डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मानवी जीवनाचं चैतन्यपूर्ण दर्शन घडलं

आपल्या रोजनिशीतील हा सर्व भाग वाचताना आपल्या त्या वेळच्या मन:स्थितीची कल्पना येते. आपण मोहाला सतत बळी पडत होतात आणि नंतर मात्र आपले मन पश्चात्तापाने दग्ध होत असे. आपल्या रोजनिशीतून आपण परमेश्वराची प्रार्थना वारंवार करून त्याने आपल्याला सद्‌वर्तनी होण्यासाठी साह्य करावे, याकरिता त्याची करुणा भाकीत होतात, हे कळले. त्या काळच्या रशियातील बहुतेक सर्व श्रीमंत तरुणांप्रमाणे आपण वेश्यागमनही केले होते आणि नंतर दुबळेपणाने मोहाला बळी पडल्याबद्दल आपले मन कमालीचे दु:खीही झाले होते. आपण पैसे लावून पत्ते खेळत असताना नेहमी हरत होतात, तरीही जुगार खेळण्याचा मोह आपल्याला कधी आवरता आला नाही. जुगारात हरल्यामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी आणि त्याच वेळी देशाच्या उपयोगीही पडावे, या भावनेने आपण सेनादलात जायचे ठरवले.

आदरणीय लिओ टॉलस्टॉय,

सादर प्रणाम.

आपणाशी माझी पहिली भेट आपल्या ‘रिसरेक्शन्स’ या लहानशा पुस्तकातून झाली. मी 1940 मध्ये ज्युनिअर बी. ए.च्या वर्गात विद्यार्थी होतो आणि इंग्रजी साहित्य हा माझ्या अभ्यासाचा खास विषय होता. कॉलेजच्या ग्रंथालयातून ‘रिसरेक्शन्स’ तसेच ‘चाइल्डहूड’, ‘ॲडोलेसन्स’, ‘युथ’ अशी एकत्र असलेली आत्मकथनात्मक कादंबरी-त्रयी आणि ‘कोझॅक्स’ ही कादंबरी- अशी आपली पुस्तके मी घेऊन आलो. ‘कोझॅक्स’ वाचण्यापूर्वी आपल्या जीवनाची ओळख करून देणाऱ्या ‘रिसरेक्शन्स’ आणि आत्मकथनपर कादंबरी-त्रयीकडे मी वळलो. आपल्या बालपणीच्या आठवणींत ‘रिसरेक्शन्स’मध्ये आपण आपल्या आईसंबंधी लिहिले आहे की, आपण दीड वर्षाचे असतानाच तिचे निधन झाले आणि घरात तिचा फोटोही नव्हता. आपण ती लिहीत असलेली रोजनिशी आणि तिची काही पत्रे वाचली, तेव्हा त्यांमधून तिची दोन वैशिष्ट्ये व्यक्त झालेली आपल्याला जाणवली.

ती म्हणजे- तिची नम्रता आणि त्याच वेळी, आपण योग्य रीतीने वागत असलो तर कोण काय म्हणतात याकडे लक्ष न देण्याची तिची वृत्ती. आपण लिहिले आहे, ‘माझी आई मला मुळीच आठवत नाही, पण माझ्या मनात आईची एक चैतन्यमय मूर्ती आहे.’ आपल्या वडिलांच्या व्यक्तिचित्रामध्ये आपण त्यांचा शिकारीचा छंद आणि स्वत:च्या शेतीकडे त्यांचे दक्षतेने असलेले लक्ष यांचा उल्लेख केला आहे. मात्र माझ्या आजही लक्षात आहे, ती आपली दूरची आत्या- आपल्या कुटुंबातच राहणारी आणि आपल्याला प्रेमाने वाढविणारी- आँट तातिआना. या आत्याच्या मायेच्या सावलीत आपले बालपण सुखात गेले. आपण आपल्या आठवणींमध्ये लिहिले आहे, ‘माझ्यावर तातिआनाआत्याचा फार प्रभाव होता. तिने शब्दांनी कधी मला उपदेश केला नाही, शिकवले नाही; पण तिच्या व्यक्तिमत्त्वातूनच, इतरांवर प्रेम करण्यात आत्मिक आनंद मिळतो, हे मी शिकलो. त्याचबरोबर शांतपणे, संथ लयीत जगण्यातला आगळा आनंद हा मला तातिआनाआत्यामुळेच उमगला.’

आपल्या लहानपणी रशियामध्ये काही अर्धवट चक्रम बैरागी साधू- एका पवित्र ठिकाणाहून दुसऱ्या पवित्र क्षेत्राकडे असे हिंडत असत आणि असे अनेक जण आपण राहत असलेल्या यास्नाया पोल्यानातील आपल्या घरीही येत असत. आपण आपल्या आठवणींमध्ये लिहिले आहे की, तातिआनाआत्या त्यांना प्रेमाने आणि आदराने वागवीत असे. याचाही परिणाम आपल्यावर झाला. या बैराग्यांची सुखी जीवनाबद्दलची अनास्था पाहून आपल्याला आश्चर्य वाटे आणि त्यांच्याबद्दल आदरही वाटत असे. त्याचप्रमाणे आपल्या माळ्याच्या हाताखाली काम करणारा अकिम प्रार्थना म्हणत असताना आपण ती एकदा ऐकली आणि आपण स्तिमित झाला होतात. तो अर्धवट माणूस परमेश्वराला उद्देशून ‘तूच माझा त्राता आहेस’ असे जणू जिवंत माणसाशी बोलावे, अशा आर्ततेने ती प्रार्थना म्हणत होता. एरवी वेडाबागडा दिसणारा अकिम देवाशी बोलत असताना गंभीर-प्रगल्भ माणूस दिसत होता, असे आपण लिहिले आहे.

प्रार्थनेत एक आगळी शक्ती आहे, असा विचार त्या वेळी आपल्या मनात चमकून गेला. आपले तीन भाऊ- निकोलस, दिमित्री आणि सर्जी- या सर्वांमध्ये सर्जीबद्दल आपल्याला एक उत्कट अनामिक ओढ वाटत असे आणि त्याचे अनेक बाबतींत अनुकरण करावे, असेही वाटे. एकूणच, एका सधन जमीनदार कुटुंबात वाढत असताना आपले बालपण सुखात गेले. ‘चाइल्डहूड’ या आत्मकथनात्मक कादंबरीत आपण लिहिले आहे, ‘बालपणातील तो मुक्त आनंद, ती निरागस वृत्ती आयुष्यात परत कधी तरी येईल का? शैशवात जसा निर्मळ आनंद असतो, त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यांचे प्रेम मिळावे, असेही वाटत असते. लहानपणी आपल्या कोमल अंत:करणामुळे अनेकदा जे अश्रू येतात, त्यांच्याइतके सुंदर दुसरे काही असू शकेल का?’

आपल्या आत्मकथनात्मक कादंबरीतील ‘ॲडोलेसन्स’ ही दुसरी कादंबरीही मला फार आवडली होती. वाढत्या वयात घोडागाडीत बसून आपण जो पहिला- काहीसा दूरचा प्रवास केला, त्या प्रवासात आपल्याला मिळालेल्या आनंदाचे वर्णन मला अद्यापही आठवते. जंगलातून जाताना झाडांच्या पूर्वी न अनुभवलेल्या वासामुळे, वाऱ्यावर डोलणाऱ्या वनवासी फुलांमुळे निसर्गातील रूप व गंध यांचा स्पर्श आपल्या मनाला कसा झाला आणि आपल्या चित्तवृत्ती कशा उल्हसित झाल्या, यांचे वर्णन बहारीचे आहे. आपल्या तेरा-चौदाव्या वर्षी एकदा घरात काम करणाऱ्या बाईची उघडी मान पाहून आपल्याला स्त्रीच्या शरीराबद्दल वाटलेल्या आकर्षणामुळे आपले मन एकदम बावरून कसे गेले, ते आपण प्रांजळपणे लिहिले आहे. त्या वयातील भावा-भावांतील भांडणे, धुसफूस, अबोले आणि सहज परत होणारी दिलजमाई या साध्यासुध्या गोष्टींचे वर्णन करताना आपण पौगंडावस्थेतील मुलांच्या मनाची सहजसुंदर ओळख करून दिली आहे.

आपण ‘ॲडोलेसन्स’मध्ये आणि ‘रिसरेक्शन्स’मध्येही एका गोष्टीचा उल्लेख केला आहे. तो म्हणजे- आपण कुरूप आहोत, आपले नाक बसके आहे; या जाणिवेमुळे आपल्याला होणारे तीव्र दु:ख आणि त्यामुळे आपल्या देखण्या भावाचा आपल्याला वाटणारा हेवा. आपली कोणी थोडी जरी स्तुती केली तरी या कुरूपपणामुळे खंतावणाऱ्या आपल्या मनाला  कसा आनंद होत असे, हेही आपण लिहिले आहे. या सर्वांमधून पौगंडावस्थेतील मुलाच्या शरीरातील आणि मनातील सूक्ष्म बदलांचे जे वर्णन ‘ॲडोलेसन्स’मध्ये आपण केले आहे, ते अठरा-एकोणिसाव्या वर्षी वाचताना पाच-सहा वर्षांपूर्वी मी अगदी असाच होतो, हे आठवून मी आपल्या आत्मकथनावर एकदम लुब्ध झालो. मात्र या कादंबरी-त्रयीतील ‘युथ’ ही तिसरी कादंबरी आज मला आठवतही नाही.

‘रिसरेक्शन्स’मध्येही आपण आपल्या महाविद्यालयीन जीवनाबद्दल अगदी त्रोटकपणे लिहिले आहे. मॉस्को विद्यापीठात आपण शिकत होतात; परंतु तेथील शिक्षणात आपले मन रमले नाही, असे आपण लिहिले आहे. आपण ज्ञानोत्सुक होतात आणि आपण विविध विषयांवरील ग्रंथ वाचले, काही पौर्वात्य भाषांचा अभ्यासही केलात. आपण कायद्याच्या अभ्यासास सुरुवात केली; परंतु विद्यापीठात जे शिकवले जात होते, त्यात आपल्याला रस वाटेना. त्यामुळे कसलीही पदवी न घेताच आपण विद्यापीठ सोडले. अवांतर वाचन करतानाच आपण गॉस्पेल्समधील ‘सरमन ऑन दि माऊंट’ वाचले. रूसोचे ‘कन्फेशन्स’ हे आत्मकथनपर पुस्तक आणि ‘एमिली’ हे पुस्तक, तसेच डिकन्सची ‘डेव्हिड कॉपरफील्ड’ ही कादंबरी, गोगोल व पुष्किन या नामवंत रशियन लेखकांचे साहित्य आपण वाचलेत. रूसोचे साहित्य वाचून काही काळ आपण त्यांचे भक्तच बनला होतात, असे ‘रिसरेक्शन्स’मध्ये आपण लिहिले आहे. आपण मॉस्को विद्यापीठात शिकत असताना आपल्या रोजनिशीत जे लिहिले आहे, त्यावरून आपल्या तरुणपणातील जीवनक्रमाची कल्पना येते.

ज्या वेळी 1847 मध्ये आपण विद्यापीठ सोडले, त्या वेळी काही दिवस आजारी असताना आपण कझान येथील हॉस्पिटलमध्ये होतात. तेथील वास्तव्यात आपल्या रोजनिशीत आपण असे लिहिले आहे की- त्या ठिकाणी एकटे असताना विचार करता-करता आपल्याला ही जाणीव झाली की, मॉस्कोमध्ये उच्चभ्रू समाजात वावरत असताना आपल्या हातून जे प्रमाद घडले, ते केवळ तरुण वयातील मोहवशतेमुळे केलेले नव्हते; तर वस्तुत: आपल्या मनाचा जो नैतिक अध:पात झाला होता, त्यामुळे ते सारे घडले होते. आपल्या रोजनिशीत त्याच वेळी आपण लिहिले आहे की, जीवनाचा- केवळ व्यक्तीच्या जीवनाचा नव्हे- सर्वांगीण परिपूर्ण विकास व्हावा, यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट ठेवून जगले पाहिजे. आपण रोजनिशीत स्वत: पाळावयाचे काही नियमही लिहिले आहेत. मात्र त्या नियमांप्रमाणे आचरण करणे आपल्याला किती जमू शकले, हे मात्र लिहिले नाही.

आपल्या रोजनिशीतील हा सर्व भाग वाचताना आपल्या त्या वेळच्या मन:स्थितीची कल्पना येते. आपण मोहाला सतत बळी पडत होतात आणि नंतर मात्र आपले मन पश्चात्तापाने दग्ध होत असे. आपल्या रोजनिशीतून आपण परमेश्वराची प्रार्थना वारंवार करून त्याने आपल्याला सद्‌वर्तनी होण्यासाठी साह्य करावे, याकरिता त्याची करुणा भाकीत होतात, हे कळले. त्या काळच्या रशियातील बहुतेक सर्व श्रीमंत तरुणांप्रमाणे आपण वेश्यागमनही केले होते आणि नंतर दुबळेपणाने मोहाला बळी पडल्याबद्दल आपले मन कमालीचे दु:खीही झाले होते. आपण पैसे लावून पत्ते खेळत असताना नेहमी हरत होतात, तरीही जुगार खेळण्याचा मोह आपल्याला कधी आवरता आला नाही. जुगारात हरल्यामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी आणि त्याच वेळी देशाच्या उपयोगीही पडावे, या भावनेने आपण सेनादलात जायचे ठरवले. त्या निर्णयानुसार सेनेत दाखल झाल्यानंतर सैन्यात अधिकारी असलेले आपले थोरले बंधू निकोलस यांच्यासमवेत 1851 च्या मे महिन्यात, वयाच्या तेविसाव्या वर्षी आपण कॉकेशसकडे प्रयाण केले.

कॉकेशसमधील आपल्या अनुभवावर आधारलेली ‘कोझॅक्स’ ही कादंबरी मी प्रथम वाचली, तेव्हा आदिम जीवनातील जीवघेणा संघर्ष आणि काव्यात्मता यांचा आगळा मिलाफ असलेल्या त्या कादंबरीमुळे मी भारावून गेलो होतो. अलीकडेच ‘कोझॅक्स’ पुन्हा वाचतानाही माझे मन आपल्या ललित लेखनावर आणि त्यातील मानवी जीवनाच्या चैतन्यपूर्ण दर्शनावर पूर्वीसारखेच लोभावून गेले. कॉकेशस पर्वताच्या परिसरात राहताना आपल्याला तेथील लोकांच्या जीवनाचे जे दर्शन घडले, त्याचे चित्रण ‘कोझॅक्स’मध्ये आपण केले आहे. ‘कोझॅक्स’चा नायक ओलेनिन हा आपणासारखाच श्रीमंत जमीनदार कुटुंबातला आहे. त्यानेही मॉस्कोतील धनिक-फॅशनेबल समाजात ख्याली-खुशालीत अनेक दिवस घालवले आहेत. आपणाप्रमाणेच ओलेनिनही अभ्यासक्रम सोडून सेनेत दाखल झाला होता आणि कॉकेशसकडे निघालेला होता.

ओलेनिन प्रवासात मॉस्कोपासून जसजसा दूर जात होता, तसतसे त्याचे मन जुन्या पाशांतून मुक्त होत होते आणि एक अननुभूत अशा चैतन्याचा स्पर्श त्याच्या मनाला होऊ लागला होता. त्याच्या घोडागाडीच्या तार्तर ड्रायव्हरने ज्या वेळी त्याला ‘आता आपण कॉकेशस पर्वताजवळ आलो’ असे सांगितले, त्या वेळी ओलेनिनने मोठ्या उत्सुकतेने आकाशाकडे पाहिले; परंतु त्या संध्याकाळच्या वेळी त्याला सगळीकडे केवळ ढग पसरलेले दिसले. दुसऱ्या दिवशी प्रात:काळी सूर्यकिरणांनी न्हालेली उत्तुंग हिमशिखरे त्याला दिसली, तेव्हा तो मंत्रमुग्ध होऊन त्यांच्याकडे एकसारखा पाहतच राहिला. घोड्यावर बसून जाणारे दोन कोझॅक तरुण त्याला दिसले. टेरेक नदीला वळसा घालून ओलेनिनची गाडी जात होती. बरेच अंतर ओलांडल्यावर तो नोव्होम्लिन्स्क या गावात थांबला. त्याच्या पलटणीच्या मुख्यालयाने त्याची तिथे राहण्याची व्यवस्था केली होती. या लहानशा कादंबरीत आपण कोझॅक्स लोकांच्या जीवनाचे केलेले वास्तव वर्णन चित्तवेधक आहे, परंतु त्यापेक्षा मला आवडले ते ओलेनिनच्या मनोभावनांचे आपण केलेले चित्रण.

कॉकेशस पर्वताच्या कुशीत वसलेल्या त्या गावात राहताना ओलेनिन त्याच्या पूर्वायुष्याचा कधी-कधी विचार करतो आणि तथाकथित सुधारलेल्या जगापासून दूर आल्यावर त्याच्या मनाला एक अनामिक शांतता का व कशी लाभली, हे त्याला उमगत नाही. इतरांवर प्रेम केल्यामुळेच खरे सुख मिळू शकेल, हाही विचार एकदा त्याच्या मनात येतो आणि हे सत्य नव्याने गवसल्यामुळे त्याचे मन प्रफुल्लित होते. ओलेनिनला त्याच्या पलटणीत नियमाने करावयाचे असे कोठलेच काम नसल्यामुळे तो शांतपणे त्या लहानशा गावात राहत असतो. या कादंबरीचे कथानक लुकाष्का हा साहसी कोझॅक तरुण- ज्यांच्या घरात ओलेनिन राहत होता- त्याची तरुण मुलगी, लुकाष्काची वाग्दत्त वधू मारिआंका आणि ओलेनिन या तिघांभोवती आपण सहजतेने गुंफलेले आहे. त्या भागातील शिकारीचे आणि कोझॅक तरुणांचे टेरेक नदीपलीकडच्या भागात राहणाऱ्या लोकांशी होणाऱ्या जीवघेण्या संघर्षाचे आपण वर्णन केले आहे. त्याचबरोबर शेतात व घरातही सारख्या कष्ट करणाऱ्या आणि द्राक्षांचे मळे पिकवून द्राक्षांची दारू बनवणाऱ्या कोझॅक स्त्रियांच्या कणखर जीवनाचेही वास्तव दर्शन आपण त्या कादंबरीत घडविले आहे.

मॉस्कोच्या कृत्रिम सुखलोलुप समाजात लहानपणीची काही वर्षे घालवलेल्या ओलेनिनला, कॉकेशसच्या परिसरातील राकट निसर्गाचाच एक भाग बनलेल्या कोझॅक लोकांच्या जीवनात चैतन्य झुळूझुळू वाहत आहे, असे वाटते. ओेलेनिन सुरुवातीस मारिआंकाकडे ग्रीक शिल्पाचे सौंदर्य असलेली कोझॅक तरुणी म्हणून तटस्थपणे पाहतो, पण नंतर तिच्याबद्दलच्या वाढत्या आकर्षणामुळे तो तिच्या प्रेमात पडतो; तेव्हा ओलेनिनला त्याच्या आयुष्यात निर्मळ प्रेमभावनेचा प्रथमच खराखुरा प्रत्यय येतो. अल्पकाल प्रेमाची ही सफलता तो अनुभवीत असतानाच लुकाष्काच्या मृत्यूनंतर मारिआंकाच्या मनातील ओलेनिनबद्दलची प्रेमभावना लुप्त होऊन तिला त्याच्याबद्दल तीव्र दुरावा वाटू लागतो. तो तिने एका तुटक वाक्यात व्यक्त करताच, ‘आपण या भूमीत उपरे आहोत’ ही जाणीव होऊन ओलेनिन ते गाव सोडून त्याच्या पलटणीकडे निघून जातो. आज ही कादंबरी वाचताना आपल्या कादंबरीतील प्रेमाच्या त्रिकोणापेक्षा कॉकेशसमधील कोझॅक लोकांच्या आदिम जीवनाचे आपण जे चैतन्यपूर्ण दर्शन घडवले आहे, त्याच्यामुळेच वाचक म्हणून आपणाशी माझे नाते कायमचे जोडले गेले.

आपला नम्र, 
ग. प्र. प्रधान
 

(2006 मध्ये ग. प्र. प्रधान यांनी टॉलस्टॉय यांना लिहिलेली 16 पत्रे साप्ताहिक सकाळमधून प्रसिद्ध झाली, नंतर त्यांचे पुस्तक ‘टॉलस्टॉयशी पत्रसंवाद’ या नावाने साधना प्रकाशनाकडून आले. त्यातील हे दुसरे पत्र.)

Tags: leo tolstoy प्रधान जन्मशताब्दी प्रारंभ ग. प्र. प्रधान weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके