डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

क्रांतिकारकांचे मेरूमणी शहीद भगतसिंह यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या विचारांवर आणि व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्याबरोबर हुतात्मे झालेल्या क्रांतिकारकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे आणि समता व सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या पुरोगामी चळवळींमधील तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे साहित्य...

भगतसिंहांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी झाला. 8 एप्रिल 1929 ला त्यांनी आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदामंडळाच्या इमारतीत बाँब फेकल्यानंतर त्यांना अटक झाली.लाहोर कटाच्या खटल्यामध्ये त्यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आले. म्हणजे उणेपुरे चोवीस वर्षांचेही आयुष्य त्यांना लाभले नाही. त्यात दोन वर्षे ते तुरुंगातच होते. म्हणजे त्यांना समजू लागल्यापासून अवघे दहा-अकरा वर्षांचे आयुष्य त्यांना मिळाले. त्या अल्प काळात त्यांनी केलेले प्रचंड क्रांतिकार्य आणि त्याचबरोबर त्यांनी केलेले वाचन आणि चिंतन यांचा प्रचंड आवाका पाहून माझे मन स्तिमित झाले. 2007 हे शहीद भगतसिंह यांचे जन्मशताब्दी वर्ष.

त्यांनी लिहिलेले 74 दस्तऐवजांचे समग्र वाङ्मय प्रा.चमनलाल यांनी संपादित केले आणि 2004 मध्ये ‘भगतसिंह के संपूर्ण दस्तावेज’हा लेखसंग्रह प्रसिद्ध झाला. या मूळ संग्रहामध्ये काही लेख व पत्रे समाविष्ट करून एकूण 70 दस्तऐवजांचा मराठी अनुवाद बारा अभ्यासकांनी केला. त्यातील 10 दस्तऐवजांचा मराठी अनुवाद चित्रा बेडेकर यांनी पूर्वीच केला होता. भगतसिंहाच्या या सर्व अनुवादित साहित्याचे संपादन करण्याचे काम शहीद भगतसिंह जन्मशताब्दी समितीने श्री.दत्ता देसाई यांच्यावर सोपविले आणि त्यांनी ते समर्थपणे केले. भगतसिंहाचे मराठीतील हे सर्व साहित्य महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने करावयास पाहिजे होते. त्यांनी ते केले नाही याचा मला फार खेद वाटतो, संतापही येतो. डायमंड पब्लिकेशनने हे काम स्वीकारून ‘शहीद भगत सिंह- समग्र वाङ्मय’ (लेख व दस्तऐवज) प्रकाशित केले याबद्दल मी त्यांना मन:पूर्वक धन्यवाद देतो. या ग्रंथाला न्या.पी.बी.सावंत यांनी विस्तृत व अत्यंत मार्मिक प्रस्तावना लिहिली आहे, याबद्दल मी त्यांनाही मनःपूर्वक धन्यवाद देतो.

भगतसिंहाच्या या लेख-संग्रहातील ‘क्रांतिकारी राजकीय विचार’हा बारा लेखांचा व दस्तऐवजांचा संग्रह, ‘धर्म, जात आणि राजकारण’या विभागातील चार लेख ‘आणि आंतरराष्ट्रीय विचार’मधील सहा लेख हे अत्यंत मौलिक आहेत. ‘धर्म जात वराजकारण’यामधील ‘मी नास्तिक का आहे’हा लेख भगतसिंहांचा जीवनविषयक दृष्टिकोन मांडणारा आहे. या लेखातील केवळ काही वाक्येच मी उद्धृत करतो...

1.“तुमच्या श्रद्धेनुसार हे विश्व सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अशा विधात्याने निर्माण केले असेल तर... दैन्य आणि यातनांनी भरलेले हे जग, लाखो शोकांतिकांची ही चिरंतन गुंफण, ज्यात एकही प्राणिमात्र सर्वार्थाने समाधानी नाही, हे सर्व त्याने का निर्माण केले?”

2.“आमचा निसर्गावर विश्वास आहे आणि संबंध पुरोगामी चळवळीची दिशाही आपल्या सेवेसाठी राबविण्यासाठी निसर्ग काबूत आणण्याकडे वळवली पाहिजे. या सर्व सृष्टीला चालविणारी एखादी चैतन्यमय शक्ती तिच्यामागे नाही, हे आमचे तत्त्वज्ञान आहे.”

3.“जेव्हा एखादा माणूस पाप किंवा गुन्हा करतो तेव्हा अशा माणसाला तो तुमचा सर्वशक्तिमान ईश्वर, त्यापासून परावृत्त का करीत नाही? युद्ध पेटवणाऱ्या सत्ताधीशांना त्याने ठार का केले नाही किंवा त्यांच्यातील युद्धाची ऊर्मी का गाडली नाही?”

धर्म, जात आणि राजकारण या विषयांवर भगतसिंहांनी विपुल वाचन आणि मूलभूत चिंतन केले होते. त्यांनी टॉलस्टॉय यांच्या लेखनाच्या आधारे सर्व धर्मातील सारतत्त्वे एक आहेत, हा मुद्दा मांडला असून धर्मातील रीतिरिवाजांतील अंधविश्वास कसा घातक आहे ते सांगितले आहे.

‘क्रांतिकारी कार्यक्रमाचा मसुदा’हा दस्तऐवज फार मौलिक आहे. हा दस्तऐवज आणि भगतसिंहांनी लिहिलेले ‘युवा राजकीय कार्यकर्त्यांना पत्र’आजच्या कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शक ठरतील,

भगतसिंहांनी आंतरराष्ट्रीय क्रांतिकारी चळवळींचा आणि या चळवळींचे अधिष्ठान असलेल्या मूलभूत विचारांचा किती काळजीपूर्वक व सूक्ष्म अभ्यास केला होता याची कल्पना ‘किरती’या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी अराज्यवादावर लिहिलेल्या तीन लेखांवरून येऊ शकेल. ते लिहितात, “खरे पाहता अराज्यवादी हे सर्वांपेक्षा जास्त संवेदनशील, ध्येयवेडे, साऱ्या जगाचे कल्याण इच्छिणारे असतात. त्यांच्या विचारांशी मतभेद राखूनही त्यांचे गांभीर्य, जनतेबाबत त्यांची आस्था, त्यांचा त्याग, त्यांची सचोटी अशा गोष्टींबाबत कोणतीही शंका असू शकत नाही.”

भगतसिंहांनी फ्रेंच तत्त्ववेत्ता प्रुधाँ याच्या विचारांचा आशय सांगून पुढे लिहिले आहे ‘अराज्यवाद’ ज्या आदर्श स्वातंत्र्याची कल्पना करतो ते आहे संपूर्ण स्वातंत्र्य. अराज्यवादी पुढील तीन गोष्टी या जगातून नाहीशा करण्याची इच्छा बाळगतो -
1. चर्च, ईश्वर आणि धर्म...
2. राज्यसंस्था (सरकार)...
3. खाजगी मालमत्ता...
भगतसिंहांनी प्रिन्स क्रोपोटकिन यांच्या विचारांचे अत्यंत मार्मिक विवेचन केले आहे.

भगतसिंह यांनी स्वत: चौफेर वाचन केले आणि लिहिले; ‘चिकित्सकपणा आणि स्वतंत्र विचारशक्ती हे दोन गुण क्रांतिकारकांसाठी अपरिहार्य आहेत... भारतीय क्रांतीचे बौद्धिक अंग हे कमकुवत राहिले आहे. यासाठीच क्रांतिकारकाने अभ्यास व चिंतन-मनन ही आपली पवित्र जबाबदारी मानली पाहिजे.’

भगतसिंह हे ज्याप्रमाणे क्रियावान क्रांतिकारक होते, त्याचप्रमाणे त्यांनी प्रचंड ज्ञानसाधनाही केली आणि म्हणूनच ते चिकित्सक आणि डोळस क्रियावान कार्यकर्ते झाले. या ग्रंथातील नववा विभाग ‘क्रांतिकारी चिंतन व अभ्यास एका हुतात्म्याची नोंदवही’असा आहे. भगतसिंहांनी तुरुंगात केलेली ही टिपणे वाचताना, त्यांचा बौद्धिक आवाका किती मोठा होता याची कल्पना येते. चार्लस् डिकन्स, अप्टन सिंक्लेर, बर्नार्ड शॉ, टुर्जेनेव्ह आदी लेखकांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. बर्नार्ड शॉ यांच्या ‘मॅन अँड सुपरमॅन’, मेजर बार्बारा या नाटकांच्या प्रस्तावनेतील महत्त्वाचे विचार भगतसिंग यांनी नोंदवले आहेत.टुर्जेनेव्ह यांचे निहिलीझमवरचे विचार या टिपणांमध्ये आहेत.

‘एका हुतात्म्याची नोंदवही’यामध्ये एंगल्स यांच्या ‘सोशलिझम, सायन्टिफिक अॅण्ड युरोपियन’आणि ‘ओरिजिन ऑफ दि फॅमिली’या ग्रंथांतील महत्त्वाच्या विचारांची नोंद आहे. ‘राइट्स ऑफ मॅन’लिहिणाऱ्या थॉमस पेन यांचेही विचार येथे आहेत. ‘भूक, नैतिकता, मुक्ती, शिकागोचे हुतात्मे’ फ्रान्सिस्को फेररने लिहिलेले ‘क्रांतिकारकाचे मृत्युपत्र’स्कॉट निअरिंगचा ‘माणूस यंत्रासाठी नाही’ हा विचार, कार्ल-मार्क्सने लिहिलेल्या ‘कम्युनिस्ट जाहीरनाम्यातील’मूलभूत विचार, आदी टिपणे वाचून मी स्तिमित झालो.

भगतसिंहांनी आयरिश क्रांतिकारक डॅन ब्रीन यांच्या ‘माय फाइट फॉर आयरिश फ्रीडम’या आत्मकथेचा हिंदी अनुवाद केला होता.त्याचा समावेश या ग्रंथामध्ये केल्यामुळे या ग्रंथाला एक आगळी मौलिकता आलेली आहे.

निकटच्या व्यक्तीला लिहिलेल्या पत्रांमधून व्यक्तीच्या मनाचा आविष्कार होतो. भगतसिंहांची जी पत्रे या संग्रहात आहेत, त्यापैकी कुलबीर या त्यांच्या धाकट्या भावाला त्यांनी लिहिलेले शेवटचे पत्र वाचल्यावर भगतसिंहाचे धीरोदात्त मन आणि त्यांच्या कोमल भावना यांचा आगळा संगम पाहून माझे मन हेलावून गेले.

भगतसिंहाच्या प्रत्येक कृतीला पुरोगामी विचारांचे अधिष्ठान होते. ते कृतिशील विचारवंत आणि क्रांतिकारकांचे मेरूमणी होते.त्यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वावर प्रकाशझोत टाकणारा हा लेखसंग्रह म्हणजे स्फूर्तीचा अखंड वाहणारा झरा आहे. भारतातील तरुणींना आणि तरुणांना तो अक्षय प्रेरणादायी ठरेल.

शहीद भगतसिंह : समग्र वाङ्मय
संपादक : दत्ता देसाई 
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन, पुणे 
मूल्य : 350/- रुपये 

स्मरणचित्रे : क्रांतिकारी शहीदांची

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात जे हुतात्मे झाले त्यांच्यातील अग्रणी शहीद भगतसिंह आणि त्यांचे सहकारी यांच्या जीवनासंबंधी क्रांतिकार्यातील त्यांचे सहकारी शिव वर्मा यांनी लिहिलेल्या ‘संस्मृतिया’या पुस्तकाचा चित्रा बेडेकर यांनी केलेला ‘स्मरणचित्रे- क्रांतिकारी शहीदांची’हा अनुवाद अलीकडेच माझ्या वाचनात आला. त्यानंतर शहीद भगतसिंह- समग्र वाङ्मय' हे पुस्तक मी वाचले. ही दोनही पुस्तके वाचताना स्वातंत्र्यपूर्व काळात कॉलेज-विद्यार्थी असताना लाहोर कटाच्या खटल्यावरील एक प्रक्षिप्त पुस्तक शिरुभाऊ लिमये यांच्या खोलीवर वाचले होते, त्यावेळी मन कसे थरारून गेले होते याची आठवण झाली. १९४५ साली ‘भगतसिंह दि प्रिन्स अमंग मार्टिर्स’हे जोएकिम अल्वा यांनी प्रसिद्ध केलेले पुस्तक वाचले होते, तेव्हाही या थोर क्रांतिकारकाच्या स्फूर्तिदायी जीवनाची व हौतात्म्याची उदात्तताजाणवून मी नतमस्तक झालो होतो. शिव वर्मा यांनी लिहिलेले पुस्तक आणि शहीद भगतसिंह जन्मशताब्दी समितीने प्रसिद्ध केलेले त्यांचे वाङ्मय, ही तरुण कार्यकर्त्यांना अक्षय प्रेरणा देणारी पुस्तके आहेत, त्यांचा अल्पसा परिचय या लेखात मी करून देणार आहे.

१९२० साली म.गांधींनी असहकाराचे देशव्यापी आंदोलन सुरू केले, तेव्हा देशभर चैतन्याची लाट उसळली. परंतु चौरिचोरा येथील एका हिंसक घटनेनंतर गांधीजींनी हे आंदोलन मागे घेतले, त्यावेळी अनेक तरुणांचा तेजोभंग झाला आणि ते सशस्त्र क्रांतीच्या मार्गाकडे वळले. भगतसिंह, चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे सहकारी यांनी एकत्र येऊन क्रांतिकारकांची ‘हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोशिएशन’ही संघटना १९२८ साली स्थापन केली. उत्तर प्रदेशातील हरडोई जिल्ह्यातील शिव वर्मा हे या संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते आणि या संघटनेच्या पहिल्या केंद्रीय समितीवर त्यांची निवड झाली होती. 

शिव वर्मा यांनी वयाच्या सतराव्या वर्षी असहकार आंदोलनात उडी घेतली आणि आंदोलन मागे घेतल्यावर शिव वर्मा सशस्त्र क्रांतीच्या मार्गाकडे वळले. १९२९-३० सालातील लाहोर कटाच्या खटल्यात भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली. इतर काही जणांबरोबर शिव वर्मांना जन्मठेपेची शिक्षा झाली. शिव वर्मा यांनी १६ वर्षे अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये कारावासातील भीषणहालअपेष्टा सहन केल्या. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोशिएशनमध्ये असतानाच त्यांची मार्क्सच्या विचारांशी ओळख झाली होती. तुरुंगात त्यांनी विपुल वाचन केले आणि ते मार्क्सवादी बनले. सुटून आल्यानंतर शिव वर्मा हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्य करू लागले. त्यांनी हिंदीमध्ये माओचे चरित्र आणि ‘मार्क्सवाद परिचय माला’ लिहिली. १९८६ मध्ये त्यांनी ‘शहीद भगतसिंह यांचे निवडक लेखन’या मूळ इंग्रजी पुस्तकाचे संपादन केले. त्यांनी अखेरपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्य केले. शिव वर्मा यांनी ‘सस्मृतिया’ या पुस्तकात भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव, महावीरसिंग, यतींद्रनाथ दास आणि भगवतीचरण वोहरा या त्यांच्या सात क्रांतिकारक सहकाऱ्यांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. 

या पुस्तकाच्या सुरुवातीस शिव वर्मा यांनी लिहिलेले मनोगत अत्यंत हृदयस्पर्शी आहे. त्यांनी लिहिले आहे, “भगतसिंह, आझाद वगैरे साथीदारांनी ज्या ध्येयासाठी आपल्या जीवनाचे बलिदान केले होते, त्याचा केवळ पहिला टप्पा आपण पार करू शकलो आहोत. आपण स्वातंत्र्य मिळवले आहे परंतु शोषण, गरिबी, विषमतेचा शाप अजूनही शिल्लक आहे. समाजवादापासून तर आपण निश्चितच मागे हटलो आहोत. अशा परिस्थितीत, राष्ट्रीय सुरक्षितता, राष्ट्राची पुनर्बांधणी, समाजवाद आणि श्रेणीविरहित समाज स्थापन करण्याच्या संघर्षात आपल्या युवकांना ही रेखाचित्रे थोडी प्रेरणा देऊ शकली... तर त्यातच या रेखाचित्रांची सार्थकता आहे.’

भगतसिंहांचे शिव वर्मा यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्र अविस्मरणीय आहे. भगतसिंहांनी केलेले चौफेर वाचन, त्यांचे ध्येयधुंद जीवन, त्यांची सुस्पष्ट वैचारिक भूमिका, त्यांचे संघटनाकौशल्य आणि त्यांची समर्पण वृत्ती-सर्व पैलूंच्यावर शिव वर्मा यांनी प्रकाश टाकला आहे.भगतसिंहांच्या खोडकर, थट्टामस्करी स्वभावाचीही झलक शिव वर्माच्या लेखनातून व्यक्त झाली आहे. संघटनेच्या दिल्लीच्या बैठकीत भगतसिंहांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार संघटनेचे पूर्वीचे नाव बदलून ‘हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक संघ’ (हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोशिएशन) असे नामकरण करण्यात आले. दिल्लीच्या असेंब्ली भवनात भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी बाँब फेकला त्या प्रसंगाचे शिव वर्मा यांनी केलेले वर्णन चित्तथरारक आहे. लाहोर कटाचा खटला चालू असताना सर्व राजबंद्यांनी केलेल्या उपोषणाचीही शिव वर्मा यांनी साद्यंत हकिगत सांगितली आहे.भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.भगतसिंहांच्या आयुष्याचा अखेरचा क्षण जवळ आला असताना त्यांनी सरकारच्या नावे लिहिलेल्या एका पत्रात म्हटले होते...

“लवकरच अंतिम संघर्ष सुरू झाल्याची दुदुंभी वाजेल...साम्राज्यवाद आणि भांडवलशाही यांच्या विरोधातील युद्धात भाग घेतला याचा आम्हाला अभिमान आहे.”

चंद्रशेखर आझाद यांच्या शौर्याचे आणि अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी लढत स्वीकारलेल्या हौतात्म्याचे शिव वर्मा यांनी केलेले वर्णन रोमहर्षक आहे.

राजगुरूंचे सुरुवातीचे खडतर जीवन, त्यांचा अवखळ स्वभाव, त्यांना न आवरता येणारी झोप, त्यांची अचूक नेमबाजी, फाशीचीशिक्षा झाल्यानंतर त्यांच्या स्वभावात आलेले गांभीर्य आणि ‘मृत्यू हे क्रांतिकारकांनी स्वतःच मागून घेतलेले वरदान आहे’हे त्यांचे शब्द- या सर्वातून राजगुरूंची वास्तव आणि विलोभनीय प्रतिमा शिव वर्मांनी साकार केली आहे.

सुखदेव यांच्या व्यक्तीचित्राच्या अखेरच्या परिच्छेदात शिव वर्मा यांनी लिहिले आहे; ‘असा होता सुखदेव-फुलापेक्षा कोमल आणि दगडांहून कठीण. भीती कधी त्याच्याजवळ फिरकली नाही... लोकांनी त्याची फक्त कठोरता पाहिली... परंतु आपल्या कोमल भावनांना, प्रेम आणि ममत्वाला स्वत:ची व्यक्तिगत ठेव समजून अखेरपर्यंत या गोष्टी त्याने आतच दडवून ठेवल्या.’

वेताने मारलेल्या तीस फटक्यांची अमानुष शिक्षा भोगताना ‘इन्किलाब जिंदाबाद’ही घोषणा करणाऱ्या, आणि शिक्षा भोगल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतही उन्नत माथ्याने कोठडीकडे जाणाऱ्या महावीर सिंगांच्या छोट्याशा व्यक्तिचित्रातून शिव वर्मा यांनी त्या तरुण क्रांतिकारकाला वाचकांसमोर साक्षात् उभे केले आहे.

राजबंद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीविरुद्ध लाहोर कटाच्या खटल्यातील क्रांतिकारक आरोपींनी जे उपोषण केले ते एक अग्निदिव्य होते. ते अग्निदिव्य करताना, पोटात थैमान घालणाऱ्या क्रुद्ध भुकेला न जुमानता यतींद्रनाथ दास यांनी कणाकणाने मृत्यूकडे सरकण्याच्या केलेल्या प्रवासाचे आणि ६३व्या दिवशी मृत्यूला शांतपणे स्वीकारण्याचे जे वर्णन शिव वर्मा यांनी केले आहे, ते वाचताना या मृत्युंजय क्रांतिकारकांनी त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या क्षणीही केलेला क्रांतीचा जयजयकार आपल्या मनात घुमत राहतो.

क्रांतिकारकांचेही काही वेळा परस्परांशी मतभेद होत, परस्परांबद्दल गैरसमजही होत. अशा गैरसमजाची झळ भगवतीचरण वोहरा यांना सोसावी लागली, परंतु ते त्यांच्या ध्येयापासून अविचल राहिले आणि गैरसमजाच्या वादळाला त्यांनी शांतपणे तोंड दिले.भगवतीचरण यांनी लिहिलेल्या ‘नौजवान भारत सभा घोषणापत्र’या पुस्तिकेत अखेरच्या परिच्छेदात त्यांनी लिहिले आहे... ‘मागे राहून काम करणाऱ्या हजारो स्त्री-पुरुषांच्या बलिदानाची राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी गरज आहे. आपले ध्येय आणि आपला देश यांना आपले आणि आपल्या प्रियजनांचं जीवन यापेक्षा श्रेष्ठ मानणारे ते लोक असतील.’

भगवतीचरण हे असेच अबोल क्रांतिकारक होते. ‘बम का दर्शन’या लेखामध्ये क्रांतिकारकांचा उद्देश आणि भावी समाजाच्या रूपरेषेविषयीची त्यांची कल्पना भगवतीचरण यांनी सुस्पष्टपणे मांडली आहे. रावी काठच्या जंगलात बाँबची चाचणी घेण्यासाठी केलेल्या स्फोटामध्ये भगवतीचरण वोहरा मरण पावले. त्यांचीअंत्ययात्राही काढणे शक्य झाले नाही. या क्रांतिकारकाच्या शवाचे अखेरचे दर्शनही त्यांच्या पत्नी दुर्गाभाभी यांना घेता आले नाही.

शिव वर्मा यांच्या ‘संस्मृतिया’या पुस्तकाचा सुंदर अनुवाद करणाऱ्या चित्रा बेडेकर यांना मन:पूर्वक धन्यवाद.

स्मरणचित्रे क्रांतिकारी शहीदांची 
लेखक : शिव वर्मा
अनुवाद : चित्रा बेडेकर
प्रकाशक : जनशक्ती प्रकाशन, वरळी, मुंबई
,मूल्य : 100/- रुपये 

Tags: टुर्जेनेव्ह बर्नार्ड शॉ अप्टन सिंक्लेर चार्लस् डिकन्स क्रांतिकारक कृतिशील विचारवंत चित्रा बेडेकर दत्ता देसाई ग प्र प्रधान लेखसंग्रह भगतसिंग weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके