानुष मारहाण झाली. तुकडीच्या नेत्यांना तुरुंगात टाकले, तेव्हा सत्याग्रहाला आणखी वेग आला आणि भारतातून सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली तुकड्या जाऊ लागल्या. काही सत्याग्रही हुतात्मे झाले तरी चळवळ चालू राहिली. मी या वेळी कॉलेजमध्ये नोकरी करीत होतो; आणि घरची सर्व जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे मला सत्याग्रह करणे शक्य नव्हते. मी 1955 च्या एप्रिल मे महिन्यात गोवा सरहद्दीवर सत्याग्रहींना मदत करण्याचे काम करीत होतो, परंतु माझे मन तडफडत होते.

लो. टिळकांचे इंग्रजी चरित्र
मी 'जनवाणी' साप्ताहिकात लेखनास सुरुवात केली, आणि काही वर्षे नियमाने थोडे स्फुट लेखन केले. 'साधना' साप्ताहिक पुण्याला आल्यानंतर यदुनाथ थत्ते यांनी आग्रह केल्यावर 'साधने’त काही लेख लिहिले. परंतु पुस्तक लिहिण्याचा विचारही माझ्या मनाला शिवला नव्हता. 1956 साली लो. टिळकांची जन्मशताब्दी होती आणि त्या निमित्ताने लो. टिळकांचे इंग्रजीत चरित्र लिहिण्याची स्पर्धा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केली, आणि उत्कृष्ट ठरणाऱ्या चरित्रास दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. प्रा.अ.के. भागवतांनी आणि मी संयुक्तपणे लो. टिळकांचे इंग्रजीत चरित्र लिहावयाचे ठरविले. मी हे एस. एम. जोशींच्या जवळ बोललो, तेव्हा ते म्हणाले, 'तुम्ही आचार्य जावडेकरांच्या मार्गदर्शनाखाली हे काम जरूर करा.’ भागवत आणि मी आचार्यांना भेटलो त्यावेळी त्यांनी ते आनंदाने मान्य केले. काम कठीण होते. परंतु आचार्यांचे मार्गदर्शन फार मौलिक होते. भागवतांनी आणि मी दोन अडीच महिने वाचन केले. कोणी कोणता भाग लिहावयाचा ते ठरविले आणि लिहावयास सुरुवात केली. आम्ही प्रत्येक प्रकरण लिहिण्यापूर्वी आचार्य जावडेकरांच्याबरोबर चर्चा करीत असू. आम्ही लिहिलेला मजकूर आचार्य डोळ्यांखालून घालत. काही सूचना करीत. अशा रीतीने अखेर भागवतांनी आणि मी लो. टिळकांचे चरित्र इंग्रजीत लिहून पुरे केले आणि वेळेवर सादर केले. आमची अशी अपेक्षा होती की लो. टिळकांच्या जन्मशताब्दीच्या वेळी स्पर्धेचा निकाल लागेल. परंतु तो त्यानंतर बराच उशिरा लागला. शि.ल.करंदीकर, त्र्यं. वि. पर्वते यांनी लिहिलेल्या व आम्ही लिहिलेल्या अशा तीन चरित्रग्रंथांना विभागून पारितोषिक देण्यात आले. हे लेखन करताना आचार्य जावडेकरांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या विचारांमध्ये व लिहिण्यात बरीच शिस्त आली. अ.के. भागवतांनी निम्मे लेखन केल्यामुळेच हे पुस्तक आम्ही पुरे करू शकलो. या निमित्ताने भरपूर वाचन झाले आणि लेखनाबद्दल आत्मविश्वास वाटू लागला. दुर्दैवाने आमचे लेखन पुरे होत आले असतानाच आचार्य जावडेकरांचे निधन झाले.

आगरकर लेखसंग्रह
1956 सालीच आगरकरांची जन्मशताब्दी होती आणि साहित्य अकादमीने त्यापूर्वी तीन वर्षे आधी 1953 सालीच आगरकरांचे निवडक लेख एकत्र करून, त्यांचे संपादन करून प्रस्तावना लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. ते काम मी लो. टिळकांच्या चरित्राचे लेखन सुरू करण्यापूर्वीच पूर्ण केले होते. या कामामध्ये मला दि. के. बेडेकरांनी मौलिक मार्गदर्शन केले. मी आगरकर लेखसंग्रहाची विस्तृत प्रस्तावना लिहून बेडेकरांना दाखविली. त्यांनी माझ्या लेखनातील उणिवा दाखवल्या. मी ती प्रस्तावना तीन वेळा लिहिली आणि ज्या वेळी बेडेकर 'ठीक आहे' म्हणाले, त्याच वेळी आगरकरांच्या लेखांच्या संग्रहासमवेत ती प्रस्तावना साहित्य अकादमीकडे पाठविली. साहित्य अकादमीने सुदैवाने आगरकर लेखसंग्रह आगरकर जन्मशताब्दीच्या वेळी प्रसिद्ध केला. लो. टिळक जन्मशताब्दीच्या वेळीच करंदीकर, त्र्यं. वि. पर्वते, केसरीचे ताम्हणकर, केंद्रातील मंत्री डी.पी. करमरकर आदींनी लिहिलेली लो.टिळकांची इंग्रजी चरित्रे प्रसिद्ध झाली. त्यामुळे आमचे पुस्तक मागे पडले. 1958 साली मूळ लिहिलेल्या पुस्तकाचा संक्षेप केल्यावर 'जयको' या प्रकाशकांनी ते प्रसिद्ध केले. सुदैवाने त्या वेळचे उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् यांनी आमच्या या चरित्राला छोटीशी प्रस्तावना लिहिली. त्यामुळे भागवतांना आणि मला फार समाधान वाटले.

प्रतापगडाच्या वाटेवरील निदर्शने
हे सर्व चालू असतानाच संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला. नोकरीच्या बंधनामुळे मी सत्याग्रह करू शकलो नाही. पुण्यामध्ये लालजी कुलकर्णी सत्याग्रह संघटित करीत होते, त्यांना मी शक्य ती मदत केली. माझ्या पत्नीने सत्याग्रह करून दहा दिवस कारावास भोगला, तेव्हा मला फार आनंद वाटला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू असताना प्रताप गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते होणार असे जाहीर झाले. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीने पं. नेहरूंच्या वाटेवर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. प्रतापगडाच्या वाटेवर वाई ते पसरणीचा घाट असे रस्त्याच्या दोनही बाजूस आम्ही निदर्शक शांतपणे उभे होतो. पंतप्रधान पंडित नेहरू आणि त्यांच्या समवेत असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची मोटार आमच्यामधून सावकाश गेली. त्यावेळी 'संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी गगनभेदी घोषणा आम्ही दहा हजार निदर्शकांनी केली. हा एक अपूर्व अनुभव होता.

निवडणुकीचा समरप्रसंग
संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या लढ्यामध्ये 1957 ची मुंबई विधानसभेची निवडणूक हे एक विलक्षण चुरशीच्या लढतीचे पर्व होते. पुण्यामध्ये शुक्रवार पेठ वॉर्डमधून काँग्रेसचे बाबूराव सणस आणि समितीचे एस. एम. जोशी असेंब्लीच्या निवडणुकीसाठी उभे होते. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या निवडणुकीत काम करणे हा एक रोमहर्षक अनुभव होता. अखेर एस.एम.जोशी विजयी झाले आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना धन्यता वाटली. अशा निवडणुकीत काम करणे हे एक राजकीय शिक्षणच असते. जीव ओतून काम करतानाच संयम राखायचा असतो. एस. एम. जोशींच्यामुळेच आम्ही हे करू शकलो. या वेळी पुणे शहरातून पार्लमेंटसाठी काँग्रेसतर्फे काकासाहेब गाडगीळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे नानासाहेब गोरे उभे होते. या निवडणुकीत नानासाहेब गोरे यांचा निवडणूक एजंट म्हणून मी काम केले. नानासाहेब गोरे निवडून आले. तेव्हाही आम्हा कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. 1957 मधील निवडणूक हा आमच्या सर्वांच्या जीवनातील समरप्रसंग होता आणि त्यात आम्ही विजयी झालो.

मतभेद आणि फूट
संयुक्त महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचे 105 हुतात्मे झाले. अनेकांनी कारावास भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने खंबीरपणे लढा दीर्घकाळ चालविला. एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, भाई डांगे, उद्धवराव पाटील आदी नेत्यांनी सर्वस्व पणाला लावले. आचार्य अत्र्यांची लेखणी आणि वाणी तरवारीसारखी तळपली, आणि अखेर केंद्रशासन नमले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य झाली. मात्र सीमा भागातील बेळगाव-कारवार हा भाग कर्नाटकातच राहिला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यामुळे मराठी जनतेचा मोठाच विजय झाला. वस्तुतः संयुक्त महाराष्ट्र समितीने केलेल्या संघर्षामुळे मराठी जनतेचे स्वप्न साकार झाले; परंतु नंतर संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला, असा प्रचार सुरू झाला. संयुक्त महाराष्ट्र समितीत मतभेद झाले आणि समितीत फूट पडली.

चित्र पालटले
यशवंतराव चव्हाण हे 1957 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी फार कुशलतेने परिस्थिती हाताळली. विरोधी पक्षाला सन्मानाने वागवून परिस्थितीतील तणाव कमी केला. 1960 नंतर त्यांनी फार धूर्तपणे पवित्रे टाकले. आणि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीतील, आमच्या प्रजासमाजवादी पक्षातील अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये गेले. 1962 साली महाराष्ट्राच्या विधानसभेची व भारताच्या पार्लमेंटची निवडणूक झाली, त्या वेळी सर्व चित्र पालटून गेले. आमचे स्वातंत्र्य चळवळीतील आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहकारी आणि एस. एम. जोशी यांचे शिष्य रामभाऊ तेलंग हे काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनाच काँग्रेसने एस. एम. जोशींच्या विरुद्ध उभे केले. या निवडणुकीत एस. एम. जोशींचा पराभव झाला त्या वेळी आम्हा समाजवादी कार्यकर्त्यांना किती दुःख झाले, हे मला शब्दांत सांगता येणार नाही. नानासाहेब गोरे आणि आचार्य अत्रे यांचा पराभव करून काँग्रेसचे शंकरराव मोरे निवडून आले. या पराभवानंतर भरलेल्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना एस. एम. जोशी यांनी केलेले भाषण अविस्मरणीय होते. त्या स्फूर्तिदायी भाषणामुळे आम्ही सर्वजण पराभवाचे दुःख विसरलो आणि कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमाने समाजवादी पक्षाच्या कामाला लागले.

विद्यापीठाची कार्यकारिणी
1955 ते 1965 ही दहा वर्षे माझ्या आयुष्यात फार धावपळीची गेली. राजकीय जीवनातील ताणतणावांचा आणि 'लो.टिळक चरित्राच्या’ लेखनाचा मी उल्लेख केलाच आहे. याच कालखंडात माझे मित्र प्रा. अ. भि. शहा यांच्या आग्रहामुळे 1955 साली मी पुणे विद्यापीठ सिनेटची निवडणूक प्राध्यापक मतदार संघातून लढवली; आणि निवडून आलो. हा अनुभव नवा होता. प्रा. शहा मला सतत मदत व मार्गदर्शन करीत आणि सिनेटमध्ये मी अभिनिवेशाने बोलत असे. 1958 साली मी पुणे विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर निवडून गेलो आणि मला शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. रँग्लर परांजपे, प्रा. डी.जी. कर्वे, प्रा. धनंजयराव गाडगीळ, महामहोपाध्याय पोतदार, काकासाहेब गाडगीळ अशी थोर विद्वान माणसे त्या काळात व्हाईस चॅन्सेलर होती. त्यांच्यापासून मी पुष्कळ शिकलो. कार्यकारिणीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे प्रा. बॅ. पी. जी. पाटील हे होते. स्वातंत्र्य चळवळीपासून आम्ही मित्र होतो. ती मैत्री येथे दृढ झाली. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर महाराष्ट्रात ग्रामीण भागात कॉलेजे निघू लागली. त्यांच्या खूप अडचणी असत. पूर्वी 1954-55 साली कर्मवीर डॉ. भाऊराव अण्णा पाटील पुण्याला आले असताना त्यांनी मला बोलावून घेतले होते. अण्णा म्हणाले, 'मी तुला काम सांगणार आहे. ग्रामीण भागात निघणार्या कॉलेजांना तू सर्व मदत केली पाहिजेस. आमचा पी.जी. आहेच. पण तू पुण्यात असतोस. या कामाची जास्त जबाबदारी तू पत्करली पाहिजेस.' कर्मवीर अण्णांनी प्रेमाने हक्काने मला हे सांगितले, हे मला माझा मोठा गौरव वाटला.

ग्रामीण विद्यार्थी
1960 ते 1965 अशी पाच वर्षे अण्णांच्या अपेक्षेप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक कॉलेजांना तरुण प्राध्यापक मिळवून देणे आणि त्यांच्या विद्यापीठातील अडचणी दूर करणे, हे काम मी मनापासून केले. बॅ. पी. जी. पाटील माझ्याबरोबर होतेच. पंढरपूर, बार्शी, सावंतवाडी, पाथर्डी, फैजपूर आदी ठिकाणच्या शिक्षणसंस्थांच्या अडचणींचे निराकरण होऊन ती महाविद्यालये सुरू झाली. पुणे विद्यापीठातून एम.ए. वा एम.एस्सी.ला पहिला वर्ग मिळविणाऱ्या काही हुशार विद्यार्थ्यांना लेक्चरर होण्याची संधी मिळाली, यामुळे आणि कर्मवीर अण्णांच्या आज्ञेचे मी पालन करू शकलो, यामुळे मला फार समाधान वाटले. समाजवादाचा विचार मांडताना मी विकासाच्या समान संधीवर भर देत असे. पुणे विद्यापीठात काम करताना ग्रामीण भागातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची संधी मिळावी म्हणून कार्य करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्ते यांना साहाय्य करणे मला शक्य झाले, याचा मला मनोमन आनंद वाटला.

॥ खंड 3 ॥

सर्ववेळ समाजवादी पक्षाचे काम
1962 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पराभव झाला, परंतु पार्लमेंटसाठी राजापूर मतदार संघातून बॅ. नाथ पै भरघोस मतांनी निवडून आले. नाथ पै हे 1940 साली पुण्यात एका वेळी फर्गसन कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हापासून त्यांची व माझी मैत्री होती. ते 1957 साली समाजवादी पक्षातर्फे पार्लमेंटवर निवडून गेले आणि अल्पावधीत ते तेथे संसदपटू म्हणून चमकू लागले. 1963 साली निवडून आल्यावर ते पुण्याला आले असताना आम्ही दोन दिवस एकत्र राहिलो. अनेक विषयांवर चर्चा केली. नाथ मला म्हणाला, 'प्रधान, तू आता नोकरी सोडून समाजवादी पक्षात सर्ववेळ काम करायला लाग.’ 
नाथच्या या बोलण्याने माझ्या मनात वादळ सुरू झाले. माझी पत्नी त्या वेळी बी.ए.एम.एस. च्या शेवटच्या वर्षात शिकत होती. मी तिला विचारले, 'मी नोकरी सोडली तर डॉक्टर झाल्यावर तू प्रपंच सांभाळशील का?’

तुम्ही संसाराची काळजी करू नका 
यावर ती म्हणाली, 'तुम्ही संसाराची आता काळजी करू नका. मला लग्नापूर्वी इंटर सायन्स झाल्यावर डॉक्टर व्हायचे होते. ते तेव्हा जमले नाही. पण लग्नानंतर मला मनासारखे पुन्हा शिकायला मिळाले. मी डॉक्टर झाल्यावर सगळी जबाबदारी घेईन. पण तुम्ही नोकरी सोडून काय करणार?' जेव्हा तिला सांगितले की मला राजकीय काम करावयाचे आहे. समाजवादी पक्षात काम करण्यासाठी मी नोकरी सोडेन, तेव्हा ती म्हणाली, 'मी माझ्या मनासारखी डॉक्टरकी करेन. तुम्ही तुमच्या मनासारखे राजकारण करा. आपला गरिबीचा संसार चालेल. तुम्ही काळजी करू नका.'

माझ्या पत्नीमुळे माझा उत्साह वाढला. मी कोणाशीही बोललो नाही; पण समाजवादी पक्षात काम करण्याचा माझा निर्धार पक्का झाला. 1965 साली माझी पत्नी बी.ए.एम.एस. होऊन नानल रुग्णालयात नोकरी करू लागली आणि मी फर्गसन कॉलेजमधील नोकरीचा राजीनामा देऊन प्रजासमाजवादी पक्षात काम करू लागलो.

भारत-पाक युद्ध 'हाजीपीर'
1965 साली भारत आणि पाकिस्तान यांचे युद्ध सुरू झाले. पाकिस्तानने प्रथम छांब-अखनूर भागावर हल्ला केल्यावर त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यकच होते. त्यावेळी शिरुभाऊ मला म्हणाले, 'प्रधान, आपण युद्धभूमीवर जाऊ या.' मी ताबडतोब तयार झालो. मी पुण्यातील 'सकाळ'चे प्रतिनिधित्व मिळविले आणि शिरुभाऊंनी 'साधना'चे प्रतिनिधित्व घेतले. पत्रकारांना खास सवलती मिळतात हे माहीत असल्यामुळे आम्ही ही सुविधा मिळविली. जम्मूला गेल्यावर आम्ही भारतीय सेनेचे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर मेजर पुरी यांना भेटलो आणि वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून मिळालेली आमची अधिकृत पत्रे सादर केली.

मेजर पुरी यांनी आम्हांला पत्रकारांच्या एका तुकडीत सामावून घेतले. रोज सकाळी 8 वाजता मेजर पुरी यांच्या कार्यालयात आम्ही गेल्यानंतर सेनेच्या जीपमधून आम्ही सहा पत्रकार आणि एक मार्गदर्शक युद्धभूमीकडे जात असू. संध्याकाळपर्यंत आमची भ्रमंती चाले. हा एक रोमहर्ष अनुभव होता. भारतीय जवानांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पराक्रमाचे आम्हांला दर्शन झाले. मेजर भास्कर रॉय या परमवीर चक्र मिळविणार्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही बातचीत करू शकलो. त्याचप्रमाणे छांब-अखनूर भागातील पाक आक्रमणाचा तडाखा सोसणाऱ्या डोग्रा नागरिकांच्या धैर्याचा, जिद्दीचा आणि अपार सहनशीलतेचाही आम्हांला प्रत्यय आला. भारतीय सेनेने पाकिस्तानचा जो काही भाग जिंकला होता, त्या सियालकोट जिल्ह्यात आम्हाला आमच्या मार्गदर्शकाने एक दिवस नेले. रावी नदीच्या तीरावर आम्ही गेलो आणि ऐलतीरावरील आपल्या सरहद्दीवरील भारतीय सेना आणि पैलतीरावरील पाकिस्तानी सेना एकमेकांवर बंदुका रोखून उभ्या राहिलेल्या आम्ही पाहिल्या. सर्वात रोमांचकारी अनुभव म्हणजे आम्ही दऱ्या-खोरी ओलांडीत हाजीपीर खिंडीत पोहोचलो आणि तेथे विजयाने फडकणाऱ्या भारतीय राष्ट्रध्वजाचे आम्हांला दर्शन झाले. काश्मीरमधून युद्धभूमीवरून परत आल्यावर मी आमचे अनुभव सांगणारी अनेक व्याख्याने महाराष्ट्रातील प्रमुख शहरात दिली. यदुनाथ थत्ते यांच्या आग्रहामुळे मी काही दिवसांनी या सर्व अनुभवाचे सविस्तर वृत्त देणारे 'हाजीपीर' हे पुस्तक लिहिले.

पक्षातील फूट आणि कार्यकत्यांची निराशा
मी सर्ववेळ राजकीय काम करण्याचे ठरविले आणि दुर्दैवाने त्याच वेळी समाजवादी पक्षात फूट पडून प्रजासमाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष हे अलग झाले. बनारस येथील अधिवेशनात ही दुर्दैवी घटना घडली. मी बनारसला गेलो नव्हतो, त्यामुळे हे का, कसे घडले हे मला नीटसे कळले नाही. मूलभूत वैचारिक मतभेद झाल्यावर राजकीय पक्षात फूट पडणे अपरिहार्य असते. परंतु असे मतभेद या दोन पक्षांमध्ये खास नव्हते. धोरणविषयक मतभेदांच्यामुळे पक्ष फुटला आणि त्यामुळे समाजवादी चळवळीचे फार नुकसान झाले, असे मला आजही वाटते. काही दिवसांत दोनही पक्षांना ही चूक समजून येईल आणि ते पुन्हा एकत्र येतील अशी मला आणि दोन्ही पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांना आशा वाटत होती, परंतु ते घडले नाही. प्रत्येक राजकीय पक्षात अभिनिवेशाने काम करणारे नेते आणि कार्यकर्ते असतात आणि त्यांच्यामुळे फाटाफूट वाढत जाते. मी स्वभावाने सौम्य आहे, आणि ज्या वेळी मी नोकरी सोडून राजकीय कामास सुरुवात केली, तेव्हा मी चव्वेचाळीस वर्षांचा होतो. ऐन पंचविशीतील आवेश माझ्यात नव्हता. उशिरा पोहायला शिकणारा ज्याप्रमाणे सूर मारत नाही, काठाजवळ पोहतो, तसेच माझे झाले. मी राजकीय भांडणांपासून दूर राहिलो. मधू दंडवते, नाथ पै. दत्ता ताम्हणे आणि लालजी कुलकर्णी हे स्वातंत्र्य चळवळीपासून माझे निकटचे मित्र होते. दंडवते, नाथ पै, दत्ता ताम्हणे आणि मी यांचे स्वभावही जुळणारे होते त्यामुळे मी त्यांच्याबरोबर राहण्याचे ठरविले. यामुळे भाई वैद्यांसारखे माझे मित्र माझ्यावर नाराज झाले. परंतु आमच्यात कटुता कधी आली नाही.


पदवीधर मतदार संघाची निवडणूक 
पुढे 1966 साली प्रजा समाजवादी पक्षाने मला पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेसाठी उभे करण्याचे ठरविले. मला हे अनपेक्षित होते. मला राजकारणात कोणतीच वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नव्हती. ही निवडणूक लढवू इच्छिणार्या एका मित्राला घेऊन मी नानासाहेब गोरे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा त्यांनी त्या मित्राला, 'हा निर्णय पक्षात घेतला जाईल' असे सांगितले आणि मला थांबवून घेतले. नानासाहेब म्हणाले, 'प्रधान, आम्ही तुमचे लग्न करायला निघालो आणि तू पानसुपारी वाटायला निघालास, तुलाच या निवडणुकीस आपल्या पक्षातर्फे उभे रहायचे आहे. मी हे ऐकून चकितच झालो. नानासाहेबांच्या आदेशाप्रमाणे मी उभा राहिलो. पश्चिम महाराष्ट्रातील बारा आणि मराठवाड्यातील पाच असा हा द्विसदस्य मतदार संघ होता. प्रजासमाजवादी पक्षाचे कार्यकर्ते, माझे विद्यार्थी आणि शिक्षक व प्राध्यापक मित्र यांनी मतदार नोंदणीपासून प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी मतदार आणण्यापर्यंत सर्व कामे उत्साहाने केली आणि त्यामुळे मी निवडून आलो.

ठाणे जिल्हा वगळता प्रत्येक जिल्ह्यात मला पहिल्या क्रमांकाची मते मिळाली. संयुक्त समाजवादी पक्षातील बहुसंख्य कार्यक्रत्यांनी मला मदत केली आणि काँग्रेसचा उमेदवार फारसा प्रभावी नसल्यामुळे मी ज्यांच्याबरोबर 1942 साली तुरुंगात होतो, त्या माझ्या ज्येष्ठ स्नेही मंडळींनी मला दुसऱ्या क्रमांकांची मते दिली आणि त्यांचाही निवडून येण्यास उपयोग झाला. प्रजा समाजवादी पक्षाच्या प्रत्येक तालुक्याच्या सदस्यांनी स्थानिक कामासाठी लागणारा खर्च केला. मुख्य म्हणजे लालजी कुलकर्णी यांनी निवडणूक यंत्रणा उभी करून कार्यक्षमतेने वापरली. त्यामुळे मी निवडून आलो. मला फार कमी खर्च आला; परंतु त्यासाठीही जवळचे सर्व पैसे, प्रॉव्हिडंट फंड संपून मला बायकोचे दोन दागिने मोडायला लागले.

दत्ता ताम्हणे यांचे मार्गदर्शन
मी निवडून आल्यावर दत्ता ताम्हणे हे मला मुंबईला कौन्सिल हॉलमधील विधिमंडळ कार्यालयात घेऊन गेले आणि त्यांनी मला तेथून विधानपरिषदेच्या कार्यपद्धतीच्या नियमांचे पुस्तक दिले. ते म्हणाले, 'हे प्रथम नीट वाच म्हणजे कामकाज कसे करायचे ते तुला कळेल.’ त्या दिवशी थोर संसदपटू, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि प्रजा समाजवादी पक्षाचे खासदार श्री. एच. व्ही. कामत हे मुंबईत होते. मी त्यांना भेटून नमस्कार केला. तेव्हा ते म्हणाले, 'प्रधान, विधिमंडळात काम करताना तू तीन शब्द लक्षात ठेव To Expose, To Oppose To Depos विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला एक्सपोझ केले पाहिजे. त्यांच्या चुका, त्यांची खेकटी, कुलंगडी वेशीवर टांगली पाहिजेत. त्यानंतर सरकारच्या प्रतिगामी धोरणांना ऑपोझ केले पाहिजे, कणखरपणे विरोध केला पाहिजे. हे काम करताना बाहेरच्या चळवळीत, जनआंदोलनात काम करून तुम्ही लोकांना आपल्या पक्षाची भूमिका समजून सांगितली पाहिजे. हे तुम्ही पंधरा-वीस वर्षे नेटाने केले तर तुम्ही सत्ताधारी पक्षाला डिपोझ करू शकाल. निवडणुकीत त्या पक्षाचा पराभव करून, त्यांना सत्तेपासून दूर करून तुम्ही देशाचे परिवर्तन करण्यासाठी हातांत सत्ता घेऊ शकाल. एच. व्ही कामतांचे ते बोलणे ऐकताना लोकप्रतिनिधी म्हणून किती कष्टाने आणि निष्ठापूर्वक काम करावे लागेल याची मला कल्पना आली.

सामान्य कार्यकर्त्यांच्या अडचणी
दत्ता ताम्हणे हे 1957 ते 1962 या काळात आमदार होते आणि त्यांनी संसदीय कामकाजपद्धतीचा उत्तम अभ्यास केला होता. डॉ. मंडलिक हे 1962 साली विधानसभेवर निवडून आले होते. त्या वेळी दत्ता निवडून येऊ शकले नाहीत. डॉ. मंडलिक यांना दत्ता सर्व तऱ्हेची मदत करीत. ते मार्गदर्शन करण्यास असल्यामुळे विधान परिषदेत काम करणे मला सुलभ झाले. अर्थसंकल्प ज्या वेळी मांडला जातो त्या वेळी मिळणार्या सर्व कागदपत्रांतून प्रथम काय वाचावयाचे, नंतर अर्थसंकल्प कसा वाचावयाचा, हे दत्ता ताम्हणे प्रजा समाजवादी पक्षातील आम्हा आमदारांना समजून सांगत. नंतर आमच्या मार्गदर्शनासाठी तीन तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जात. रिझर्व्ह बँकेत माझे ज्येष्ठ मित्र श्री. जाखडे ऑफिसर होते. ते आमदार निवासाजवळच रहात. तेही मला अर्थसंकल्पाबद्दल मार्गदर्शन करीत. त्या वेळी विधानपरिषदेची अधिवेशने दरवर्षी किमान चार महिने चालत. प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वी मी काळजीपूर्वक दौरा आखून माझ्या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान तीन ठिकाणी जात असे. आमदारांना रेल्वे आणि एस.टी. प्रवासाची सुविधा असल्यामुळे आणि शासकीय विश्रामगृहात राहण्याची सोय असल्यामुळे हे सहज करता येत असे. प्रत्येक ठिकाणी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते येत आणि लोकांची गाऱ्हाणी मला सांगत, त्यांच्या भागातील समस्या मला समजावून सांगत. मी त्यांना अधिक माहिती काय हवी, आणि कोणते कागदपत्र मिळणे आवश्यक आहे हे सांगत असे. हे करीत असताना मला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील परिस्थिती नीट समजू लागली. काही कार्यकर्ते अतिशयोक्ती करतात, काहीजण अर्धसत्य सांगतात, हेही माझ्या लक्षात येत असे. त्यामुळे शक्य असेल तेथे मी प्रश्नाची दुसरी बाजूही समजून घेत असे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती पाहून मला फार वाईट वाटले. या बाबतीत मला उत्तम मार्गदर्शन नागपूरच्या डॉ. बोकरे यांनी केले. ते मला म्हणाले, ‘प्रधान, समाजवादाचा भारताच्या संदर्भातील अर्थ येथील शेतकऱ्यांना शेतमजुरांना न्याय देणे हा आहे.’ शेतकरी जे उत्पादन करतो त्याची किंमतही त्याला मिळत नाही, हे नीट समजून घ्या. कापूस, ऊस ही नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा सरकारी कचेरीतील शिपायाची आर्थिक स्थिती अधिक चांगली असते, हे तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही ग्रामीण भागाची नीट ओळख करून घ्या, म्हणजे तुम्हांला पुस्तकी समाजवाद आणि शेतकर्याला न्याय देणारा समाजवाद यांतील फरक लक्षात येईल.’ मी डॉ. बोकरे यांच्या समवेत विदर्भात जेव्हा फिरलो, तेव्हा मला त्यांच्या म्हणण्यातील सत्य उमगले.

अभ्यास व कौशल्य
जिल्ह्यांचे दौरे केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे कोणता प्रश्न तालुका वा जिल्हा अधिकार्याकडून सुटेल; कोणता प्रश्न सचिवालयातील सचिव वा उपसचिव यांना सांगावा लागेल, कोणता मंत्र्यांपुढे न्यावा लागेल, आणि कोणता प्रश्न विधिमंडळात उपस्थित करावयाचा हे मी ठरवीत असे. माझ्याबरोबर प्रजा समाजवादी पक्षातील माधवराव लिमये हे विधान परिषद सदस्य होते. दत्ता ताम्हणे 1968 साली विधान परिषदेवर निवडून आले. आम्ही तिघांनी एकत्रितपणे महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प- धरणे, वीजनिर्मितीचे प्रकल्प इत्यादी पाहिले. तेथील अधिकारी आम्हांला सर्व माहिती देत. गोखले इन्स्टिट्यूटमधील काही तज्ज्ञ मित्रांशी यासंबंधी मी चर्चा करीत असे. त्यामुळे विकासाचे काम काय चालू आहे, आणि कसे झाले पाहिजे, हे मला समजून येई.

विधान परिषदेत सभागृहातील कामकाज मनापासून करताना मला खूप आनंद मिळाला. कोणत्या गार्हाण्याच्या निराकरणासाठी तारांकित प्रश्न विचारायचा, कोणती विस्तृत माहिती अतारांकित प्रश्नाच्या साहाय्याने विचारावयाची, कोणत्या तातडीच्या बाबतीत लक्षवेधी सूचना मांडावयाची आणि दुष्काळासारख्या प्रश्नांवर चर्चा कशी घडवून आणावयाची हे दत्ता ताम्हणे, माधवराव लिमये आणि मी एकत्र चर्चा करून ठरवीत असू. अशासकीय ठराव किंवा अशासकीय विधेयक कोणते मांडावयाचे यासंबंधी आम्ही सतत विचार करीत असू. संसदीय कामात कोणत्या मार्गाने योग्य डिव्हाइस वापरून आपल्याला महत्त्वाचा वाटणारा प्रश्न मांडावयाचा, याला अभ्यास व कौशल्य लागते हे विधानपरिषदेत काम करताना मला उमगले, आणि मी त्या दिशेने सतत काम केले. विधान परिषदेत राजकीय प्रश्नांवरील माझी भाषणे चांगली होत. अर्थसंकल्पावर बोलताना मात्र मी अनेकदा चाचपडत असे.

सत्ता संघर्षाची स्थाने
विधानसभा, विधानपरिषद आणि संसद ही चर्चामंडळे नाहीत. ती सत्तासंघर्षाची स्थाने आहेत. त्यामुळे सभागृहात उत्तम भाषणे करणाऱ्या संसदपटूंना प्रसिद्धी मिळाली तरी ज्या लोकप्रतिनिधींच्या शब्दांमागे जनशक्तीचे, जनआंदोलनाचे सामर्थ्य (सॅक्शन) असते तेच खरे प्रभावी ठरतात. मृणालताई गोरे यांच्यापेक्षा अधिक चांगली भाषणे करणारे आमदार विरोधी पक्षांमध्ये होते. परंतु मृणालताईंच्या शब्दांमागे त्या करीत असलेल्या जनआंदोलनाचे सामर्थ्य असल्यामुळे त्या विरोधी पक्षातील प्रभावी नेत्या ठरल्या. मी जनआंदोलनाचा नेता नव्हतो. परंतु उपेक्षितांसाठी संघर्ष करणार्या माझ्या सहकार्यांबरोबर मी सतत निकटचा संबंध ठेवीत असे आणि त्यांचे म्हणणे मांडीत असे.

प्रथम सत्याग्रह, मग वाद. 
काही ठिकाणी मी प्रथम सत्याग्रह करून नंतर तो प्रश्न मांडीत असे. ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये अनेक आदिवासींच्या जमिनी सावकारांनी बळकावल्या होत्या. दत्ता ताम्हणे आणि मी तेथे जाऊन काही आदिवासींना त्यांच्या मालकीच्या परंतु सावकारांनी बळकावलेल्या जमिनीत नांगर घालण्यास सांगितले. आम्ही त्यांच्याबरोबर होतोच. आम्हांला अटक करण्यात आली आणि नंतर सोडण्यात आले. आम्ही हा प्रश्न सभागृहात मांडणार होतो. परंतु तत्पूर्वी त्या वेळचे महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांनी ताम्हण्यांना व मला त्यांच्या चेंबरमध्ये बोलावून घेतले. आदिवासींची जमीन कायद्याप्रमाणे अन्य कोणाला बळकावता येत नाही हे आम्ही त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडले. तेव्हा बाळासाहेब देसाई म्हणाले, 'तुम्ही प्रत्येक प्रकरण माहितीसह मांडू शकाल का? मी एक खास अधिकार्याची नेमणूक करीन. तो तुम्ही दिलेला पुरावा पाहील आणि तो बरोबर आहे असे आढळून आल्यास त्या आदिवासींना त्यांच्या जमिनी परत मिळतील. आम्ही हे मान्य केले. जव्हार तालुक्यातील आमच्या पक्षाचे रवींद्र वैद्य आणि त्यांचे सहकारी यांनी अशी माहिती गोळा केली. बाळासाहेब देसाई यांनी नेमलेले खास अधिकारी मंत्रालयात उपसचिव असलेले श्री. पांडे यांनी प्रत्येक प्रकरण काळजीपूर्वक तपासले आणि आम्ही ज्यांची बाजू मांडली त्यांच्यापैकी 80% आदिवासींना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते निष्ठापूर्वक जनतेत काम करीत असले आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कामाच्या आधारे सामाजिक न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले तर बऱ्याच जणांच्यावरील अन्याय दूर होऊ शकतो, हा माझा त्या वेळचा अनुभव आहे. या अन्याय निवारणाचे मुख्य श्रेय मी माझ्या समाजवादी पक्षातील तळागाळात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना देतो.

अरण्यरुदन
मी एकूण अठरा वर्षे आमदार होतो. या काळात जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यामध्ये वसंतदादा पाटील हे मला सर्वात चांगले मुख्यमंत्री वाटले. त्यांना जनतेचे प्रश्न बरोबर समजत असत आणि लवकर निर्णय घेऊन त्यांची कार्यवाही अधिकारी करतात, हे ते दक्षतापूर्वक पहात. वसंतराव नाईक यांना शेतीचा विकास व्हावा ही तळमळ होती. परंतु एकूण सर्व काँग्रेस मंत्रिमंडळाचे धोरण स्थितिवादी (स्टेटसकोइस्ट) परिवर्तनाला विरोधी असेच होते. काही कल्याणकारी योजना केल्या जात. परंतु समाजातील धनिकांच्या आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करणे हेच काँग्रेस शासनाचे खरे धोरण असे. एका वेळी स्वातंत्र्य चळवळीत असलेले नरेंद्र तिडके, मधुसूदन वैराळे हे मंत्री माझे मित्र होते. आम्ही मनमोकळेपणाने बोलत असू. मी त्यांच्या नजरेस आणलेले काही अन्याय ते दूर करीत. परंतु मंत्रिमंडळाच्या 'जैसे थे' स्थिती टिकविण्याच्या धोरणाचाच ते पाठपुरावा करीत. मी ज्या कालखंडात (1966 ते 1984) आमदार होतो. त्या वर्षांपैकी दीड वर्षाचा जनता पक्षाच्या शासनाचा काळ वगळता काँग्रेसकडेच सत्ता होती आणि त्यांना भरघोस बहुमत होते. त्यामुळे विरोधी पक्षांशी मंत्रिमंडळ सौजन्याने वागले तरी आमच्या विरोधाची फारशी दखल घेतली जात नसे. शिवाय सभागृहात जी आश्वासणे दिली जात, त्यांची कार्यवाही करण्यात नोकरशाहीचा मोठा अडसर असे. त्यामुळे आपण सभागृहात जे बोलतो ते अरण्यरुदन आहे असे मला अनेकदा वाटे.

काही सिद्धी
याचा अर्थ त्या अठरा वर्षांमध्ये काहीच चांगले झाले नाही असा नाही. सर्वात उत्तम झालेले कार्य म्हणजे रोजगार हमी योजनेस मिळालेली मान्यता. ग्रामीण भागात दारिद्र्यरेषेखाली जाणारे असंख्य लोक आहेत, त्याचप्रमाणे तुटपुंजी शेती करणाऱ्यांना अनेक दिवस मजुरी करावी लागते आणि तीही नियमाने मिळत नाही. यासाठी उपाययोजना म्हणून रोजगार हमीयोजना मांडण्यात आमच्या विधान परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ना.वि.स. पागे यांचा मोठा पुढाकार होता. या योजनेतून महाराष्ट्रातील शेतीचे आमूलाग्र परिवर्तन कसे करता येईल हे एन्.डी. पाटील, दत्ता देशमुख यांनी मुख्यतः मांडले. त्यावेळी वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. त्यांना शेतीच्या प्रश्नांमध्ये खास रस होता. परंतु ही योजना प्रत्यक्षात ज्या रीतीने राबविली गेली व अद्यापही जाते, तिच्यामुळे काही रस्ते, पाझरतलाव, नाला-बंडिंग इत्यादी कामे झाली. परंतु महाराष्ट्रातील पाणीवाटपाचा आणि शेती सुधारणेचा प्रश्न सुटावा यासाठी एन. डी. पाटील, दत्ता देशमुख आदी माझे मित्र जो आग्रह धरत होते, तशी ही योजना राबवली गेली नाही. दुष्काळात अनेकांची उपासमार होऊ नये यासाठी या योजनेचा उपयोग झाला. परंतु महाराष्ट्रातील शेतीचे व शेतकऱ्यांच्या जीवनाचे स्वरूप आमूलाग्र पालटले गेले पाहिजे, ही आमची अपेक्षा पूर्ण झाली नाही.

कार्यकर्त्यांची सतत मदत
मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची ज्याप्रमाणे मदत घेत असे त्याचप्रमाणे लोकशाही प्रक्रियेत अन्य सामाजिक संस्थांना सहभाग मिळावा असे मला वाटे. ते मी एका प्रकाराने करू शकलो. ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील एका आरोग्यसेविकेचा खून झाला. ते प्रकरण मी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानपरिषदेत मांडले. त्यावर सरकारने या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी एक खास अधिकारी नेमण्याचे मान्य केले आणि त्यामुळे गुन्हेगार सापडून त्याला शिक्षा झाली. परंतु माझे एवढ्यावर समाधान झाले नाही. ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना, सेविकांना संरक्षण असावे यासाठी योजना करण्याकरिता शासनाने एक समिती नेमावी, असा अशासकीय ठराव मी मांडला. ती सूचना सरकारने स्वीकारली. समिती नेमली गेल्यावर तिच्यापुढे ठिकठिकाणच्या महिला मंडळांनी साक्ष द्यावी, मागण्या कराव्यात यासाठी मी 'ऑल इंडिया वुमेन्स कौन्सिल’ च्या पदाधिकाऱ्यांना भेटलो. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिला संघटनांनी या प्रश्नावर शासकीय समितीस निवेदने दिली. त्यांच्या आधारे समितीने अहवाल तयार करून शासनाला सादर केला. शासनाने तो स्वीकारला. त्याची नीट कार्यवाही व्हावी यासाठी मी सर्व जिल्ह्यांतील महिला संघटनांना पत्रे पाठविली आणि त्यांनी त्यांच्या जिल्ह्यांत अधिकाऱ्यांना भेटून त्या अहवालाची कार्यवाही करण्याची विनंती केली. ज्या महिलांना काम संपल्यावर तालुक्याच्या गावी परतणे शक्य नसेल त्यांची तेथे राहण्याची सोय करणे, तालुक्याच्या गावी शासकीय महिलांसाठीही राहण्याची कायमची व्यवस्था करणे, काही ठिकाणी पोलिसांचे संरक्षण देणे आदी समितीच्या शिफारशींची काही प्रमाणात अंमलबजावणी झाली, याचे श्रेय या महिला मंडळांच्या कार्यकर्त्यांना आहे. माझ्या कामात आणि लोकशाही प्रक्रियेत या महिला कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्याचे माझे प्रयत्न थोडेफार यशस्वी झाले, याचे मला समाधान वाटते.

निष्ठापूर्वक काम हीच कसोटी
1960 ते 1982 अशी दोन वर्षे मी विरोधी पक्षनेता होतो. या दोन वर्षांत मी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत दौरे केले आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने अनेक समस्यांना वाचा फोडली. बरेच अन्याय दूर करून घेऊ शकलो आणि काही कल्याणकारी योजना मार्गाला लावल्या. मात्र ज्या ग्रंथालय चळवळीत मी अनेक वर्षे काम केले त्या चळवळीचे काम माझ्या मनाप्रमाणे होऊ शकले नाही. ग्रंथालयसेवकांना वेतनश्रेणी मिळाली नाही; आणि ग्रंथालय कायद्यात आवश्यक त्या सुधारणा झाल्या नाहीत. मला याबद्दल फार खंत वाटते.

माझ्याबरोबरचे कार्यकर्ते
मी विरोधी पक्षनेता असताना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्ते आपुलकीने माझ्या बंगल्यावर येत आणि रहात. हे कार्यकर्ते अनेक वर्षे समाजवादी पक्षाचे निष्ठापूर्वक काम करीत राहिले म्हणून मी विरोधी पक्षनेता होऊ शकलो हे मी कधी विसरलो नाही. त्यांचे आतिथ्य करण्यात माझ्या घरी सतत येणाऱ्या अहिल्याबाई रांगणेकर, मृणालताई आदींच्या विश्रांतीची व्यवस्था करण्यात माझ्या पत्नीला मोठा आनंद वाटे. त्या वेळी जनता पक्षाचे अध्यक्ष असलेले चंद्रशेखरजी तसेच माझे दोन राजकीय गुरु एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे माझ्या बंगल्यावर नेहमी येत, राहत यामुळे आम्हा उभयतांना धन्यता वाटे. सीमा भागातील सायनाक आदी पाच नेते उपासाला बसण्यापूर्वी व नंतरही माझ्याकडेच राहिले होते. ग्रामीण भागात दौरा करताना माझ्या लाल दिव्याच्या गाडीत माझ्याबरोबर मी कार्यकर्त्यांना घेत असे. माझे सचिव, स्टेनो हे कुटुंबीयांप्रमाणेच वागत. सर्व डावे-विरोधी पक्ष हक्काने माझ्या बंगल्याच्या हॉलमध्ये त्यांच्या बैठका घेत. मी दिवसभर काम करीत असे. सतत दौरे करीत असे. परंतु मला कधी कंटाळा, थकवा आला नाही. राजकीय काम हा व्यवहार असला तरी कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे, सहकाऱ्यांच्या आपुलकीमुळे राजकीय जीवनातही जिव्हाळा निर्माण होतो, हा सुखद अनुभव मला विरोधी पक्षनेता असताना आला.

वेगवेगळ्या पुस्तकांचे लेखन
आमदार झाल्यावर 1968 साली मी कच्छ सत्याग्रहात भाग घेतला आणि एका तुकडीचे नेतृत्व केले. ऐन उन्हाळ्यात कच्छला जाणे ही एक कसोटीच होती. पण सत्याग्रह करण्याच्या मनातील उर्मीमुळे उन्हाळ्याचे काहीच वाटले नाही. भूजजवळ आम्हांला अटक झाली आणि दोन महिन्यांची शिक्षा देऊन आम्हांला साबरमती तुरुंगात पाठवण्यात आले. या अनुभवांवर आधारलेले 'कांजरकोट' हे छोटे पुस्तक मी जेलमध्येच लिहिले. मी सुटून आल्यानंतर 'साधना' प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले.

आमदारकीच्या काळात एक पुस्तक लिहिण्याची संधी मला लाभली. 1969 साली म.गांधींची जन्मशताब्दी होती. त्या वर्षी एस.एस.सी. च्या विद्यार्थ्यांना म. गांधींचे छोटे चरित्र इंग्रजीच्या पेपरात रॅपीड रीडर असावे असा एस.एस.सी. बोर्डाचे एक ज्येष्ठ सदस्य आणि राजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सरदेशपांडे यांचा आग्रह होता. परंतु तसे पुस्तक उपलब्ध नव्हते. तेव्हा सरदेशपांडे यांनी मला बोलाविले आणि सांगितले, 'तुम्ही आणि भागवत मिळून असे पुस्तक लिहा. नंतर तज्ज्ञ समितीने ते मान्य केले तर रॅपीड रीडर म्हणून ते लावण्यात येईल.' प्रा.अ.के. भागवतांनी आणि मी असे छोटे 80 पानांचे म.गांधींचे चरित्र सोप्या इंग्रजीत लिहिले. तज्ज्ञांना ते पसंत पडले. म. गांधींचे हे चरित्र तीन वर्षे रॅपिड रीडर म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या एस.एस.सी. बोर्डाने चालू ठेवले. सहा-सात लाख विद्यार्थ्यांना म. गांधींच्या उदात्त जीवनाची ओळख करून देण्याची संधी आम्हांला मिळाली. याबद्दल मला धन्यता वाटली.

1971 ला बांगला देश निर्मितीच्या वेळी शिरुभाऊ लिमये, दत्ता जगताप, देवदत्त दाभोलकर आणि मी बांगला देशात गेलो. तो एक विलक्षण अनुभव होता. आम्ही मुक्तिवाहिनीतील क्रांतिकारक तरुणांना भेटलो. म.गांधींचा नोआखलीतील आश्रम पाहिला आणि थेट चित्तगावपर्यंत गेलो. परत आल्यानंतर या अनुभवाच्या आधारे मी 'सोनार बांगला' हे पुस्तक लिहिले.

॥ खंड : 4 ॥

पुन्हा ऐक्य
1972 साली मी विधान परिषदेवर दुसऱ्या वेळी निवडून गेलो. त्याच सुमारास प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांचे पुनश्च ऐक्य झाले आणि नव्याने स्थापन झालेल्या समाजवादी पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागलो. भूमिहीनांना जमीन मिळावी यासाठी जमीनदार आणि बड़े शेतकरी यांच्याकडे कायद्यापेक्षा अधिक असलेल्या जमिनींपैकी काही भाग ताब्यात घेण्याच्या 'जमीन बळकाव' आंदोलनात हे ऐक्य घडून आले, आणि कर्पूरी ठाकूर हे पक्षाचे अध्यक्ष झाले. 1971 च्या लोकसभेच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या 'गरिबी हटाओ' या घोषणेस देशभर मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांना प्रचंड बहुमत मिळाले. बांगला देशाच्या निर्मितीसाठी इंदिरा गांधींनी जी खंबीर पावले टाकली, त्यामुळे त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली. परंतु देशभर भ्रष्टाचार बोकाळला होता आणि इंदिरा गांधींच्या हातांत अमाप सत्ता असूनही जनतेचे कोणतेच प्रश्न सुटत नव्हते.

जयप्रकाशांचे आवाहन - गुजरातचा प्रतिसाद 
जयप्रकाश नारायण यांनी देशातील भ्रष्टाचार हटला पाहिजे आणि यासाठी शासनाने निर्धाराने पाउले टाकली पाहिजेत आणि लोकांनीही भ्रष्टाचाराच्या विरोधी चळवळ केली पाहिजे, असे कळकळीचे आवाहन सर्वांना केले. जयप्रकाश नारायण हे भारताच्या नैतिकतेचे प्रवक्ते आहेत हे सर्वांच्या लक्षात आले. त्यांना प्रथम प्रतिसाद दिला तो गुजरातमधील युवकांनी. तेथे चिमणभाई पटेल यांच्या भ्रष्ट शासनाविरुद्ध नवनिर्माण आंदोलन सुरू झाले. जयप्रकाशजी तेथे गेले आणि त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. हे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन बिहारमध्ये प्रचंड वेगाने पसरले. जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीची घोषणा करून युवकांना समाजपरिवर्तनाचा कार्यक्रम दिला, आंदोलन देशव्यापी होऊ लागले. जयप्रकाश नारायण मुंबईत आले. आणि आम्ही समाजवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते एकत्र जमल्यावर त्यांनी आम्हांला मार्गदर्शन केले. याच वेळी जयप्रकाशजींच्या प्रेरणेने बँ.तारकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज' ही संस्था स्थापन करण्यात आली आणि तिच्या शाखा देशभर सुरू झाल्या.

1974 ते 1975 सालात देशभर नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. 1975च्या एप्रिलच्या अखेरीस पुण्यामध्ये हडपसरला समाजवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे शिबिर झाले. कर्पूरी ठाकूर, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु लिमये, मधु दंडवते कपिलदेवसिंग आदी नेते त्या शिबिरासाठी आले होते. मीही शिबिरामध्ये सामील झालो. आमची तीन दिवस चर्चा झाली आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन सुरू करावयाचे, असा आम्ही निर्णय घेतला.

आणीबाणी
त्यानंतर 25 जूनला इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, चरणसिंग, मधु लिमये, मधु दंडवते, नानाजी देशमुख, लालकृष्ण आडवाणी, चंद्रशेखर, मोहन धारिया आदी नेत्यांना अटक झाली. पुण्याचे त्यावेळचे महापौर भाई वैद्य आणि आमदार रामभाऊ म्हाळगी यांना 25 तारखेस रात्रीच अटक झाली. मी प्रथम 26 तारखेस सत्याग्रह केला; आणि शिक्षा भोगून सुटल्यावर सत्याग्रह आंदोलन संघटित करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेलो. 2 ऑक्टोबरला राजहंस, शिरुभाऊ लिमये, मी, बाबा आढाव, अरविंद लेले, अण्णा जोशी आदींना अटक झाली आणि मिसाखाली येरवडा तुरुंगात आम्हांला स्थानबद्ध करण्यात आले.

या वेळी भाई वैद्य, कुमार सप्तर्षी, डॉ. पूर्णपात्रे, सदानंद वर्दे, डॉ. पारीख, शिरुभाऊ लिमये, नारायण तावडे, सदाशिव बागाईतकर, जगन्नाथ जाधव आदी मित्र बरोबर असल्यामुळे आणि कारावास हा मला सुपरिचित असल्यामुळे तसे काहीच वाटले नाही. 1942 साली मी नुकताच बी.ए. झालेला तरुण होतो. आता माझी पन्नाशी उलटून गेली होती. या वेळी सुदैवाने मला बराकीत राहावे लागले नाही. मला 'बी' यार्डला अन्य मित्रांसमवेत स्वतंत्र खोली मिळाली होती. त्यामुळे वाचन, लेखन भरपूर झाले. मी पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञान पुन्हा काळजीपूर्वक वाचले. भगवद्गीतेच्या एका अध्यायाचे मराठी भाषांतर- गीताई वाचावयाची त्यानंतर त्या अध्यायावर ज्ञानेश्वरीतही काय भाष्य केले आहे हे वाचायचे, त्याच अध्यायावरील लो. टिळकांच्या गीता रहस्यातील विवेचन वाचावयाचे असे अठरा अध्याय वाचले. त्याचप्रमाणे आर.डी.रानडे यांचा 'कन्स्ट्रक्टिव्ह सर्व्हे ऑफ उपनिषद्स्' हा ग्रंथ आणि भारतीय तत्त्वज्ञानावरील अन्य काही लेखन वाचले. तेव्हा गुरुदेव रानडे हे मोठे तत्त्वज्ञ होते, हे लक्षात आले. आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञांच्यामध्ये बट्रांड रसेल हे मला सर्वांत अधिक जवळचे वाटले.

आणीबाणीतील कारावासाच्या काळात मी दोन पुस्तके लिहिली. 'साता उत्तराची कहाणी' हे माझ्या पिढीतील सात वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये आयुष्यभर निष्ठापूर्वक काम करणाऱ्या मित्रांच्या जीवनाचे चित्रण करणारे पुस्तक होते. 1939 ते 1975 पर्यंतच्या कालखंडातील राजकारणावरील वैचारिक प्रवाहांचे विवेचनही मी या पुस्तकात केले होते. दुसरे पुस्तक 'भाकरी आणि स्वातंत्र्य' हे होते. या विषयावरील अनेक लेखकांच्या पुस्तकांच्या आधारे मी प्रथम सात-आठ व्याख्याने दिली आणि नंतर हे पुस्तक लिहिले.

या कारावासात मला तसा काहीच त्रास झाला नाही. बाहेर माझ्या पत्नीवर मात्र बराच ताण पडला. तिने धीराने सर्व अडचणींना तोंड दिले. लालजी कुलकर्णी यांचा तिला खूपच आधार वाटे. नानासाहेब गोरे आणि एस. एम. जोशी तिची सतत चौकशी करीत.

26 जानेवारी 1977 ला मी सुटलो. त्यानंतर जनता पक्षाची स्थापना झाली. त्या वेळी समाजवादी पक्ष बरखास्त होऊन जनता पक्षात विलीन झाला. मला हा निर्णय तेव्हा मान्य होता. परंतु आता मागे वळून पाहताना हे करावयास नको होते असे वाटते.

सुटल्यानंतर 1947 ते 1979 पर्यंतच्या कालखंडाचे चित्रण करून मी 'साता उत्तराची कहाणी' पुरी केली. 2 ऑक्टोबर 1980ला मौज प्रकाशनातर्फे नानासाहेब गोरे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. माझ्या आयुष्यातील हा एक अत्यंत आनंदाचा प्रसंग होता.

विधान परिषदेतून निवृत्ती
1982 साली माझी विरोधी पक्षनेतेपदाची मुदत संपली. 1984 ला माझी आमदारकीची तिसरी टर्म संपणार होती. 1983 साली मी महाराष्ट्र जनता पक्षाचे अध्यक्ष माझे मित्र राजारामबापू पाटील यांना पत्र लिहून कळविले की, मी आता पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लढविणार नाही. त्यांना ते मान्य नव्हते. परंतु माझा निर्णय ठाम होता. ‘या बाबतीत नानासाहेब गोरे देतील तो निर्णय आपण दोघांनी मान्य करावा’ असे राजारामबापूंनी सुचविले. नानासाहेबांच्यासमोर बापूंनी पक्षाची बाजूच मांडली. मी म्हणालो, 'मी साने गुरुजींच्या समवेत 1942 साली तुरुंगात होतो. त्यांचा माझ्या जीवनावर फार मोठा सुसंस्कार घडला. साने गुरुजींच्या 'साधना'साठी सात-आठ वर्षे काम करण्याची माझी इच्छा आहे.’ नानासाहेब गोरे यांनी माझी भूमिका मान्य केली आणि मला विधान परिषदेतून निवृत्त होण्यास परवानगी दिली. माझ्या आमदारकीची सुरुवात आणि अखेर नानासाहेब गोरे यांच्या निर्णयामुळे झाली, हा माझ्या जीवनातील एक मजेदार योग होता.

वीस वर्षे कॉलेजमध्ये शिकविले, 18 वर्षे विधान परिषदेत काम केले आणि 1984 साली आयुष्याच्या वाटचालीत मी तिसरे वळण घेतले.

॥ खंड : 5 ॥

'साधना' साप्ताहिकाचे संपादक म्हणून यदुनाथ थत्ते यांनी दीर्घकाल वैशिष्ट्यपूर्ण कार्य केले. यदुनाथजींनी समाजाचे अज्ञात आधार असलेल्या अनेक ध्येयवादी कार्यकर्त्यांच्या कामाचा महाराष्ट्राला परिचय करून दिला. बाबा आमटे यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि असामान्य कार्य यांवर यदुनाथजींनी प्रकाशाचा झोत टाकला. नांदेड जिल्ह्यातील सगरोळीसारख्या एका लहान गावात बाबासाहेब देशमुख यांनी साने गुरुजींच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन, स्वतःच्या जमिनीवर शैक्षणिक कार्य सुरू केले आणि काही वर्षांमध्ये अनेक शाखा, उपशाखा काढून आगळे शैक्षणिक संकुल उभे केले. त्याचा परिचय पश्चिम महाराष्ट्राला झाला तो यदुनाथजींच्यामुळे. उत्तर प्रदेशातील प्रेमभाई आणि रागिणी या सर्वोदयी कार्यकर्त्यांच्या कामाचे भव्य दर्शन यदुनाथजींनी वाचकांना घडविले. हे करतानाच यदुनाथ सतत दौरे करीत. चंद्रकांत शहांसारख्या सहकाऱ्याच्या मदतीने आंतरभारतीचे उपक्रम करीत. यशवंत चौधरींच्या साहाय्याने कुमारांची शिबिरे घेत. अनेक वर्षे हरिभाऊ गद्रे यांनी कुशलतेने प्रेस चालविल्यामुळे 'साधना' कधी तोट्यात नव्हती.

आणीबाणीचा काळ हे 'साधना'च्या जीवनातील एक तेजस्वी पर्व. त्या वेळी यदुनाथ थत्ते आणि नाना डेंगळे यांनी जे कार्य केले त्याला तोड नाही. पुढे नानासाहेब गोरे काही वर्षे साधनाचे संपादक होते आणि नाना डेंगळे त्यांना साहाय्य करतानाच साधना ट्रस्टचे सचिव म्हणून काम करीत. याच काळात प्रेस कामगारांच्यासंबंधी आयोगाने जो निर्णय दिला त्यामुळे सर्व लेटर प्रेस तोट्यात गेले. मोठमोठे प्रेस बंद पडले आणि 'साधना' प्रेसची तर दुर्दशा झाली. ‘साधना साप्ताहिका’चा तोटा आणि प्रेसचा तोटा हा भार असा असल्यामुळे 'साधना'ची स्थिती फार खालावली.

'साधने'च्या नव्या वळणावर
अशा वेळी 1984 साली वसंत बापट आणि मी आम्ही दोघांनी संपादकीय जबाबदारी घेतली. एस.एम.जोशी आणि नानासाहेब गोरे हे वृद्ध झाले असल्यामुळे सदानंद वर्दे यांनी साधना ट्रस्टच्या कार्यकारी विश्वस्तपदाची जबाबदारी घेतली. तसेच बारा वर्षांहून अधिक काळ काम केल्यावर नाना डेंगळे निवृत्त झाले आणि मी विश्वस्त सचिव झालो.

पहिली दोन वर्षे आर्थिक अडचणींना तोंड देताना आमची दमछाक झाली. बापट हे संपादक म्हणून मुख्यतः अग्रलेख लिहीत आणि मी सहसंपादक म्हणून आलेल्या मजकुराचे संपादन करीत असे आणि मधून मधून लेख व कधीकधी अग्रलेखही लिहीत असे. आमदारकीच्या काळात वाचनात खंड पडला होता. मी ते पुन्हा नव्याने सुरू केले. परंतु लेखन माझ्या मनासारखे होत नसे. वसंत बापट आणि मी नियमाने विचारविनिमय करून अंकाचे स्वरूप निश्चित करीत असू आणि अग्रलेखाचा आशय काय असावा हेही ठरवीत असू. बापट कोणत्याही विषयावर प्रभावीपणे लिहीत. शिवाय 'साधना'त एकही अशुद्ध लेखनाची चूक राहता कामा नये, म्हणून शेवटचे प्रूफ तेच तपासत.

आर्थिक अडचणी, नवी दिशा
आर्थिक अडचणींनी आम्ही मेटाकुटीला आलो असताना परिस्थिती अचानकपणे पालटली. आम्ही बिवलकरांच्या प्रचंड वाड्यात एकमेव भाडेकरू होतो. याच वेळी बिवलकरांनी तेथे नवी इमारत बांधण्याचे ठरविले आणि त्यासाठी आमच्या ताब्यात असलेला एक भाग आमच्याकडून विकत घेतला. त्यातून आलेल्या रकमेतून आम्ही आमच्या प्रेसमधील सर्व कामगारांना नियमाप्रमाणे ग्रॅच्युएटी आणि नुकसानभरपाई देऊ शकलो आणि नंतर आमचा लेटरप्रेस बंद करून आम्ही दुसरीकडून छपाई करून घेऊ लागलो. कर्जाचा सर्व भारही डोक्यावरून उतरला.

विलक्षण नवे प्रयोग
पुढे 431, शनिवार पेठमधील जागाही बिवलकरांनी ताब्यात घेतली आणि भाडेकरू म्हणून 'साधना'ला दोन मजले बांधून मिळाले. बापट, वर्दे, आप्पासाहेब पाटील हे दीपावली अंकासाठी खूप जाहिराती मिळवीत. मी पूर्वी कधी व्यवहार केला नव्हता. परंतु सचिव म्हणून मी रोज आठ तास संपादकीय लेखन व व्यावहारिक काम करू लागलो. काही वर्षांतच आमचे स्वतःचे डी.टी.पी. मशीन आल्यावर आम्ही 'साधना साप्ताहिका'चे रूप पालटले. आणि आमच्या मालकीच्या दोन मजल्यांच्या प्रशस्त जागेत 'साधना साप्ताहिक', 'साधना प्रेस', 'साधना प्रकाशन' यांचा संसार सुव्यवस्थितपणे सुरू झाला. या स्थित्यंतराच्या काळात राजाभाऊ माटे, नवनीतभाई गांधी आणि अन्य अनेक मित्रांनी साने गुरुजींबद्दलच्या आदरामुळे व भक्तिभावामुळे आम्हांला फार मोठे साहाय्य केले आणि आम्ही आमची नौका वादळातून पार करून सुरक्षितपणे पैलतीराला नेली. आता डॉ. नरेंद्र दाभोलकर व त्यांचे सहकारी यांनी 'साधना'ची जबाबदारी स्वीकारल्यामुळे मला फार समाधान वाटते.

आव्हाने व समतोल
हे सर्व काम आम्ही एकत्रितपणे केले, तरी माझ्या स्वभावामुळे माझ्या मनावर फार ताण येत असे. त्यामुळे मी अनेकदा अकारण रागावत असे. मात्र मी रोज नियमाने तीन-चार तास वाचन-लेखन करीत असे, त्यामुळे माझा मानसिक तोल गेला नाही. 1984 ते 1990 या काळात मी 'स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत' आणि त्याच विषयावरील 'इंडियाज फ्रीडम् स्ट्रगल' हे इंग्रजी पुस्तक अशी दोन मोठी पुस्तके लिहिली. त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला. त्यामुळे माझ्या मनाला नवी उभारी आली.

तात्त्विक विचारांचे अधिष्ठान हवे
1990 नंतर लेखन सुधारावे यासाठी मी खास वाचन सुरू केले. यामध्ये मला माझे मित्र डॉ. बारलिंगे यांचे फार मोठे साहाय्य झाले. बारलिंगे हे तत्त्वज्ञानाचे नामवंत प्राध्यापक, आणि तत्त्वचिंतनपर लेखन करणारे एक मोठे विचारवंत. ते मला म्हणाले, 'तुम्ही भाषाविषयाचे प्राध्यापक शैलीकडे फार लक्ष देता, परंतु लेखनात आशयघनता यायची असेल तर मूलभूत संकल्पनांचे तुमचे आकलन उत्तम असले पाहिजे. याकडे तुमचे दुर्लक्ष होते. त्यामुळे प्रधान, तुमच्या अग्रलेखांचे स्वरूप प्रासंगिक होते. प्रासंगिक लिहितानाही त्याला तात्त्विक विचारांचे अधिष्ठान पाहिजे, यामध्ये तुम्ही अपुरे पडता.'

डॉ. बारलिंगे यांनी स्पष्टपणे मला हे जे सुनावले, त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. मी त्यांना म्हणालो, 'मला माझ्या मर्यादा कळतात. मी स्वातंत्र्य संग्रामावर जी पुस्तके लिहिली आहेत, ती मुख्यतः विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्या पुस्तकांमध्ये सुबोध शैलीमध्ये वस्तुनिष्ठ रीतीने लिहिताना मी सत्याशी इमान राखले आहे. पण माझ्या पुस्तकांमध्ये आणि मी लिहिलेल्या अग्रलेखांमध्येही विवेचन असते, मूलभूत विश्लेषण नसते, हे मला समजते, पण मी आता 67-68 वर्षांचा झालो. ही जित्याची खोड कशी जाणार?

डॉ. बारलिंगे यावर मनापासून हसले आणि म्हणाले, 'सत्तराव्या वर्षीही विद्यार्थी होता येते. ती तयारी आहे का तुमची?’ 
मी म्हणालो, 'तुम्ही गुरू होत असाल, तर विद्यार्थी व्हायला तयार आहे. 
डॉ. बारलिंगे म्हणाले, 'मी गुरू होणार नाही, पण तुमची मी काही ग्रंथांशी ओळख करून देईन, काही तत्त्वज्ञांच्या लेखनावर तुमच्याशी बोलेन आणि मग तुम्हांला तुमची वाट सापडेल.

"डॉ. बारलिंगे यांची प्रकृती बरी नसे. परंतु त्यांनी मला कार्ल मार्क्स यांची नव्याने ओळख करून दिली. श्रीनिवास सरदेसाई आणि प्रा. चट्टोपाध्याय यांची भारतीय तत्त्वज्ञानाची पुस्तके मला वाचायला लावून त्यावर माझ्याशी ते विस्ताराने बोलले. त्यांना आणखी पुष्कळ सांगायचे होते, परंतु त्यांची प्रकृती वारंवार बिघडू लागल्यामुळे मी त्यांना त्रास देत नसे.

याच काळात मी मराठीतील इतिहासाचार्य राजवाडे, वामन मल्हार जोशी, श्रीधर व्यंकटेश केतकर, दि.के. बेडेकर आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची पुस्तके पुन्हा वाचली.

या सर्व वाचनामुळे आणि बारलिंगे यांच्याशी केलेल्या चर्चेमुळे माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत 1990 नंतर निश्चित फरक पडला असे मला वाटते. 1995 नंतरचे माझे काही लेखन आणि माझी भाषणे यांच्यामध्ये सुधारणा झाली आहे. असे मला माझ्या चिकित्सक, जाणत्या मित्रांनी सांगितले.

मात्र या काळात जी पुस्तके मी लिहिली त्यांचे स्वरूप पूर्वीच्या पुस्तकांसारखेच होते. नॅशनल बुक ट्रस्टसाठी राष्ट्रीय चरित्रमालेत (नॅशनल बायॉग्रॉफी सेरीज) मी लोकमान्य टिळकांचे चरित्र इंग्रजी व मराठीत लिहिले. तसेच साहित्य अकादमीसाठी मराठीतील नामवंत लेखकांचा अन्य भाषिकांना इंग्रजीत परिचय करून देण्यासाठी त्या सेरीजमध्ये साने गुरुजी आणि राम गणेश गडकरी यांच्यावर छोटी 80 पानांची पुस्तके लिहिण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आले. नॅशनल बुक ट्रस्टच्या संपादकांनी छोटे टिळक चरित्र सामान्य वाचकासाठी सुबोध शैलीत आणि वस्तुनिष्ठ वर्णनपर पद्धतीने लिहावयास सांगितले. आणि तेही मी लिहिले.

या सर्व मर्यादा सांभाळून मी या पुस्तकांचे लेखन केले. साहित्य संस्कृती मंडळासाठी 'महाराष्ट्र शिल्पकार' या मालेतील एस. एम. जोशी यांचे चरित्र आणि जयप्रकाश नारायण यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेले त्यांच्यावरील पुस्तक, ही दोनही पुस्तके सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या दोन नेत्यांच्या जीवनाचा व कार्याचा परिचय करून देण्यासाठीच मी लिहिली.

डॉ. बारलिंगे यांची शिकवण
डॉ. बारलिंगे यांच्या शिकवणुकीमुळे मी संकल्पनांचा विचार करू लागलो, तरी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे माझ्या हातून काही थोडे लेख आणि प्रस्तावना वगळता प्रगल्भ लेखन झाले नाही. मला त्याची खंत वाटत नाही. संस्कारक्षम विद्यार्थ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांचा संस्कार होईल असे लेखन मी केले. त्यांच्या हातून देशसेवा, समाजसेवा घडणारच. त्याला पोषक असे लेखन मी करू शकलो, यातच मला साफल्य वाटते. एखाद्या भावगीतावर लुब्ध होणार्या श्रोत्याला आयुष्यात उशिरा अभिजात संगीत समजू लागले तरी त्याला आनंद वाटतो. त्याचप्रमाणे आयुष्याच्या संध्याकाळी का होईना संकल्पनांच्या चिंतनात मला आनंद वाटतो, हे मी माझे भाग्यच मानतो.

॥ खंड : 6 ॥

आयुष्याच्या या प्रदीर्घ वाटचालीनंतर मी जेव्हा मागे वळून पाहतो, त्या वेळी जे मला वाटते ते प्रांजळपणे मला सांगावेसे वाटते. माझे भावजीवन आणि वैचारिक जीवन हे प्रवाह सतत एकमेकांत मिसळत होते. थोर विचारवंतांच्या जीवनात वैचारिक क्षेत्रातील वाटचालीलाच अग्रस्थान असते, आणि त्यामुळे स्वतंत्र विचारांची छाप निवेदनातच उमटते. माझ्या बुद्धीची ही झेप नाही. मी जे पहात होतो, जगत होतो त्यामुळे माझ्या भावना उत्कट, अनेकदा तीव्र असत. माझे विचार आणि माझ्या भावना यांच्या परस्परांवरील परिणामांमधून माझ्या हातून थोडीबहुत कृती झाली, आणि बरेच लेखनही झाले.

कधी संभ्रम कधी निराशा

मी स्वतःशी कधी प्रतारणा केली नाही आणि मला व्यावहारिक यशापयशाची कधी क्षिती वाटली नाही. जो विचार मला मनोमन पटला, त्याच्या प्रकाशात वाटचाल करीत मी कृती करण्याची धडपड केली. ही कृती करताना मला जे अनुभव आले. त्यांच्यामुळे मी माझ्या काही विचारांना मुरड घातली. विचार आणि कृती, वैचारिक जीवन आणि भावजीवन यांच्या परस्परांवरील परिणामांमुळे काही वेळा माझ्या मनात वादळे झाली, काही वेळा संभ्रम निर्माण झाला, काही वेळा निराशाही आली. अशा वेळी मी माझ्या काही निकटच्या मित्रांशी चर्चा केली. एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे यांच्याजवळ माझे मन मोकळे केले आणि काही विचारवंतांचे ग्रंथ वाचून चिंतनही केले. त्यामुळे माझ्या मनातील वादळे शमली, संभ्रम दूर झाला, निराशेची अभ्रे पांगली आणि मी पुन्हा कामाला लागलो.

श्रेय चळवळीतील सहकाऱ्यांचे
काही असामान्य व्यक्ती स्वतंत्रपणे, एकट्याने कृती करतात. माझ्याजवळ हे सामर्थ्य नाही. स्वातंत्र्य चळवळीत आणि समाजवादी चळवळीत माझ्या सहकाऱ्यांसमवेत मी वाटचाल केली. यामुळे माझा धीर कधी खचला नाही, आणि मी निष्क्रिय झालो नाही. माझ्या हातून जे घडले त्याचे श्रेय चळवळींना, माझ्या सहकाऱ्यांनाच मला दिले पाहिजे.

1942 साली स्वातंत्र्य चळवळ झाली नसती, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समाजवादी चळवळ नसती तर माझ्या जीवनाला वेगळे वळण लागले असते. मी केवळ कॉलेजमध्ये शिकवत राहिलो असतो आणि स्वतःचा प्रपंच करीत राहिलो असतो. या अर्थाने राजकीय परिस्थितीने मला घडवले आहे. परंतु मी केवळ प्रवाहपतित नव्हतो.

साधन म्हणून कोणाला वापरले नाही 
मी डोळसपणे वाटचाल केली. चळवळींच्यामध्ये काम करताना माझा स्वभाव, माझ्या मर्यादा यांची जाणीव ठेवून मी वागलो. मला राजकीय वा सामाजिक क्षेत्रात कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती. त्यामुळे कोणाही व्यक्तीला मी साधन म्हणून वापरले नाही. मी समाजवादी चळवळीत अनेक तरुणांसमोर लोकशाही समाजवादाचा विचार अभिनिवेशाने उत्कटपणे मांडला. परंतु त्याच वेळी मी त्यांना अन्य विचारधाराही समजून घ्या आणि शेवटी जे मनोमन पटेल, ज्याची बांधिलकी वाटेल तोच विचार स्वीकारा, असे सांगितले.

कार्यकर्त्यांना स्वतंत्र विचाराची सवय
माझ्या या भूमिकेबद्दल राष्ट्र सेवादलातील माझे काही सहकारी नाराज असत. त्यांना वाटे की यामुळे बुद्धिभेद होईल. परंतु केवळ प्रचारकी भूमिका घेऊन काही काळ आपण तरुणांच्या मनावर प्रभाव टाकला आणि नंतर काही दिवसांनी त्यांना तो विचार पटेनासा झाला, तर त्याची फार तीव्र प्रतिक्रिया होते; म्हणून कार्यकर्त्यांना स्वतंत्र विचार करण्याचीच सवय लावली पाहिजे आणि त्यामुळे ते आपल्या संघटनेपासून दूर गेले तरी ते मान्य केले पाहिजे, असे मी मानतो. ही उदारमतवादी भूमिका काही कृतिशील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दुबळी वाटते. परंतु मला मात्र तीच योग्य वाटते. लोकशाही समाजवादाला हे उदारमतवादाचे अधिष्ठान असलेच पाहिजे असे माझे ठाम मत आहे.

विचारधारेच्या आधारे वाटचाल
मी जे ग्रंथ वाचले, थोर विचारवंतांची जी व्याख्याने ऐकली आणि राजकीय व सामाजिक काम करताना समाजाचे जे- निरीक्षण केले, त्यांच्यामधूनच माझी लोकशाही समाजवादी भूमिका कणखर झाली. भारताचे भविष्य उज्वल होण्यासाठी याच विचारधारेच्या आधारे वाटचाल केली पाहिजे. मात्र लोकशाही समाजवादाचा आशय भारतातील समाजजीवन लक्षात घेऊनच निश्चित केला पाहिजे. मार्क्स हा थोर तत्त्वज्ञ होता. सामाजिक न्यायाचा त्याने धरलेला आग्रह आणि त्यासाठी कष्ट करण्याची श्रमिकांना त्याने दिलेली प्रेरणा ही फार महत्त्वाची आहे. परंतु मार्क्स कितीही मोठा असला तरी त्याच्या स्थलकाल परिस्थितीच्या आधारेच त्याने त्याचे तत्त्वज्ञान मांडले होते, हे विसरून चालणार नाही. त्याच्या विचारांना काही बाबतीत मुरड घालणे आवश्यकच आहे. भारताच्या समाजजीवनात आर्थिक विषमतेप्रमाणेच सामाजिक विषमतेचाही प्रश्न अत्यंत तीव्र आहे. हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेमुळे येथील श्रमिकांवर आणि दलितांच्यावर, भटक्या विमुक्तांवर घोर अन्याय शतकानुशतके झाला. भारतातील डाव्या चळवळीतील नेत्यांमध्ये पूर्वी ही जाणीव नव्हती. आता मात्र समाजवादाचा आशय सामाजिक समतेशिवाय अपूर्ण राहील, हे बहुतेक सर्वांनी मान्य केले आहे. माझ्या वैचारिक वाटचालीत म.गांधी, डॉ. आंबेडकर आणि डॉ. लोहिया यांच्यामुळे हे मला उमगले आणि पटले.

संघर्ष व समाजवाद
एका वेळी कामगार हा क्रांतीचा अग्रदूत असेल, अशी माझी समजूत होती. परंतु आता शेतकरी आणि शेतमजूर यांना न्याय मिळणे हाच भारतीय समाजवादाचा खरा आशय आहे याची मला जाणीव झाली आहे; जे कार्यकर्ते आणि पक्ष शेतकरी-शेतमजूर यांची संघटना करून या देशातील जमीनदार, भांडवलदार आणि त्यांच्या हितसंबंधांना जपणारे शासन यांच्याबरोबर संघर्ष करतील, तेच खरे समाजवादी ठरतील, असे मी मानतो.

जनतेच्या हातांत खरी सत्ता 
रशियाच्या विघटनेनंतर आणि अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणानंतर समाजवाद ही विचारधारा संपली, असे अनेकांना वाटते. रशियातील समाजवादाचा प्रयोग चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे फसला, हे मान्य केले पाहिजे. परंतु भारतीय समाजवादाचा आशय सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे निर्मूलन करणे, समाजातील सर्वांच्या जीवनावश्यक गरजा भागविल्यानंतर सर्व मुला-मुलींना शिक्षणाची समान संधी देणे आणि सर्वांना आरोग्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे, हे लक्षात घेतल्यावर समाजवादी चळवळ विजयी होईपर्यंत संघर्ष केला पाहिजे आणि विधायक कार्यही केले पाहिजे, हे मान्य करावेच लागेल. यामुळेच लोकशाही समाजवाद हे ध्येय अविनाशी आहे अशी माझी धारणा आहे. म. गांधींच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे; परंतु त्यांच्या ग्रामस्वराज्याच्या मार्गाने न जाता भारताचे आधुनिकीकरण करण्याचा जो निर्णय पंडित नेहरूंनी घेतला, विज्ञानाच्या आधारे भारताच्या भविष्याची जी पायाभरणी केली आणि तरुण पिढीला आधुनिक ज्ञान व तंत्रविज्ञान मिळण्यासाठी ज्या सुविधा निर्माण केल्या त्यामुळेच भारताची आजपर्यंतची प्रगती झाली असे माझे स्पष्ट मत आहे. मात्र एक विशिष्ट टप्पा गाठल्यावर विकासाची आणि सर्वांगीण प्रगतीची फळे सर्वांना उपभोगता आली पाहिजेत आणि त्यासाठी राजसत्ता व अर्थसत्तेचे विकेंद्रीकरण करून खऱ्या अर्थाने जनतेच्या हातात सत्ता देणे, 'पॉवर टू दी पीपल' आणि स्त्रिया व अन्य सर्व दुर्बल घटक यांना सत्तेत सहभाग मिळणे आवश्यक आहे, असा माझा आता आग्रह आहे

भारताचा स्वातंत्र्यलढा ही एक क्रांती होती. विसाव्या शतकात रशियन राज्यक्रांती, चीनमध्ये माओच्या नेतृत्वाखाली क्रांती यांच्याइतकीच भारतीय स्वातंत्र्याची राष्ट्रवादी चळवळ हीसुद्धा प्रमुख क्रांती होती, हे थोर कम्यूनिस्ट विचारवंत मोहित सेन यांनीही त्यांच्या आत्मचरित्रात मान्य केले आहे. मात्र भारताचे स्वातंत्र्य केवळ अहिंसेच्या मार्गाने मिळालेले नाही. काँग्रेसनेही अहिंसा हे तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारले नव्हते. एका विशिष्ट परिस्थितीत धोरण (स्ट्रॅटेजी) म्हणून शांततामय मार्गाने 1942 पर्यंत वाटचाल केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. 1942 सालातील भूमिगत चळवळ, सुभाषबाबूंनी आझाद हिंद फौजेद्वारा दिलेला लढा आणि नाविक बंड यांच्यामुळे स्वातंत्र्य जवळ आले व सुदैवाने आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदलल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याचा शेवट झाला, म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लो.टिळकांचे 'साधनानाम् अनेकता' हे सूत्र वास्तववादी ठरले. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस राजकीय साम्राज्ये संपली आणि त्यामुळे भारताप्रमाणेच आशिया व आफ्रिका खंडातील अनेक देश स्वातंत्र्य चळवळ न करताही स्वतंत्र झाले हे खरे आहे. परंतु अशा विनायासेन स्वातंत्र्य मिळालेल्या राष्ट्रांत लोकशाही रुजू शकली नाही. अनेक देशांमध्ये अंतर्गत यादवी युद्ध होऊन लक्षावधी लोक मेले आणि अशा अनेक देशांमध्ये लष्करी हुकूमशहांच्या हातांत सत्ता गेली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात येथील जनतेला जो त्याग करावा लागला, जुलुमाचा प्रतिकार करताना आणि लढ्याचे नेतृत्व करणार्या दादाभाई नौरोजींपासून पंडित नेहरूंपर्यंतच्या नेत्यांनी लोकशाही मूल्यांचा जो संस्कार येथील जनतेवर केला, त्यामुळेच भारतात लोकशाही राज्यपद्धती स्थिर झाली हे मान्य करावेच लागेल.

पाकिस्तानशी संघर्ष
भारताच्या फाळणीमुळे अमेरिकेसारख्या महासत्तेला पाकिस्तानचे प्यादे वापरून भारतीय उपखंड प्रबल होऊ द्यावयाचे नाही, हा दुष्ट डाव गेली अनेक वर्षे खेळता आला आणि त्यामुळे भारताच्या आर्थिक प्रगतीत मोठा अडसर निर्माण झाला. असे असूनही भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण सर्व क्षेत्रांमध्ये अपेक्षेइतकी नसली, तरी थोडीफार प्रगती केली. विशेषतः भारतातील शेतकरी वर्गाला काही भागांत शेतीला आवश्यक ते पाणी आणि काही थोड्या आधुनिक सुविधा मिळताच, शेतकऱ्यांनी अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी केला. त्याचप्रमाणे भारतीय जवानांनी असीम त्याग व बलिदान करून भारताच्या सीमांचे रक्षण केले आणि म्हणूनच लालबहादुर शास्त्री यांनी 1965 साली 'जय जवान, जय किसान' ही घोषणा दिली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताची जी भौतिक प्रगती झाली ती मुख्यतः शहरी भागात झाली. ही प्रगती देशाच्या कानाकोपर्यापर्यंत तळागाळातील स्त्री-पुरुषांपर्यंत पोहोचली पाहिजे, याचे भान आपल्याला सतत ठेवावयास हवे. याला येथील प्रस्थापितांचा वर्ग सतत विरोध करीत आला आहे.

त्याचप्रमाणे येथील नोकरशाही हाही जनतेच्या प्रगतीच्या मार्गातील मोठा अडसर आहे. 1947 ते 1972 अशी पंचवीस वर्षे भारताची जी वाटचाल झाली ती अधिक वेगाने व्हावयास हवी होती. परंतु भ्रष्टाचारामुळे आपला देश पोखरला गेला आहे आणि त्यामुळे आपली प्रगती खंडित झाली आहे. इतकेच नव्हे, तर आपला अधःपात होत आहे. 1972 सालानंतर याविरुद्ध जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी चळवळ होण्याची शक्यता होती. परंतु असे जनआंदोलन हे आपल्या सत्तेला आव्हान आहे, असे मानून इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर करून भारतीय लोकशाहीवर आघात केला. सुदैवाने 1977 मध्ये लोकशाहीचे पुनरुज्जीवन झाले. परंतु त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला नाही. गेल्या पंचवीस वर्षांतील वाढलेला भ्रष्टाचाराचा हा कॅन्सर सर्व क्षेत्रांमध्ये अधिकाधिक पसरला तर आपण आपल्याच दुष्कर्माने आपल्या देशाचा विनाश करू अशी मला भीती वाटते. भारतीय लोकशाहीला या संभाव्य धोक्याला तोंड द्यावे लागेल. यासाठी निवडणूक पद्धतीत मूलभूत सुधारणा कराव्या लागतील. आणि भ्रष्टाचाऱ्यांना तत्काळ व कठोर शासन करणारी न्यायव्यवस्था उभी करावी लागेल.

दोन संकटे - जागतिकीकरण व जातीयवाद

आज भारतापुढे अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणामुळे फार मोठे संकट उभे राहिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धेत भारतासारखा विकसनशील देश टिकू शकणार नाही: आणि या बाजारपेठेपासून आपल्याला पूर्णपणे अलग होता येणार नाही, असा हा पेच आहे. अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणामुळे अमेरिका आणि युरोपमधील धनवान राष्ट्र जगावर हुकूमत गाजवू लागली आहेत. यामुळे भारत अमेरिकेच्या आर्थिक साम्राज्याच्या मगरमिठीत सापडण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे जगात जे अत्याधुनिक तंत्रविज्ञान रूढ होत आहे, त्यामुळे भारतातील बेकारीच्या प्रश्नाचे स्वरूप भीषण बनले आहे. भारताचा विकास येथील जनशक्तीच्या जोरावर करावयाचा असेल तर सर्वांच्या हाताला काम मिळेल असेच तंत्रविज्ञान आपल्याला स्वीकारावे लागेल.

भारतीय लोकशाहीला निर्माण झालेला दुसरा मोठा धोका म्हणजे हिंदुराष्ट्रवादी विचारधारा आणि त्या विचारधारेच्या आधारे चाललेले सत्तेचे राजकारण हा आहे. विविधतेत एकात्मता हे भारताचे वैशिष्ट्य आहे आणि हिंदु राष्ट्रवादी राजकारणामुळे त्यावर सतत मोठा आघात होत आहे. दुर्दैवाने येथील मुस्लिम समाजाचे नेतृत्व मुल्ला-मौलवीच करीत आहेत म्हणून मुस्लिम तरुणांच्यात मूलतत्त्ववाद फैलावत आहे. असा मूलतत्त्ववाद भारतीय एकात्मतेच्या मुळावर आघात करणारा आहे आणि त्यामुळे तो मुस्लिम समाजालाही घातक ठरणार आहे हे निर्भयपणे सांगणारे नेते जर मुस्लिम समाजाला मार्गदर्शन करू शकले नाहीत, तर हिंदुराष्ट्रवादी विचारधारा अधिकाधिक प्रबळ होत जाईल. मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी काश्मीरमधील दहशतवादाचा आणि रघुनाथ मंदिरावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करावयास हवा होता. भारतीय मुस्लिम हे प्रथम भारतीय आहेत, त्याचबरोबर घटनेने दिलेले उपासना स्वातंत्र्य आचरत आहेत. हा प्रत्यय अन्य धर्मीयांना आला पाहिजे, अशी शिकवण मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी मुस्लिम जनतेस दिली पाहिजे. त्याचबरोबर बहुसंख्य हिंदू धर्मीयांनी सहिष्णुता हे हिंदू धर्माचे सर्वश्रेष्ठ वैशिष्ट्य आहे हे लक्षात घेऊन धर्माचे आचरण करताना, सत्तासंपादनासाठी धर्मभोळ्या जनतेची दिशाभूल करणार्या राजकीय पक्षांना आळा घातला पाहिजे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा कधी असहिष्णु झालेला नाही, हे मला एक आशास्थान वाटते. हिंदु राष्ट्रवादी सत्ताधारी पुनरुज्जीवनवादी धोरणाची आक्रमकतेने कार्यवाही करीत आहेत, हे अदूरदर्शीपणाचे आहे आणि सर्व पुरोगामी विचाराच्या संघटनांनी व व्यक्तींनी त्याला विरोध केला पाहिजे. हिंदुराष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष अयोध्या रामजन्मभूमी आणि तत्सम प्रश्नांना प्रथम स्थान देत असल्यामुळे जनतेच्या जीवनात आद्य स्थान असलेला आर्थिक प्रश्न, रोजगारीचा प्रश्न हे मागे पडत आहेत. आज जगातील आर्थिक साम्राज्यवाद्यांपासून भारताचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने लढायला हवे. परंतु सत्तेसाठी धर्माधिष्ठित राजकारण करणारे पक्ष जनतेचा बुद्धिभेद करून आपला हा लढा दुर्बल करीत आहेत. त्याचप्रमाणे आजवर जो मध्यम वर्ग स्वातंत्र्य आणि समता यांसाठी लढला, त्या उच्च मध्यम वर्गाने श्रमिकांशी आणि गरिबांशी फारकत घेऊन, ते उच्च मध्यमवर्गीय येथील धनिकांच्या आघाडीत सामील होत आहेत. उच्चशिक्षित मध्यमवर्गीयांपैकी अनेकजण भारतात मिळालेल्या ज्ञानाचा व उच्च शिक्षणाचा उपयोग भारताचे जीवन संपन्न करण्याऐवजी अमेरिकेत वा युरोपात जाऊन तेथील नागरिकत्व घेत आहेत. या प्रवृत्तीस आळा घातला पाहिजे. अर्थव्यवहाराचे जागतिकीकरण होत असताना भारतातील शेतकरी समाजाचे आणि अन्य श्रमिकांचे हितसंबंध सुरक्षित राहण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भारताची नवी अर्थनीती ठरवून तिची कार्यवाही केली पाहिजे. भारतावरील आर्थिक साम्राज्यवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि भारतीय एकात्मतेस विघातक असलेल्या हिंदुराष्ट्रवादी विचारधारेबरोबर संघर्ष करण्यासाठी सर्व पुरोगामी राजकीय पक्ष आणि संघटना यांना एकजूट करावी लागेल आणि त्याची सुरुवात म्हणून एक व्यापक वैचारिक व्यासपीठ निर्माण करावे लागेल.

राज्यघटनेत बदल आवश्यक
स्वातंत्र्य मिळाले त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे आपण केंद्र सत्ता प्रबल ठेवणारी पद्धत स्वीकारली, परंतु 55 वर्षांनंतर आता आपण फेडरल पद्धत स्वीकारली पाहिजे. केंद्र शासनाकडे देशाचे संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि अर्थनीती या मुख्य जबाबदाऱ्या ठेवून, या देशातील सर्व निसर्गसंपत्ती व दळणवळणाची साधने याबाबतची अंतिम सत्ता केंद्र सरकारचीच असली पाहिजे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने सर्व राज्य सरकारे घटनेच्या चौकटीत कारभार करतात याची दक्षता ठेवली पाहिजे. बाकी सर्व विभाग शिक्षण, शेती इत्यादी राज्य शासनांच्याच अखत्यारीत असले पाहिजेत. त्याचप्रमाणे राज्यशासनांनी हळूहळू सत्तेचे विकेंद्रीकरण करून 73 व्या घटना दुरुस्तीप्रमाणे पंचायतींना अधिकाधिक अधिकार दिले पाहिजेत.

आजची भारतातील राजकीय परिस्थिती चिंता वाटावी अशी असली, एकत्मताविरोधी शक्ती प्रबळ झालेल्या दिसत असल्या आणि अमेरिकेचे पाश आपल्या जीवनाभोवती आवळले जात असले तरी त्यांच्या विरोधी शक्तीही या देशात खासच आहेत. सामाजिक न्याय आणि समता यासाठी लढणाऱ्या मेधा पाटकर आणि तत्सम विविध संघटना व कार्यकर्ते, रचनात्मक कार्य करणारे अभय बंग, राणी बंग, प्रकाश आणि विकास आमटे आणि त्यांचे कुटुंबीय व सहकारी, पडिक जमीन लागवडीखाली यावी हा आग्रह धरीत नवनिर्माणाचे काम करणाऱ्या वनराई व तत्सम संस्था, रागिणी प्रेम आणि अनेक सर्वोदयी संस्था, तरुणांचे अनेक पर्यावरणवादी गट, संघटना, सुंदरलाल बहुगुणा, चंडीप्रसाद, वंदना शिवा यांच्यासारखे ध्येयवादी नेते व कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मूलनवादी संस्था ही माझी आशास्थाने आहेत. रचना आणि संघर्ष या दोनही आघाड्यांच्यावर कार्य करणारे अनेक स्त्री-पुरुषांचे गट भारतात आहेत. ज्येष्ठ विचारवंत अमलान दत्त यांनी म्हटल्याप्रमाणे ही सायलेंट रेव्होल्युशन- शांतपणे वाटचाल करणारी क्रांती सुरू झाली आहे. या क्रांतीचे पडघम वाजणार नाहीत. यातून रक्तपात तर होणार नाहीच. या क्रांतीचे नेतृत्व देशभर विखुरलेले आहे आणि नव्याने आकांक्षा जागृत झालेल्या स्त्रिया, दलित, भटके विमुक्त समाज आदींच्यातील कार्यकर्ते निर्धाराने आणि समर्पण वृत्तीने काम करीत आहेत. नव्या युगाच्या या नवक्रांतिकारांना शक्यतो पाठिंबा देणे हे माझ्या उर्वरित आयुष्यातील माझे ध्येय

आहे. भारताच्या भविष्याचे स्वप्न माझ्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत साकार झाले नाही तरी हे झुंजार तरुण रचना व संघर्ष चालू ठेवून भारताचे भविष्य उज्ज्वल करतील असा मला विश्वास आहे.

आगामी काही वर्षे तरी केंद्रामध्ये कोणत्या तरी आघाडीचे शासन, वेगवेगळ्या राज्यांमध्ये तेथील जनतेत प्रभावीपणे कार्य केलेल्या राजकीय पक्षाचे किंवा त्या पक्षाचे प्रभुत्व असलेल्या आघाडीचे शासन असे राजकीय जीवनाचे स्वरूप असेल असे मला वाटते. आपल्या पंतप्रधानांना आंतरराष्ट्रीय क्षेत्रात महत्त्व असेलच आणि पंतप्रधान म्हणून संरक्षण, परराष्ट्र धोरण आदी देशाच्या जीवनाचा मुख्य आधार असलेल्या प्रश्नांसंबंधी त्यांचाच निर्णय असेल. त्यांनी पं. नेहरूंच्याप्रमाणे, जगातील अविकसित व विकसनशील देशांची एकजूट करून अमेरिका व युरोपमधील धनदांडग्या राष्ट्रांशी संघर्ष करण्यात पुढाकार घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या राज्यांतील स्थान सर्वोच्च असले तरी हळूहळू सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्यावर जनसामान्यांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग अधिकाधिक वाढत जाईल. पंचायत राज हे समाजपरिवर्तनाचे मुख्य साधन आणि सत्ताकेंद्र असेल. असे सत्तांतर झाले तरच अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण होऊनही भारतातील शेतकरी, शेतमजूर आणि अन्य श्रमिक यांचे हितसंबंध सुरक्षित राहतील. म.गांधींच्या ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेत कालानुरूप आवश्यक ते बदल करून जनसामान्यांना भारत भाग्यविधाते होता आले तरच आर्थिक साम्राज्यवाद्यांना आपण नामोहरम करू. अशा सर्वांगीण परिवर्तनासाठी आज जे तरुण कार्यकर्ते संघर्ष आणि रचना करीत आहेत. त्यांच्यासमवेत उर्वरीत आयुष्यात दोन पावले चालता आले तरी मला साफल्य वाटेल. ही वाटचाल करताना, गेल्या 55-56 वर्षांमध्ये ज्यांचे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत अशा सात घटकांचे प्रश्न मी माझ्या तरुण सहकाऱ्यांना विचारणार आहे. माझी पिढी हे प्रश्न सोडवू शकली नाही. स्त्रिया, दलित, आदिवासी आणि भटके व विमुक्त समाज, भूमिहीन शेतमजूर, उपजीविकेचे साधन नष्ट झालेले धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त लोक आणि भारताशी ज्यांना आपण अद्याप एकरूप करून घेऊ शकलो नाही असे ईशान्येकडील नागा, बोडो आणि त्रिपुरातील आदिवासी, अस्मिता दुखावलेले शीख बांधव आणि राजकीय वंचनेने ग्रासलेली आणि दहशतवादाने होरपळलेली काश्मिरी जनता अशा सात घटकांचे प्रश्न अद्यापही आपण सोडवू शकलेलो नाही. मी 1980 साली 'साता उत्तराची कहाणी' लिहिली. आज या सात प्रश्नांची कहाणी लिहावी असे मला तीव्रतेने वाटते. त्या प्रश्नांची उत्तरे आजच्या तरुण ध्येयवादी कार्यकर्त्यांनी द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. मला येथे एक सत्य स्पष्टपणे मांडावेसे वाटते की विधायक कार्य करणाऱ्या तरुण मित्रांच्याबद्दल माझ्या मनात प्रेम असले तरी समाजपरिवर्तन करण्यासाठी राजकीय संघर्ष करावाच लागेल हे विसरून चालणार नाही. आज राजकारणात ज्या अपप्रवृत्ती फोफावल्या आहेत. त्यांच्याशी लोकशाही समाजवादी भूमिकेच्या आधारे राजकीय पातळीवर संघर्ष करावा लागेल. राजकीय सत्ता ही परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे हे विसरून चालणार नाही. यासाठी सर्व पुरोगामी शक्तींना एकत्र आणावे लागेल. ही एकजूट वाटाघाटीतून होणार नाही. संघर्षात जे एकत्र येतात त्यांचेच ऐक्य चिरस्थायी होऊ शकते. आर्थिक क्षेत्रातील धनदांडगे आणि त्यांचे मध्यमवर्गीय साथीदार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील धार्मिक पुनरुज्जीवनवादी यांच्याबरोबरचा हा राजकीय संघर्ष जेव्हा तीव्र होईल तेव्हाच आजची राजकीय कोंडी फुटेल. या संघर्षाचा प्रारंभ तरी पहावयास मिळावा यासाठी मी उत्सुक आहे.
 

Tags: कम्युनिस्ट पार्टी पुणे विद्यापीठ शिरूभाऊ लिमये कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधी जयप्रकाश नारायण राममनोहर लोहिया साधना साप्ताहिक राष्ट्र सेवा दल ग.प्र. प्रधान Communist Party Pune University Shirubhau Limaye Karmaveer Bhaurao Patil Mahatma Gandhi Jaiprakash Narayan Rammanohar Lohia Sadhana Weekly Rashtra Seva Dal G.P. Pradhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके