डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'आपट्याचं पान' - चरित्रात्मक कादंबरी आणि राजकीय व सामाजिक जीवनाचा आलेख

डॉ.अरुण मांडे यांनी 'आपट्याचं पान' या चरित्रात्मक कादंबरी मध्ये जानकीबाई आपटे यांचे कार्य हा केंद्रबिंदू ठेवला आहे आणि त्याचवेळी तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचेही सुस्पष्ट चित्र रेखाटले आहे. १९३० ते १९५४ या कालखंडातील अहमदनगरमधील महाराष्ट्रातील आणि भारतातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जानकीबाईंची व्यक्तिरेखा फार उठावदार झाली आहे. डॉ.मांडे यांची शैली कादंबरीच्या आशयाला अनुरूप आहे. एक चरित्रात्मक कादंबरी आणि एक राजकीय-सामाजिक जीवनाचा आलेख
असे 'आपट्याचे पान'चा पुस्तकाचे स्वरूप आहे आणि ते अतिशय हृद्य आहे.
 

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये लोकमान्य टिळकांच्या काळापासून ते गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळेपर्यंत अहमदनगर हे एक महत्त्वाचे केंद्र होते. जानकीबाई आपटे यांनी १९३० साली स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्या झुंजार स्वातंत्र्यसैनिक आणि असामान्य विधायक कार्यकर्त्या होत्या. जानकीबाई आपटे यांचे चरित्र त्यांचे चिरंजीव श्री.भालचंद्र प. आपटे यांनी लिहिले असून मी ते वाचले आहे. १९४२ सालापासून मी जानकीबाईंना ओळखत होतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५४ पर्यंत त्यांनी केलेले विधायक काम मी जवळून पाहिले आहे. जानकीबाईंच्या जीवनावर डॉ.अरुण मांडे यांनी प्रदीर्घ ६४३ पृष्ठांची चरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे. ती कादंबरी वाचल्यावर तिचा थोडक्यात परिचय करून दिल्यास अनेक वाचक ती वाचतील असे वाटल्यामुळेच मी हा लेख लिहीत आहे.

जानकीबाई आपटे यांच्या जीवनावरील या कादंबरीला, लेखक डॉ.अरुण मांडे यांनी 'आपट्याचं पान' हे कादंबरीच्या आशयाला अनुरूप असे शीर्षक दिलेले आहे. कादंबरीच्या प्रस्तावनेत डॉ.र.बा.मंचरकर या थोर समीक्षकांनी लिहिल्याप्रमाणे 'आपट्याचं पान' ही गांधीयुगाच्या चैतन्याने भारलेली आणि ध्येयवादाच्या स्फुरणाने तेजोमय झालेली कादंबरी आहे.'

जानकीबाईंचा जन्म एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. दहाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांना पाच मुले झाली. शिवणकाम करीत त्यांनी स्वत:चा गरिबीचा संसार सावरला. तीस वर्षापर्यंतचे त्यांचे आयुष्य संसार करणारी गृहिणी म्हणूनच गेले. परंतु देशातील राजकीय वातावरणात त्यांच्या मनात देशसेवेची ठिणगी पडली आणि त्यांचे सर्व जीवनच बदलून गेले. ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोर येथे पं.जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव एकमताने मंजूर झाला आणि त्यानंतर पं.नेहरूंनी २६ जानेवारी हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्याचे सर्व भारतीयांना आवाहन केले. त्याप्रमाणे २६ जानेवारी १९३० रोजी अहमदनगर येथे झेंडावंदन आणि जाहीर सभेचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्या सभेत कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे अत्यंत स्फूर्तिदायी भाषण झाले. त्या म्हणाल्या, 'स्त्रियांनी आता चार भिंतीच्या बाहेर पडले पाहिजे' कमलादेवी च्या त्या शब्दांनी जानकीबाईंच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. रावसाहेब आणि अच्युतराव या पटवर्धन बंधूंच्यामुळे त्या म.गांधींच्या विचाराकडे आणि स्वातंत्र्य चळवळीकडे आकृष्ट झाल्या आणि तोपर्यंत गृहिणी म्हणून संसार करणाऱ्या जानकीबाईंचे जीवनच आमूलाग्र बदलून गेले. त्या स्वातंत्र्यलढ्यात सामील झाल्या.

या कादंबरीमध्ये लेखकाने पूर्वार्धात १९३०-३२ सालच्या स्वातंत्र्य चळवळीचे चित्र अत्यंत प्रभावीपणे रेखाटले आहे. लाठीमार, गोळीबार असे ब्रिटिशांचे अत्याचार, त्या अत्याचारांना निर्भयपणे तोंड देणारे नेते व त्यांचे अनुयायी, हे सर्व रोमहर्षक वर्णन वाचताना वाचकाला स्वातंत्र्य लढ्याच्या त्या कालखंडाचे वास्तव दर्शन होते. सत्याग्रहींचे धीरोदात्त वागणे, बायकांनी आणि मुलांनीही त्यांना दिलेली साथ, प्रभातफेऱ्या, दारूच्या दुकानावरचे पिकेटिंग, गुप्तपणे बुलेटिन छापणे व वाटणे हा सारा तपशील लेखकाने अत्यंत चित्तवेधक पणे सांगितले आहे. मुख्यतः जानकीबाई आपटे यांच्या कार्याचे वर्णन करून स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामान्यांचे असामान्यत्व कसे प्रगट झाले याचे या कादंबरीत डॉ.मांडे यांनी अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण केले आहे.

जानकीबाईंचे पती तात्या हे एक अगदी सामान्य गृहस्थ होते. जानकीबाईंच्या तुलनेत तर ते कर्तृत्वशून्य वाटतात, परंतु ते मनाने फार मोठे होते. जानकीबाईंचे गुण, त्यांचे कर्तृत्व यांचा तात्यांना अभिमान वाटे. तात्या आणि जानकीबाई यांच्या

स्वभावात फरक असला तरी त्यांची मने एकमेकांना जोडलेले, मिळालेली होती. डॉ.अरुण मांडे यांनी या कादंबरीत तात्यांच्या टिपणवहीचा निवेदनाचे माध्यम म्हणून फार कौशल्याने उपयोग केलेला आहे. या टिपणवहीतील टिपणांमधून तात्यांचे साधेसुधे व्यक्तिमत्त्व प्रगट होते आणि जानकीबाईंच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश पडतो. जानकीबाई स्वातंत्र्य चळवळीत आणि समाजात काम करू लागल्या. त्यावेळी त्यांनी त्यांचा कधीही तेजोभंग केला नाही. जानकीबाईंना जे काम करायचे होते ते करण्यास तात्यांनी त्यांना मुभा दिली, इतकेच नाही तर त्यांना पाठिंबाही दिला. टिपणवहीत तात्यांनी जानकीबाईंचे जिव्हाळ्याने वर्णन केले आहे. या वर्णनातून तात्यांच्या आणि जानकीबाईंच्या भावजीवनाची आपल्याला कल्पना येते.

जानकीबाई आपटे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा होत गेला, म.गांधींचे विचार त्यांनी कसे आत्मसात केले, भोवतालच्या परिस्थितीचे त्यांचे आकलन कसे परिपक्व होत गेले हे डॉ.मांडे यांनी अनेक प्रसंगांतून दाखविले आहे. जानकीबाईंच्या मनात एखादा विचार निश्चित झाला की भोवतालच्या स्त्रियांना बरोबर घेऊन त्या विचाराची कार्यवाही करावयाची अशी त्यांची कार्यपद्धती होती. त्या संघटनेचे महत्त्व जाणत आणि अत्यंत कुशलतेने संघटना आणि संस्था उभ्या करीत. त्यांना असे मनोमन वाटले की नगरमधील भगिनींची एक संस्था असली पाहिजे. त्यांनी हा विचार त्यांच्या सहकारी सुशिलाबाई यांच्याजवळ बोलून दाखविला. या संस्थेत जाती, धर्म अशी बंधने न ठेवता सर्व स्त्रियांना घ्यावयाचे हा विचार जानकीबाईंनी मांडला. तेव्हा सुशिलाबाई म्हणाल्या, 'आपल्या बायकांना पटेल का हा विचार?' यावर जानकीबाई म्हणाल्या, तुम्हाला पटतो ना हा विचार? मग आपण दोघी सुरुवात करू. आपला विचार आपण इतरांना पटवून देऊ शकू असा आत्मविश्वास जानकीबाईंना होता. आपण स्वतःच्या विचारांप्रमाणे वागू लागलो की इतरांना तो हळूहळू पटू लागतो असे जानकीबाईंना वाटे. हिंद सेविका समाज ही संस्था स्थापन करण्याच्या त्यांच्या निर्णयातून हे समजून येते. जात, धर्म न पाळता सर्व स्त्रियांना या संस्थेत प्रवेश द्यायचा, हा जानकीबाईंचा विचार त्या काळात अपूर्वच होता. संस्थेचे नाव जानकीबाईंनी कसे सुचविले हेही या संभाषणातून आपल्याला समजते. 

जानकीबाईंच्या मनावर म.गांधींच्या शिकवणुकीचा फार खोलवर परिणाम झाला. त्या वैतागवाडी' या हरिजन वस्तीत जाऊन काम करू लागल्या. या कामाबद्दल रावसाहेब पटवर्धन यांनी गौरवोद्गार काढले होते. काही प्रसंग वाचताना जानकीबाईंच्या धैर्याचे आपल्याला आश्चर्य वाटते.

जानकीबाई वैतागवाडीत गेल्या असताना एका घरासमोर प्रेत तिरडीवर ठेवलेले होते. तीन माणसे खांदा देण्यासाठी आली होती, परंतु ती मृत व्यक्ती मातंग असल्यामुळे बाकीचे लोक बाजूला उभे होते. जानकीबाईंनी हे ऐकल्यावर त्या संतापून म्हणाल्या, 'मेलेल्या माणसाची कसली आली आहे जात-पात? कोणी येत नसेल तर मी खांदा द्यायला येते.' असे म्हणून त्या पुढे सरसावल्या तेव्हा एकजण पुढे आला आणि म्हणाला, 'बाई, मी खांदा देतो.' या प्रसंगाचे अगदी साधे सरळ वर्णन डॉ.मांडे यांनी केले आहे आणि त्यातूनच जानकीबाईंची खरी ओळख होते. जानकीबाई आपटे यांनी दलित आणि मुस्लिम स्त्रियांमध्ये आपुलकी निर्माण करून त्यांचेही सहकार्य विधायक कामामध्ये मिळाले. वैतागवाडी हरिजन मुलांना गोळा करून त्यांच्या डोक्यातील उवा काढणाऱ्या जानकीबाईंनी तेथे शाळा कशी सुरू केली याचे फार सुंदर चित्रण लेखकाने केलेले आहे.

जानकीबाई वैयक्तिक सत्याग्रहात येरवडा तुरुंगात असताना तेथे त्यांना फातिमा तय्यबजी घेतल्या. तुरुंगातील या दोघींच्या भेटीचे वर्णन बहारीचे आहे. १९४२ च्या चळवळीतील अनेक प्रसंगांचे डॉ.मांडे यांनी जे वर्णन केले आहे त्यातून त्या कालखंडाचे स्वरूप वाचकाला समजून येते. अशा वादळी कालखंडामध्ये जानकीबाई किती निर्धाराने आणि धैर्याने वागल्या हेही डॉ.मांडे यांनी चित्रीत केले आहे.

२३ नोव्हेंबर १९४३ ला हिंद सेविका संघाच्या बालिकाश्रमाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष थोर गांधीवादी ठक्करबाप्पा हे आले होते, त्या प्रसंगाचे तिसाव्या प्रकरणातील वर्णन बहारीचे आहे.

म.गांधींच्या हत्येनंतर नगरमध्ये तणावाचे वातावरण होते. सात दिवसांनी कप उठल्यावर रावसाहेब पटवर्धन आणि अन्य नेत्यांनी मूक मिरवणूक काढली. त्यावेळी प्रकृती बरी नसतानाही जानकीबाई मिरवणुकीत सामील झाल्या. साने गुरुजींनी ज्यावेळी जानकीबाईंनी चालविलेल्या बालिकाश्रमास भेट दिली त्यावेळी साने गुरुजींनी लिहिलेला अभिप्राय डॉ.मांडे यांनी शब्दशः उद्धृत केला आहे. जानकीबाईंना ज्या कठीण प्रसंगातून जावे लागले त्यांचीही डॉ.मांडे यांनी सुव्यवस्थित मांडणी केली आहे. उपसंहार या प्रकरणात जानकीबाईंच्या निधन प्रसंगाचे जे रेखीव वर्णन आहे ते वाचताना डोळे पाणावतात. 

डॉ.अरुण मांडे यांनी 'आपट्याचे पान या चरित्रात्मक कादंबरी मध्ये जानकीबाई आपटे यांचे कार्य हा केंद्रबिंदू ठेवला आहे आणि त्याचवेळी तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचेही सुस्पष्ट चित्र रेखाटले आहे. १९३० ते १९५४ या कालखंडातील अहमदनगरमधील महाराष्ट्रातील आणि भारतातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जानकीबाईंची व्यक्तिरेखा फार उठावदार झाली आहे. डॉ.मांडे यांची शैली कादंबरीच्या आशयाला अनुरूप आहे. एक चरित्रात्मक कादंबरी आणि एक राजकीय-सामाजिक जीवनाचा आलेख असे 'आपट्याचं पानचा पुस्तकाचे स्वरूप आहे आणि ते अतिशय हृद्य आहे.

Tags: जानकीबाई आपटे आपट्याचे पान डॉ.अरुण मांडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके