साने गुरुजी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांच्या सभेत कै. लालजी कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहणारी सभा 15 एप्रिलला झाली. या सभेत श्री ग. प्र. प्रधान यांनी लालजींना वाहिलेली श्रद्धांजली..
आज साने गुरुजी रुग्णालयात येतानाच मन अतिशय अस्वस्थ झाले. कारण इथं बैठकीला यायचं म्हणजे लालजींच्याबरोबर यायचं हा अनेक वर्षांचा आमच्या सर्वांचा परिपाठ होता. आज लालजी नव्हते, पुढे कधीही असणार नाहीत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जातो आहोत या जाणिवेने माझे मन अतिशय दुःखी आहे.
'वरून थापटी आतून आधाराचा हात'
आपल्या संस्थेच्या स्थापनेतून लालजी कुलकर्णी हे खंबीरपणे उभे राहिले. संस्था त्यांनी जोपासली. महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या कामाचा विस्तार झाला पाहिजे असा आग्रह धरला. येथील कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा मिळाव्या म्हणून ते झटले. संस्थेकडून त्यांनी कसली अपेक्षा केली नाही. आपल्या संस्थेची भरभराट हाच त्यांचा आनंद असे. आपल्या संस्थेच्या कुटुंबातले वडिलधारे लालजी गेले. आपल्याला करड्या आवाजात चार गोष्टी सुनावणारे, प्रेमाने बळकट हाताचा आधार देणारे लालजी यापुढे आपणांत नाहीत. त्यांचे आचरण आपल्याला मार्गदर्शक ठरले पाहिजे, त्यांच्या पावलांच्या खुणांमागोमाग आपण वाटचाल केली पाहिजे.
जीवनपट
येथील अनेक नव्या मंडळींना लालजींच्या जीवनाची माहिती नाही म्हणून मी काही गोष्टी सांगणार आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे हे लालजींचे गाव. गरीब कुटुंबात 1915 साली त्यांचा जन्म झालेला. लहानपणात दारिद्र्याचे चटके बसले. पण सगळे भाऊ कष्ट करीत आयुष्यात मार्गाला लागले. लालजींना गरिबीचे कधी वाईट वाटले नाही. त्यांचा स्वाभिमान कधी ढळला नाही. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांचा राष्ट्रीय विचारांकडे, स्वातंत्र्य चळवळीकडे ओढा होता. माधव लिमये, विनायक ओक, दिगू पानसे, लालजी, -या सर्वांचा एक गट होता. लालजी सेवादलाच्या सुरवातीपासूनच सेवादलात दाखल झाले. ते शास्त्र शाखेचे विद्यार्थी होते आणि त्यांच्या मनात सतत विज्ञाननिष्ठा होती. बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनातून ते सर्व प्रश्नांकडे पहात.
महाराष्ट्र कटाचा खटला
दुसरे महायुद्ध आले- परिस्थितीमुळे लालजींना मिलिटरी अकौंट्समध्ये नोकरी धरावी लागली. पण सरकारी नोकरी करतानाच त्यांचे मन स्वातंत्र्य चळवळीकडे झेपावले. ते शिरूभाऊ लिमयांच्या गटात सामील झाले. गुप्त बैठकांना जाऊ लागले. 1942 ची चळवळ आली. लालजी नोकरी करीत असतानाच भूमिगत चळवळीत सामील झाले. साबोटेजिंगसाठी खडकीच्या अॅम्युनिशन फॅक्टरीतून दारूगोळा लांबवण्याचे काम ज्या गटावर सोपवलेले होते, त्याच्यात लालजींच्यावर मोठीच जबाबदारी होती. हे काम चालू असतानाच धरपकड झाली.
पकडलेल्या सर्व तरुणांना जबर मारहाण करण्यात आली. लालजींनाही खूप 'टॉर्चर' करण्यात आले पण त्यांनी कोणाचे नाव सांगितले नाही. पुढे लालजींना महाराष्ट्र कटाच्या खटल्यातील एक आरोपी करण्यात आले. जवळजवळ साडेतीन वर्षे ते तुरुंगात होते. खूप हाल झाले पण लालजी कधी डगमगले नाहीत.
प्रसिद्धीपराडगमुख कार्यकर्ता
तुरुंगात आजारी कैद्यांची देखभाल करणे हे त्यांचे आवडते काम असे.
याच तुरुंगात असताना एक कानडी तरुण मरण पावला. लालजींनी बाहेर निरोप पाठवून सर्व व्यवस्था केली. पुढे दीड दोन वर्षे त्या राजवंद्याच्या घरी नियमाने मदत जात असे. लालजींनी चळवळीत खूप सोसले. पण आयुष्यात त्याचे प्रदर्शन केले नाही. कधी तोंडाने ते या गोष्टीबद्दल बोललेही नाहीत.
सेवादल आणि लालजी
1946 साली लालजी सुटले आणि राष्ट्रसेवा दलाचं सर्व वेळ काम लागले. त्यावेळी ते व यदुनाथ थत्ते भारत इतिहास संशोधक मंडळाजवळ एका उंच जागेतील खोलीवर रहात. तेथे लालजी सेवादलातल्या मॅट्रिकच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत.
1947 साली लालजींचे व कमलताईंचे लग्न झाले. पोस्टात नोकरी करीत लालजींच्या प्रपंचाची सर्व जबाबदारी कमलताईंनी स्वीकारली. लालजीचे बिर्हाड गणपती चौकात आले. लालजी, त्यांच्या आई व कमलताई यांचा हसतमुखाने संसार चाले. त्या एका खोलीत दिवसभर सेवादलातल्या कार्यकर्त्यांची वर्दळ असे.
पडद्यामागचा सूत्रधार
1954 नंतर लालजी प्रजासमाजवादी पक्षाचे सर्व वेळ काम करू लागले. गोवामुक्ती संग्रामात व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी अविश्रांत काम केले. मजबूत संघटना उभारली. लालजी व्यासपीठावर कधी आले नाहीत पण व्यासपीठावरच्या पुढार्यांनाही त्यांचा वचक असे. गुळमुळीत बोलणे लालजींना कधी जमले नाही. ते रोखठोक बोलत. पण त्या बोलण्यात कडवटपणा नसे. त्यामुळे त्यांचे शब्द कठोर वाटले तरी झोंबत नसत.
प्र. स. पक्ष, पुढे समाजवादी पक्ष यांचे काम करताना लालजींनी ऑफिस चोखपणे सांभाळले. कधी एक पैशाची गफलत नाही. कार्यकर्त्यांचा, विशेषतः तरण कार्यकर्त्यांचा घोळका लालजींभोवती सतत असे. त्यांच्यासमवेत चहा पिणे ही लालजींची एकमेव चैन. पुणे विद्यापीठ कोर्टाचे सदस्य म्हणून लालजींनी तडफेने काम केले.
माझा सखा- सुहृद, मार्गदर्शक
माझ्यासाठी लालजींनी जे केले त्याचे मला शब्दांत वर्णन करता येणार नाही. त्यांच्यामुळेच मी पदवीधर मतदार संघात तीन वेळा निवडणूक जिंकू शकलो. पदवीधर मतदार नोंदण्यापासून, मतदान बरोबर झाले की नाही ते पाहण्यापर्यंत लालजी सर्व काही करीत. कधी त्यांनी रिक्शा घेतली नाही. सायकलचीच पायपीट चालू असे.
आणीबाणीत लालजींनी आम्हा राजवंद्यांना मोठा आधार दिला. ज्या घरातला कर्ता पुरुष जेलमध्ये होता, त्या घरी नियमाने आर्थिक मदत देण्याची व्यवस्था त्यांनी खूप कष्ट घेऊन पार पाडली. आम्हा सगळ्यांच्या घरी जाऊन ते विचारपूस करीत. घरी काही अडचण आली तरी लालजी पहायला होते. म्हणून आम्ही निश्चित होतो.
माझ्या घराची भिंत पडली, त्यावेळी आलेल्या पत्रात माझ्या पत्नीने लिहिले होते, "कसलीही अडचण दूर करायला लालजी आहेत तोपर्यंत तुम्ही घराची काळजी करू नका."
कृतार्थ मी!
अशा लालजींची एकसष्टी आम्ही 1975 च्या जूनमध्ये करणार होतो. पण आणीबाणीत आम्ही सारे जेलमध्ये गेलो. ते तसेच राहून गेले. पण 1979 च्या 13 जानेवारीला नानासाहेब गोरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या आम्ही मित्रांनी अनौपचारिक सत्कार केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मित्र आले. समारंभात लालजी प्रसन्न होते. त्यांच्या मनाला कृतार्थता वाटत होती. आताच लालजी थोडे सुख भोगत होते. मूलगा कर्तबगार आणि प्रेमळ. वहिनी सेवानिवृत्त झालेल्या, सून काळजी घेणारी. नातू मांडीवर खेळणारा. पण लालजींनी हे अल्पकाळच भोगले. सत्काराच्या वेळीच त्यांची प्रकृती बरी नव्हती. पुढे पंधरा दिवसांनी त्यांचा आजार बळवला. जहांगीर नर्सिंग होममध्ये त्यांना ठेवले. उपायांची शर्थ झाली- पण अखेर शरीर थकले आणि लालजींचे 3 एप्रिलला निधन झाले. समाजाचा अज्ञात आधार गेला. आपल्या संस्थेचा आधारस्तंभ गेला. त्यांच्यासारखे अबोल, निष्ठावान जीव विरळा. त्यांच्यासारखे वागणे सोपे नाही. तसे वागण्याचा प्रयत्न करणे हीच त्यांना श्रद्धांजली.
Tags: शिरूभाऊ लिमये साने गुरुजी आणीबाणी राष्ट्र सेवा दल यदुनाथ थत्ते ग. प्र. प्रधान लालजी कुलकर्णी Shirubhau Limaye Sane Guruji Emergency Rashtra Seva Dal Yadunath Thatte G. P. Pradhan Lalji Kulkarni weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या