डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ज्ञानाच्या जागतिकीकरणाच्या स्वरूपासंबंधीचे सत्यशोधन

जगामध्ये उत्पादन साधनांची तसेच उपभोगाच्या वस्तूंची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींच्याकडे वा संस्थांच्याकडे असू शकते. परंतु जगातील ज्ञानावर, कलांवर सर्व मानव जातीचा हक्क आहे असे आपण मानत होतो. एकोणीसाव्या शतकापर्यंत प्रत्यक्षात जरी काही शाखांतील ज्ञान काही जणांनाच उपलब्ध असले, अगर लोककला एखाद्या प्रदेशापुरत्या वा लोक समुदायापुरत्याचे मर्यादित असल्या, तरी त्या ज्ञानावर आणि कलांवर कोणाचीही मालकी असण्याचे कारण नाही, जीवन संपन्न करणारे ज्ञान व कला या सर्वांच्या आहेत; सर्वांच्या असल्या पाहिजेत, असे सर्वसाधारणपणे मानले जात होते.

गेल्या काही वर्षांमध्ये जगातील अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण होत आहे. काही जणांच्या मते ते झालेले आहे. विसाव्या शतकात विनाशकारक शस्त्रास्त्रांचे स्वरूप आमूलाग्र बदलल्यानंतर राष्ट्रांच्या सीमांना अर्थ उरलेला नाही. जगात कोठेही होणारे उत्पादन आता अन्यत्र सहज उपलब्ध होऊ लागले आहे. दूरदर्शन या माध्यमामुळे आणि गेल्या काही वर्षांत माहिती-तंत्रज्ञानात जे क्रांतिकारक बदल झाले आहेत, त्यांच्यामुळे आधुनिक जगातील माणसांची जीवनशैली बदलली असून सांस्कृतिक देवाण-घेवाण आता सुलभतेने होऊ लागली आहे. या मूलभूत बदलांचा परिणाम वेगवेगळ्या मानव समूहांच्यावर वेगवेगळा होत आहे. या परिणामांचे स्वरूप आज तरी फार गुंतागुंतीचे आहे. या संदर्भात ज्ञानाच्या जागतिकीकरणाला सामोरे कसे जावे, यासंबंधी विचारवंतांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. याविषयी डॉ.अशोक केळकर यांनी 'इंडियन फिलॉसॉफिकल कार्टर्ली' या त्रैमासिकात जो निबंध लिहिला आहे. त्यातील विचारांचा सुलभ रीतीने परिचय करून देण्याचा मी या लेखात प्रयत्न करणार आहे.

जगामध्ये उत्पादन साधनांची तसेच उपभोगाच्या वस्तूंची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींच्याकडे वा संस्थांच्याकडे असू शकते. परंतु जगातील ज्ञानावर, कलांवर सर्व मानव जातीचा हक्क आहे असे आपण मानत होतो. एकोणीसाव्या शतकापर्यंत प्रत्यक्षात जरी काही शाखांतील ज्ञान काही जणांनाच उपलब्ध असले, अगर लोककला एखाद्या प्रदेशापुरत्या वा लोक समुदायापुरत्याचे मर्यादित असल्या, तरी त्या ज्ञानावर आणि कलांवर कोणाचीही मालकी असण्याचे कारण नाही, जीवन संपन्न करणारे ज्ञान व कला या सर्वांच्या आहेत; सर्वांच्या असल्या पाहिजेत, असे सर्वसाधारणपणे मानले जात होते. डॉ.केळकर यांनी असे त्यांच्या निबंधाच्या सुरुवातीस म्हटले आहे की, विविध स्वरूपाच्या ज्ञानपद्धतींचा योग्य रीतीने मेळ कसा घालावा, या समस्येला मानवी संस्कृतीच्या वाटचालीत आज आपण प्रथमच सामोरे जात आहोत. या पूर्वी माणसांच्या विविध प्रकारच्या श्रद्धांचा मेळ कसा घालावा ही समस्या मानवी समाजाने काही प्रमाणात हाताळली होती. या श्रद्धांचे स्वरूपही दोन वेगवेगळ्या त-हेचे होते. एका बाजूला अनेक धर्म होते आणि दुसरीकडे ईश्वरनिष्ठ धर्मापेक्षा वेगळा आशय असलेला बौद्ध धर्म, कन्फ्युशिअसने सांगितलेल्या सत्याच्या स्वरूपाची विविधता मान्य करणारा सहिष्णू धर्म, मार्क्सचा द्वंद्वात्मक ऐतिहासिक भौतिकवाद अशा सेक्युलर विचारधारा होत्या. इस्लामच्या एकेश्वरी भूमिकेमुळे त्या धर्माच्या श्रद्धेपासून थोडेही विचलित होणे म्हणजे परमेश्वराशीच द्रोह आहे, ते पाखंड आहे, असे मानले जात होते. मार्क्सवादातही वैचारिक शुद्धतेपासून बाजूला जाणे हा प्रमादच मानला जाई. यांच्याविरुद्ध असलेला प्रवाह हा जैन धर्मामधील अनेकान्त वाद, स्याद वाद हा होता. त्यांच्यामध्ये ज्ञान हे बहुविध असल्यामुळे व्यक्तींच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात, अशी बौद्धिक अहिंसावादी भूमिका घेतलेली होती. याचेच थोडे वेगळे स्वरूप युरोपातील बौद्धिक प्रगल्मतेतील सहिष्णुतेत व्यक्त होत होते. काही काळानंतर जगातील निरनिराळ्या भाषांतून व्यक्त झालेल्या सांस्कृतिक बहुविधतेची जाणीव झाल्यावर युरोपमधील विचारवंत तुलनात्मक पद्धतीचा वापर करू लागले. प्रथम बनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र यांच्यामध्ये या तुलनात्मक पद्धतीचा अवलंब करून नंतर ती धर्म, साहित्य, कला यांच्या बाबतीत आणि अखेरीस तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही अवलंबिली गेली. मात्र हे करताना नैसर्गिक बहुविधतेपासून आपण वैचारिक व बौद्धिक बहुविधतेकडे जात आहोत याची संपूर्ण जाणीव युरोपियन समाजास झालेली नव्हती. अगदी अलीकडच्या काळापर्यंत विविध शाखांतील समाजात उपलब्ध असलेले बहुविध स्वरूपाचे ज्ञान खोलवर हाताळण्याचा अनुभव मानवाला आलेला नव्हता. एक संस्कृती दुसऱ्या संस्कृतीतील उपयुक्त वाटणाऱ्या गोष्टी सहजतेने स्वीकारीत होती. नंतर मात्र राजकीय क्षेत्रात विजयी झालेली आणि आर्थिक क्षेत्रात वरचढ झालेली युरोपियन राष्ट्रे सर्वच क्षेत्रांमध्ये आक्रमक व अहंकारी बनली. 

'जगातील काळ्या लोकांना सुधारणे हे गोऱ्या माणसावर येऊन पडलेले ओझे आहे, अशा उद्धट भूमिकेतून ही आक्रमकता व्यक्त होऊ लागली. युरोपातील. शास्त्रीय ज्ञान व तत्त्वज्ञान हेच श्रेष्ठ ज्ञान आहे, असे युरोपियन राष्ट्रे मानू लागली. अन्य देशांतील भिन्न संस्कृती हीदेखील मानवी जीवन संपन्न करणारी आहे, याचे भानही साम्राज्यवादी युरोपियन राष्ट्रांना उरले नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर राजकीय क्षेत्रातील त्यांचे वर्चस्व संपले आणि साम्राज्ये विलयाला गेली. तरी आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे आणि विनाशकारी शस्त्रांची मालकी असल्यामुळे उत्तरेकडील अमेरिका आणि युरोप खंडातील सधन देश आशिया आणि आफ्रिका खंडातील विकसनशील आणि अविकसित देशांकडे, आपल्या पक्क्या मालाची बाजारपेठ आणि स्वस्त मजुरी उपलब्ध असलेले देश म्हणून तुच्छतेने पाहत होते व आजही पाहत असतात. ही उत्तर-दक्षिणेतील सधन आणि निर्धनतेतील दरी ज्ञानाच्या क्षेत्रातही आहे आणि असली पाहिजे असे अमेरिका आणि अन्य सधन युरोपियन देश मानत असतात. आर्थिक साम्राज्यवादाचा आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सामर्थ्याचा अहंकार ज्ञानाच्या क्षेत्रातही उन्मत्तपणे होत असतो. याला एक सन्माननीय अपवाद म्हणून डॉ.अशोक केळकर यांनी 'बॉहट्लंघ' या भाषाशास्त्रज्ञाचा उल्लेख केला आहे. त्यांनी सायबेरियातील भाषेचे विश्लेषण करताना पाणिनीची रीत आदर्श म्हणून स्वीकारली होती. अमेरिका आणि युरोपातील सधन राष्ट्रांच्या या बौद्धिक आक्रमकतेची प्रतिक्रिया म्हणजे दक्षिणेकडील काही देश या उत्तरेकडील राष्ट्रांमध्ये उपलब्ध असलेल्या ज्ञानाकडे शोषणाचे एक भीषण साधन म्हणून तरी पाहू लागली; अगर काही राष्ट्रांनी या आधुनिक ज्ञानाबद्दल कमालीची अनास्था. तरी दाखविली. ज्ञानाच्या क्षेत्रातील सधन राष्ट्रांतील व गरीब देशांतील या दोनहीं प्रवृत्ती अनिष्ट आहेत. या दोन्ही टोकाच्या चुकीच्या भूमिका सोडून आजच्या जगातील ज्ञानवंतांच्या पिढीने विविध ज्ञानशाखांमधील वेगवेगळ्या ज्ञानाच्या पद्धती योग्य रीतीने कशा हाताळावयाच्या याची आखणी करणे आवश्यक आहे. असे डॉ.अशोक केळकर यांचे प्रतिपादन आहे. डॉ.केळकर यांच्या मते जगातील ज्ञानवंतांनी यासाठी पुढील तीन गोष्टी केल्या पाहिजेत. 1. वेगवेगळ्या ज्ञानशाखांचे स्वरूप नीट समजून घेणे. 2. ज्ञानशासखांतील विविधता आणि परस्परपूरकता यांतील फरक समजून घेणे. 3. ज्ञानक्षेत्रातील बहुविध ज्ञानावी नीट आखणी करून त्याच्या साहाय्याने जाणतेपणाने, प्रगल्भपणे वाटचाल कशी करता येईल आणि मानवाला श्रेयस कसे मिळेल ते पाहणे. ही प्रक्रिया आजवर थोडीफार सुरूच आहे. या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्याकडे जग जात आहे, याकडे डॉ.अशोक केळकर यांनी लक्ष वेधले आहे.

ज्ञान आणि श्रद्धा ही दोन क्षेत्रे भिन्न असली तरी त्यांना एकमेकांपासून अलग करणे मात्र शक्य नाही. श्रद्धेच्या क्षेत्रात बहुविधता स्वीकारलेली असते. तरीदेखील इतरांना आपली श्रद्धा मान्य होईल अशी आशा श्रद्धावानांना वाटत असते. ज्ञानाच्या क्षेत्रात मात्र अधिकाधिक काटेकोरपणा यावा आणि विविधतेच्या नावाखाली वाढणारा विस्कळीतपणा संपावा हीच मुख्य प्रवृत्ती आढळून येते. या दोन क्षेत्रांमध्ये अशी भिन्नता असूनही ज्ञान विकसित करण्याच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती आणि वेगवेगळ्या समाजांच्या विविध श्रद्धा यांच्या एकीकरणातूनच मानवाचा जीवनविषयक दृष्टिकोन घडत असतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असे डॉ.अशोक केळकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

ज्ञानाचे विश्लेषण करून त्याची सुसूत्र मांडणी करता येते. विविध ज्ञानशाखांतील वेगवेगळ्या पद्धतींचे आलोचन व विश्लेषण केल्यानंतर आजच्या काळासाठी कोणती भूमिका घेणे योग्य ठरेल, याचे विवेचन करताना डॉ.अशोक केळकर यांनी पुढील तीन पद्धतींचा उल्लेख केला आहे. 1. अनाग्रही- अराजकवादी- यामध्ये हवा तितका लवचिकपणा असतो. 2. अत्याग्रही- एकांतिकवादी- यामध्ये लवचिकपणा यत्किंचितही नसतो. 3. मिताग्रही- सापेक्षतावादी- ही पद्धती मध्यममार्गी आहे. त्यामुळे संयमपूर्ण नेमस्त प्रवृत्तीची वाढ होते.

मुख्य समस्या आज जे ज्ञान उपलब्ध आहे, त्यातून समाजाला उपकारक ठरेल अशी पद्धती निर्माण करून तिचा स्वीकार कसा करावयाचा आणि योग्य दिशेने वाटचाल कशी सुरू करावयाची याचा निर्णय घेण्याबाबतची आहे.

भाग दोन तत्त्वज्ञांची जबाबदारी 

तत्त्वज्ञान ही सर्वश्रेष्ठ ज्ञानशाखा आहे. आज जगात जे प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे, ते एकत्र करून आणि ज्या विविध श्रद्धापद्धती वेगवेगळे मानवसमूह पवित्र मानतात त्यांच्यातील संघर्ष टाळून मानवी जीवन सुखी, समाधानी आणि संपन्न कसे करावे याचा मार्ग, तत्त्वज्ञानाचा दीर्घकाळ व्यासंग केलेल्या ज्ञानवंतांनीच शोधून काढला पाहिजे. डॉ.अशोक केळकर यांनी हा मार्ग कसा शोधावा लागेल याचे उदाहरण म्हणून भारतातील पारंपरिक मानसशास्त्र आणि सध्याचे युरोपातील मानसशास्त्र या दोन ज्ञानशाखांचे सूक्ष्म व मूलग्राही विश्लेषण केले आहे. भारतीय मानसशास्त्रामध्ये मानवी मनाच्या सृजनशीलतेचा विचार करताना प्रज्ञा आणि प्रतिभा या संकल्पना मांडण्यात आल्या ही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी होती असे डॉ.केळकर यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे युरोपमधील मानसशास्त्रज्ञांनी अनुवंशिक ज्ञान आणि संपादित ज्ञान यांतील फरक तसेच व्यक्तीने मिळविलेले ज्ञान आणि समाजाने आत्मसात केलेले ज्ञान यांमधील फरक स्पष्टपणे मांडला आहे, हीदेखील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी आहे असे डॉ.अशोक केळकर यांनी लिहिले आहे.

या प्रदीर्घ विवेचनाच्या शेवटी डॉ.केळकर स्पष्टपणे लिहितात, 'खऱ्याखुऱ्या जागतिक ज्ञानपद्धतीकडे जाणे याचा अर्थ पाश्चात्य ज्ञानपद्धती हीच जागतिक ज्ञानपद्धती आहे, असा टेंभा युरोपियन राष्ट्रांनी मिरविणे हा खासच नाही.' निबंधाच्या शेवटच्या भागाला डॉ.अशोक केळकर यांनी 'ज्ञानाच्या खन्याखुन्या जागतिकीकरणाकडे" (Towards a true globalisation of knowledge) असे सुयोग्य शीर्षक दिले आहे.

सुरुवातीस डॉ.अशोक केळकर यांनी सांगितले आहे की, आपले आजचे पहिले उद्दिष्ट हे ज्ञानशाखांच्या विविधतेचे स्वरूप, राजकीय, सामाजिक, वांशिक आदींच्या संदर्भात समजून घेऊन त्या ज्ञानाची आजच्या काळाला अनुरूप अशी नीट मांडणी करणे हे आहे. परंतु आपले अंतिम उद्दिष्ट यापेक्षा व्यापक आहे. असे सांगून डॉ.केळकर यांनी लिहिले आहे की, आपले अंतिम साध्य म्हणजे जागतिकीकरणाच्या व्यापक प्रवाहात जागतिक ज्ञानपद्धती अस्तित्वात याबी हे असून त्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्प जगातील ज्ञानवंतांनी विशेषतः तत्त्वज्ञांनी हाती घेतला पाहिजे. सुरुवातीस अशा प्रकल्पाची शक्यता किती आहे हेही अजमावून पाहिले पाहिजे, असे डॉ.केळकर यांना वाटते.

ज्ञानाच्या खन्या-खुन्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत केवळ वस्तुस्थिती निदर्शक सत्ये आणि ज्ञान मिळविण्याची कौशल्ये यांचे एकत्रीकरण करून चालणार नाही. या प्रक्रियेतून मानवी जीवनाचे सम्यक स्वरूप ज्यांच्यामुळे समजते असे सूक्ष्म खोलवरचे ज्ञान आणि सत्यशोधनाच्या प्रवृत्ती यांना एकत्र आणले गेले पाहिजे, हे डॉ केळकर यांनी स्पष्टपणे मांडले आहे. अशा प्रयत्नांची सुरुवात एका बाजूला जोसेफ नीडहॅम यांच्या Science and Civilization in China या ग्रंथातून आणि दुसऱ्या बाजूला जॉन हॉफमन यांच्या Encyclopaedia mundarica या ग्रंथातून झाली आहे असे डॉ.केळकर यांनी सांगितले आहे. युरोपियन राष्ट्रांकडे चिकित्सक दृष्टीने पाहणाऱ्या अन्य देशांतील ज्ञानोपासकांनीही असे कार्य केले पाहिजे हे सांगून डॉ.अशोक केळकरांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, भारतात सेंटर फॉर युरोपियन स्टडीज' सुरू करणे अत्यावश्यक आहे. सर्व देशांतील ज्ञानोपासकांनी परस्परांच्या देशांतील संस्कृतीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण ग्रंथांची भाषांतरे करणे, वेगवेगळ्या ज्ञानपद्धतींचा तौलनिक अभ्यास करणे अशी कामे सतत केली पाहिजेत. अशा प्रयत्नांतूनच ज्ञानाच्या जागतिकीकरणासाठी आवश्यक असलेला प्रकल्प एका शतकात साध्य होऊ शकेल. असा प्रकल्प निर्माण करण्याच्या प्रक्रियेत ज्ञाननिर्मितीचा उद्योग हळूहळू विकेंद्रित होऊ लागेल. आज युरोपियन देशांमध्ये या ज्ञानाच्या उद्योगात जे प्रचंड भांडवल गुंतवून केंद्रीकरण करण्यात आले, त्याच्याऐवजी वेगवेगळ्या देशांमध्ये ते सुरू करून या प्रकल्पांमध्ये तरुण ज्ञानोपासकांना अधिकाधिक वाव दिला पाहिजे. त्यानंतरच त्याचे स्वरूप अधिक मानवी बनेल, असे डॉ.केळकर यांनी सांगितले आहे. ज्ञानाच्या पद्धतीच्या विविधतेचे आकलन होण्यासाठी विविध श्रद्धा, पद्धती आणि वेगवेगळ्या जीवनशैली यांच्या संदर्भात या ज्ञानपद्धतींचा सांगोपांग विचार करावा लागेल आणि तो करताना व्यक्ती, समाज आणि संस्कृती यांचे भिन्नत्व हेही लक्षात घ्यावे लागेल असे डॉ.केळकर यांचे प्रतिपादन आहे. विविधतेमुळे जीवन अधिक रंगतदार आणि लज्जतदार होते; इतकेच केवळ न मानता विविधता हे जीवनातील महत्त्वाचे मूल्य आहे हे लक्षात ठेवणे जसरीचे आहे असे डॉ.केळकर यांनी सांगितले असून वेगवेगळे मानवसमूह आपल्या भोवतालच्या परिसराशी आणि समाजाशी जुळवून घेताना वेगवेगळी जीवनशैली स्वीकारीत असतात याकडेही लक्ष वेधले आहे. या संदर्भात त्यांनी लिहिलेला पुढील परिच्छेद मला फार महत्त्वाचा वाटतो. 

"योगदर्शन हा एक भारतीय धारणाव्यूह आहे - चित्तवृत्तीविरोधापासून समाधिरूप भेदविलोपनात परिणत होणारा आदर्शक्रम आणि ज्यात एक कार्यक्रमही आहे- शरीराचे आणि चित्ताचे आणि या दोन्हींना जोडू पाहणाऱ्या प्राणाचे निरनिराळ्या प्रकारे संचालन करण्याचा कार्यक्रम. समाजवाद, अधिक नेमकेपणानं सांगायचे तर लोकशाही समाजवाद हा एक युरोपीय धारणाब्यूह आहे. ज्यात एक आदर्शक्रम आहे, तो पुढीलप्रमाणे... प्रत्येकाकडून त्याच्या कुवतीनुसार समाजाच्या संपत्तीत भर आणि प्रत्येकाकडे त्याच्या गरजेनुसार समाजाच्या संपत्तीचा वाटा. या धारणाव्यूहात एक कार्यक्रमही आहे, ज्यानुसार काही लोकांनी आपल्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त वाटा घेण्याचे थांबवले तर कुणालाही गरजेपेक्षा कितीतरी कमी वाट्यावर भागविण्याची वेळ येणार नाही. त्याचबरोबर काही लोकांनी आपल्या कुवतीपेक्षा कितीतरी कमी काम करायचे थांबवून योग्य तितके काम केले तर कोणावरही कुवतीपेक्षा अधिक काम लावले जाणार नाही... जागतिकीकरणाच्या संथ चालीत हे दोन धारणाच्यूह त्या त्या संस्कृतिविशिष्टतेपलीकडे गेले. बौद्धांच्यामार्फत योग दर्शनातले महत्त्वाचे अंश पूर्ण आशियाभर गेले आणि भारतीय योगशिक्षकांमार्फत काही अंश युरोपीय संस्कृतीत फैलावले; त्याचप्रमाणे लोकशाही समाजवादाचे काही अंश जगाच्या इतर भागांतही गेले. भारतीय संस्कृतीत काहींनी गांधीवादी समाजवाद आणि हिंदू समाजवाद हे संकर जन्माला घातले पण ते कार्यक्रमाच्या अभावी कागदावर राहिले."

केळकरांनी भारतातील आयुर्वेद हा ज्ञानव्यूह आणि डार्विनोत्तर जैविकी हा ज्ञानव्यूह हेही असेच आपापल्या देशाच्या वा खंडाच्या सीमा ओलांडून जगातील अन्य काही भागांत गेले हे दाखविले आहे. केळकरांच्या मते वरील दोन धारणाव्यूह आणि योग व लोकशाही समाजवाद हे दोन ज्ञानव्यूह जगभर जावयास हवे होते. परंतु मानवजात हळूहळू विविधता स्वीकारीत असली तरी त्या मार्गात अनेक अडथळे आहेत हेही डॉ.केळकर यांनी दाखविले आहे.

ज्ञानाच्या जागतिकीकरणाचा आशय मानवी (मेन) असला पाहिजे हे सांगून, तत्त्वज्ञांना या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेऊन मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल असे मत डॉ.केळकर यांनी मांडले. या महत्त्वाच्या निबंधाचा आशय पुढीलप्रमाणे आहे.. "ज्ञानाचे जागतिकीकरण हवे का? हो! मात्र त्याचे स्वरूप पाश्चात्त्यांच्या ज्ञानाच्या क्षेत्रातील वसाहतवाद असे असून कधीही चालणार नाही. मूळ इंग्रजी वाक्य पुढीलप्रमाणे आहे. (टू समपा ग्लोबलायझेशन ? येस्! युरोपियन रीकलोलायझेशन ? नो !)"

(डॉ. अशोक केळकर यांचा लेख 'इंडियन फिलॉसॉफिकल क्वार्टर्ली' एप्रिल-जुलै ओडअंक 2002 मध्ये आहे. डॉ.अशोक केळकर यांचा विस्तृत मराठी लेख 'आजचा सुधारक' फेब्रुवारी 2008 मध्ये प्रसिद्ध होईल.)

Tags: डॉ.अशोक केळकर युरोपियन राष्ट्रे जागतिकीकरण. अर्थव्यवस्था ग. प्र. प्रधान weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके