डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भागवत आणि मी लिहिलेले पुस्तक

अखेर ’जयको’ या प्रकाशकांनी ते प्रसिद्ध करण्याचे मान्य केले. मात्र त्यांनी आम्हांला मूळ पुस्तकाचा अर्धा भाग गाळायला सांगितला. आम्ही ते नाकारले. तरी अखेर मूळ लेखनाचा एकतृतीयांश भाग गाळावा लागला. प्रकाशकांनी पृष्ठ मर्यादा ठरवली असल्यामुळे टाईप बारीक वापरावा लागला. बक्षीस मिळण्यास आणि पुस्तक प्रसिद्ध होण्यास झालेल्या विलंबामुळे आम्हा दोघांचा विरस झाला.

1954 साली आम्ही दोघांनी मिळून लोकमान्य टिळकांचे इंग्रजी चरित्र लिहायचे ठरवले. बाळ भागवतची त्या वेळी सांगलीला विलिंग्डन कॉलेजमध्ये बदली झाली होती. आम्ही दर महिन्याला भेटत असू. त्याचप्रमाणे आम्ही दोघेही मिळून आचार्य जावडेकरांकडे मार्गदर्शनासाठी जात असू. बरेचसे वाचन झाल्यावर टिपणे काढून चर्चा केल्यावर आम्ही दोघांनी टिळकांच्या चरित्राचे वेगवेगळे कालखंड निवडून त्यावर लिहावयास सुरुवात केली. मी भराभरा भावनेच्या आवेगात लिहीत असे. भागवत चिकित्सकपणे लिही. आम्ही एकमेकांनी लिहिलेला मजकूर तपासून त्यावर चर्चा करून सुधारणा करीत असू. सुट्टीच्या काळात बाळ पुण्याला येऊन राहत असे. त्याच वेळी मुख्यतः लेखनावरील परिष्करणाचे काम होई. अखेर 1955 सालच्या शेवटी आमचे लेखन पुरे झाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 1956 मधील लोकमान्य टिळक जन्मशताब्दी निमित्त लो. टिळकांच्या इंग्रजी चरित्रास दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आम्ही या स्पर्धेसाठी आमचे पुस्तक सादर केले. स्पर्धेचा निकाल जन्मशताब्दी वर्ष संपल्यानंतर एक वर्षाने म्हणजे 1957 मध्ये जाहीर झाला. शि. ल. करंदीकर, त्र्यं. वि. पर्वते आणि भागवत व मी यांनी लिहिलेल्या तीन टिळक-चरित्रांमध्ये बक्षीस विभागून देण्यात आले. जन्मशताब्दीच्या वेळी करंदीकर आणि पर्वते यांनी त्यांची पुस्तके प्रसिद्ध केली. त्या शिवाय केन्द्रातील मंत्री डी. पी. करमरकर, केसरीचे लंडनमधील प्रतिनिधी ताह्मणकर यांनी लिहिलेली इंग्रजी चरित्रेही प्रसिद्ध झाली. त्यामुळे बक्षीस मिळूनही आमचे पुस्तक काहीसे मागे पडले. अखेर ’जयको’ या प्रकाशकांनी ते प्रसिद्ध करण्याचे मान्य केले. मात्र त्यांनी आम्हांला मूळ पुस्तकाचा अर्धा भाग गाळायला सांगितला. आम्ही ते नाकारले. तरी अखेर मूळ लेखनाचा एकतृतीयांश भाग गाळावा लागला. प्रकाशकांनी पृष्ठ मर्यादा ठरवली असल्यामुळे टाईप बारीक वापरावा लागला. बक्षीस मिळण्यास आणि पुस्तक प्रसिद्ध होण्यास झालेल्या विलंबामुळे आम्हा दोघांचा विरस झाला. त्यातल्या त्यात भाग्याची गोष्ट म्हणजे फर्गसन कॉलेजमधील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक एन. जी. दामले यांनी शब्द टाकल्यामुळे त्या वेळचे उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी आमच्या पुस्तकाला छोटीशी प्रस्तावना लिहिली.

(2004 मध्ये  साधना प्रकाशनाकडून आलेल्या ‘माझी वाटचाल’ या पुस्तकातील उतारा)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके